•mr•

रात्र.

त्याच्या शेजारीच पडलेला फरशीचा एक तुकडा त्यानं उचलला, एका डोळा मिटून नेम धरला आणि कमालीच्या जोरानं भिरकावून दिला. नकळतं वय होतं त्याचं. आपण काय करतो आहोत हे त्याला उमजण्याआधीच फरशीच्या तुकड्यानं अच…

त्याच्या शेजारीच पडलेला फरशीचा एक तुकडा त्यानं उचलला, एका डोळा मिटून नेम धरला आणि कमालीच्या जोरानं भिरकावून दिला. नकळतं वय होतं त्याचं. आपण काय करतो आहोत हे त्याला उमजण्याआधीच फरशीच्या तुकड्यानं अचूक वेध घेतलेला.

संध्याकाळची वेळ होती. बागेतल्या गवतामध्ये कुत्र्याचं एक पिलू मनसोक्त खेळत होतं. त्याच्या चिमुकल्या पायावर त्या तुकड्यानं आघात केला आणि अकस्मात झालेल्या आघातानं भेदरलेलं पिलू जीवाच्या आकांतानं ओरडलं.

तो मुलगा गोंधळला. आपल्याला कोणी तरी बघेल ह्या भीतीने झाडाच्या पाठीमागे लपला. पुढचा किती तरी वेळ ते पिलू ओरडतच राहिलं.

त्या पिलाची आई आणि बाकीच्या पिलांपासून ते वेगळं झालं होतं. चुकलेली वाट त्याला ह्या बागेत घेऊन आली होती. स्वत:मध्ये रमण्याची कला त्या पिलाला अवगत होती. मावळतीच्या सोनेरी अभाळाखालच्या ओलसर गवतातले त्याचे खेळ पाहावेत एखाद्याने. कोणी विचारही करू शकलं नसतं की ह्याची वाट चुकलेली आहे. त्या पिलाच्या मनामध्ये कदाचित त्याच्या आईच्या स्मृतींचा गंध असेल, बाकीच्या पिलांच्या आठवणी असतील; पण त्याच्या स्वानंदी वृत्तीसमोर एकाकीपणाचं वैषम्य नेहमीच बुजून जात असावं.

मात्र त्या संध्याकाळचं निमित्त झालं आणि त्याच्या एकाकीपणाला भेसूर वाचा फुटली. त्याच्या क्रंदानानं आभाळ भरून गेलं. त्याला पाप-पुण्य, कर्म-बंधनं, देव-दानव अशा कुठल्याच कल्पनांचा ठाव नव्हता. आभाळाचा ठाव घेणारे त्याचे डोळे निरागस होते. इतर दु:खांसारखं त्याचं हे दु:खही सरती रात्र तिच्यासोबत घेऊन जाणार होती.

फरशीचा तुकडा भिरकावून झाडामागं लपताना त्याला वाटलं होतं की तो इतरांपासून लपू शकला, स्वत:पासून लपू शकला म्हणजे अशाच चतुराईने आता त्या रात्रीपासुनही तो लपू शकेल.

- सौरभ राघवेंद्र.