•mr•

प्रसंग: उत्तरार्ध

पर्वतीवर जाणं हल्ली माझ्या दिनक्रमाचा एका भागच बनलंय. सकाळी सात वाजता एकदा जावं आणि पुन्हा संध्याकाळी सहा वाजता. का जातो असं विचारलं तर नेमकं असं सागंता नाही यायचं. म्हटलं तर व्यायाम होतो, म्हटलं तर वेळ छान जातो.

पर्वतीवर जाणं हल्ली माझ्या दिनक्रमाचा एका भागच बनलंय. सकाळी सात वाजता एकदा जावं आणि पुन्हा संध्याकाळी सहा वाजता. का जातो असं विचारलं तर नेमकं असं सागंता नाही यायचं. म्हटलं तर व्यायाम होतो, म्हटलं तर वेळ छान जातो. कधी कधी काही ओळखीचे चेहेरे दिसतात तर कधी काही अनोळखी चेहरे ओळखीचे होतात. कधी विष्णू मंदिराच्या सभोवतालाने पांघरलेली निरव शांतता मला बोलावते तर कधी आयुष्यात ओढावून घेतलेल्या समस्या पार्वतीच्या पायथ्याशी सोडून वर छान विहार करता येतो म्हणूनही जावसं वाटतं.

परवाच्या संध्याकाळी सुद्धा या यादीतलं असंच कुठलंस एक कारण उचलून मी पर्वतीकडे गेलो. पर्वतीपाशी पोहोचलो तेंव्हा पायथ्यापाशी मला थोडी गर्दी दिसली. पार्वतीच्या पायथ्याशी नीरेपासून पिझ्झ्यापर्यंत येनकेन प्रकारचे पदार्थ मिळतात. प्रथम वाटलं त्याच्यासाठीचीच गर्दी असेल, पण कुठल्याश्या मध्यबिंदु भोवती जमलेल्या त्या गर्दीमधून बोलाचालीचे काही आवाज ऐकू आले आणि कळलं की प्रकरण काही साधं नाही.

माणसाला बऱ्याचदा गर्दीमध्ये मिसाळायाचं म्हटलं की कसंसंच होतं. नको वाटते ती गर्दी, नको वाटतात ती माणसं. ती घसट, आगंतुक लगट. बिनचेहऱ्याच्या अनोळखी प्रवाहाचा भाग होणं नकोसंच होतं कित्येक वेळा. पण बघ्यांच्या गर्दीच्या बाबतीत मात्र हा नियम प्रत्येक वेळी लागू होतोच असं नाही. बघ्यांच्या गर्दीत आपण चटकन सामावून जातो. आपल्या नकळत आणि त्या गर्दीच्याही नकळत. मग न त्या अनोळखी चेहऱ्यांची फिकीर न शेजाऱ्याचं कोपर आपल्या पाठीला किंवा पोटाला लागलायचा राग. समोर काय घडतंय हे पाहण्याच्या उत्सुकतेनं प्रेरित झालेल्या गर्दीत आपण सहजगत्या मिसळून जातो. त्या संध्याकाळी मी ही गेलो, पुढे सरसावलो. आणि जे काही मी पाहिलं ते पाहिल्यानंतर माझ्या मनाला ज्या विषण्णतेनं ग्रासलं, ती विषण्णता आजही त्या प्रसंगाच्या मात्र स्मरणानं पुन्हा जागी होते.

त्या गर्दीच्या मधोमधच एक दुचाकी उभी केली होती. दुचाकीस्वार एक तरुण मुलगा होता. सव्वीस-सत्तावीस वर्षांचा. त्याच्याबरोबर त्याचे दोन मित्र होते. त्या तिघांचीही व्यक्तिमत्वं चौकातल्या एखाद्या कट्ट्यावर बसून तोंडातल्या तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रस्ते रंगवत येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांची-मुलींची छेड काढणाऱ्या गावगुंडांना शोभावीत अशीच होती.

त्या दुचाकीस्वाराचे दोन मित्र त्यांच्यासारख्याच एका मुलाशी तावातावाने भांडत होते. त्या मुलाचं वय साधारण सतरा-अठरा वर्षाचं असावं. अर्वाच्य शिव्यांचा अक्षरशः पाउस पडत होता. शा‍ब्दिक वार करता करता त्या हे त्या मुलाच्या कानशि‍लात भडकावत होते, त्याला लाथा मारत होते. त्या मुलाला मारणे ही आपल्या मर्दमुकीची कसोटीच आहे असा त्यांचा समाज झाला था जणू. त्या मर्दमुकीच्या अनुभूतीचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरून आणि देहबोलीतून स्पष्टपणे परावर्तीत होत होता. माझं लक्ष मग दुचाकीस्वाराकडे गेलं.

आपल्या दुचाकीच्या जवळच तो उभा होता. त्याने आपल्या पायातील चप्पल उगारलं होतं. आपल्या मधल्या शूर पुरुषाची नुकतीच जाणीव झाल्याप्रमाणे एखाद्या सैनिकाने गनिमावर ज्या त्वेषाने वार करावे तश्याच त्वेषाने तो समोरच्या व्यक्तीवर आपल्या चपलेने बेफाम वार करत होता. राग, क्रोध, अहंकार अशा कैक भावनांच्या राक्षसी वणव्याची धग त्याच्या डोळ्यात दिसत होती तर त्याच्या देहबोलीमध्ये पिसाटलेल्या जनावराची निर्दयता आणि क्रोर्य. ज्या व्यक्तीला तो मारत होता ती व्यक्ति एक सोळा-सातारा वर्षांची मुलगी होती, आणि मला नंतर कळलं ती मुलगी त्याची सख्खी बहीण होती !

साऱ्या प्रसंगाचा मग मला चटकन उलगडा झाला. प्रेमकरण, विजातीय मुलगा, त्यात कनिष्ठ जातीचा. बंधुराजांची बहिणीवर पाळत. पर्वतीवरच्या वनराईत बसलेल्या या दोघांना त्यानं पाहिलं, फोन करून मित्रांना बोलावून घेतलं आणि या दोघांना ‘रंगे हाथ’ पकडलं. दोघांनी त्या मुलाची ‘काळजी’ घेतली आणि भावाने त्याच्या सख्ख्या बहिणीला भर संध्याकाळी पार्वतीच्या पायथ्यावरून फरफटत खाली आणलं. आणि खाली आल्यावर बाचाबाची वरून हे प्रकरण हातघाईवर गेलं.

त्या मुलीच्या अवस्थेकडे मला पाहवत नव्हतं. तिचे डोळे, ओघळून ओघळून डोळ्यामधलं पाणी संपून गेल्यावर जसे व्हावेत तसे झाले होते. स्वत:च्याच दादाचे शा‍ब्दिक आणि शारीरिक फटके तिच्या सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे गेले होते. ती सुन्न झाली होती, किंवा अर्धमेली कदाचित, पण तिचा प्रतिकार मंदावला होता हे निश्चित. तिचे केस पुरते विस्कटून गेले होते. तिच्या हाताला, पायाला खरचटलं होतं, रक्त येत होतं. अंगावरचे कपडे फाटले होते. त्या फाटलेल्या कपड्यांमधून तिचं स्त्रीसुलभ शरीर मार्यादेपाक्षा जास्त उघडं पडत होतं. तिला मारता मारता तिच्या या शरीराला स्पर्श करण्याची एकही संधी तिच्या भावानेही सोडली नाही.

हे सगळं बराच वेळ चालू होतं. किमान वीस एक मिनिटं तरी. बघ्यांच्या गर्दीतली अनेक मुलं या प्रसंगाचा व्हिडीओ बनवण्यात मग्न होती. प्रसंग पहात हळहळत पर्वतीकडे मार्गस्थ होणारी वृद्ध मंडळी इतर गप्पागोष्टी करता करता त्या मुलांच्या असंस्कृतपणाचा धिक्कार करत होती. तिथे उभ्या चार आठ बायकांचं दोन पावलं पुढं, चार पावलं माग करत घडणाऱ्या प्रसंगाचा आदमास घेणं चालू होतं. काही जणांच्या वखवखलेल्या नजरा त्या मुलीच्या फाटलेल्या कपड्यामधून डोकावणाऱ्या शरीराचं निरीक्षण करत होत्या. दुचाकीस्वाराचे मित्र त्या आधीच गांगरलेल्या मुलाला निर्दयपणे मारत होते. त्या मुलीला तिचा दादा भर रस्त्यात शिव्या देत होता. पायातल्या वाहाणेने झोडपत होता.

हे सगळं चालू असताना बघ्यांची गर्दी शेवट पर्यंत बघ्यांचीच राहिली. ते तिघे अखेर दमले तेंव्हा कुठे परिस्थिती जरा थंडावली. त्या मुलीने मोकळा श्वास घेतला, मुलाने स्वत:ला सावरलं. भावाने आपल्या बहिणीला दुचाकीवर टाकलं आणि मुलाला उद्या तुझ्या कामाच्या ठिकाणी येऊन पुन्हा ‘फोडून काढेन’ अशी सूचना देऊन तो घरी निघून गेला.

ते तिघे दिसेनासे झाल्यावर इकडे जमाव पांगू लागला. जे घरी जात होते, ते घरी निघून गेले. पर्वती चढण्यासाठी आले होते, ते वर निघून गेले. नुसतेच उभे राहिले होते, ते तसेच उभे राहिले. फक्त काही क्षणांचाच अवधी, काही वेळापूर्वी पर्वतीच्या पायथ्याशी असं काही घडलं होतं, याची एकही खूण काळाच्या पटलावर शिल्लक राहिली नाही !

उत्क्रांतीच्या ओघात आपण चार पायांवरून दोन पायांवर आलो. आपल्या तोंडातल्या सुळ्यांची धार कमी होत गेली. अंगावरचे केस कमी झाले. आपली शेपूट गायब झाली. नखं छोटी झाली. गुहेच्या चार भिंती झाल्या. एरवी कच्च्या मांसाचे भक्षण करणारे आपण शेतात पिकलेलं धान्य, भाजीपाला छान भाजून, शिजवून, निवडून खाऊ लागलो. लग्नाची संकल्पना अंगीकृत करून आपल्या शरीरसंबंधांना पावित्र्याचं अधिष्ठान देऊ केलं. कुठल्या तरी संस्कृतीचे पाइक झालो- सुसंस्कृत झालो. चांगलं बनण्यासाठी, माणूस होण्यासाठी जे जे म्हणून काही करता येईल ते सगळं केलं, अगदी सगळं केलं. पण स्वत:मधलं जनावर मात्र तसंच जिवंत ठेवलं.

आपल्या अहंकारनं या जनावराचं आपण पालनपोषण केलं. वाढवलं, त्याला मोठं केलं. या आणि अश्या कित्येक प्रसंगी ‘तूच माझा स्वामी’ असं म्हणून आपल्या मनाचा ताबा घेण्याची मोकळीक त्या जनावराला आपण देऊ केली. आपली माणुसकी, आपली संस्कृती, सदसद्विवेकबुद्धि, आपल्यावरच्या कैक शिकवणी, अंधळ्या भक्तीने ज्यांची भजनं आपण गातो असे आपले शेकडो परमपूज्य राष्ट्रपुरुष, सगळं सगळं बाजूला ठेवलं. या अशा क्षणांसाठीच. या अशा प्रसंगांसाठीच.

कधी वांशिक आणि धार्मिक अहंमन्यतेच्या रुपानं हे जनावर बाहेर आलं तर कधी जातीय विद्वेषाच्या रुपानं. आपल्या स्त्री वर आपला अधिकार हवा या भावनेनं स्त्रीच्या अस्तित्व-स्वातंत्र्याला या जनावरानं आपलं विषारी नख लावलं तरी कधी सत्तेच्या, शक्तीच्या आणि पैशाच्या मदाने कित्येकांना आपल्या पायाखाली लोळवलं, तुडवलं.

तसं पाहिलं तर उत्क्रांतिच्या एका टप्प्यावर आपल्याला या जनावराची गरज होती. अस्तित्व टिकवण्यासाठी आक्रमक होणं आवश्यकच होतं. पण आता आपण पुष्कळ अंशी माणसांत आलो आहोत, समोरच्या व्यक्तीला शारीरिक किंवा भावनिक पातळीवर न दुखावता सामंजस्यानं आणि सामोपचारानं आपण वागू शकतो हे आपण तात्विक नाही तर जाणीवेच्या पातळीवरही समजून घेण्याइतकी आपली बौद्धिक कुवत नक्कीच आहे असं मला खात्रीपूर्वक वाटतं.

आपल्यला जसं आचार आणि विचार स्वातंत्र्य असतं तसं समोरच्या व्यक्तीला सुद्धा असतं. त्यामुळं तत्त्वांचे, विचारसरणीचे संघर्ष हे व्हावयाचेच, पण हे संघर्ष सोडवण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्यामधल्या जनावरा को पाचारण करणं हे आपल्याला एक माणूस म्हणून आजिबात शोभणारं नक्कीच नाही.

रागाच्या भरात किंवा दु्:खाच्या आवेगामध्ये बऱ्याच वेळा आपला समतोल ढळतो, आणि यात काही गैर आजीबात नाही, पण समर्थ रामदासांनी सांगितलेला ‘अखंड सावधान’ हा संदेश अंमलात आणावयाचा असतो तो या अशा प्रसंगीच. आपण एरवी तसे पुष्कळ सभ्य असतो, शांत असतो, संतुलित असतो; पण तरीसुद्धा आपल्याकडून आपल्याच नकळतपणे एखाद्यावर हात उगारला जातो, किंवा एखादा आपल्या शब्दांनी दुखावला जातो, तो या अशा बेसावध क्षणीच. हे टाळता येऊ शकतं. मान्य की हे कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही.

या लेखामध्ये विषद केलेला प्रसंग असो किंवा पूर्वार्धामधला त्या कोण्या मुलावर ओढावलेला प्रसंग असो- या अत्यंत दुर्दैवी घटना आहेत. मानवी शरीर एकविसाव्या शतकात येऊन ठेपलं असलं तरी आपल्या स्वभावामधला हिंस्त्रपणा मात्र जुनाच आहे याची विषण्ण करून जाणारी साक्ष या घटना पटवून देणाऱ्या या घटना आहेत.

जमावाच्या तावडीत सापडलेल्या समान्य खिसेकापुचा दगडाने ठेचून खून होतो, तीन किंवा चार वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार होतो, तरुण मुलीवर बलात्कार होऊन तिचा निर्घृण खून होतो, अनेक वेळा वाद-विवादांत समोरच्या व्यक्तीची स्वप्रतिमा, त्याची श्रद्धा आणि जीवनमूल्यं धुळीला मिळतील इतके तीव्र शा‍ब्दिक हल्ले आपण चढवतो ते या हिंस्त्रपणाच्या जोरावरच.

या अशा वागण्याला कारणीभूत ठरणाऱ्या मानवी स्वभावाचं, त्याच्या वागण्याचं आणि त्यामागच्या प्रेरणेचं वस्तुनिष्ठ आणि नेमकं विवेचन करण्याएवढी बौद्धिक पात्रता माझ्याठायी निदान या घडीला तरी नाही हे मी प्रांजळपाने कबुल करतो, पण जेंव्हा अशा प्रसंगांचा साक्षीदार होण्याचा दैवदुर्विलास माझ्यावर ओढवतो तेंव्हा मन विषण्ण झाल्यावाचून राहत नाही हे ही तेवढंच खरं.

- सौरभ राघवेंद्र.