•mr•

प्रश्न

(प्रस्तुतचा लेख जुन्या ब्लॉगवर लिहिला होता. तो मी इथे पुन्हा पोस्ट करतो आहे.)

(प्रस्तुतचा लेख जुन्या ब्लॉगवर लिहिला होता. तो मी इथे पुन्हा पोस्ट करतो आहे.)

लिहिणं हल्ली कठीण होत चाललंय. गेली साडे-तीन वर्षं मी अखंड लिहितोय. कित्येक वह्या भरल्या आणि फेकून दिल्या मी पण आताच हे अवघडलेपण का याचं उत्तर काही केल्या मिळत नाही...

मला मुळात प्रश्नच इतके पडतात की कोणाची उत्तरे शोधावी आणि कोणाची नको असे होऊन जाते ! मुळात हे प्रश्न पडतातच का?पडला की नाही नवा प्रश्न ! या प्रश्नोत्तरांच्या मागं धावता धावता मग थकवा येतो खूप आणि अश्याच केविलवाण्या अवस्थेत कधी झोप लागते ते समजतही नाही ! मग उठल्यावर पुन्हा नवे प्रसंग अन नवी प्रश्नावली !

आता सुद्धा एक नवा प्रश्न पडतोय ! पुढे काय लिहू?

शांत दुपार पसरली आहे. वाऱ्याच्या स्पर्शाने सळसळणारी पाने. मध्येच एखाद्या पक्ष्याची आपल्या पिलांना हाक. नुकतीच एक खार खिडकीच्या गजांवर खेळून गेली. झुबकेदार शेपूट,खोडकर आणि पाणीदार डोळे ! स्वच्छंदी. त्या खारीला न सबमिशन चं प्रेशर न देशाचा पंतप्रधान मोदी होणार कि राहुल गांधी होणार याबद्दल उत्सुकता. खिडकीच्या चौकटीवर पडलेला एक छोटासा शेंगदाणा तिला मिळाला कि तिचे छोटेसे डोळे लुकलुकतात मग पुढच्या दोन पायांनी ती तो पकडते आणि खाऊनही टाकते ! आणि नाहीच मिळाला तर आपली झुबकेदार शेपूट हलवत उडी मारून निघूनही जाते. शेंगदाणा कधी मिळाला तर तिला त्याचा लोभ नाही आणि नाही मिळाला तर आमच्यावर राग नाही !

मी ही मग विचार करू लागतो. राहता येईल का मला एवढं सहज?इतकं स्वच्छंदी आणि इतकं साधं?आणि इतकं निरागस?या प्रश्नांना मला कधीच उत्तर नाही मिळत. मिळतात ती फक्त स्पष्टीकरणे. ती देखील स्वतःचं समाधान करण्यासाठी आणि माझं जे काही चालू आहे ते जस्टीफाय करण्यासाठी. गम्मत आहे ना आपल्या मनाची. कोणती गोष्ट कधी कशी फिरवेल सांगता नाही येणार.

पण स्वच्छंदी राहणं म्हणजे तरी काय?मनाला येईल तसा वागणं की आणखी काही?मग स्वैराचार आणि स्वच्छंद यामध्ये काही फरक आहे का?यामध्ये सीमारेखा आहे का?असली तर शोधायची कशी?सापडलीच तर आपला शोध योग्य आहे हे समजणार तरी कसे?ही प्रश्नांची संततधार अशीच कायम माझ्या डोक्यात बरसत राहते...

मला असं नेहमीच जाणवत आलं आहे की एक माणूस म्हणून माझा आणि या निसर्गाचा कुठे तरी खूप घनिष्ट संबंध आहे. निसर्ग आपल्याला अन्न देतो. वृक्ष सावली देतो. पाउस पाणी देतो वगैरे आहेच ते. प्राथमिक शाळेत निबंध लिहित असल्यापसुन जाणतो मी. पण आता मीही थोडा मोठा झालोय. जाणीवांच्या गाभाऱ्यामधले हुंकार आता दीर्घ काळ टिकतात. त्या स्वरांमाधली एक एक श्रुती स्पष्टपणे ऐकण्याचा मन प्रयत्न करते. संवेदना सखोल होत जातात.

निसर्ग मला सर्वार्थाने आता आपल्या आयुष्याच्या रथाचा सारथी वाटू लागलाय. आपल्याला कुठे जायचं आहे हे आपल्याला माहिती असावं लागतं. काय मिळवायचं आहे हे ठाऊक असावं लागतं मग तो सारथ्य योग्य तऱ्हेने करतोच.

एक छोटीशी स्वच्छंदी खार साधेपणाचा केवढा मोठा पाठ पढवून जाते आणि आपल्यापाशी मोबदला काय मागते?खिडकीच्या चौकटीवर ठेवलेला एकच छोटासा शेंगदाणा?तो ही नसला तरी चालतो बरं तिला. मुळात तिला काहीच नको असतं. अगदी काहीच. किती साधं सूत्र आहे !

त्या खारीला किंवा सुर्योन्मुख कमळाला असा कधीच नाही वाटत की आपण काही तरी वेगळे कराव. वेगळे बनावे. कावळ्याला कधी तरी वाटलं असेल का हो की चला आता आज आपण गोरे होऊ म्हणून?एखाद्या हरिणाला वाटत नसेल का की फॉर अ चेंज आज आपण गवत खाण्याऐवजी सिंहाची शिकार करू?किंवा छोट्याश्या चिमणीला उंच आकाशात झेपावणाऱ्या राजबिंड्या गरुडाचा हेवा वाटत?

मला तरी नाही वाटत की त्यांना असं कधी वाटत असेल म्हणून. कारण हा निसर्ग आहे. निसर्गाच्या अनेक सुक्तांपैकी हेच एक सुक्त आहे. आपण स्वतःला आणि आपल्या आजूबाजूंच्या सर्वांनाच मग ते आपले शत्रू असोत अथवा मित्र गुण-दोषांसह आपलसं करून घ्यायचं असतं. निसर्ग हेच करतो.

छोटीशी चिमणी गरुडाप्रमाणे झेपावू शकत नाही पण म्हणून ती तिथेच थांबत नाही. आपल्या पिलांसाठी चारा शोधते. या झाडावरून त्या झाडावर,अंगणात दाणे टिपत,आपल्या थव्यामध्ये बागडत दिवसभर थकते आणि आपल्या छोटाश्या घरट्यात पिलांसह निजते. तिला समजतं आपलं आयुष्य सुंदर कसं बनवायचं. एखाद्या छोट्याश्या बाळासाठी चिऊताई कसं बनायचं आणि त्यांच्याही आयुष्यात छोटासा का होईना पण आनंद निर्माण कसा करायचा !

हेच तर करतो निसर्ग...

आनंद निर्माण करतो. एखादं छोटासं फुल आणि त्याचा मोहक गंध क्षणात सुखावून जातात. पावसाची एखादी सर आणि नंतर पसरलेला तो मृद्गंध नकळत आपल्याला हळवं बनवून जातो. मन शांत करणारा अथांग समुद्र,गर्द वृक्षराई. किंवा मग मावळतीच्या सोनेरी रंगाने उजळून निघालेली सोनेरी धरा. सारचं सुखावणारं.

- सौरभ राघवेंद्र.