•mr•

स्पेस आणि डिफेन्स टेक्नॉलॉजी

ज्या मुलांमध्ये लहानपणापासूनच विज्ञानाविषयी कुतूहल असतं किंवा विज्ञानाविषयीच्या चर्चेत किमान आस्था असणाऱ्या वातावरणात ज्यांची जडणघडण होते अशा मुलांमध्ये अवकाश आणि खगोल या दोन्ही विषयांविषयी क…

ज्या मुलांमध्ये लहानपणापासूनच विज्ञानाविषयी कुतूहल असतं किंवा विज्ञानाविषयीच्या चर्चेत किमान आस्था असणाऱ्या वातावरणात ज्यांची जडणघडण होते अशा मुलांमध्ये अवकाश आणि खगोल या दोन्ही विषयांविषयी काही प्रमाणात आकर्षण निर्माण झालेलं सहसा आढळून येतंच असं माझं ढोबळ निरीक्षण आहे. अशा मुलांच्या मनामध्ये आपल्या आयुष्यात आपण अस्ट्रोनॉट व्हावं अशी एक निरागस इच्छा किमान एकदा तरी चमकून गेलेली असतेच. पुढे थोडं मोठं झाल्यावर अस्ट्रोनॉट नाही, तरी स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या इस्रो किंवा नासा अशा प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम करता यावं अशा आशयाचं एक स्वप्न या मुलांच्या डोळ्यांमध्ये तरळून गेलेलं असतंच.अस्ट्रोनॉट होण्याची इच्छा किंवा नासा आणि इस्रो सारख्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळणं या गोष्टी खचितच सोप्या नाहीत, मात्र गेल्या काही वर्षात स्पेस आणि स्पेस टेक्नॉलॉजीच्या कमर्शिअलायझेशनमुळं निर्माण झालेल्या अनेक संध्या काळजीपूर्वक पाहिल्या तर या क्षेत्रांत नावारूपाला आलेल्या संस्थांमध्ये काम करता आलं नाही तरी या क्षेत्रात स्वतंत्रपणे काम करता येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढलेली असल्याचं लक्षात येतं. स्पेस आणि डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये काम करण्याऱ्या कंपन्यांची वाढलेली संख्या, त्यांच्या टॅलेंट अक्विझिशनची वाढती टक्केवारी आणि त्यांच्या एकूण 'ऍक्टिव्हिटीज्' पाहता बाकीच्या सर्व गोष्टी अनुकूल राहिल्या तर पुढच्या किमान पाच एक वर्षांत आपला देश जगभरात स्पेस डिफेन्स टेक्नॉलॉजी हब म्हणून नावारूपाला येण्याची सुरुवात होण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. या विषयी सविस्तर लेखन करण्याचा माझा मानस आहे, पण तूर्तास इतकंच!