•mr•

साहेब !

ह्या बिल्डिंगची एक बात साहेब, बहोत बहोत खास साहेब!

ह्या बिल्डिंगची एक बात साहेब, बहोत बहोत खास साहेब!

एकाच फोटोत मावतात शंभर, शंभर-शंभर संसार साहेब !

डाव्या हाताला लोकल अन् उजव्याला हाय जंक्शन साहेब!

आमची मुंबई, तुमची मुंबई, सगळ्या सगळ्यांची मुंबई साहेब !

इथं राहिलं की प्रश्न नाहीत, उत्तरं भी नाहीत साहेब !

कशासाठी, कोणासाठी ! सवाल एक भी न्हाई साहेब !

इथे फक्त एकच खोली, एकच स्वयंपाकघर साहेब !

खिडकी- ती पण एकच हाय, बाल्कनी भी न्हाई साहेब !

इथं झोप पन शांत शांत, सात मरणाची गाढ साहेब !

स्वप्नं-बिप्नं छोटी-मोठी आज्याबात भानगड न्हाई साहेब!

मनगटाला एकाच्याभी घड्याळ दिसणार नाही साहेब!

पर पायाला सगळ्यांच्या भिंगरी तेवढी नेहमी साहेब!

दवाखाना-हॉस्पिटल इकडे कुठून येणार साहेब !

गोळी मिळते नशेची अन् बाटली क्वार्टरची साहेब!

प्रेम-बिम पिक्चर मध्ये, इकडं तसलं न्हाई साहेब !

पोर झोपतं पलंगावर अन् आय-बाप खाली साहेब!

मोठे शब्द लै महाग, तूप, लोणी-साखर साहेब!

हॉटेल नाही, कॅफे नाही, स्टेशनवरती इडली साहेब!

इकडे एकदा बघा साहेब ! आमचा फोटो काढा साहेब!

आम्ही असतो इथेच रोज, तुम्ही कुठून येता साहेब ?

आमच्या इथे असंच असतं, तुमच्या तिथे कसं काय साहेब ?

आमचा फोटो तुमच्या लोकांस्नी, दावा फक्त एकदा साहेब !

आमचा फोटो तुमच्या लोकांस्नी, दावा फक्त एकदा

-सौरभ राघवेंद्र.