•mr•

पाहतोय !

पाहतोय!

पाहतोय!

हस्तिदंती मनोऱ्यात काचेच्या पडद्यावर

उदंड वाहणाऱ्या वेदनांची प्रतिबिंब !

पाहतोय!

आस्मानी संकटात सुलतानी चाळे,

आर्त किंकाळी घुमविण्या उतावळे

भेगाळलेले चौथे खांब!

पाहतोय!

अदृश्य पाया, मूर्ती आणि कळस,

ध्वस्त देव्हाऱ्याचे शेवाळलेले अवशेष

कृष्णाचा गीतोपदेश!

पाहतोय!

मिट्ट काळोख चिरणारी किंकाळी

आणि क्षणात तुटलेली ब्रम्हनाळ

किणकिणते मेणाचे दिवे!

पाहतोय!

आढ्यतेच्या, बलाढ्यतेच्या गगनभेदी मजल्यांवर

रुसलेल्या, रागावलेल्या आत्मरत माईचे

निशब्द उसासे!

पाहतोय!

खचलेले मनोरे, स्वप्नांचा चिखल

ओलांडत, तुडवत आधारासाठी सरसावलेले

माणसाचे हात!

पाहतोय!

हस्तिदंती मनोऱ्यात काचेच्या पडद्यावर

उदंड वाहणाऱ्या वेदनांची प्रतिबिंब !

हस्तिदंती मनोऱ्यात काचेच्या पडद्यावर

उदंड वाहणाऱ्या वेदनांची प्रतिबिंब !

पाहतोय!

- सौरभ राघवेंद्र.

(फोटो ६ ऑगस्ट रोजी कोल्हा'पूरा'त काढलेला आहे. ज्या ठिकाणी तो काढला त्या ठिकाणची सद्य स्थिती वेगळी असू शकते, त्यामुळे फोटो कृपया शेअर करू नये.)