स्पर्श
छोट्या छोट्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात तेंव्हा मोठ-मोठ्या गोष्टी जमवून ठेवायला हव्यातच का? असा प्रश्न पडतो मला. रस्त्यावरून जाता जाता मलूल, अंग चोरून पडलेल्या कुत्र्याच्या डोळ्यात दाटले…
छोट्या छोट्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात तेंव्हा मोठ-मोठ्या गोष्टी जमवून ठेवायला हव्यातच का? असा प्रश्न पडतो मला. रस्त्यावरून जाता जाता मलूल, अंग चोरून पडलेल्या कुत्र्याच्या डोळ्यात दाटलेला एकटेपणा पाहून ज्याच्या मनात चलबिचल होते, आजीच्या घरी जाऊन परत येताना आपण निरोप घेतो तेंव्हा आजी हातावर शे-दोनशे रुपये टेकवून आशीर्वाद देते तेंव्हा तिच्या आवाजातली थरथर ज्याला जाणवते त्याला सृष्टीच्या भाळावर झालेल्या जखमेतून ओघळणाऱ्या रक्तातल्या कारूण्याच्या आणि दुःखाच्या पेशी वगैरे शोधण्यासाठी दुःखाच्या महाकवींची पारायणं करावी लागत नाहीत, पण आपली आयुष्यं आताशा अशा उसन्या स्पर्शांवाचून जगता यावं इतकी सहज आणि सोपी नक्कीच राहिलेली नाहीत.
आपल्याला तत्त्वज्ञान हवं असतं, गोष्टींचे अर्थ लावायचे असतात. तत्त्वचर्चेत, 'मी मिडिओकर लेखक आणि लिटरेचर फॉलो करत नाही, सो डाऊनमार्केट' हे पटवून द्यायचं असतं, चार ऑफबिट फिल्म्सची नावं ठोकून 'कुछ कुछ होता है' किंवा तत्सम मेन्स्ट्रीम आणि एस्केपिस्ट चित्रपट पाहताना मिळालेलं गिल्टी प्लेजर स्वतःपासूनच लपवायचं असतं. आ वासून उघड्यावर पाडलेल्या जिवंत दुःखाकडे स्वतः आणि थेट पाहण्याऐवजी पुस्तकं आणि चित्रपटाचे पडदे सोयीचे वाटतात. आजीच्या थरथरत्या स्पर्शापेक्षा ती गेल्यावर माणसाच्या मृत्यूविषयी तत्त्वचिंतन करताना अंगभर उमटत जाणाऱ्या विकृत शहऱ्याच्या स्पर्श आपल्याला हवाहवासा आणि सुसह्य वाटतो.
स्पर्शासाठी वखवखलेलो असतो आपण, मात्र थेट स्पर्शाची भितीही असते आपल्या मनात. तो स्पर्श आपल्यासाठी आधी कोणी तरी अनुभवावा आणि मग त्याची गोष्ट आपल्याला सांगावी अशी आपली इच्छा असते. गोष्ट ऐकली की आपलं समाधान होतं. ऐकल्यावर तिला विसरूनही जाता येतं. स्पर्शाचं मात्र गणितच वेगळं. तो झाला की थरारून जातो आपण, त्याची खूण राहते जन्मभर. स्वर्ग तर पाहायचा, पण मृत्यू मात्र नको! अशी आपली अवस्था. म्हणूनच म्हणायचे कदाचित- मेल्याशिवाय स्वर्ग थोडीच दिसायचा?
मग काय! स्पर्शाचा हव्यास तर आहे, पण थरथर मात्र नको हे द्वैत घेऊन जगत राहतो आपण, आणि त्यातूनच मग हे मोठे-मोठे छंद सुचतात, अवडंबरं निघतात. आपल्याच मनाच्या रित्या गाभ्याचा, आपल्याच पोकळ व्यक्तित्त्वाचा, दुःखाच्या जिवंत धगीचा, भेसूर आवाजचा स्पर्शच नको असं म्हणून मोकाट सुटतो आपण आणि करतो तरी काय काय!! स्वतःच स्वतःला विचारून पाहावं ज्याने-त्याने. स्पर्शाची चटक लागलेलं आपलं मन जगतं कमी आणि जमवतं जास्त. म्हणूनच आयुष्याच्या अल्टीमेट स्पर्शाला- मृत्यूला बिचकून जगावं लागतं आपल्याला आयुष्यभर. तो स्पर्श करतो तेंव्हा हे सारं संचित विरघळून जातं एका क्षणात. मग तिथे आपण शेक्सपिअर वाचला, अभ्यासला की शाळेत शिकलेल्या मोरोपंतांच्या आर्येच्या पुढे आपली गाडी गेलीच नाही याने फारसा फरक नाही पडत. डेथ इज अ ग्रेट इक्वलायझर.
मृत्यूला तुम्ही सांगू शकत नाही, "बाबरे! मी अमुक अमुक इतक्या गोष्टी जमवल्यात, मोठा- भला मोठा साठा आहे माझ्याकडे. ये आपण लिओनार्दोच्या द लास्ट सपरवर चर्चा करू. कालच मी मस्त डॉक्युमेंटरी पहिली, फ्रेंच चित्रपटही पाहिला! बरं, चित्रपट वगैरे नको, मग स्पिनोझाविषयी बोलूया का?" देअर इज नो अर्ग्युमेंट बिफोर डेथ. इट टचेस अँड यु आर गॉन.
हे जाणवतं तेंव्हा सारं संचित बिनकामाचं वाटतं. ते जमवून, आपल्या हरप्रकारच्या साठ्याच्या फुगवटा मिरवत त्याच्यावर उंच उभी माणसं नादान, खुजी, भेसूर आणि असहज वाटायला लागतात. आपणही त्यांच्यासारखेच होतो आहोत का? असा प्रश्न पडू लागतो आणि तो पडतो तेंव्हा प्रतिसादादखल मोठ्या-मोठ्या गोष्टींपाठी धावणाऱ्या, स्पर्शासाठी वखवखलेल्या मनाचं रितेपण आहे तसंच राहू द्यावं असं वाटतं. आपण जमा केलेल्या, जडवून घेतलेल्या गोष्टींशिवाय आपण कोण आहोत, कसे आहोत हे तपासून पहावंसं वाटतं. "उगी राहावे" असं म्हणताना संत तुकारामांनाही हेच सांगायचं असावं बहुतेक. जिथे आहात तिथेच जगा, जसे आहात तसेच जगा!
उंच डोंगर चढून, शिखरावर पोहोचल्यावर तिथून दिसणारा मनोहर सूर्यास्त पाहताना आपल्याला आनंदाच्या एखाद्या लहरीचा स्पर्श झालाच तर त्या स्पर्शाचा संबंध आपल्या मनामध्ये काय साचलंय किंवा काय नाही याच्याशी अजिबातच नसतो. भले तो सूर्य, तो डोंगर आकाराने मोठा असेल, पण तो पाहून मिळणाऱ्या आनंदासाठी संचितचा आकार छोटा असला तरीही चालतो. म्हणूनच, जमवा-जमावीसाठी कोणताही सायास करण्याची अटकळ न ठेवता मनाला सहज स्पर्श करून जाणाऱ्या किती तरी गोष्टी या जगात, आपल्या दैनंदिन आयुष्यात आहेत हे जाणवतं तेंव्हा गरज नसताना मोठ-मोठ्या स्पर्शांची उसनवारी करण्याची खरंच गरज आहे का? असा प्रश्न पडतोच. त्याचं उत्तर 'नाही' हे आहे हे ठाऊकही असतं, पण या हव्यसाचं, मोठ्या-मोठ्या गोष्टींच्या भुकेचं कारण असलेल्या केविलवाण्या, दीनवाण्या, रित्या आणि वखवखलेल्या मनाच्या वास्तवाचा थेट स्पर्श सहन करण्याचं धैर्य कोठून आणायचं हे मात्र काही केल्या आकळत नाही आणि ज्ञाताचा फेराही सुटत नाही! असो.
सौरभ राघवेंद्र.