तो असेल, तो नसेल..
अस्ताव्यस्त टेबलावर
अस्ताव्यस्त टेबलावर
कुठल्या तरी पानावर
येऊन थांबलेली वही आणि
टेबलावरच्या पसाऱ्यात
हरवलेलं जुनं पेन
शोधण्याच्या प्रयत्नात
तो असेल, तो नसेल..
कुलुपबंद घरात
संपंत आलेल्या सामानाच्या
मोठ्या यादीच्या पाठीमागे
अर्धवट लिहिलेल्या कवितेच्या
सहा ओळींत अडखळलेला
तो असेल, तो नसेल..
परायणं केलेली पुस्तकं,
न वाचलेले ग्रंथ
आणि लांबत गेलेले संदर्भ
ऐटीने मिरविणाऱ्या
कपाटाच्या चोरकप्प्यात
पूर्ण होता होता राहिलेल्या
त्याच्या पहिल्याच कादंबरीत
तो असले, तो नसेल..
भौतिकाच्या सूत्रांना
लीलया गुंडाळून
अज्ञाताकडे मार्गस्थ
झालेला तो असेल.
कुलूपबंद घराचं
दार उघडून आत शिरल्यावर
उग्र दर्प निघून जावा
म्हणून पडदे सरकवून
खिडक्या उघडताना
त्याच्या शब्दांवर सांडलेलं
चांदणं पाहायला
तो नसेल.
असलाच
तर तो असेल कदाचित,
नसला तर तो नसेलही.
पण तो असला काय किंवा नसला काय,
त्याचे शब्द- ते मात्र असतील.
-सौरभ राघवेंद्र