•mr•

सात आणि वाडा

माझा एक मित्र सांगत होता- एक लेखक होता म्हणे. काही केल्या त्याच्या पुस्तकाचा शेवट करणं त्याला जमत नव्हतं. मग ठरवून तो एका हॉटेलात जाऊन राहिला. सातव्या मजल्यावर. त्या मजल्यावर दोनच खोल्या. दोन्ही खोल्यांच्या खिडक्या समुद्राच्या दिशेने उघडायच्या.

मनात घर करून राहिलीच नाही तर ती भयकथा कसली!

माझा एक मित्र सांगत होता- एक लेखक होता म्हणे. काही केल्या त्याच्या पुस्तकाचा शेवट करणं त्याला जमत नव्हतं. मग ठरवून तो एका हॉटेलात जाऊन राहिला. सातव्या मजल्यावर. त्या मजल्यावर दोनच खोल्या. दोन्ही खोल्यांच्या खिडक्या समुद्राच्या दिशेने उघडायच्या. त्यातली एक खोली त्याची, दुसरी खोली म्हणे बऱ्याचदा बंद असे. प्रियकराने प्रेमात फसवलं म्हणून प्रेयसीने त्याच खोलीत आत्महत्या केली अशी क्लासिक वदंता. खरं खोटं माहिती असायला हॉटेलचा मूळ मालकही जागी नव्हता. घटना घडली तेंव्हा एका परदेशी कंपनीला हॉटेल विकून हा मोकळा झाला. लेखक महाशयांनी सातवा मजला हवा असं सांगितलं तेंव्हा रिसेप्शनिस्ट चरकलीच होती; पण त्याच्या हट्टापुढे तिचं काहीच चाललं नाही. हॉटेल मधले गडी म्हणाले समान नेणार नाही, आम्ही सातवा मजला चढत नाही. लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंतच आहे. पुढचं तुमचं तुम्ही पहा. ‘पाहतो’ एवढंच उच्चारून लेखक महाशयांनी सातव्याच्या पायरीवर पाय ठेवला.

महाशय सकाळी दहा वाजता उठायचे. अंघोळ उरकायचे. सातव्यावर कोणी येतच नसे, त्यामुळे जेवण मागवून घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. जेवणासाठी महाशय समुद्रापासून थोडं लांब एका गावात जायचे. आहारही ठरलेला. तिन पोळ्या, गावठी पद्धतीनं बनवलेलं चिकन, वाटीभर दहीभात. मग अख्खी दुपार किनाऱ्यावर. क्षितिजाकडे पाहताना अचानकच कधी तरी कथेचा शेवटचा डॉट कनेक्ट होईल अशी भाबडी आशा. ती पूर्ण होणार होतीच, पण त्याला सात दिवसांचा अवधी होता. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की महाशय पुन्हा जेवणासाठी गावात. जेवून आलं की मात्र थेट खोलीत. आत शिरलं की स्वच्छ अंघोळ. अंघोळीनंतर कपडे मात्र घालायचे नाही. कल्पनेला तेवढंही ओझं नको असं वाटायचं त्यांना. नागव्यानंच खिडकी उघडायची आणि समुद्रावरचा वारा मनसोक्त प्यायचा. टेबल खिडकीपाशी आणून ठेवलंच होतं. सगळे दिवे मालवायचे आणि टेबल लॅंप सुरु करायचा. पेन हातात घ्यायचं, वही उघडून ठेवायची, खुर्चीत बसायचं आणि सुचेपर्यंत शोधक नजरेने क्षितीजाकडे पहायचं.

सातवी सकाळ उजाडली. सहाव्या रात्री पुस्तक पूर्ण झालं होतं. महाशय आनंदी होते. समान बांधलं. पुस्तक पूर्ण झाल्यावर घालायचे म्हणून नवीन कपडे आणले होते, ते चढवले. खोलीला कुलूप लावलं, किल्ली खिशात ठेवली. सातव्याची पायरी उतरणार तेवढ्यात ते थबकले. खिडकी बंद केलीये का? स्वत:शीच पुटपुट. हातातली बॅग तिथेच ठेवली आणि महाशय खोलीकडे परतले. कीहोल मधून पाहिलं. खिडकी उघडी होती. समुद्राचा निळा रंग चमकत होता. आत जाऊन बंद करावी का? असा विचार करून हात किल्ली ठेवलेल्या खिशापाशी नेला. दार उघडलं. आत गेले. टेबलावर हात ठेवून खिडकीपाशी उभे राहिले. दीर्घ श्वास घेतला. खिडकी बंद केली. दाराला कुलूप लावलं. सातव्याची पायरी उतरणार तोचं खुडबुड कानावर आली. वाऱ्यानं खिडकी उघडली असेल आणि भिंतीवर आदळली असेल. महाशयांनी एरवी त्रागा केला असता, पण स्वारी आज खुशीत. कोई नही म्हणून पुन्हा वळले आणि की-होल मधून पाहिलं. खिडकी बंद होती. महाशयांना काय वाटलं कोणास ठाऊक! पलीकडच्या खोलीच्या की-होलला डोळा टेकवला. निळाशार रंग दिसला.

महाशय खुशीत होते. खोलीबद्दलची वदंता त्यांच्या खिजगणतीतही नव्हती. मागे वळून सातवा उतरले. सहाव्याला लिफ्ट. उतरल्यावर रिसेप्शनीस्ट समोर किल्ली नाचवली. चमत्कारिक कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सातव्यावर महाशय सात दिवस राहिले होते त्यामुळे शूर महाशायांवर ती ही भाळली असावी. डेस्कवर ठेवलेली किल्ली परत घेताना ती अंमळ जास्तच वाकली. महाशयांची नजरही तयारीचीच; पण त्यांना परतण्याची घाई. स्मित हास्यावर बोळवण करून ते बाहेर पडले. हॉटेल आणि वास्तव्याची आठवण राहावी म्हणून मागे वळून हॉटेलच्या इमारत ते डोळ्यात साठवत होते. नजर साहजिकच सातव्याकडे गेली. मग त्यांच्या खोलीकडे गेली. खिडकी बंद होती. डावीकडे पाहिलं. दुसऱ्या खोलीची खिडकी. तीही बंद.

महाशय निघाले. वाटेत थबकले. ‘एक मिनिट’ स्वत:शी पुटपुट. ‘मगाशी तर खिडकी उघडी दिसली होती मला. मग समुद्र कसा दिसला? गड्याने जाऊन बंद केली की काय?’ महाशायांना खोलीभोवती गुंफलेल्या सगळ्या कथा आठवल्या. माघारी फिरून रिसेप्शनीस्टला गाठलं.

“काय मॅडम! धीट झाला वाटतं तुम्ही पण!” सात दिवस वरती राहून दाखवल्याचा माज स्वच्छ झळकत होता.

“काय बोलताय सर?” रिसेप्शनीस्टनं सैल काड्यांशी चाळा करत विचारलं.

“खिडकी, दुसऱ्या खोलीची. सातव्या मजल्यावरच्या- दुसऱ्या खोलीची.” प्रत्येक शब्द महाशयांनी पुरेपूर वजन देऊन उच्चारला.

“त्याचं काय सर?” रिसेप्शनीस्टने कान टवकारले. पाठीचा कणा एकदम ताठ. डोळ्यात वेगळीच चमक. भिती होती का ती? महाशयांनी विचार केला.

“खिडकी- ती उघडी होती मी जाताना. आता बाहेरून बघितलं तर बंद दिसतेय. मी राहून आल्यापासून सगळे धीट झाले वाटतं! इतक्यात जाऊन कोणी बंद करूनही आलं!?” आपण किती शूर आहोत हे ठसवण्याचा महाशयांचा प्रयत्न.

“काय बोलताय सर तुम्ही?” तिचा आवाज कापत होता. “तुम्ही कधी पहिली खिडकी?”

“मी की-होल मधून पाहिलं.” मी सिंहाला ठार केलंय अशा आवेशात महाशयांनी सांगितलं.

“काय दिसलं तुम्हाला सर?” रिसेप्शनीस्टच्या हातावरचे शहरे दिसत होते. महाशयांची नजर मात्र तिच्या हातावर नव्हतीच.

“समुद्र. निळाशार समुद्र. खिडक्या उघडला की दिसतो तो. निळाशार समुद्र.” आधीच शूर त्यात लेखक जागला!

“सर!” आवंढा गिळून ती म्हणाली “ते शक्यच नाही.”

“का?” महाशयांनी विचारलं.

“सर कारण.. ती गोष्ट.. ती मुलगी..” रिसेप्शनीस्टची ततपप पाहून महाशयांना मजा येत होती. एक मोठा आवंढा गिळून ती म्हणली, “खिडकीतून उडी मारली होती त्या मुलीने. खिडक्या आतून.. आतून फळ्या ठोकून बंद केल्यात.”

“छ्या! काहीही. मी पहिला तर समुद्र! अथांग.. आणि त्याचा निळा रंग!” महाशय पुढे काही तरी बोलणार तेवढ्यात रिसेप्शनीस्ट जगाची उठली. नजरेनेच खूण करून महाशयांना तिने आपल्या पाठोपाठ या असे सांगितले. महाशयांची कल्पनाशक्ती जागृत झाली. रिसेप्शनीस्टने एका हॉटेलच्या छोट्या ऑफिसचा दरवाजा उघडला आणि ती आत शिरली. महाशय तिच्या पाठोपाठ आत शिरले आणि ऑफिसचा दरवाजा बंद केला. ती कपटापाशी गेली. कपाटाचं दर उघडलं, हात चोरकप्प्याशी गेला. ती वळून आपल्याकडे पाहिलं तेंव्हा तिचा स्पर्श आपल्याला होईल अशा बेताने महाशय तिच्या पाठीमागे उभे राहिले. तिने चोरकप्प्यातून एक जुनं वर्तमानपत्र बाहेर काढलं. त्याच्याकडे न पाहताच ती वळाली. लगट अनपेक्षित होती तिला, पण मुळातच ती एवढी बिथरलेली होती- स्पर्शाने भीतीचे शहरे ओलांडलेच नाहीत.

“काय आहे?” ते वर्तमानपत्र जुनं होतं. हॉटेल जेवढं जूनं होतं कदाचित तेवढं जुनं.

“निळा रंग.” घामाच्या धारांनी ती पूर्ण भिजली होती.

“काय? निळा रंग? म्हणजे?” महाशयांनी ते वर्तमानपत्र हातात घेतलं. पहिल्याच पानावर त्या मुलीच्या आत्महत्येची बातमी होती. तिच्याबद्दलही लिहिलं होतं. वय सत्तावीस. मध्यम बांधा. काळे केस, गोळा रंग आणि निळे डोळे!

तर ही अशी गोष्ट. माझ्या एका मित्राने मला सांगितलेली. इतकी वर्षं झाली, आजही आठवते. म्हणून म्हणतो, मनात घर केलं नाही तर ती भयकथा कसली! माझा मित्र हा असा, तर आज्जी तशी! आज्जीकडे तर अशा अफाट गोष्टी. मी कोकणातल्या आमच्या वाड्यात जातो तेंव्हा आजी एक से बढकर एक गोष्टी सांगत असते. म्हणे आजोबांना काय तर चकवाच लागला होता एकदा आणि शेजारच्या दामू अण्णांनी लहान असताना उलट्या पायाची बाई पहिली होती. आजी गोष्टी सांगायला लागली म्हणजे हडळ, समंध, पिशाच्च हे असले शब्द तर सापशिडीमध्ये फासे फेकावेत तशा सहजपणे सांगते. खरं तर भूता-खेतांच्या किती तरी गोष्टी मला आजीने सापशिडी खेळता खेळताच सांगितल्या होता. मी लहान असताना सुट्टीत जायचो तेंव्हा खेळत असू आम्ही सापशिडी, पत्ते वगैरे.

आमचा वाडा खूप मोठा, खूप प्रशस्त. एके काळी इंग्रजही मडमेला घेऊन राहायला यायचे म्हणे! पण खरं सांगू! वाईट वाटतं मला आमच्या वाड्याबद्दल. काही वर्षांपूर्वी एका नतद्रष्ट मनुष्याने आवई उठवली होती- त्या वाड्यात एका शाळकरी मुलाचं भूत आहे म्हणून. काय तर म्हणे तो मुलगा विहिरीत पडला होता. मला आठवलं नसतं का तो विहिरीत पडला नसता तर! आमच्या वाड्यावर नजर आहे सळ्यांची! आजही अमावस्या आली की काही बाही मंत्र म्हणतात, पूजा-बिजा करतात. आज्जी एकटीच असते तिथे आणि ती राहते बरं तिथे! म्हातारीला त्रास होतो त्या सगळ्याचा! उभी हयात वाड्यात गेली आणि आता शेवटी हे असं.तिला सोबत म्हणून अजूनही जातो मी कधी कधी तिकडे आणि ते सुद्धा अमावस्या बघूनच. बस मधून ऐटीत उतरतो आणि चालू लागतो. माणसांची दातखीळ बसलेली असते. पहातही नाही माझ्याकडे कोणी! बघितलं त्यांच्याकडे तर वश करेन अशी भिती वाटत असावी त्यांना- जसं काही मीच भूत आहे!

आज्जी दर उघडते. मी आत जातो. वाड्याची अवस्था बघून वाईट वाटतं. रयाच गेलीये पूर्ण. धुळीचं साम्राज्य पसरलंय सगळीकडे. आज्जी राहतेच कशी देव जाणे! आजी चहा टाकते. ‘उद्या अमावस्या आहे.’ आम्ही जमिनीवर बसतो तोच आज्जी म्हणते. ‘माहितीये.’ अमावास्येच्या दिवशी तरी आज्जीला एकटं राहावं लागू नव्हतंच म्हणूनच तर मी येत असतो. माझं येणं आज्जीला आवडत नाही, पण माझी काळजी कळते तिला. ‘मंत्र वाढवलेत त्यांनी. पुष्कळ वेळ म्हणत बसतात आता. नको जीव करतात. चार वेळा ओरडून सांगितलं त्रास होतो मला म्हातारीला. ऐकतच नाहीत माझं.’ आज्जीच्या डोळ्यात पाणी आणि माझ्या मस्तकात तिडीक. ‘रात्र होऊच दे उद्याची. बघतोच त्यांना. आईच घालतो एकेकाची.’

अमावास्येची रात्र. मंत्रांचा घोष. असह्य होतो आवाज. जोरजोरात ओरडतो आम्ही. मंत्रघोष अजून मोठा. त्या कोलाहलात आजी म्हणते, ‘बाळा चल! आपणच जाऊ इथून. वड्यावर नजर आहे मेल्यांची. ही माणसं राहू देणारच नाहीत आता आपल्याला इथे.’ माझा दुजोरा. आम्ही विहिरीकडे जातो आणि मोठ्या आवाजात ओरडतो- ‘जातो! आता नाही येणार पुन्हा इथे.’

त्या वाड्यावर आता जात नाही आम्ही!

-सौरभ राघवेंद्र.