•mr•

तिच्या डोळ्यात दिसतो..

रात्रीचे अडीच वाजलेत. ती झोपलीये, पण झोपेविना तो मात्र तळमळतो आहे. तो

रात्रीचे अडीच वाजलेत. ती झोपलीये, पण झोपेविना तो मात्र तळमळतो आहे. तो

थकला नाहीये, असं नाही. थकलाय तो, पण निद्रादेवी प्रसन्न व्हावी एवढाही

नाही कदाचित. “काही तरी बिनसलंय.” घरघरत्या पंख्याखाली पहुडलेल्या,

मध्यरात्रीच्या अविचल शांततेत खिडकीतून वाट शोधात आलेल्या चंद्राच्या

प्रकाशाने उजळलेल्या तिच्या निद्रिस्त आकृतीकडे पहात तो विचार करत होता.

“पण काय ?” तापानुतपं तपश्चर्या करूनही परमेश्वराचा आशिष न गवसलेल्या

तपस्व्याची हाताशा होती त्याच्या प्रश्नात.

“नेहमीप्रमाणेच तर सुरु

आहे सगळं. कुठे काय बिनसलंय ?” रात्री जेवताना तिने त्याला समजावलं होतं,

तिचं खरंही होतं. सगळंच तर नेहमीप्रमाणे सुरु होतं. प्रातर्विधी पासून

प्रणायाराधानेपर्यंत, अगदी तसंच, जसं नेहमीच होतं. “पण मग, पण मग ही हुरहूर

? माझं हे असं अकारण अस्वस्थ होणं ?” त्याची मानसनौका प्रश्नांच्या वादळात

पार भरकटून गेली होती.

“काही तरी हरवलंय.” तो उठून बसला. खिडकीच्या

बाहेर लावलेलं गुलाबाचं छोटं झाड वाहत्या वाऱ्यासोबत संथ झुलत होतं.

“प्रेम हरवलंय ?” त्याच्या मनात शंका आली. “छे ! छे !” अंगावर पडलेली पाल

झटकावी अगदी तशीच ती शंका त्याने झटकून दिली. “आमचं एकमेकांवर आजही तेवढंच

प्रेम आहे जेवढं आम्ही पहिल्यांदा एकमेकांकडे प्रेमाची कबुली दिली तेंव्हा

होतं."

"ओहोटी लागल्यासरशी खडकांना उघडं पाडणाऱ्या समुद्राच्या

पाण्याइतकं उथळ नाहीये आमचं प्रेम.” त्याने स्वत:ला समजावलं. “लिंबाच्या

मुरलेल्या लोणच्यासारखं आहे ते. जुनं आणि चविष्ट !” आपल्या उपमेवर तो

स्वत:शीच हसला, पण तोच त्याला मागच्या आठवड्यात घडलेला प्रसंग आठवला आणि

त्यासरशी स्मितहास्यमुळे डोळ्यांभोवती चढलेल्या नाजूक सुरकुत्या विरल्या

आणि कपाळावर आठ्या जमू लागल्या.

“ती अशी कधीच वागली नव्हती याआधी.”

त्या प्रसंगाच्या स्मृतीवर आपली प्रतिक्रिया त्याने स्वत:शीच नमूद केली.

“ती असं वागेल, बोलेल...”

शून्यात रोखलेल्यात्याच्या नजरेने

एव्हाना चंद्राचा ठाव घेतला होता. “प्रसंग तसं गंभीर नव्हता- पण तिचं वागणं

! ते अनोळखी होतं मला. आणि तिचं वागणं हे असं अनोळखी वाटणं मात्र गंभीर

आहे आणि हे अलीकडे वरचेवर होतंय असं. तिचं वागणं कळतच नाही मला कधी कधी ”

तो उठला आणि खिडकीशी येऊन उभा राहिला. एव्हाना तीन वाजले होते. रस्ता अर्थातच निर्मनुष्य होता.

“सगळ्याच नात्यांची कथा असेल का ही ? इतक्या वर्षांची ओळख तरीही ती

व्यक्ती अनोळखी ? इतक्या वर्षांची सोबत तरीही हा अवघडलेपणा ?” आपल्या

अनुभवाशी मिलता जुळता अनुभव कोणाला आला आहे का याचा तो आता विचार करू

लागला. “ऑफिसमध्ये आज अवि सांगत होता. त्यालाही म्हणे त्याच्या बायकोचं

वागणं काळात नाही कधी कधी. असंच होत असेल का त्याचं पण ? कोण जाणे ! आणि

होत असेल तरी त्यांच्या नात्याचा मापदंड आमच्या नात्याला कसा लावायचा ?

शिवाय अविसुद्धा आहेच थोडा उथळ स्वभावाचा.” दुपारचं संभाषण आपल्याला आत्ता

आठवायला नको होतं या जाणीवेने तो अजूनच अस्वस्थ झाला. खिडकीचा कठडा त्याने

घट्ट आवळला.

“खरंच विरून जात असेल का प्रेम, लोक म्हणतात तसं ? सात

जन्मांच्या सोबतीच्या शपथेवर उभ्या या स्तब्ध आणि निश्चल पर्वताच्या आत

कसला हा ज्वालामुखी खदखदतोय ?” तो वळला आणि त्याने खोलीच दार अलगद उघडलं

आणि खोलीतून बाहेर पडला. उघड्या दारामुळे खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याला थोडी

मोकळीक मिळाली आणि वाऱ्याचा जोर किंचित वाढला.

तो त्याच्या

अभ्यासिकेच्या दिशेने निघाला. “नातं, त्याचा प्रवास, प्रेम या सगळ्या

गोष्टी खरंच खऱ्या असतात की घेतलेली जबाबदारी सुसह्य व्हाव्ही केलेल्या

साखरगप्पा ? मला खऱ्या वाटायच्या या गोष्टी. अजूनही वाटतात. तिच्या डोळ्यात

पाहायचो तेंव्हा वाटायचं, आमची सोबत ही आमची नव्हे, तर आमच्या एकत्रआमचा

प्रवासाची नियती आहे. आम्हा दोघांचा मार्ग एक आहे. गाव एक आहे, पण आता..!?”

 

त्याने त्याची वही उघडली आणि तो लिहिता झाला-

तिच्या डोळ्यात दिसतो | एक अनोळखी गाव |

ठाव मज त्याचा | अद्याप नाही ||

 

तिच्या केसात खुलते | एक चाफ्याचे रे फूल |

गंध त्याचा परी | विरून गेलेला ||

 

उष्ण श्वासात तिच्या | एक अनामिक साद |

अन् पैजणांचा नाद | पण कोणासाठी ||

तिच्या स्पर्शात जाणत्या | एक अबोल काहूर |

ही कसली चाहूल | ठाऊक नाही ||

ओळखीची ती | अनोळखी पण |

लागले ग्रहण | ते सुटेल ना ??

उगवल्या सूर्या | आता संध्येची चाहूल |

दुखा:ची रे भूल | त्यात काळरात ||

तिच्या डोळ्यात दिसतो | एक अनोळखी गाव |

ठाव मज त्याचा | अद्यापही नाही ||

-सौरभ राघवेंद्र.