•mr•

फोटोग्राफी

फोटोग्राफीचं आणि माझं अफेअर तसं जुनं आहे, पण हल्ली मी माझ्या विश्वात आणि कॅमेरा त्याच्या बॅगेत असतो. त्यात माझा सगळा डेटा असलेल्या दोन हार्डडिस्क्स आणि एक अख्खा लॅपटॉप लागोपाठ करप्ट झाल्यानं…

फोटोग्राफीचं आणि माझं अफेअर तसं जुनं आहे, पण हल्ली मी माझ्या विश्वात आणि कॅमेरा त्याच्या बॅगेत असतो. त्यात माझा सगळा डेटा असलेल्या दोन हार्डडिस्क्स आणि एक अख्खा लॅपटॉप लागोपाठ करप्ट झाल्यानं मी काढलेले जुने फोटोही डेटाच्या पडद्याआड गेलेत. त्यामुळं इथे-तिथे घेतलेला किरकोळ बॅकअप सोडला तर आमच्या अफेअरची पाटी आताशा पुरती कोरी झालीये!

त्यात माझ्या मोबाइलमध्येही बऱ्यापैकी बरे फोटो निघतात, त्यामुळे त्या एकाच फोटोसाठी बॅग उघडा, लेन्सेस बदला, फोटो काढला की तो लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करून नीट एडिट करा, मग तो पुन्हा ट्रान्सफर करून शेअर करताना कॉम्प्रेस करा.. हा सगळा उपद्व्याप आपण त्या प्रोसेस मध्ये सातत्याने असतो तेंव्हाच सह्य वाटतो, नाही तर एकट्या-दुकट्या फोटोसाठी हे सगळं करायचं म्हटलं तर कंटाळा येतो आणि ही प्रोसेस आपसूकच टाळली जाते.

हे असं असलं तरी शेवटी कॅमेरा तो कॅमेराच. क्लिक करण्यापासून ते क्लिक केल्यानंतर व्ह्यू फाईंडर मधून दिसणारं छोट्याशा सेन्सरने पडकलेलं विश्व, त्या क्षणी त्या ठिकाणी तो विशिष्ट प्रसंग पाहताना, अनुभवताना जे जाणवलेलं असतं त्याच्या जवळ नेऊन ठेवताना जो अनुभव मिळतो तो 'वन ऑफ अ काइंड'च म्हणावा लागेल. शिवाय एक नवीन फोटो काढताना, तो प्रोसेस करताना आधी काढलेले अनेक चांगले-वाईट फोटो, ते काढताना जमवलेल्या बऱ्या-वाईट आठवणी डोळ्यांसमोरून सरकत जातात ते वेगळंच.

त्यामुळे, इन प्रॅक्टिस मी फोटोग्राफीपासून हल्ली लांब असलो, तरी इन प्रिन्सिपल माझी फोटोग्राफी रोज सुरूच असते. नवं काही तरी साठवण्याची, जुनं आठवण्याची, जे आहे ते सगळं प्रोसेस करत राहण्याची, या सगळ्यातून शेवटी नवं काही तरी शोधण्याची, जुन्याकडे नव्यानं पाहण्याची नाही तर फुल न फुलाची पाकळी म्हणत जुन्यात हरवून जाण्याची प्रक्रिया सुरूच असते. बाकी मधूनच काढलेले हे फोटो वगैरे या प्रोसेसचं मटिरिअलिस्टिक मॅनिफेस्टेशन.

-सौरभ राघवेंद्र.