•mr•

निरोप

निरोपाचे शब्द ठाऊक होते. तिलाही आणि मलाही. पण त्या विचित्र शांततेत सारेच विसरलो होतो आम्ही. ठाऊक होते आता पुन्हा भेट होणे नाही. आणि जर झालीच तर ? इतक्या दिवसांचा सहवास, इतके प्रगल्भ मैत्र आणि जन्मो…

निरोपाचे शब्द ठाऊक होते. तिलाही आणि मलाही. पण त्या विचित्र शांततेत सारेच विसरलो होतो आम्ही. ठाऊक होते आता पुन्हा भेट होणे नाही. आणि जर झालीच तर ? इतक्या दिवसांचा सहवास, इतके प्रगल्भ मैत्र आणि जन्मोजन्मीचीच वाटावी अशी ओळख डोळ्याआड लपवता येईल ? नाहीच कदाचित. पापणीमध्ये रेंगाळणारा अश्रू ते ओझे घेईल आणि हलकेच गालावर उतरेल.

तरीही, निरोप तर घ्यावाच लागतो. परतीची वाट पकडवीच लागते. कानात घुमणारा तिचा मधुर नाद, स्पर्शाने उभे राहिलेले शहारे, एकमेकांच्या डोळ्यात स्वत:ला शोधताना स्तब्ध झालेला काळ, मिठीमध्ये विरघळलेल्या निशब्द सांजवेळा आणि अशा कितीतरी गोड आठवणींची पुन:पुन्हा होत राहणारी उजळणी आता थांबुदे अशी विनवणी नियतीकडे करावीच लागते.

आयुष्यही मग पुन्हा सुरु होतं. किंबहुना ते करावंच लागतं. पण रोजच कोसळतो तो एकाकीपणा, मुसळधाऽर पावसासारखा. विरहाची संततधार चालूच असते. मी ही मग त्या पावसाला विचारतो, कोसळतोस का रे तिच्याही अंगणात... असाच, मुसळधार ? की वेलीवर तिच्या आहे अजूनही कोवळे उन, सुखावणारा गारवा आणि वाऱ्याची मंद झुळूक ?

निरोपाचे ते क्षण मला आजही स्मरतात.

अडखळलेले शब्द अजूनही वाटा शोधतात.

वाटतं त्या निरोपाच्या त्या फुलांची दरवळ घेऊन वर अजूनही येतो माझ्या अंगणात.

 

आणि मग पुन्हा मनोमन जिवंत होऊ पाहणारं ते निनावी नातं, शब्दांच्या निर्जीव शिल्पात मी जखडून टाकतो. 

अशी असंख्य शिल्पे जमवली आहेत मी आताशा...

-सौरभ राघवेंद्र.