वा रे तुझा न्याय !
त्या तिथे एक झाड आहे. झाडावर एकही पान नाही. आणि मुळं ? ती एकमेकात गुंतलेली. ती ही इतकी की पाण्याचा शोध घेताहेत दुसऱ्याचा गळा आवळत आहेत इतपत शंका यावी. त्या झाडावर न घरटे न क्षणभर विश्रांती शोधणारा…
त्या तिथे एक झाड आहे. झाडावर एकही पान नाही. आणि मुळं ? ती एकमेकात गुंतलेली. ती ही इतकी की पाण्याचा शोध घेताहेत दुसऱ्याचा गळा आवळत आहेत इतपत शंका यावी. त्या झाडावर न घरटे न क्षणभर विश्रांती शोधणारा पक्षी. त्याच्या डोलीत न साप न बुंध्यावर सुरवंट. मुंग्या सुद्धा ओलांडून जातात म्हणे त्याला. अनंत अवकाशाच्या पोकळीखालचं वाळत चाललेल्या लाकडाचं ते अजस्त्र धूड. भेसूर आणि एकाकी...
म्हणतात कधी काळी तेही बहरलेलं होतं. पानांनी लगडलेलं होतं. फळांनी रसरसलेलं होत. चिमण्यांची चिवचिव, कोकिळेचं कूजन, पारावरती गप्पा मारणाऱ्या वाटसरूंनी गजबजलेलं होतं. सुंदर साजेलेलं होतं. आणि आता ?
ते एकटं आहे म्हणून त्याच्याजवळ कोणी जात नाही कि त्याच्यापाशी कोणी जात नाही म्हणून ते एकटं आहे या विचारात हरवलेलं...
काही म्हणतात त्यात झाडाचाच दोष होता. कोणी म्हणतं तो निसर्गाचा कोप होतं. आजी म्हणे की कुलदेवतेचा प्रकोप होता. उरलेसुरले लोक ? त्यांना कुठे फरक पडत होता...
पण त्या झाडाचीही गोष्ट आहे. बुंध्यावरच्या प्रत्येक ओरखड्याला स्वत:चा इतिहास आहे. वाळलेल्या फांद्यांनी अनेक पावसाळे पेलले आहेत. अंग मोडणारी थंडी सोसली आहे. एकमेकात गुंतेलेल्या मुळांनी कित्येक वादळे अनुभवली आहेत. या आठवणी जपत झगडणारं हे लाकूड सरणावर चढण्याची वाट पाहतं आहे.
अंग पार भाजून काढणाऱ्या उनाचा दाह ओसरतो. मावळतीचा प्रकाश आणि येऊ घातलेला अंधार एकमेकात मिसळतो. मग हे झाड आपले डोळे किलकिले करून आजूबाजूस पाहतं. त्याला दिसतात अनेक हिरवीगार झाडं. मजेत डोलणारी. पक्ष्यांसोबत गाणे गाणारी. खेळणारी, हसणारी. आनंदाचा गंध पसरवणारी.
माग यालाही मोह होतो, त्यांना साद घालावी. आपल्या आयुष्याची कथा धीरगंभीर आवाजात ऐकवावी. मग त्याची उरलीसुरली शक्ती एकवटते. आणि संपूर्ण ताकदीनिशी ते सळसळते. पण ते अभागी. एकही पान नाही. प्रेमाने जपलेली आणखी एक वृद्ध फांदी मग कट्दिशी तुटते. क्षणात निर्जीव, मातीत पडते. हिरवीगार झाडे बघतात. कसला हा आवाज... ?
मग त्यांच्यातलाच कोणी म्हणतो, ' काही नाही ! काही नाही ! रोजचंच आहे. '
झाडाला ते ऐकू जातं. पसरलेली संध्या अंधारात हरवण्याआधीच आपले डोळे मिटून घेते. म्हणते तसाही दिवा विझणारच आहे. फुंकलेला काय वाईट ?
मिटत्या डोळ्यातले अश्रूंचे ते दोन थेंब. मरणासन्न बुंध्यावरून ओघळतात. आता तेवढाच ओलावा उरलेला अंधारात भकास दिसणाऱ्या त्या अजस्त्र देहात. निसर्ग तोही परत मागून घेतो.
वा रे तुझा न्याय !
-सौरभ राघवेंद्र