•mr•

व्हेकेशन

व्हेकेशन या शब्दाचं मूळ एका फ्रेंच शब्दात आहे. मला फ्रेंच येत नसल्यानं त्या शब्दाचा उच्चार नेमका कसा करावा हे मला माहिती नाही, पण त्या (फ्रेंच) शब्दाचा अर्थ 'एखादी गोष्ट रिकामी अथवा मोकळी करण…

व्हेकेशन या शब्दाचं मूळ एका फ्रेंच शब्दात आहे. मला फ्रेंच येत नसल्यानं त्या शब्दाचा उच्चार नेमका कसा करावा हे मला माहिती नाही, पण त्या (फ्रेंच) शब्दाचा अर्थ 'एखादी गोष्ट रिकामी अथवा मोकळी करणं' (टू व्हेकेट) असा होतो.

तर मुद्दा असा की व्हेकेशनचा अर्थ जर खरोखरीच आपल्याला समजला, तर 'व्हेकेशन'साठी म्हणून (थोडक्यात, मोकळं व्हायला) कुठे वेगळीकडे जायची गरज उरेल असं मला वाटत नाही. कारण आयुष्यात आपण कुठेही गेलो तरी सगळा गोंधळ आपण आपल्या डोक्यात घेऊनच फिरत असतो. त्या गोंधळात आठवणी असतात, ध्येयाने आणि महत्वाकांक्षेने प्रेरित झालेले विचार असतात, स्वप्नं असतात, पूर्वग्रह असतात, गिल्ट असते, काळजी असते, भीती असते, वगैरे वगैरे. नाही म्हणायला आपली रोजची चौकट ओलांडून आपण एखाद्या वेगळ्या ठिकाणी गेलो, वेगळ्या माणसांत वावरलो किंवा अगदीच एक-दोन पेग रिचवले तर या गोंधळापासून आपण लांब जातो खरे, बट वी डू नॉट व्हेकेट धिस गोंधळ, वी जस्ट एस्केप (फॉर अ व्हाईल.)

त्यामुळे, व्हेकेशन आणि एस्कपेड या दोन्ही शब्दांच्या अर्थामधला फरक आपण समजून घ्यायला हवा असं मला प्रकर्षानं वाटतं. शेवटी एखाद्या गोष्टीपासून पळायचंच असेल तर अवघी आकाशगंगाही थिटी पडेल, पण जर मोकळं व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल तर मात्र जिथे आपण आहोत तिथेच ते होता येतं किंबहुना 'तिथेच' होता येतं.

ज्ञानाने, माहितीने आणि अनुभवाने जड झालेलं मन घेऊन आपण एखादं शिखर सर करून आलो, समुद्राच्या पाण्यात डुंबून आलो, पब मध्ये नाचून आलो किंवा एखाद्या 'मेडिटेशन कॅम्प'मध्ये जाऊन श्वासोच्छ्वासच्या कसरती करून आलो- तरीही या गोष्टींना फारसा अर्थ उरत नाही, मात्र संचिताच्या ओझ्यापासुन मुक्त असणारं मन राहत्या घराच्या खिडकीतून रहदारीने भरलेला साधा रस्ता पाहतं, तेंव्हा त्या निव्वळ पाहण्यातही एक वेगळं गांभीर्य असतं, आकर्षक सहजता असते.

अशी सहजता आणता येत नाही, ती आणली तर त्यात सहजभाव उरत नाही. मग ती शोधावीशी वाटते आणि त्या गरजेतून 'व्हेकेशन'सारख्या कल्पना जन्म घेतात. या गरजेबरहुकूम मी ही बऱ्याचदा येणाऱ्या प्रत्येक विकेंडचा मुहूर्त साधून कुठे-न-कुठे जात असतो. शिवाय घराजवळच्या तळजाई टेकडीवर जाऊन सूर्यास्त पाहणं हा तर माझ्या दिनक्रमाचाच भाग आहे; पण तिथून येताना सहजतेच्या, तरलतेच्या अनाहूत, ओझरत्या आणि निसटत्या स्पर्शाच्या आणखी एका निव्वळ आठवणीपलीकडे हे नेहमीचं ओझंच जाणवत राहतं, असहजतेची जाणीव तीव्र करून जातं आणि 'व्हेकेशन' किती महत्त्वाची- नव्हे, 'महत्वाचं' आहे ते सांगून जातं.

असो.

- सौरभ राघवेंद्र