तेंव्हा
पण,अजून एक दहा वर्षांनी, एका मुलाला कडेवर घेऊन आणि दुसऱ्या मुलाचा हात पकडून
पण,
अजून एक दहा वर्षांनी
एका मुलाला कडेवर घेऊन आणि दुसऱ्या मुलाचा हात पकडून
मनामध्ये सुरू असलेल्या संसारातल्या शंभर गोष्टींच्या विचार-वादळातून वाट शोधत शोधत
तुला सरावलेल्या एखाद्या शहरातला रहदारीने भरगच्च रस्ता ओलांडशील तेंव्हा
एका भल्या मोठ्या इमारतीला झाकणाऱ्या काचेच्या अपारदर्शी तावदानावर
दिसेल तुला तुझाच चेहरा आणि एक प्रतिबिंब, हुबेहुब तुझ्याचसारखे
आणि बोचेल तुला एक जाणिव टचकन,
पायात खोलवर नकळत रुतलेल्या काट्यासारखी-
'किती बदलले आहे मी !'
आणि मनात उसळेल विचारांची एक महाकाय लाट-
रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र होता होता,
अंशा-अंशाने आणि कणा-कणाने विरत गेलेल्या
तुझ्या स्वतंत्र अस्तित्वाच्या किनाऱ्याच्या शोध घेणारी.
मग ये तेंव्हा मला भेटायला एकदा आणि घेऊन जा माझ्याकडून
मी अजूनही कैद करून ठेवलेल्या तुझ्या कैक संजीवन-प्रतिमा.
तुझ्या मनमोकळ्या हास्याच्या, बेफिकीर विजीगिषेच्या,
सहज अभिलाषेच्या, मोहवणाऱ्या निरागसतेच्या, आणि,
आणि तुझ्यातच सापडत गेलेल्या तुझ्या.
तेंव्हा,
ये एकदा मला भेटायला, आणि घेऊन जा,
मी अजूनही कैद करून ठेवलेल्या
तुझ्या कैक संजीवन-प्रतिमा.
-सौरभ राघवेंद्र.