फोटो
मला विनोदी फारसं चांगलं लिहिता येत नाही म्हणून नाही तर सेल्फ डेप्रीशिएटिंग ह्युमरच्या चार सहा ओळी हमखास ठोकल्या असत्या ह्या फोटोसोबत. तसंही हल्ली कुठल्याही ओळीच्या नंतर एलओएल जोडलं की नाही म्हणायला ती ओळ ‘फनी’ वगैरे होते आणि ‘आय डिडन्ट मिन इट ऑल राईट!’- असं म्हणून त्या ओळीपासून आपल्याला सही सलामत सुटकाही करून घेता येते; पण लिखाणाच्या बाबतीत मात्र अपना एक उसुल है बॉस- नो चीप थ्रील्स. सस्ती मस्ती पचत नाही आपल्याला.;
मला विनोदी फारसं चांगलं लिहिता येत नाही म्हणून नाही तर सेल्फ डेप्रीशिएटिंग ह्युमरच्या चार सहा ओळी हमखास ठोकल्या असत्या ह्या फोटोसोबत. तसंही हल्ली कुठल्याही ओळीच्या नंतर एलओएल जोडलं की नाही म्हणायला ती ओळ ‘फनी’ वगैरे होते आणि ‘आय डिडन्ट मिन इट ऑल राईट!’- असं म्हणून त्या ओळीपासून आपल्याला सही सलामत सुटकाही करून घेता येते; पण लिखाणाच्या बाबतीत मात्र अपना एक उसुल है बॉस- नो चीप थ्रील्स. सस्ती मस्ती पचत नाही आपल्याला.
बाकी मला माझे स्वतःचे फोटो शेअर करायला विशेष आवडत नाहीत. ते चांगले येत नाहीत किंबहुना मी जसा दिसतो, ते नेमके तसेच येतात हे कारण त्यापाठी आहेच, पण जरी ते चुकून बरे आलेच तरी माझा फोटो बघण्यात कोणाला विशेष रस असेल असं मला अजिबातच वाटत नाही. त्यामुळं "अ फोटो नोबडी आस्कड् फॉर" हे माझ्या जवळपास सगळ्याच फोटोंचं मनातल्या मनातलं कॅप्शन असतं. ह्यावेळी ते उघडपणे लिहिण्याचा माझा मानस होता खरा; पण मग म्हटलं झाकली मूठचं बरी, रिकाम्या तळहातावर बोचलेली नखं लोकांना उगा दाखवा कशाला? एलओएल, राईट!? पण खरं सांगू का, एवढ्या सगळ्या लोकांचे एवढे सगळे चेहेरे पाहून 'आपणही मध्येच आपलं डोकं एकदा तरी वर काढू' असं वाटतंच कधी तरी, शिवाय कसए, कसंही असलं तरी डोकं आहे हे महत्त्वाचं ना, कसं?
आणि ह्या फोटोबद्दल विचाराल तर (खरं तर विचाराल असं वाटत तरी नाहीए, पण सा रे ग म्हटल्यावर मपधनिसा पण म्हणून टाकतात त्याच चालीवर सांगतो) चार एक महिने जुना आहे हा फोटो. केस बरेच वाढलेले होते माझे तेंव्हा आणि एरवीच मला ते विंचरायचा कंटाळा येतो- तेंव्हाची तर गोष्टच वेगळी होती. शिवाय माझे दोन स्टार्टअप्स वगैरे असले तरी माझे सगळे क्लाएंट्स कार्पोरेट कल्चरवाले असतात, त्यामुळं सटीव्ह जॉब्झवाला माज आपल्या बजेटमध्ये बसत नाही आणि हे ही नसे थोडके म्हणून, “अरे किती वाढवायचे केस, कापून ये- कसं दिसतंय ते!” असा आमच्या मतोश्रींचा मध्येच कधी तरी तगादा... ही अशी सगळी परिस्थिती माझ्या थेट डोक्यात गेली, मग मी नाव्ह्याकडे गेलो, खुर्चीत बसलो, नाव्ह्याने विचारलं काय करू? मी वैतागून म्हटलं "भादर"
मग काय!? तो हुकुमाचाच ताबेदार, केस त्याचे थोडीच जाणारेत. शिलगावलं मशीन आणि त्यानंतर जे झालं ते दिसतंचे फोटोत. तरी बरं, केसांच्या लांबीवर केस कापण्याचे पैसे मोजत नाहीत, नाही तर माझं पाकीटही पुढचे काही दिवस माझ्या डोक्यासारखं हलकं हलकं वाटत राहिलं असतं. असो. जे गेलं ते गेलं. ह्या फोटोमध्ये माझ्या डोक्यावर (टकलावर म्हणायला हवं खरं तर) थोडा अंधार आला असल्यामुळं परिस्थितीचं ओझं मी किती हलकं केलं होतं हे नीट दिसणार नाही तुम्हाला. (आणि ते दिसत नाहीए हे एका अर्थी बरंच आहे. ज्यात ते दिसतंय ते पहिल्यावर, मी माझे फोटो शेअर करत नाही, हेच बरं असं तुम्ही सुद्धा म्हणाल कदाचित. एल ओ एल, राईट?)
बाकी माझ्या एका मैत्रिणीची थिअरी आहे की मी हे असं काही ‘बावळट सारखं’ लिहीत असतो, त्यामुळं मला गर्लफ्रेंड मिळणं वगैरे खूप कठीण आहे. त्यामुळं "लिहायचं असेल तर असलं काही तरी लिहिण्यापेक्षा कूल आर्टिकल्स शेअर कर, चांगले चांगले फोटोज् शेअर कर, तुझ्या स्टार्टअप्स विषयी लिही..." असे मजेशीर सल्ले ती मला देते. त्यात ती म्हणे की माझा ‘आनंदी’ नावाचा लेख वाचून तिच्या एका मैत्रिणीने मला फेसबुकवर फॉलो करायचं थांबवलंय! तेंव्हा मी म्हटलं, “हो का? मग असे सल्ले देण्यापेक्षा मला नंबरच दे ना तिचा!” तुम्हाला सांगतो सल्ले द्यायला साले सगळे पुढे असतात, पण नंबर द्यायच्या वेळी मात्र तो नेमका डिलीट झालेला असतो! इति तात्पर्यम्! जोक्स अपार्ट- ती बिचारी जी कोणी होती, तिचा नंबर मला एनिवे नकोच होता; पण माझ्या मैत्रिणीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता.
एनिवे.. तिचा चेहरा तूर्तास बाजूला ठेऊ आपण. मला खरी गम्मत वाटते ती ह्या गोष्टीची की त्या झुकरबर्गनं ह्यांना गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड शोधून द्यायला फेसबुक काढलंय असंच ह्यां लोकांना वाटत असतं. काही जणांचं जुळलं असेल इथे, नाही असं नाही- पण भाई, फेसबुक तुमचीच खाजगी माहिती गोळा करून तुमच्याच भिंतीवर जाहिराती रंगवणारा भला मोठा कारखाना आहे हे आपण विसरतो. फेसबुकनं काय काय गोंधळ घातलेत ह्यावर एक वेगळं पुस्तक लिहिता येईल एवढा मोठा आईसबर्ग आहे ह्यांच्या कारनाम्यांचा. कोणाला माहिती हवी असेल त्याबद्दल तर पर्सनल वर मेसेज धाडा मला. (फोन नंबर सकट धाडला तर उत्तमच! एल ओ एल, राईट?)
बाकी माझ्या गर्लफ्रेंड विषयी लोकांना उत्सुकता का असावी हे मला न उलगडलेलं कोडं आहे. करण मला स्वतःला तरी कोणाची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड कोण आहे हे जाणून घेण्यात काडीचाही रस नसतो. ब्रो- ज्याचा त्याचा प्रॉब्लेम तो- जानू आहे की मनू आहे हे जाणून घेऊन मी काय करणारे! आणि लोकांना तरी काय करायचं असतं हे देवच जाणे- उगाच चौकश्या! मागे केंव्हा तरी एक मित्र बऱ्याच दिवसांनी भेटला होता. भेटल्या भेटल्या पाचव्या मिनिटालाच त्यानं विचारलं, "अरे त्या तुझ्या एक्सचं काय झालं?” मी वैतागलोच. मी म्हटलं, "इंटिग्रेट केलं, मग एक्स एल झालं... तुला काय करायचंय?" त्यावर तो सारवासाराव करत म्हणाला, "अरे तसं नाही, तुला गर्लफ्रेंड झाली का असं विचारायचं होतं मला." मी म्हटलं, “सिरीअसली? हे असं? तुझ्या कम्युनिकेशन स्किल्स वर थोडं काम कर भावा! आणि व्हायला गर्लफ्रेंड म्हणजे काय बाळ आहे का?” आणि ह्या वाक्यानंतर त्याला एक रापचिक शिवी हसडली मी. गर्लफ्रेंडचं वगैरे जाऊदे, पण त्या मित्राची आणि माझी भेट मात्र नंतर कधीच झाली नाही. एल ओ एल, राईट?
तर लोकहो हे असं असतं. चेहरा घेऊन समोर यायचं तर त्या चेहऱ्याला प्राप्त आकार देणाऱ्या गोष्टी सांगितल्याशिवाय राहवत नाही मला. ह्या गोष्टींत कधी मी नायक असतो, कधी व्हिलन असतो. ह्या गोष्टी कधी कौटुंबिक असतात, कधी मित्र-मैत्रिणींवाल्या असतात. काही गोष्टींना कधी परिस्थिती जबाबदार असते, काही गोष्टींना आपलेच उपद्व्याप जबाबदार असतात. चार गोष्टींसारख्या गोष्टी- जशा तुमच्या, तशाच माझ्या आणि मी म्हणतो चेहऱ्याच तरी काय घेऊन बसायचं एवढं? एखादा तीळ असतो चेहऱ्यावर, डाग असतो, सुरकुत्या असतात, हसू असतं, डोळ्यात स्वप्नं असतात, कधी पाणी असतं. चिंता असते, व्यथा असतात, आनंद असतो, माजही असतो- सगळंच असतं, आणि हे सगळं असण्यातच खरी मजा असते.
मध्यंतरी फेसअॅप नावाचं एक डिजिटल वादळ घोंगावून गेलं. त्यात आपला फोटो टाकला की म्हातारे झाल्यावर आपण कसे दिसणार हे अॅप्लीकेशनचा अल्गोरिदम आपल्याला दाखवतो. त्या अॅपच्या भोवती उठलेलं वादाचं मोहोळ बाजूला ठेवू, पण मला कुतूहल होतं म्हणून आय हॉपड् ऑन टू द बॅंडवॅगन. टर्न्स आउट- त्यातल्या त्यात बरा दिसेन मी काही वर्षं डाऊन द लाईन. एलओएल, राईट? बाकी दिसण्याचा वगैरे फारसा विचार करायचा नसतो आपण. एकसो तीस करोड लोक आहेत अपने भारतवर्ष मे! त्यातलेच आपण एक. कुठं सिनेमात काम करायचंय आपल्याला? टापटीप राहिलं तरी पुष्कळए.
एनिवे, आज दिवाळी म्हणून लवकर उठलोय नाही तर एरवी साडे आठ शिवाय उठत नाही आपण. आळशी नाहीये मी, कामामुळं रात्री जागरण होतं उशिरापर्यंत; पण आता भल्या पहाटे उठून करायचं काय हा प्रश्न पडला मला. मग हे असलं अरबट चरबट लिहून तो सोडवला! गोड मानून घ्या! बाकी लिखाणावरून आठवलं- कलाक्षेत्रात (उगाचच) वावरणारे एक गृहस्थ भेटले होते मध्यंतरी. ते मला म्हणाले, “मी लिखाण वाचतो तुझं. बरं लिहितोस, पण तुझ्या पात्रांना संघर्षाची खोली नसते असं मला वाटतं. वरवरचे संघर्ष असतात त्यांचे. पात्रं कशी डीप हवीत.”
मी विचारलं, “कशी हवीत?”
ते: “डीप हवीत.” (मुठी आवळून पोटातून शब्द ओढून काढल्याच्या आवेशात ते म्हाणाले.) “अशी डीप हवीत.”
मी: “अहो ते कळलं, पण डीप म्हणजे कशी?” लिखाणाच्या बाबतीत कोणी सल्ला दिला तर मी तो गांभीर्यानं घेतो. मला वाटलं की खरं काही तरी म्हणायचं असेल ह्यांना डीपच्या पाठीमागे. म्हणून म्हटलं, विचारून तर बघावं- “डीप म्हणजे कशी?”
ते: “अरे डीप रे. डीप. त्या आपल्या ह्यांच्यासारखी. लक्षात येतंय का?” ते आपले हे. सदर गृहस्थांना आणि त्या आपल्या ह्यांना मी माझ्या अदृश्य हातांनी मनोमन नमस्कार केला. ते आपले हे!
मी: “हो हो! बरोबर. ते आपले हे. हो, त्यांच्याचसारखी हवीत.” नको असलेलं संभाषण थांबवायचं असेल तर एक मूलमंत्र सांगतो. समोरचा जे काही सांगतोय त्याच्या हो मध्ये हो मिसळायचं. नंदीबैलासारखी मान डोलवायची. म्हणजे कसं- तो बैल तो बैलच राहतो, पण आपण आनंदी राहतो. (नो ऑफेन्स टू शिवारातले बैल्स. यु गाईज आर डुइंग अ ग्रेट जॉब. यु गाईज आर ग्रेट! (हे लिहिताना मला डोनाल्ड ट्रम्प आठवला. (निव्वळ योगायोग.)))
ते: “आता कसं! कळलं ना! बाहेर ये रे तू- बाहेर ये.” एक बाउन्सर टाकून हा मनुष्य ओव्हर संपवेल म्हटलं अजून एक बॉल! आणि तो पण गुगली. बाहेर काय ये? लपून बसलोय का मी कुठे?
मी: “काका आपण बाहेरच आहोत. अजून कुठं बाहेर येऊ आता?” वाटत असला तरी ह्या रश्नात कुठलाही उपहास अध्याहृत नाहीये. जसा मी निरागस आहे, तसा हा प्रश्न ही अगदी निरागस होता.
ते: “अरे तसं नाही. मध्यमवर्गीय मानसिकतेमधून बाहेर ये. येता येता तुझ्या पात्रांना घेऊन ये. संघर्ष कर. संघर्ष. काय समजलास? संघर्ष कर.”
मी: “संघर्ष? उगाचच? कोणाविरुद्ध? ” ‘भेंडी! आता बास!’ मी मनातल्या मनात म्हटलं. एक तर मिडल क्लास विक पॉंईंट आहे आहे आपला. त्याला कोणी काही बोलेलेलं खपत नाही आपल्याला आणि इथे आधीच इकॉनॉमिक स्लोडाऊन, त्यात आमचं पोट हातावरचं. पाणी गळयापर्यंत आलंय इथं आणि हे गृहस्थ म्हणतात ओत अजून पाणी, ओत अजून पाणी.)
ते: “अरे कोणा विरुद्ध असा नाही रे.. संघर्ष. ते आपले हे आहेत ना, आपले हे त्यांच्यासारखा.” ते आपले हे कोण आहेत हे शोधून मला त्यांना साष्टांग दंडवतच घालायचाय. ते आपले हे आहेत ना.. सिरिअसली.. माझे तरी असे कोणीच नाहीएत.. हे आपले कुठून आले!
मी: “बरं बरं! करतो. जोमानं संघर्ष करतो. बाकी तुम्ही काय म्हणता?” ह्या वाक्यासोबत मी मनातल्या मानत अनेक गोष्टी म्हटल्या. त्या नाही लिहित.
ते: “मी विशेष काही नाही. चार पुस्तकं विकत घ्यायची होती, ती घ्यायला निघालोय.” त्या पुस्तकांसाठी मला थोडं वाईट वाटलं आणि त्या व्यक्तीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून उगाचच वाटलं की ह्याच्या घरावर ‘मालकापासून सावधान’ अशी पाटी ठोकून यायला हवी.
असो. तुम्ही लिहिता हे कळल्यावर लेखनाविषयी बोलणारे चार लोक त्यांची त्यांची मतं घेऊन तुमच्या अंगणात त्या मातांचं बीज पेरायचा प्रयत्न करतातच. असाच एक मित्र माझा, पुण्यातला. माझ्यापेक्षा थोडा मोठा आहे. तो म्हणतो, “सिम्बॉल रे ल्याका, सिम्बॉल. असा भिडला पाहिजे ना तो, की बस्स! वाचणाऱ्या लोकांची डोकं अशी सरभरली पाहिजेत. असा, असा भिडला पाहिजे तो.” त्याचं ते असा असा म्हणताना चालू असणारे हस्तविक्षेप बघून तो हवेत एखाद्या भोपळ्याची कल्पना करून भिडला पाहिजे, भिडला पाहिजे म्हणत आपल्या बोटांना सुरी समजून त्या भोपळ्याला भोसकतोय असं वाटतं. न राहवून त्याला मी म्हटलं शेवटी, “अरे हो, ते सगळं ठीक आहे, पण सावकाश जरा. डोळ्यात बोट घालशील माझ्या.” मात्र हे असं सांगितलेलं आवडत नाही लोकांना. त्यांचा इगो वगैरे दुखावतो म्हणे. त्यामुळं लोकांशी फार जपून बोलावं लागतं. वॉकिंग अराउंड एगशेल्स म्हणतात तसं. आणि लेखनाच्या बाबतीत मला चार डोस पाजायला आलेल्या लोकांची गोष्ट वेगळी असते, कारण कुठला डोस घ्यायचा आणि कुठला नाही हे कळण्याइतका अनुभव आता गाठीशी आहे; पण कसं लिहायचं सांग असं म्हणत जेंव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे येते तेंव्हा मात्र माझी मेजर अडचण होते.
अशाच एका सद्गृहस्थांनी मला मेसेज केला होता. त्याचं म्हणणं होतं की, “सौरभ तुझं लिखाण छान असतं, कसं जमतं तुला?” आता मी काय सांगणार!? मला माहिती असतं कसं जमतं, तर माझे सगळेच लेख मी प्रकाशित केले नसते का! सक्सेस फेल्युअर वालं गणित इथं पण लागू पडतं! आणि मी चांगलं वगैरे लिहितो असं म्हणणं खरंच ह्या लोकांचा मोठेपणा आहे. त्यामुळं मान देऊन आपल्याला चार गोष्टी कोणी विचारात असेल तर त्याचा किंवा तिचा हिरमोड होऊ नये म्हणून मग चार गोष्टी मी ही सांगतो. वाचन कसं महत्वाचं असतं, अपडेट राहणं कसं गरजेचं असतं, सरावाशिवाय पर्याय नाही, वैचारिक लेखनाची इच्छा असेल तर पेरिफेरल आणि व्हर्टीकल रिसर्च कसा करायचा- ह्याच त्या गोष्टी असतात आणि त्या खरंच गरजेच्या असतात. ज्याला खरंच लिहायचं आहे, त्याला ह्या गोष्टी पटतात, त्यांचं महत्त्व उमजतं; पण ज्याला पहिल्याच फटक्यात चटपटीत काही तरी लिहायचं आहे, त्याला मात्र अजून काही तरीची हाव असते. मग तो किंवा ती विचारते- ते सगळं आहे, पण लिहायचं कसं? एका मित्राने मला विचारलं होतं, “अरे कविता कशी होते ?”असे प्रश्न डोक्यातच जातात माझ्या. अरे! व्हायला ती काय शी आहे का? कशी होते काय! सुचते तरी म्हणा राव! माझ्या मनात काय सुरु आहे ते माझ्या चेहऱ्यावर लगेच दिसतं माझ्या जवळच्या काही जणांचं म्हणणं आहे. हे असे काही प्रश्न पुढ्यात येऊन पडले की मग माझ्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलून जातात आणि प्रश्न विचारणाऱ्याचीच परीक्षा सुरु होते. एलोईल, राईट? राईट!
तर ही अशी आहे ह्या चेहऱ्याची गम्मत. म्हटलं तर सांगण्यासारखी आहे, म्हटलं तर बोअरिंग आहे- पण ही जशी आहे ती तशीच आहे. ज्याला आवडेल तो हसेल, नाही आवडणार तो कुत्सितपणे हसेल, पण म्हणून ती सांगायची नाही असं थोडीच आहे! आपल्या दिवेलावणीला दिवाळीची मर्यादा आहे. आपण जग उजळवून टाकू किंवा नाही माहिती नाही- पण किमान आपलं घर तरी प्रकाशमान करू शकतो ही जाणिव कमी सुखाची आहे का! मी एकटाच बसलेलो असताना माझ्या चेहऱ्यावर कधी तुम्हाला एखादं स्मित दिसलं तर ह्या जाणिवेत त्याचं बीज आहे हे मी आनंदानं सांगतो.
चलो तर! झोप येतेय आता ! मी पळतो. भल्या पहाटे उठलो आहे आज, साडे सात वाजता. बाय बाय!
दीपावलीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा!
-सौरभ राघवेंद्र.