•mr•

त्या फोटोबद्दल...

ह्या फोटो बद्दल लिहीण्यासारखं विशेष काही नाहीये माझ्याकडे. आजीनं

ह्या फोटो बद्दल लिहीण्यासारखं विशेष काही नाहीये माझ्याकडे. आजीनं सांगितलं, तिकडे बाहेर नारळाच्या झाडाचं कोम्ब आहे त्याच्याभोवती एक पतंग उडतोय, बघ फोटो काढणार असलास तर... आणि मी काढला. मागे कोणी तरी सांगितलं होतं, की फोटोच्या ऑब्जेक्टची मूव्हमेंट कॅपच्युर केली की फोटो थोडा बरा दिसतो. ते आठवलं आणि त्याचा उडताना एखादा फोटो काढू म्हणून तो उडण्याची वाट पहात मी उभा राहिलो. तीस एक फोटो काढल्यानंतर अखेर हा फोटो मिळाला मग म्हटलं बास आता! दोन-अडीच वर्षांपूर्वीसुद्धा असाच एक फोटो मी काढला होता, तळजाई वरती. तो फोटो सुद्धा साधारण असाच होता. अचानक दिसलेला पतंग आणि चपळाईने दाबलेलं कॅमेराचं बटण, पण तेंव्हाची गोष्ट वेगळीच होती.

तेंव्हाचे कितीतरी फोटो मी कृतीसातात्यातून आलेल्या अति-आत्मविश्वासाने आणि माझी फोटोग्राफी कशी भारी वगैरे असते ह्याचं प्रदर्शन मांडायच्या हेतूने मी काढत असे. ते सगळं आठवलं की आता हसू येतं! मधल्या काळात चार गोष्टी वाचल्यानंतर, स्वतंत्रपणे शोध घेतल्यानंतर मग कुठं जाणवायला लागलं की फोटोग्राफी ह्या कलेविषयीच्या माझ्या जाणिवा किती उथळ आणि ‘सुपरफ़िशिअल’ आहेत.

अलीकडे नाही म्हटलं तरी कामाचा थोडा ताण असतोच शिवाय शनिवार-रविवार मित्र-मैत्रिणींसोबत असेच निघून जातात. त्यामुळं कॅमेरा बऱ्याचदा त्याच्या बॅगेत स्वस्थ पडून असतो. त्यातून कामानिमित्त कुठे-न-कुठे जावं लागतं, तेंव्हा कधी कधी हे समान सुद्धा मी खांद्यावर वागवतो खरं, पण फोटो मात्र क्वचितच काढले जातात. त्यात माझ्या फोनच्या कॅमेरामध्ये निघणाऱ्या फोटोची क्वॉलिटी माझ्या साधारण अपेक्षेपेक्षा थोडी उजवीच असल्यामुळे कित्येक प्रसंगी डी.एस.एल.आर. ची उणीवही आता भासेनासी झाली आहे.

हे सगळं असं असताना सुद्धा मध्येच कधी तरी एखादा असा क्षण येतोच जो टिपण्यासाठी कॅमेरा बाहेर काढण्याचा मोह आवरत नाही.

असो.

- सौरभ राघवेंद्र.