•mr•

सई.

सईच्या आणि माझ्या आठवणी तशा फार नाहीयेत, ज्या आहेत त्याही धूसरच आहेत; पण आज दोन-अडीच वर्षांनंतरही तिची आठवण येते तेंव्हा माझ्या चेहऱ्यावर हसू उमटतं आणि डोळ्यांसमोर एक चित्र हमखास उभं राहतं.

सईच्या आणि माझ्या आठवणी तशा फार नाहीयेत, ज्या आहेत त्याही धूसरच आहेत; पण आज दोन-अडीच वर्षांनंतरही तिची आठवण येते तेंव्हा माझ्या चेहऱ्यावर हसू उमटतं आणि डोळ्यांसमोर एक चित्र हमखास उभं राहतं.

त्या चित्रात संध्याकाळ झालेलीअसते. साडे-सात किंवा फार तर आठ वाजलेले असतात. हे चित्र मुंबईच्या पटलावरचं त्यामुळं हवेत थोडासा दमटपणा. रोज रोज बाहेरचं खाणं नको म्हणून स्वयंपाकाच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावं असा निर्णय मी नुकताच घेतलेला. त्या अनुषंगानं ऑफिस सुटल्यावर घरी जाताना दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या ब्रेकफास्टची तयारी म्हणून दूध, ब्रेड आणि अंडी घ्यावी आणि रात्रीसाठी एखादी भाजी घ्यावी या विचारात मी अभ्युदय बँकेच्या चौकात रिक्षा सोडून वाशीच्या सेक्टर सहा कडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलोय आणि नेहमीच्या वाटेने चालत निघालोय.

वाशीतल्या आतल्या गल्ल्यांमधले रस्ते बऱ्यापैकी मोठे आहेत. काही फूटपाथ्स तर सदाशिव पेठेतल्या रहदारीच्या रस्त्यांपेक्षा रुंद आहेत. संध्याकाळ होते तसे हे आतले रस्ते आणि फूटपाथ्स सोडियम-व्हेपर दिव्यांच्या पिवळसर-सोनेरी प्रकाशाने उजळून निघतात.

माझ्या ठरलेल्या वाटेवरुन मी घराच्या दिशेने चालत जातोय आणि नेहमीच्या वळणावर रस्त्याशी काटकोन करून स्ट्रीटलॅम्प्सच्या पिवळसर प्रकाशात एक छोटंसं दुकान दिमाखात उभं आहे. ते दुकान चालवणाऱ्या काकू येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांशी बोलत आहेत, व्यवहार करत आहेत. मी दुकानासमोर जाऊन उभा राहिलोय.

दूध आणि ब्राऊन ब्रेड. मला काय हवं हे काकूंना माहिती असतं. छोटासा फ्रीझ उघडून काकू दूध आणि वरच ठेवलेलं ब्रेडचं पॅकेट असे दोन्ही जिन्नस माझ्यासमोर मी मागायच्या आधीच ठेवतात. “आज उशीर झाला रे तुला!?” काकूंच्या चौकशीतल्या अगत्याचं मला मनापासून कौतुक. त्यांच्या एकूण वागण्या-बोलण्यावरून त्यांचं माहेर कोकणातलं असावं असं वाटतं. मी म्हणतो, “हो, आज मिटिंग जरा जास्त वेळ चालली.” बोलता बोलता दुधाची पिशवी आणि ब्रेडचं पाकीट मी माझ्या बॅग मध्ये ठेवतो आणि व्यवहार पूर्ण करायचा म्हणून पाकिट हातात घेतो. पाकिटात फक्त पाचशेच्या नोटा. काकू म्हणतात, “सुट्टे नाहीयेत रे पाचशेचे. राहूदेत आज, उद्याच दे.” सस्मित मी म्हणतो, “चालेल, उद्या ऑफिसला जाताना देऊन जाईन सकाळीच. संध्याकाळी घरी जातोय, पुण्याला. ऑफिसमधून थेटच जाईन मी. सोमवारी येईन परत.” काकूंची काहीच हरकत नसते.

मी जायला निघतो तेवढ्यात पाठीमागून एक आवाज येतो, “ओय! काय काय घेतलंस तू?” मी मागं वळून उत्तर देणार तेवढ्यात, “सई! किती वेळा सांगितलंय तुला, असं विचारायचं नसतं म्हणून!” काकू सईला काहीशा लाडानंच दरडावतात. नुकत्याच पडलेल्या दातामुळं तयार झालेली फट दाखवत सई तिची बॅलन्सिंगसाठीची चाकं लावलेली सायकल घेऊन उभी असते. तिला पाहून मी विचारतो, “तुला का सांगू मी काय घेतलं ते?”

सईला हे उत्तर अनपेक्षित असतं. काकूंकडे- तिच्या आईकडे बघून ती म्हणते, “आई, बघ ना तो दादा कसं करतोय, सांगत नाहीए मला!!” काकू तिला, “गप्प बैस गं तू.” असं म्हणून माझ्याकडे वळून, “अरे काही नाही, असाच दंगा करते ती!” असं थोडंस ओशाळून सांगतात. मी हसतो आणि म्हणतो, “अहो काहीच हरकत नाही. कितवीत आहे सई?” “पहिलीत.”

मी तिच्याकडे पाहतो. टपोरे बोलके डोळे, दोन शेंड्या, पडलेला एक दात दाखवणारं आकर्षक हसू, फ्रॉक आणि सँडल्स अशा अवतारातली सई एका हातात तिचं छोटसं दप्तर घेऊन दुसऱ्या हाताने तिची छोटी सायकल धरून उभी असते. मी म्हणतो, “मी ना, दूध घेतलं आणि ब्रेड्स घेतले.” त्यावर तिचा पुढचा प्रश्न तयारच असतो, “फक्त ब्रेड? बिस्किटं पण घ्यायची असतात. माहित नाही का तुला?” मला हसू येत.

एव्हाना रात्रीचे साडे-आठ होत आलेले त्यामुळं काकू आता त्यांचं दुकान बंद करण्याच्या घाईत असतात. त्यांचा हिशोब सुरु असतो, परिणामी सईच्या, “माहित नाही का तुला?” या प्रश्नाकडे त्यांना दुर्लक्ष करावं लागतं. मी सईला विचारतो, “मला नाही गं माहिती, तुला कसं काय माहिती?” त्यावर सहज उत्तर देते ती, “आमच्याकडे येणारे सगळेच घेतात!”

“असं होय!” मी म्हणतो, “पुढच्या वेळी घेईन बरं.”

सई हसते. मी मार्गस्थ होतो. काकू, सई आणि तिची सायकलही मार्गस्थ होतात. जाता जाता काकू सईला मोठ्या माणसांशी कसं वागावं याविषयी दोन गोष्टी ऐकवत असतात; पण त्यातही तिच्या चुणचुणीतपणाचं कौतुक असतंच कुठेसं.

अशाच आणखी एका संध्याकाळी मी त्यांच्या दुकानात गेलो होतो. सई काही तरी पुटपुटत बसलेली. मी विचारलं, “काय गं? काय चाललंय?” तिनं खुणेनंच मला शांत बैस असं सांगितलं. “मी म्हणतेय ना हे, मग थांब जरा!” असं सांगायचं असावं तिला कदाचित. मी हसलो. “अशीच आहे अरे ही!” काकू हसत हसत म्हणाल्या, “मनाचे श्लोक पाठ करवून घेतीये तिच्याकडून. या वयात पाठ होतात ना चटकन. उच्चारही शुद्ध होतील त्या निमित्ताने.”

मग मी दोन मिनिटं तिचे श्लोक ऐकत उभा राहिलो. ते म्हणून झाल्यावर माझ्याकडे बघत पडलेला दात दाखवत मॅडम हसल्या आणि विचारत्या झाल्या, “तुला येतात का मनाचे श्लोक?”

“तुझ्याएवढा असताना येत होते.” माझं उत्तर.

त्यावर तिचे पुढचे प्रश्न तयारच. “मग आता? आता नाही येत? आता मोठा आहेस का तू? केवढा आहेस तू?” माझं उत्तर मिळायच्या आधी काकूंकडून एक धपाटा मिळतो तिला. “अशी चौकशी करायची नाही असं सांगितलंय की नाही तुला मी?” इति काकू.

“असुदे अहो.” मी हसून म्हटलं, “आणि बरं का सई, मी तुझ्याएवढाच आहे, फक्त उंची जास्त आहे माझी.” सईला आवडतं ते उत्तर; पण मग त्यावर ती लगेच म्हणते, “काही प्पण!! माझ्या एवढा असशील तर मग तुला दाढी कशी काय? गम्मत नको करू तू माझी.” तिच्या लटक्या रागावर हसण्यापलिकडे काहीच नसतं माझ्याकडे.

पुढे काही दिवसांनी मी दाढी काढलेलीअसताना दुकानात गेलो होतो तेंव्हा मला पाहून सई म्हणाली होती, “ए!!! दाढी कुठाय तुझी? दाढीच चांगली दिसते तुला. असलं नको करत जाऊ काही तरी.” पुन्हा एक धपाटा; पण तो नावालाच! माझ्यासोबत काकूही हसत होत्या यावेळी.

काकूंचं हसणं आपल्यापाठी एखादी अबोल खिन्नता लपवतंय असं वाटायचं मला कधी कधी. काकू सडपातळ होत्या की कृश झाल्या होत्या असाही प्रश्न पडायचा मला. त्यांचा मोकळेपणा स्वाभाविक होता की त्यापाठी संवादाची आस होती हे ही मला कळलं नाही कधी. सईच्या बोलण्यात तिच्या बाबांचा आणि काकूंच्या बोलण्यात त्यांच्या नवऱ्याचा उल्लेखही मला कधीच जाणवला नाही. काकूंच्या चपळ आणि काटेकोर हालचालींच्याआड दडलेला थकवा, आपुलकीपाठी दडलेला एकाकीपणा केवळ मलाच जाणवतोय की तो खराच आहे अशी शंकादेखील माझ्या मनात यायची; पणतोच सई एक छान धप्पा द्यायची आणि आनंद पुन्हा दरवळायला लागायचा.

काकूंशी बोलता बोलता मला असं कळलं होतं की सई मराठी शाळेत शिकायला जाते. समाधान वाटलं होतं मला ते ऐकून. “काय करायचंय इंग्रजी शाळेत घालून? आपल्याच संस्कारात वाढायला हवी आपली पोर आणि त्या इंग्रजी भाषेत तिचा अभ्यास घेणं मला नाही जमायचं!” असं काकूंचं म्हणणं. दुकानातच माय-लेकीचा अभ्यास सुरू असे संध्याकाळी. सई एरवी कमालीची दंगेखोर, पण अभ्यास करताना मात्र तिच्यातली सगळी ऊर्जा हातातल्या वही-पुस्तकावर केंद्रित व्हायची. तिच्या कमालीच्या एकाग्रतेचं मला नेहमीच कौतुक. अभ्यास सुरु असताना आपल्या दुकानात कोण आलं, कोण गेलं याचं भानही तिला नसायचं. सईला एक मोठी बहीणही आहे, सई पहिली-दुसरीत होती तेंव्हा तिची अकरावी सुरु होती. ताईचा स्वभाव मात्र सईच्या उलट- अत्यंत शांत आणिअंतर्मुख, निदान मला तरी तो तसा अनुभवायला आला. माझ्या मुंबईमधल्या वर्षभराच्या वास्तव्यात ज्या मोजक्या लोकांबद्दल मला कमालीचा आपलेपणा वाटला होता, हे त्रिकुट त्या लोकांपैकीच एक होतं.

काकू माझ्या जेवणाखाण्याची अगत्यानं चौकशी करायच्या. मला आठवतं, ऑफिसमधून घरी आल्यावर स्वयंपाक करणं मला अत्यंत कंटाळवाणं वाटायचं त्यात पोळ्या लाटणं वगैरे ‘हमारे बस की बात नही’ हे ठाऊक असल्यानं मी ती वाट मी धरण्याचा प्रश्नही नव्हता. माझ्या पोळ्यांची ही अडचण त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी, “माझ्य शेजारीच एक जण पोळ्या बनवून देतात. त्यांना सांगते मी.” असं सुचवलं मला. त्यावर मी "चालेल, पण त्यांच्याकडे जाऊन रोज घेऊन येणं मला जमेल असं वाटत नाही.” असं म्हटल्यावर लागलीच त्या म्हणाल्या होत्या, “अरे, तू नकोच जाऊ, माझ्या इथे ठेवते मी! माझ्याकडून घेऊन जा, मग तर झालं?”

माझ्या स्वयंपाकाबद्दलही त्यांना कुतूहल होतं. मी काय बनवतो, कसं बनवतो, इंडक्शनवर चांगलं बनतं का वगैरे चौकशी त्या वरचेवर करायच्याच शिवाय येता जात दोन-चार सोपे पदार्थही सुचवायच्या; ते पदार्थ मी कधी केले नाहीत हे भाग निराळा. त्याशिवाय कधी आई, बाबा आणि माझ्या बहिणीची चौकशी त्या करत तर कधी मी कुठं काम करतो, माझं काम नेमकं कसं असतं, काम ऑफिसमध्येच असतं की कुठे बाहेर फिरावं लागतं याही गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न त्या करायच्या. यातल्या एकही प्रश्नाचं उत्तर देताना मला कुठलाच अवघडलेपणा जाणवायचा नाही किंवा त्या उगाचच चौकश्या करत आहेत असंही कधी वाटायचं नाही. आपुलकीची जाणीव अशी दुतर्फा असते तेंव्हा वरवरचे संवादही आपोआपच सखोल होत जातात ते हे असेच.

माझी ऑफिस मधून यायची वेळ निश्चित नसे आणि बऱ्याचदा कंटाळा आला की येताना मी बाहेरूनच जेवून येत असे. अशावेळी मी येईपर्यंत काकूंचं दुकान बंद झालेलं असायचं. एरवी सुद्धा माझी दुकानात जायची वेळ आणि काकूंची दुकान बंद करायची वेळ जवळजवळ सारखीच असल्यामुळं आणि दुकानात इतरही ग्राहक असल्यामुळं जेंव्हा होईल तेंव्हा फार तर दोन ते तीन मिनिटंच आमचा संवाद होई आणि त्यातही सईमध्येच डोकं वर काढायची आणि काही तरी मजेशीर बोलून पुन्हा तिच्या पाठांतर नाही तर अभ्यासात गर्क व्हायची. असं असूनही गप्पांच्या त्या दोन-तीन मिनिटांनी आम्हाला केवळ निखळ आनंदच दिला. आमच्या अशा गप्पांची अनेक धूसर चित्रं अजूनही तरळतात माझ्या डोळ्यांसमोर कधी कधी.

आमची शेवटची भेट झाली ती तीन वर्षांपूर्वी, म्हणजे सतरा सालच्या दिवाळीच्या अलिकडच्या आठवड्यात. दिवाळीनंतर माझा, 'आपण आता पुण्यातच राहायचं आणि स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा' असा निर्णय घेऊन झालेला होता. जायच्या आधी एकदा काकूंना आणि सईला भेटावं म्हणून त्यांच्या दुकानात मी गेलो; पण सई तिथे नव्हती. मी काकूंचा निरोप घेतला, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढे निघालो तेवढ्यात सई पाठीमागून सायकलवरून आलीच, माझ्या पुढ्यात थांबली आणि माझ्याकडे पाहून कपाळावर अठ्या चढवून मला म्हणाली, “कुठे निघालास?”

“तुला का सांगू?” असं उत्तर द्यायची माझी इच्छा झाली नाही. मी म्हटलं, “माझ्या घरी, पुण्याला.”

त्यावर तिने विचारलं, “परत कधी येणार?” क्षणभर वाटलं तिला नको सांगायला हिला, पण मग सांगितलंच, “आता पुण्यातच राहणारे मी.” ती क्षणभर शांत झाली.

“इकडे येणारच नाहीस मग परत कधीच??” तिनं विचारलं. तिला नाही म्हणणं जीवावर आलं होतं. मी म्हटलं, “बघू. येईन की!” त्यावर ती “बरं” असं म्हणून गालातल्या गालात हसली.

“आज काय घेतलंस?” माझ्या हातात बॅग नव्हती हे ते लक्षात आल्यावर तिनं मला विचारलं.

“काहीचनाही. मीबसमधून जाणारे ना आता, म्हणून नाही घेतलं काही.” मी समजावलं. केवळ निरोपच घ्यायच्या बेतानं आलो होतो मी.

“बिस्किटं घेऊन जा की. भूक लागेल बसमध्ये.” असं म्हणून तिनं एका हातात माझा हात आणि दुसऱ्या हातात सायकल घेऊन मला दुकानापर्यंत चालवत नेलं आणि “आई, दादाला बिस्कीट दे माझं आवडतं.” असं फर्मान सोडलं. काकू क्षणभर गडबडल्या. क्रीमच्या बिस्किटांचा एक पूडा सईनं माझ्या हातात दिला आणि माझ्याकडे पाहून सई म्हणाली, “संपव काय तो आणि तू एकटा-एकटाच खा!” तिलाही पुण्याला घेऊन जावं आपल्याबरोबर असं वाटून गेलं मला क्षणभर .

पुन्हा एकदा दोघींना ‘बाय’ करून मी निघालो तेवढ्यात सई आणि तिची सायकल पुन्हा माझ्यासमोर उभी ठाकली, कपाळावर पुन्हा अठ्या चढल्या आणि अजून एक प्रश्न आला, “मला ‘हॅप्पी दिवाली’ का नाही केलंस?”

त्या प्रसंगानंतर जेंव्हा जेंव्हा माझं मुंबई किंवा वाशीला जाणं झालं तेंव्हा ठरवूनही वेळेअभावी सई किंवा काकूंची आणि माझी भेट होऊ शकली नाही. अडीच तीन वर्षांचा काळ तसा मोठा नक्कीच नाही, पण सईच्या वयाची मुलं एवढ्याशाकाळातही पुष्कळ मोठी होतात. त्यामुळं मी त्यांना पुन्हा भेटेन तेंव्हा काकू कदाचित तशाच असतील पण सई मात्र तशीच नसेल, ती मोठी झालेली असेल याची खात्री आहे मला.

तिची सायकल ती आताही तशीच सुसाट हाणत असेल; पण ती बॅलन्स करायला मात्र जास्तीच्या दोन चाकांची गरज उरलेली नसेल तिला. तिच्या ताईसारखी तीही शांत झाली असेल आता, किंवा नसेलही कदाचित, शिवाय मी तिला पुन्हा भेटेन तेंव्हा ती मला ओळखेलच याचीहीशाश्वती मला नाही, पण तरीही, 'भेटायचं तर आहेच तिला' एवढं मात्र मी माझ्या मनाशी पक्कं करून ठेवलंय.

तसं पाहिलं तर हे सगळे प्रसंग, या गडद-पुसट आठवणी मागं वळून वगैरे पहावं एवढ्या जुन्या नक्कीच नाहीयेत, पण तरीही केवळ सहज, साध्या आणि गोड स्वभावापायी लोभ जडलेल्या 'आपल्या' माणसांची प्रतिबिंब आठवणींच्या पडद्यावर अशी उमटतात तेंव्हा नाही म्हटलं तरी मन हळवं होतंच आपलं. सईला मोठं होताना पाहणं मला शक्य नाही हे ठाऊक असूनही ते पाहता यायला हवं होतं अशी भाबडी इच्छा माझ्या मनात तरळून जाते कधी किंवा मग काकूंच्या खाजगी आयुष्याशी माझा संबंध असायचं कारण नसूनही त्यांच्या घरी खरंच काही अडचण असेल का? कोरोनाच्या सध्याच्या सावटात त्यांचं घर नीट चालू असेल ना? त्यांच्या सगळ्यांच्या तब्येती ठीक असतील ना? असे प्रश्न पडतात मला. मुंबईला जाऊन त्यांना न भेटताच परत येताना प्रत्येक वेळी चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं.

पावसाचे दिवस होते तेंव्हा मी काकूंच्या दुकानात गेलो होतो एकदा. पाऊस मुसळधार होता त्यामुळं मी बाहेर आडोशाला उभा होतो. अचानक एक मोठी वीज कडाडली. त्या विजेसरशी सई घाबरली आणि, “भिती वाटतेय” असं म्हणून येऊन मला बिलगली. मी तिला कडेवर उचलून घेतलं तसं तिनं माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. तेंव्हा क्षणभरासाठी, ‘माझ्या सहवासात तिला भीती वाटणार नाही असा निर्धोक विश्वास संपादन करण्याएवढं मी काय केलं होतं तिच्यासाठी?’ असं वाटून गेलं होतं मला, पण त्या वीणेच्या स्पर्शातली ऊब अगदीच अनोळखीही नव्हती आमच्यासाठी. मग हे सगळं येतं कुठून असा प्रश्न मला पडतो तेंव्हा गतजन्मावर विश्वास नसूनही, कुठल्याच सायासाशिवाय जुळलेल्या अशा अनुबंधांच्या तळाशी गतजन्मीचं ऋण असतं असं माझी आई म्हणते तेंव्हा तिच्यावर विश्वास ठेवावासा वाटतो. सईच्या निर्भेळ आणि नितळ मनात मात्र तो विश्वास उपजतच असावा कदाचित.

माझ्या उण्या-पुऱ्या सव्वीस वर्षं आणि काही महिन्यांच्या आयुष्यात अशा ऋणानुबंधांची वर्गवारी नात्यांच्या रूढ व्याख्यांमध्ये करायची नसते किंबहुना ती तशी होतही नाही हे मी शिकलोय. आमच्या सहवासाच्या सहा-सात महिन्यांचा हिशोब आम्ही कोणीच आपापल्या जमेस धरला काय किंवा नाही काय- आमच्या कोणाच्याच आयुष्यात त्यामुळे फार मोठा फरक पडणार नाही मला हे तत्त्वतः मान्य असूनही तो फरक पडतोच असं जेंव्हा जाणवतं तेंव्हा संततधार द्वैतांच्या गोंधळात अजून एका द्वैत गडगडून जातं. मग खांद्यावर डोकं ठेऊन निश्चिंत झालेली सई आठवते, ही सगळी चित्रं डोळ्यांसमोरुन एका क्षणात तरळून जातात, मी आत डोकावतो आणि मग हर-तऱ्हेचे विचार, अंतस्थ संघर्ष, आशा-निराशेची अव्याहत चक्रं, वासना-विरक्तीची अगणित आवर्तनं, स्वार्थ-परमार्थाची द्वंद्वं आणि अशा अनेक परस्परविरोधी प्रभावांच्या मंथनात मूढ झालेलं माझं केविलवाणं मन मला दिसू लागतं.

या अखंड मंथनातुन एखादी निष्पत्ती होतच नाही असं नाही; ती होते, पण ती होवो अथवा न होवो, या मंथनामुळं माझ्या मनाचं नितळ आणि निर्मळ असणं मी केंव्हाचं हरवून बसलोय याची लख्ख जाणीव मला होते आणि खांद्यावर डोकं ठेवणाऱ्या सईचा सहजभाव आपल्या ठायी नाही या जाणिवेनं मी काहीसा खिन्न होतो. मनाचं निरभ्र आणि नितळ असणं किती मोलाचं आहे हे सईला तिच्या या वयात नाही कळायचं शिवाय ती मोठी होत जाईल तसं तिच्याही मनात ही मंथनं यथावकाश सुरू होतीलच हे ही मला जाणवतं आणि म्हणूनच माझ्यासारख्या नास्तिकलाही काही क्षणांसाठीआस्तिक व्हावं आणि "तिच्या-तिच्या आयुष्यात सई खूप मोठी होवो मात्र तिचं कोवळं मन नेहमीच तसंच निरभ्र आणि नितळ राहावं" अशी प्रार्थना करावीशी वाटते.

मी लहान होतो तेंव्हा 'मुलं देवाघरची फुलं' हे वाक्य मी बऱ्याचदाऐकलं होतं. मी ते ऐकायचो तेंव्हा मला माझ्या डोक्यावर एखादं सूर्यफूल वगैरे उमलल्यासारखं वाटायचं वर त्याचं हसूसुद्धा यायचं; पण आता हेच वाक्य घेऊन मी जेंव्हा सईकडे पाहतो तेंव्हा मात्र मला त्या वचनाची सत्यता जाणवू लागते. ही फुलं छोटी छोटी- आपापली उमलतात, दरवळतात आणि दिवसभर खेळून-खिदळून आपपाली मिटुनही जातात; पण त्यांचं केवळ असणंच इतकं घनगंभीर असतं की त्यांना त्यांच्या आयुष्यात वेगळं काही करायची गरजही उद्भवत नाही. त्यांचं हे असं असणं हेच त्यांचं सौंदर्य असतं, त्यांचं असणं हाच त्यांचा धर्म असतो, तीच त्यांची सुसंगतीही असते. आमची सईसुद्धा तशीच आहे, एखाद्या रानफुलासारखी. आपल्या दातातली फट दाखवत ती मोकळी हसते, खूप सारे आगाऊ प्रश्न विचारते, आईचे धपाटे खाते, तिची सायकल घेऊन माझ्या बाईकशी स्पर्धा करते, मन लावून अभ्यास करते, आवडतं बिस्किट खाते; अर्धं मला देते, मनाचे श्लोक पाठ करते... पण ती जे काही करते ते तिच्या आयुष्याशी जे आणि जेवढं सुसंगत असेल तेवढंच ती करते आणि हे सगळं करून अखेर ती दमून रात्री झोपी जाते तेंव्हा तिच्या केवळ असण्यानंच इतरांच्या आयुष्यात आनंदाची केवढी मोठी दरवळ पसरतेय याची तिला किंचितशी जाणीवही नसते.

अशीच आहे सई आणि ती तशीच राहो!

- सौरभ राघवेंद्र