•mr•

पाउस

आभाळ भरून आलंय. आता पाउस पडेल.

आभाळ भरून आलंय. आता पाउस पडेल.

लाकडाचं मोठं दार हळूच उघडेल. छोट्याश्या

फटीतून दोन डोळे लुकलुकतील.

मग एक दीर्घ श्वास. मातीचा वास साठवून घेणारा.

ती हळूच वळेल. मागे पाहायला... कोणी उभे तर

नाहीये ना ?

मग तशीच पाठमोरी ती हळूच दार ओढून घेईल. जुना

दरवाजा अजिबात किरकिरणार नाही.

अंगणातल्या ओल्या मातीवर ती अलगदच पाउल ठेवेल.

जणू एका फुलावर बसतंय फुलपाखरू.

त्या मृदू स्पर्शाची खूण मातीच्या उरावर तशीच...

आपल्याच नादात गिरक्या घेत ती जाईल बहरलेल्या

मोगऱ्यापाशी. एक फुल उचलेल आणि केसांत मळेल.

मातीच्या गंधात मिसळलेला मोगऱ्याच्या गंध...

पावसाच्या सरींत चिंब न्हालेली ती. अंगणाच्या मधोमध

येऊन आपसूकच थबकेल.

डोळे हळुवार मिटेल अन हात पसरून पावसाचा एक एक

थेंब झेलेल.

स्वत:भोवती एक गिरकी घेईल. चांदीच्या पैंजणांचा

नाद पावसात विरून जाईल.

बेभान वारा झेलणारं तिचं लावण्य, तारुण्य अनिमिष

नेत्रांनी मी पाहताच राहीन.

तिला जाणवेल... पाहतंय कोणीतरी.

स्वत:शीच लाजेल. माझ्याकडे पाहून गोड हसेल.

माझ्या अंगणाच्या कुंपणाशी उभा राहून पाहणारा

मी. मी ही बेभान.

जाईन ते थेट तिला माझ्या मिठीतच घेईन.

वाहू दे मग सोसाट्याचा वर. उठू दे मोठं

वादळ.

माळलेल्या फुलाचा गंध. आता थोडा उन्मादक.

थंड जलधारांत स्पर्शणारं तिचं उष्ण शरीर. बंधने

विरघळवून टाकणारा उष्ण श्वास.

बहरलेल्या तारुण्याचा मादक स्पर्श. वेगाने

धडधडणारी दोन हृदयं.

सैलावेल मिठी अन टेकतील तिच्या ओलावलेल्या

ओठांवर माझे ओठ.

नकळत. तिच्याही अन माझ्याही.

शहारेल अंग आणि एक लहर थेट मस्तकात.

क्षणार्धात भानावर येऊ. क्षणार्धात विलग होऊ.

तिच्याकडे पाहेन मी. लाजेने व्याकूळ होऊन ती उभी.

मोकळे केस, घट्ट मिटलेले डोळे, नुकतेच स्पर्शलेले

लालसर ओठ, चिंब भिजलेली काया.

ती झटकन मागे वळेल. अन जाऊन उभी राहील त्या

जुन्या दारापाशी.

दाराची कडी पकडून ती उभी. श्वासाने धपापणारा

उर.

दर उघडून ती आत जाईल.

दाराच्या फटीतून ती मला शोधेल.

दाराच्या फटीतून दोन डोळे लुकलुकतील.

-सौरभ राघवेंद्र.