स्वातंत्र्यदिन !
स्वातंत्र्यदिनासारख्या अत्यंत पवित्र
स्वातंत्र्यदिनासारख्या अत्यंत पवित्र दिवसाचे औचित्य साधून काही लिहावयास घ्यावे तर एक भिती सतत मनामध्ये उद्भवते; अनेक मोठमोठ्या लेखकांनी, पत्रकारांनी, विविध क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या प्रतिथयश व्यक्तींनी प्रदिर्घ अनुभव आणि अभ्यासाने सिद्ध झालेल्या लेखणी आणि वाणीमधून आपल्या भावना यथार्थ आणि सार्थ पद्धतीने व्यक्त केल्या असता माझ्यासारख्या अल्प अभ्यास आणि अल्प समज असणाऱ्या अननुभवी तरुणाने काही लिहावे तर त्याने औचित्यभंग तर व्हावयाचा नाही ना ? आपण काही लिहावयास घ्यावे आणि त्यामधून जावयास हवा तो संदेश जाऊच नये, उलटपक्षी लेखकाची उथळ बुद्धिमत्ता उघडी पडावी असे तर व्हावयाचे नाही ना ? तर्कसुसंगत काही लिहावयाच्या प्रयत्नात तर्कविसंगत लेखन तर आपल्या हातून घडणार नाही ना ?
आपल्या भारतभूचा समृद्ध इतिहास पाहता माझ्यासारख्या नवख्या लेखकाने या प्रश्नांचा विचार करणे अत्यावश्यक होऊन जाते. परकीयांची अनेक आक्रमणे शतकानुशतके झेललेल्या आपल्या भारतभूच्या स्वातंत्र्यमुकुटावर रात्नरुपी असंख्य हुतातम्यांच्या बलिदानाचे, पाहता क्षणीच आपले चक्षु ज्याच्या प्रखर तेजाने दिपून जावे असे तेज:पुंज कोंदण आहे. त्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या मनात स्वातंत्रप्राप्तीच्या ध्येयाने पेटलेल्या तेजाग्निला, उरात वसलेल्या समृद्ध भारतभूच्या सोनेरी स्वप्नाला, देशप्रेमाच्या ज्वालेला- त्यांचा अधिकृत सन्मान देण्याची पात्रता माझ्या लेखणीमध्ये यावयाची आहे हे मी जाणत असूनही निव्वळ देशप्रेमाच्या भावनेखातर काही लिहिण्याची चेष्टा करताना या प्रश्नांचा मेरे मनामध्ये उद्भव व्हावा ही गोष्ट मी स्वत: काहीशी नैसर्गिकच समजतो आणि म्हणूनच या लेखात काही अधिक-उणे होऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतांनाही काही अनुचित लिहिले गेले असल्यास मी भारतमातेच्या चरणी क्षमेची याचना करतो.
स्वातंत्र्यदिन म्हटलं की आम्हांस आठवतो तो आमच्या शाळेमधील सोहोळा. पहाटे पहाटे उठावे, उत्साहाने तयार व्हावे आणि समारंभास वेळेच्या काहीसे आधीच जाऊन पोहोचावे हा आमचा दरवर्षीचा ठरलेला नेम. मग शाळेजवळ पोहोचताच छोटे राष्ट्रध्वज आणि शर्टावर लावावयाचे बिल्ले आणि तत्सम विक्रेते आणि त्यांच्या सभोवती जमलेली शाळकरी मुले व त्यांचे पालक, या दृश्याने आमचे स्वागत व्हाव्हे. शाळेच्या शिपायाने मग घंटा वाजवावी अन् आम्ही आपापल्या वर्गाच्या रांगेत जाऊन उभे राहावे. मुख्याध्यापकांनी झेंडा फडकवताच सुरेल गाणाऱ्या आमच्याच शाळेतील विद्यार्थिनींचा गानवृंद, पेटी, ढोल यांच्या संगतीने आम्ही सुस्वरात राष्ट्रगीत गावे ! हे दृश्य माझ्या मन:चक्षुंवर जसेच्या तसे कोरले गेले आहे. या निमित्ताने आपल्या राष्ट्रगीताचे मला नेहमीच भावलेले एक गुज इथे सांगावेसे वाटते- राष्ट्रगीत गाणारा प्रत्येक व्यक्ति आपापल्या स्वरांमध्ये गात असतो, पण तरी देखील राष्ट्रगीत हे असे कदाचित एकमेव गीत असावे जे ऐकावयास कधीच बेसूर वाटत नाही. राष्ट्रगीतानंतर यथावकाश प्रतिज्ञा आणि समूह्गीतांचा कार्यक्रम व्हावा. स्वातंत्रदिन ऑगष्ट मासांत येत असल्याने कधी कधी वरुणराजांनी मध्येच प्रसन्न व्हावे, पण आमचा उत्साह आणि देशप्रेम मात्र त्याच्या सरींपुढे कधीच डळमळीत होऊ नये ! आज शालेय वय पाठीमागे सोडल्यानंतरही स्वातंत्र्यदिन म्हटले की शाळाच आठवते ती या अशा लोभस आठवणींमुळे.
स्वातंत्र्यदिनाच्या संदर्भाने आम्हांस एक वैयक्तिक गोष्ट आग्रहाने आणि काहीश्या अपराधीपणानेच नमूद करावीशी वाटते ती अशी- शालेय वयात आम्हांस स्वातंत्र्यदिनाबद्दल उत्साह निश्चितच असे पण या दिनाच्या महत्वाचे मात्र आमच्या लेखी म्हणावे तसे अधोरेखन झाले नव्हते. त्यासाठी काही काळ जावा लागला. स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासाच्या अभ्यासास आम्हांस स्वत:स समर्पित करावे लागले. देशासाठी वयाच्या कोवळ्यां वर्षांत तुरुंगात गेलेल्या धाडसी युवकांची चरित्रे अभ्यासावी लागली. अनेक स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यप्राप्ती साठी केलेल्या त्यागाच्या एक शतांश त्यागही आमच्या सुखवस्तू आयुष्य उपभोगणारऱ्या स्थूल देहाकडून आणि तितक्याच स्थूल मनाकडून आपल्या राष्ट्रासाठी होत नाही ही बोचरी जाणीव स्वीकारावी लागली. तेंव्हा कुठे आम्हांस एकोणीसशे सत्तेचाळीस साली आम्ही मिळविलेल्या स्वातंत्र्याची थोडी थोडी किंमत समजू लागली.
आम्हांस आणि आमच्या पिढीस स्वातंत्र्य जन्मजातच मिळाले. त्यासाठी आम्हांस कुठचेच सायास कधीच करावे लागले नाहीत. त्यामुळेच कदाचित या प्राप्त स्वातंत्र्याचा पाईक होण्यासाठी लागणारी पात्रता आमच्या अंगी यावी या निमिताने पार पाडावयांस लागणाऱ्या जबाबदार्या mishaps म्हणावी तशी तोंडओळख आम्हांस झाली नाही. नाही म्हणावयास शासनाने नागरिकशास्त्र या विषयाच्या माध्यमातून आमच्या मतिस प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला खरा, पण गुणपत्रिका हातात पडताच अभ्यासक्रमातील इतर गोष्टीप्रमाणे या गोष्टींचेही एका मर्यादेपर्यंत विस्मरणच झाले, कदाचित मर्यादेपलीकडेच. अन्यथा समाजाच्या उच्चभ्रू वर्तुळांमधून देशाचा अभिमान असणे हे प्रतिगामी विचारधारा असण्याचे लक्षण मानले गेले नसते; राजकारणातील विशिष्ट गोटाने देशप्रेमाचा मताच्या जुळवणूकीसाठी नियोजनबद्ध खेळ मांडला नसता. प्राप्त स्वातंत्र्याचे उणे चाळीस अंशात न डळमळता उभे राहून रक्षण करणाऱ्या जवानांना आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलने छेडावी लागली नसती, उपोषणे करावी लागली नसती. आमच्याच देशाच्या राजधानीमधल्या एका नावाजलेल्या विद्यापीठामधल्या ‘सुशिक्षित’ युवकांना देशाचे तुकडे व्हावे असे वाटले नसते.
पण भारतमातेचे सुदैवच म्हणावे खरे, या अशा उथळ बुद्धीवादास आणि बुद्धिवाद्यांस (खरे तर दुर्बुद्धिवाद्यांस असे म्हणावयास हवे) फारसे महत्त्व न देता, राजकीय बोलाचालीच्या आहारी न जाता देशाबद्दल खरोखरीच आत्मीयता बाळगणारे, तळमळ असणारे असंख्य पुत्र भारतमातेंस लाभले आहेत. हे पुत्र अत्यंत निष्ठेने आणि प्रमाणिकपणे प्राप्त कर्म पुरे करतात. यांपैकी कोणालाच आपल्या देशप्रेमाचा देखावा मांडावासा वाटत नाही. आपण आपल्या कर्तव्यामध्ये चोख असू, तर त्यातून देशाचे हितच साधले जाते याची जाणीव या सुपुत्रांना आपसूकच असते. यांपैकी कोणी सैन्यात जातो, कोणी शिक्षक होतो आणि विद्यार्थी घडवतो, कोणी निस्वार्थ वृत्तीने समाजसेवा करतो तर कोणी आपल्या मिळकतीवरचा कर कुठलाही आडपडदा न ठेवता देशासाठी अपर्ण करतो.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या सत्तराव्या सोहोळ्यात आम्हांस आमच्या लोकांस 'आपल्या देशावर प्रेम करा' हे सांगावे लागणे दुर्दैवाचे आहे खरे, पण त्याचवेळी त्यांना देण्यासाठी- देशावर न केवळ प्रेम करणाऱ्या तर देशाच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या तुम्हां-आम्हांमधल्याच लोकांची उदाहरणे आपल्यापाशी असावी हे आपले सुदैवच म्हणावे लागेल. हा विरोधाभास लक्षात घेता या छोट्याशा लेखाचा शेवट आमच्या मतिस अनुचित वाटणाऱ्या गोष्टींवर टीकेची एक फैर झाडून करावा अथवा आम्हांस उचित वाटणाऱ्या गोष्टींचे कौतुक करून करावा या द्विधेचा सामना आम्हांस करावा लागतो आहोत. परंतु या संभ्रमास आणखी बळी न पडता, मध्यंतरी स्वातंत्रदिनास काही दिवसांचा अवधी असता याच सुदिनाच्या निमित्ताने आमची एका सन्मित्राशी वादचर्चा रंगिली होती, त्याच चर्चेच्या सामारोपादखल आम्ही दिलेल्या उत्तराने या लेखाची सांगता आम्ही करू इच्छितो.
विचारधारा किंवा विचारसरणी म्हणावे तर अनुनय हा यावयाचाच, अनुयायी यावयाचेच. संसारामध्ये जसे भांड्याला भांडे लागावयाचे तसेच, विचारसरणींमध्ये संघर्ष हा उद्भवावयाचाच. हा संघर्ष उद्भवणे अथवा न उद्भवणे हे आपल्या हातामध्ये नक्कीच नाही, परंतु तो कुठवर ताणावयचा हे आपण सर्वांनी जाणून घ्यावयासाच हवे, कारण तीच एकमेव गोष्ट आपल्या अधिपत्याखाली असते. समोरच्यावर चिखलफेक करावयाचे म्हटले तर आपले हातही त्याच चिखलाने बरबटले जातात याचे भान आपण ठेवावयास हवे. याचा अर्थ असा अजिबातच घेऊ नये की तत्सम वाद आणि चर्चां या सकळपणेच थांबवाव्यात. संकल्पना आणि विचार यांची बौद्धिक पातळीवर देवाण घेवाण ही व्हावायासच हवी पण आमचा किंतु हा आहे कि ही देवाण घेवाण करत असतांना आपण कुठल्या दिशेने जातो आहोत याची जाणीव आपण बाळगावयांस हवी.
आजच्या घडीस या पृथ्वीतलावर सहा पूर्णांक सात दशलक्ष विविध प्रकारचे सजीव वास्तव्य करून आहेत. आपली मानवाची प्रजात ही यांपैकीच एक. जर मनुष्यजात वगळता सर्व प्रजाती एकमेकांशी निर्विवाद सहसंबंध प्रस्थापित करून आपले आयुष्य व्यतीत करू शकत असतील, तर आपणा मानवामध्येच नेमकी कोणती कमी आहे या गोष्टीचा विचार आपण करावयास हवा. आपल्या तात्विक वादांची, चर्चेची फलनिष्पत्ती केवळ बौद्धिक, सामाजिक तथा राजकीय करमणूक आदि뭡ूर्तीच मर्यादित न राहता त्यापलीकडे जाऊन कुठे तरी एक उदात्त हेतू साध्य करण्यात होते आहे ना याचेही वेळोवेळी निष्पक्ष परिक्षण व्हावयांस हवे.
आपल्या विचारधारेचा आग्रह धरण्यांत फारसे काही गैर आहे असे आम्हांस वाटत नाही, पण त्याचबरोबर हा आग्रह दुराग्राहाकडे मार्गस्थ होऊ न देणे तितकेच महत्वाचे असते हे विस्मरणात जाऊन चालावयाचे नाही. प्रत्येकासच आपला तो बाळ्या वाटत असतो, पण म्हणून दुसर्याच्या मुलास ‘कार्टे’ असे संबोधणे खरेच गरजेचे आहे का हा प्रश्न आपण स्वत:स विचारावयास हवा.
आपण आणि आपली विचारसरणी कशी महत्तम हे सिद्ध करण्यासाठी समोरच्या व्यक्तीने मनापासून जोपासलेल्या श्रद्धेस आणि त्याचा आत्मसन्मानास काहीश्या निष्काळजीच आणि बेजबाबदार शब्दरचना वापरून ठेचून काढणे ही मज तरी वैचारिक हिंसा वाटते. अशाने कदाचित एखाद्याचे माहात्म्य प्रस्थापित होईलही- कोणी सांगावे ? पण त्याची परिणती सहसंबंधाचे विघटन होण्यात होते हे ही आपण लक्षांत घ्यावयांस हवे. आणि खरेच, जर तुमची विचारधारा, तुमचा आग्रह इतकाच सुखकारी असेल, तर मनुष्यवर्ग यथावकाश त्याकडे आपोआप आकृष्ट होईलच !
अंतत: मनुष्याच्या सुखद सहसंबंधापेक्षा मोठे मधुर असे आणखी काही नसते. त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीच्या सत्तराव्या सोहोळ्याचे औचित्य साधून जर आपण हे सहसंबंध आणखी दृढ आणि सुसंवादी करण्याच्या निश्चयाने वाटचाल सुरु केली तर आपल्या सर्वांची आणि पर्यायाने आपल्या देशाची प्रगती आणखी वेगाने होईलच शिवाय ती शाश्वतही असेल या आमच्या विश्वासाबद्दल बद्दल कोणाचे दुमत असावे असे आम्हांस वाटत नाही.
-सौरभ राघवेंद्र.