तुंबाड.
<!--[if gte mso 9]>
एखाद्या चित्रपटाविषयी लिखाण करण्याची वेळ माझ्यावर येते तेंव्हा या विषयवार विपुल लेखन करणाऱ्या विषयतज्ञांना अवगत असणाऱ्या चित्रपटसमिक्षेसाठी आवश्यक तंत्रचिकित्सेचा आपलाही अभ्यास आणि सराव असता तर किती बरं झालं असतं हा विचार राहून राहून माझ्या मनाला टोचत राहतो आणि लिहित गेलेल्या प्रत्येक वाक्यागणिक मी अडखळत राहतो.
खरं सांगायचं तर चित्रपट आणि सहसंबंधी विश्व हा माझ्या लिखाणाचा प्रांत नव्हे तरीही नाही म्हणायला बॅरी एव्हान्स या अभिनेत्यावर लिहिलेला एक चरित्रात्मक लेख शिवाय ‘शॉप अराउंड द कॉर्नर’ आणि ‘पिंपळ’ नावाच्या चित्रपटांच्या निमित्ताने लिहिलेले (मला फारसे न जमलेले) छोटेसे दोन लेख हे तिन अपवाद वगळले तर ह्या क्षेत्रसंबंधाने माझा लेखनाचा अनुभव अगदीच नगण्य म्हणावा लागेल, पण असं असतानाही एक सामान्य व्यक्ती म्हणून मला आणि पर्यायानं माझ्यामधल्या लिहिणाऱ्या मला, हे क्षेत्र नेहमीच खुणावत राहतं.
मग ह्या सादेला प्रतिसाद म्हणून एखादा चित्रपट पाहिला जातो आणि योगायोगानं तो चित्रपट मला एवढा भारून टाकतो, की त्यावर काहीतरी लिहिल्याशिवाय त्या भारातून उतराई होणं मला जवळ जवळ अशक्य होऊन जातं. ह्यावेळी मला भाराक्रांत केलं ते ‘राही अनिल बर्वे’ ह्या चित्रपट-निर्मितीकलेवर अत्यंत सहज वर्चस्व असणाऱ्या, लढाऊ बाण्याच्या आणि कणखर मनोवृत्तीच्या दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली निर्माण झालेल्या ‘तुंबाड’ ह्या चित्रपटाने.त्याच तुंबाड नावाच्या चित्रसंसाराविषयीचा हा लेखनप्रपंच.
तुंबाडची सुरुवात एका पौराणिक दंतकथेने होते.-जगन्नियंत्या देवीमातेच्या ‘हस्तर’ नावाच्या मुलाच्या कथेपासून. कथा, कथेचा दृक्श्राव्य प्रवास आणि कथेचा शेवट प्रेक्षकाला खुर्चीशी खिळवून ठेवणारा आणि कथेचा अनुभव घेता घेता ओझरत्या प्रत्येक क्षणाला अप्रतिम सिनेमॅटोग्राफिच्या माध्यमातून गुंतवून ठेवणारा आहे. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटी सुरु होणाऱ्या चित्रपटाचा प्रवास विसाव्या शतकाच्या मध्यावर येऊन थांबतो, पण हा चित्रपट पाहताना एका गोष्टीची जाणीव राहून राहून होत राहते की ह्या कथेचा गाभा काळाच्या बंधनांपासून अलिप्त आहे. तो मनुष्याची निर्मिती झाली तेंव्हाच रचला गेला होता आणि शेवटचा मनुष्य भूतालावर असेपर्यंत तो तसाच टिकून राहील.
‘भय’ आणि ‘अधिकाची हाव’ ह्या मनुष्याच्या दोन मुलभूत प्रेरणांच्या धाग्यांनी ह्या कथावास्त्राची वीण तुंबाडच्या टीमने कमालीच्या सक्षमतेने विणली आहे. भल्या भल्या इंग्रजी चित्रपटांना कॉम्प्लेक्स देईल अशा रीतीने करण्यात आलेला ‘व्ही. एफ. एक्स.’ तंत्रज्ञानाच कलात्मक वापर, प्रेक्षकाला कवेत घेणारं पार्श्वसंगीत, विलोभनीय दृश्यनिर्मिती आणि उत्कृष्ट अभिनय ह्या चित्रपटाच्या जमेच्या बाजूंचं अत्यंत तरल उपयोजन करून ज्या हातोटीने ‘राही अनिल बर्वे’ नावाच्या दिग्दर्शकाने ही कथा पाड्यावर साकारली आहे त्याच्या कौतुकासाठी शब्दांच्या पलीकडे जावं लागतं.
सर्व्हाईव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणत उत्क्रांत झालेल्या जीवसृष्टीने मनुष्याला त्याचं ‘सर्व्हाईव्हल इंस्टिंक्ट’ भिती ह्या भावनेच्या आडून बहाल केलं. ह्या भितीपोटी मनुष्याने देवांना निर्माण केलं. भितीपोटीच मनुष्यानं देवळं बांधली. ह्या भितीपोटीच मनुष्यान हस्तर सारख्या देवतांची मंदिरं नाही बांधली. ह्या भितीपोटीच मनुष्यानं संचयाची सुरुवात केली. ह्या भितीपोटीच मनुष्याच्या संचिताची संस्कृती झाली. ह्या भितीनेच त्याला संस्कृतीच्या रक्षणाची कल्पना सुचवली, त्यासाठी युद्ध छेडून नरसंहार करण्याची प्रेरणा दिली.
भितीपोटी निर्माण झालेल्या देवतांच्या आराधनेमध्ये मनुष्याला भितीचा सामना करण्याचा मार्ग सापडला आणि आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी मागण्याचं हक्कचं ठिकाण सापडलं. ज्या गोष्टीमधून माणसाला सुख मिळू लागलं, त्या सगळ्या गोष्टी त्यानं देवाच्या चरणी माथा घासून घासून मागितल्या. त्यानं अजून संपत्ती मागितली, त्यानं अजून आयुष्य मागितलं, त्यानं गृहसौख्य मागितलं, वाहनसौख्य मागितलं, विवाहसौख्य मागितलं, आणि अंती ‘बा तूच मला सद्गती दे’ म्हणून करुणाही भाकली.
सुळावर चढवल्या गेलेल्या येशूचा संदेश पोहोचविण्यासाठी येशूच्या नावाखाली मनुष्याने युद्धं छेडली, मनुष्यवाधामध्ये मर्दमुकी शोधली. सत्तेची लालसा असणाऱ्या आणि सत्ता गमावण्याची भिती असलेल्या भ्रष्ट नेत्यांनी मंदिरांना सोन्याचे कळस चढवले. सोन्याच्या वर्खाने माखलेल्या कप-बशीच्या जागी खऱ्याखुऱ्या सोन्याची कप-बशी यावी आणि आहे त्या कप बशी जाऊन त्या ठिकाणी वाडगा येऊ नये म्हणून धनदान करणाऱ्या देवतांनाच लोकांनी डाग-दागिने आणि पैसे दान केले.
वर्गात आपल्याला इतरांपेक्षा अधिक गुण मिळावे या लालसेने आणि आपण पुन्हा नापास होऊ ह्या भितीने दोन मुलांनी परीक्षेच्या दिवशी सकाळी देवासमोर दिवे प्रज्वलित केले. वैधव्याच्या भितीने मारझोड करणाऱ्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी बायकोने देवतांची पूजा मांडली आणि हेरून ठेवलेली परस्त्री आपल्यावर भाळावी ह्या ही इच्छा शनिवारी एका पुरुषाने हनुमानाच्या डोक्यावर वाहिलेल्या तेलातून हनुमानाच्या मूर्तीवर ओतून दिली.
‘गमावण्याची भिती आणि अधिकाची हाव’ ह्या मुलभूत प्रेरणा घेऊन मनुष्य शतकानुशतकं जगत आला आहे. आज आपण ज्या जगात राहतो त्या जगाची, त्या समाजाची निर्मिती ह्या प्रेरणांच्य संमिश्रणांमधूनच झालेली आहे. आपल्या भितीपासून पळून जाण्याऐवजी भितीला सामोरं जायचं असतं आणि आपली अधिकाची हाव सुटावी हा सुद्धा एक हव्यासच असतो ह्या मुलभूत दोन गोष्टी मनुष्य जोपर्यंत साकल्यानं समजून घेत नाही तोपर्यंत तो ह्या फेऱ्यातच अडकून राहील, कदाचित विश्वाच्या शेवटापर्यंत.
‘भिती आणि लालसा’ ह्या संकल्पना मांडण्याचे प्रयत्न मनुष्य विचार करायला लागल्यापासून काळाच्या अनेक टप्प्यांवर अगणित लोकांनी अगणित माध्यमातून अगणित वेळेस केले. तुंबाड नावाची कलाकृती सुद्धा कदाचित त्या अगणित प्रयत्नांपैकी एक प्रयत्न, पण माध्यमनिवडीमुळे आगळावेगळा आणि कौतुकास्पद ठरलेला.
चित्रपटातून आपल्या समोर येणाऱ्या मानवाच्या मुलभूत प्रेरणांच्या फेऱ्यात अडकलेल्या पात्रांची कथा चित्रपटापुरती स्थळ, वेळ, काळ आणि पार्श्वभूमीपुरती मर्यादित असली, तरी त्याचं दुर्दैवी चिरंतन स्वरूप हे दहा जन्म आणि त्याच्यांही पलिकडचं आहे. भिती आणि लालसा ह्या दोन प्रेरणा मांडणाऱ्या ह्या कथेची सुरुवात दिग्दर्शक एका पौराणिक कथेपासून करतो, त्याचं अजिबात नवल वाटत नाही, ते ह्या करणामुळेच.
तुंबाडची कथा मोठ्या पडद्यावर साधारण पावणेदोन तासात संपते; पण हे पावणे दोन तास साकारण्यासाठी ह्या कथेचा शहाण्णव-सत्याण्णव साली तयार झालेल्या पहिल्या ड्राफ्ट पासून ह्या चित्रपटाच्या एंड क्रेडिट्स पर्यंतचा थक्क करणारा ‘राही अनिल बर्वे’ ह्या दिग्दर्शकाचा प्रवास पाहिला तर अंगावर सरसरून शहरा येतो, हाताची पाचही बोटं आश्चर्यानं तोंडात जातात, राही नावाच्या एका संपूर्णपणे अनोळखी व्यक्तीबद्दलच्या आदरानं आणि आपुलकीनं मन भरून येतं, डोळ्यात पाणी तरळतं आणि मनुष्याच्या जगण्याच्या मुलभूत प्रेरणांपैकी अजून एका प्रेरणेचं- हिमालयाच्या उंचीचं मनाला स्तब्ध करणाऱ्या दुर्दम्य इच्छाशक्तीचं भव्य दर्शन होतं.
लौकिकदृष्ट्या यशस्वी अॅनिमेटर असलेला राही नागझिऱ्याच्या जंगलात रात्री तुंबाडची कथा ऐकतो, पुढच्या तीन-चार वर्षात स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट तयार होतो, मग अजून काही वर्षात राही आपली नोकरी सोडून चित्रपटनिर्मिती कडे वळतो आणि तुंबाडच्या कथेमागची कथा खऱ्या अर्थाने सूरु होते. राहीनं बनवलेल्या डॅनी बॉयलनं ‘स्लमडॉग मिलीनीअरच्या’ डी.व्ही.डी. मध्ये समाविष्ट केलेल्या मांजा नावाच्या शॉर्टफिल्मचा अनुभव गाठीशी असलेल्या राहीला तुंबाडसाठी निर्माता मिळाला तो दोन हजार सात साली आणि त्यापुढची सारी कथा राही अनिल बर्वे ह्या झपाटलेल्या मनुष्याने त्याच्या फेसबुक अकाउंटवर त्यानेच लिहिलेली आहे, ती मी माझ्या शब्दात मांडायचा कितीही प्रयत्न केला, तरी तो माझ्या लेखणीला पेलवणारा नाही. केवळ त्यानेच सांगावयाची आणि त्यानेच लिहावयाची ही कथा आहे!
कथा म्हणून, चित्रपट म्हणून, चित्रपटनिर्मितीची कथा म्हणून चित्रपटसृष्टीत तुंबाडचं जेवढं महत्त्व आहे, तेवढंच महत्वाचं ‘राही अनिल बर्वे’ सारख्या कलावंतांचं या सिनेसृष्टीमध्ये असण्यात आहे. आज पराकोटीची तंत्रसुलभता प्राप्त असूनही, तंत्रशुद्ध शिक्षणाचे अनेक मार्ग उपलब्ध असूनही, निर्मितीच्या संधीची सुसाध्यता वाढूनही सिनेसृष्टीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या लोकांना ‘भिकेचे डोहाळे लागले आहेत का’ असं म्हणून स्वकीय आणि आप्तेष्टांकडून हिणवल्या गेलेल्या कैक स्वप्नवेड्या लोकांसाठी राही आणि त्याची जीवनगाथा प्रेरणेच्या दीपस्तंभासारखी आहे. सुखासीनतेच्या शिखरावरून दुसह्यतेच्या नरकापर्यंत आणि दुसह्यतेच्या नरकामधून ते पुन: यशशिखरांच्या पर्वतराशीपर्यंतचा प्रवास एकाच आयुष्यात अनुभवणारा राही ‘बना किस मिट्टी का है’ हा प्रश्न माझ्या सारख्या सामान्यांन राहून राहून आश्चर्यचकित करत राहील हे सांगणे न लगे.
असं म्हटलं जातं की प्रत्येक कलाकृती स्वत:चं एक भाग्य घेऊन निर्माण होते आणि तेच भाग्य ती कलाकृती निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या भाळी येऊन चिकटतं. तुंबाडच्या प्रवासाच्या नियतभाग्यामध्ये असंख्य प्रत्यवाय होते, खाचखळगे होते, अडचणी होत्या पण त्या प्रवासाची अखेर मात्र उज्ज्वल आणि लखलखणारी होती. शुक्र-शनी-रवि ह्या तीन दिवशी घडणाऱ्या हिशोबांचं गणित मांडून शंभर आणि दीडशे कोटींच्या उड्या मारण्याची स्वप्न बघत घातलेल्या चित्रपटांच्या रतीबामध्ये चित्रपट निर्मितीच्या मूल्याशी घट्ट नातं सांगणाऱ्या, मनुष्याच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या आणि त्याला पार मोडून तोडून टाकणाऱ्या संघर्षातून निर्माण झालेल्या तुंबाड सारख्या एखाद्या स्वयंभू चित्रपटाची चित्रपटगृहात वर्णी लागते आणि तो पाहून बाहेर येताना वळीवाचा पाउस अनुभवल्याचं समाधान घेऊन तुम्ही-आम्ही बाहेर येतो. ह्या चित्रपटनिर्मितीचं भाग्य लाभेल्या ‘राही अनिल बर्वे’ नावाच्या असामान्य मनुष्याची नाळ चित्रपट निर्मितीच्या मूल्यांशी आणि शुद्ध कलेशी जोपर्यंत जोडलेली असेल, तोपर्यंत ह्या मनुष्याला त्याच्या व्यक्तित्त्वाचा इतकंच असामान्य यश लाभात राहो अशी माझी मनापासून इच्छा आहे.
तुंबाडच्या अनुभवासाठी राहीचे, आणि तुंबाडच्या सर्व टीमचे मनापासून आभार.
-सौरभ राघवेंद्र.