यु हॅव गॉट मेल (१९९८)
‘शॉप अराउंड द कॉर्नर’- न्यू-यॉर्कमधल्या गजबजलेल्या रस्त्यावरचं लहान मुलांच्या पुस्तकांचं एक छोटसं दुकान, बेचाळीस वर्षं जुनं. आपल्या प्रत्येक वाचकाला आपुलकीनं जोडून ठेवणारं. या दुकानाची मालकीण- कॅथल…
‘शॉप अराउंड द कॉर्नर’- न्यू-यॉर्कमधल्या गजबजलेल्या रस्त्यावरचं लहान मुलांच्या पुस्तकांचं एक छोटसं दुकान, बेचाळीस वर्षं जुनं. आपल्या प्रत्येक वाचकाला आपुलकीनं जोडून ठेवणारं. या दुकानाची मालकीण- कॅथलिन केली. कॅथलिनच्या आईने सुरु केलेल्या या द्कानावर तिचं खूप प्रेम असतंच; पण तिच्या आईच्या मृत्युनंतर त्या दुकानाचं स्थान तिच्या मनामध्ये आणखीनच दृढ होते. कॅथलिन आणि तिचे तीन मदतनीस यांनी चालवलेलं हे छोटसं दुकान हे न्यू-यॉर्कमधल्या कित्येकांचं अत्यंत लाडकं ठिकाण असतं.
कॅथलिन, फ्रँक नावाच्या आपल्या एका जवळच्या मित्रासोबत फ्लॅट शेअर करून रहात असते. वृत्तपत्रांमधून अभ्यासपूर्ण लिखाण करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या फ्रँकचा कॉम्प्यूटर, इंटरनेट अशा गोष्टींना पुष्कळ प्रमाणात विरोध असतो. फ्रँकचं सख्य कीबोर्ड पेक्षा टाईपरायटरशी चांगलं जुळत असतं तर कॅथलिन मात्र या नव्या तंत्रज्ञानाला चांगलीच सरावलेली असते. ए. ओ. एल. नावाच्या एका वेबसाईट वर शॉपगर्ल या नावानं तिचं एक अकाउंट असतं. या अकाउंटच्या माध्यमातून ती 'एनवाय-152' नावाच्या एका माणसाशी बोलतही असते.
पण हा माणूस कोण हे मात्र तिला माहिती नसतं. तिनं त्याला पाहिलेलं नसतं, त्याचा आवाज ऐकलेला नसतो. त्या माणसालाही कॅथलिनबद्दल तिच्या ‘शॉपगर्ल’ या नावापलीकडे काहीच ठाऊक नसतं. पण तरी या संवादाच्या माध्यमातून ते दोघे एकमेकांचे खूप छान मित्र बनतात. आपल्या वैयाक्तीक आयुष्यातल्या अनेक गोष्टी एकमेकांशी विश्वासाने पण एक प्रकारच्या अनोळखीपणाने बोलत असतात, आपल्या आवडीनिवडी सांगत असतात, विचार ऐकवत असतात. आता आपण एकदा समोरासमोर येऊन भेटायला हवं असही त्या दोघानां वाटू लागतं. सारं काही आलबेल चालू असतं. पण...
पण एके दिवशी अचानक ‘फॉक्स बुक्स’ नावाच्या बुकशॉप्सच्या चेनचा मालक- जो फॉक्स- एक प्रचंड श्रीमंत बिझनेसमन- कॅथलिनच्या ‘शॉप अराउंड द कॉर्नर’ पासून थोड्याच अंतरावर ‘फॉक्स बुक्स’ नावाचं पुस्तकांचं एक भलं मोठं दालन उघडतो. अत्यंत आकर्षक सूट उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांसोबत फॉक्स बुक्समध्ये विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध असणारं कॅपचिनो, बसून वाचन करण्यासाठी ऐसपैस जागा आणि अशा पुस्तकांच्या विक्रीसाठी पूरक असणाऱ्या अनेक सुविधा असतात.
या ‘फॉक्स बुक्स’कडे ग्राहक आकर्षित होतातच पण कॅथलिनच्या ‘शॉप अराउंड द कॉर्नर’चे जुने वाचकही तिकडे जाऊ लागतात. कॅथलिनच्या ‘शॉप अराउंड द कॉर्नर’च्या विक्रीवर ‘फॉक्स बुक्स’चा कल्पनपेक्षा जास्तच विपरीत परिणाम होतो आणि आईची शेवटची आठवण असलेलं हे दुकान आता कायमचंच बंद करावं लागेल की काय असा प्रश्न कॅथलिनसमोर उभा राहतो.
या प्रश्नाला ती कशी सामोरी जाते याचा उलगडा होतो टॉम हँक्स आणि मेग रायन अभिनित, बाफ्टा अॅवार्ड विजेत्त्या नोरा एफ्रॉन या दिग्दर्शिकेच्या ‘यु हॅव गॉट मेल (१९९८)’ या अत्यंत सुंदर चित्रपटामध्ये.
‘रॉम-कॉम’ श्रेणीत मोडणाऱ्या ‘यु हॅव गॉट मेल (१९९८)’ या अत्यंत अलगद आणि सहजपणे पुढे सरकत जाणाऱ्या चित्रपटात-
जो फॉक्स आणि कॅथलिन यांची भेट होते का ? एनवाय-152 कोण असतो ? कॅथलिन आणि तो भेटतात का ? फ्रँक आणि कॅथलिनच्या नात्याचं काय होतं ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध अत्यंत संवेदनशीलपाणे पण तेवढ्याच मनोरंजनात्मक पद्धतीने घेतलाय. ‘रॉम-कॉम’ श्रेणीतला कुठलाही चित्रपट पाहताना ज्या प्रतिक्रिया एक प्रेक्षक म्हणून आपण देतो, त्या सगळ्या प्रतिक्रिया इथेही आपल्याकडून दिल्या जातात, पण या चित्रपटातले कित्येक संवाद आपल्या मनावर रंजनाच्या पलीकडे जाऊन एक सखोल असा स्पर्श करून जातात.
शॉपगर्ल आणि एनवाय152 यांच्या संवादाबद्दल ‘शॉपगर्ल’ म्हणजेच कॅथलिन त्यांच्या इमेल मार्फत चालणाऱ्या संवादाचं तिच्या लेखी असणारं महत्व अधोरेखित करताना, एके ठिकाणी म्हणते :
“What will NY152 say today, I wonder. I turn on my computer. I wait impatiently as it connects. I go online, and my breath catches in my chest until I hear three little words: You've got mail. I hear nothing. Not even a sound on the streets of New York, just the beating of my own heart. I have mail. From you.”
-You Have Got Mail (1998)
पुढे एके ठिकाणी ती एनवाय152 याला लिहीते,
“The odd thing about this form of communication is you're more likely to talk about nothing than something. But I just want to say that all this nothing has meant more to me than so many... somethings. So, thanks.”
-You Have Got Mail (1998)
याशिवाय मला आवडलेलं आणखी एक वाक्य जे आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहताना ती स्वत:शीच म्हणते, “कधी कधी मी माझ्या आयुष्याचा विचार करते. माझ्या आयुष्याचा परीघ तसा छोटा आहे. माझ्यासाठी तो मौल्यवान आहें पण छोटा आहे आणि मग मला वाटतं मी हे जे काही करते, ते मी मला आवडतं म्हणून करते की मी माझ्या आयुष्याच्या बाबतीत धाडसी होऊ नाही शकले म्हणून करते ?”
या अशा अनेक अर्थपूर्ण संवादांनी भरलेल्या चित्रपाटामध्ये पार्श्वसंगीताचं संयोजन सुद्धा अत्यंत सुंदर आहे. (निदान मला तरी) कुठेही न खटकणारी पटकथा लाभलेला हा चित्रपट जाता जाता पुस्तकाच्या संदर्भाने येणाऱ्या अनेक गोष्टी, उदाहरणार्थ- पुस्तकाचं आपल्या आयुष्यातलं स्थान; पुस्तकाचं दुकान, त्या दुकानाचा मालक आणि ग्राहक यांच्यामधलं नातं, कॅथलिन आणि जोच्या निमित्तानं स्त्री आणि पुरुष यांच्यामधलं मैत्रीचं आणि प्रेमाचं नातं असे अनेक पैलू अत्यंत हळुवारपणे उलगडत नेतो, पूर्णत्वाला नेतो.
शेवटी एवढंच सांगेन की ही काही चित्रपटाची समीक्षा नव्हे. समीक्षा वगैरे करणं हा प्रांतही नव्हे. अशाच एका कांटाळवाण्या दुपारी आता काय करावं म्हणता म्हणता हा चित्रपट पहायचा मी ठरवला आणि मला तो आवडला. अत्यंत सोपं पण वेगळं कथानक असलेला हाचित्रपट तुम्हीही पहावा असं मला वाटलं. म्हणूनच हा छोटासा खटाटोप.
सो, शक्य झाल्यास नक्की पहा !
-सौरभ राघवेंद्र.