•mr•

त्याआधी ...

अनाहूत ताण-तणावांची झापडं डोळे स्वत:च ओढून घेतील त्याआधी,

अनाहूत ताण-तणावांची झापडं डोळे स्वत:च ओढून घेतील त्याआधी,

खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या झाडांकडे, समुद्राकडे,

पर्वताच्या रांंगांकडे आणि ओसाड माळरानाकडे पाहूनही

रोजच्या आयुष्यात ‘आ’ वासून उभा राहिलेला केवळ कंटाळाच दिसेल त्याआधी,

ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या गाडीमध्ये

पाठीमागच्या सिट वर बसून खिडकीच्या काचेवर नाकच ठसा उमटवत

टपोऱ्या डोळ्यांतून ओसांडून वाहणाऱ्या कुतूहलानं

जग न्याहाळत पुढे जाणाऱ्या छोट्या मुलाकडे,

‘हं! लहान आहे तो पर्यंत कर मजा, मोठं होशीलच एके दिवशी, मग बघ!’

असा कुत्सित कटाक्ष नजर सवयीनेच फेकेल त्याआधी,

रस्त्यावरून बाईक बुंगावत जाणाऱ्या त्याला

घट्ट बिलगून बसलेल्या तिचे वाऱ्याशी खेळ करणारे मोकळे केस पाहून

“छ्या! कावळ्याच्या हाती रसगुल्ला”

ह्या पलीकडे दुसरा कुठलाच विचार

मनामध्ये येणारही नाही त्याआधी,

दाटून येणाऱ्या आभाळकडे पहात,

“पुन्हा पाउस, चिखल सारा,

गारठा पुन्हा, वादळ-वारा” असं काहीसं चरफडत

परगावी विसरून आलेल्या पाचशे रुपयांच्या

छत्रीच्या आठवणीत व्याकूळ होऊन

मनमयूर मलूल होऊन जाईल त्याआधी,

खमंग वडा तेलकट किती,

साखरेचा चहा गोडच किती,

रिमझिम नुसती, साला पाऊसच नाही,

पाउस किती, भेंडी उसंतच नाही,

सोमवार ते शुक्रवार फक्त काम,

शनिवार रविवार तरी कुठे आराम,

हे असलं काही तरी बरळत

वारा लागला की डोकं दुखतं, सर्दी होते म्हणून

खिडकी खाड्कन बंद करायला हात आपसूकच सरसावतील-

त्याआधी,

त्याच खिडकीतून दिसणारं

एक क्षणचित्र साठवून ठेवायला

हरकत काय आहे?

-सौरभ राघवेंद्र.

Subjected to Copyright