मिसळ
<!--[if gte mso 9]>
कोल्हापुरात लहानाचं मोठं झाल्याचा एक खूप मोठा फायदा असतो. ‘मिसळ’ आणि ‘तांबडा-पांढरा’ रस्सा या दोन विषयांवर बोलण्याची अधिकारवाणी ‘नाभिषेको न संस्कारा: सिंहस्य क्रियते वने’च्या चालीवर निसर्गत:च प्राप्त होते आणि या वाणीची अधिकारकक्षा एवढी विसुद्धार्ण बनते कि जगाच्या कुठच्याच गावच्या किंवा शहराच्या, कुठच्याही चौकामध्ये किंवा पेठेमध्ये मिळणाऱ्या मिसळीवर आणि तांबड्या-पांढऱ्या रश्श्याव’ ती विनाआक्षेप लागू पडते; भले मग ते शहर पुणे आणि पेठ सदाशिव का असेना! (नो ऑफेन्स बरं का!)
तर आज ह्या अधिकाराचं उपायोजन करण्याचं निमित्त म्हणजे काही दिवसांपूर्वी चाखलेली ‘श्रीमंत मिसळ.’ पुण्यातल्या रेंज हिल रोड वरच्या सिम्बायोसिस कॉलेजच्या थोडं पुढे पासपोर्ट ऑफिसला लागून असलेल्या ‘श्रीमंत मिसळ’ नावाच्या एका छोटेखानी हॉटेल मध्ये मिळणारी- श्रीमंत मिसळ.
हॉटेल तसं लहानच आहे. हायवेवर राजस्थानी जेवण वाढणाऱ्या धाब्यांवर असलेल्या टिपिकल खाटांसारख्या त्यांच्यापेक्षा थोड्या चांगल्या दर्जाच्या खाटा, हॉटेलच्या आत किंवा बाहेर मोकळ्या हवेत बसण्याची सोय एवढंच ते काय त्या हॉटेलच्या स्थापत्यशैली बद्दल बोलता येण्यासारखं. जे काही बोलता येण्यासारखं आहे ते केवळ मिसळीबद्दल.
मी आजपर्यंत अनेक ठिकाणची मिसळ खाल्ली आहे. कोल्हापूर, पुणे, सांगली, मुंबई, नाशिक, सातारा आणि हायवेलगत असणारी धाबावजा हॉटेलं ही त्या ठिकाणांतली काही प्रतीनिघिक ठिकाणं. यांच्यापैकी सांगली आणि साताऱ्यामध्ये मिसळ खाण्याचा योग अनुक्रमे केवळ एक-एकदाच आला होता पण तो कुठे आणि कधी आला होता हे आता फारसं आठवत नाही त्यामुळे त्यावर लिहिण्यासारखं माझ्यापाशी फार काही नाही. उरलेल्या शहरांपैकी मिसळीबाबत नाशिकचा अनुभव सुद्धा मी केवळ एकदाच घेतला आहे, आणि माझ्या दुर्दैवानं तो फारसा चांगला नव्हता.
‘आराधना मिसळ’ नावाचं ते भलं मोठं काही तरी. (सूचनेनुसार मूळ नाव बदललेलं आहे.)
काही तरी अशासाठी कि त्याला हॉटेल म्हणता येत नाही, कारण ते हॉटेलच्या मानाने ते जरा जास्तच मोठं आहे आणि भले त्यांनी अॅम्बिअन्ससाठी ‘खेडेगाव’ हा विषय थीम म्हणून निवडला असला तरी थीम पार्क म्हणावं एवढही मोठं आणि विशेष ते नाही.
तर ‘आराधना मिसळ’ नावाचं बिरूद मिरवणारं काही तरी आपल्या मिसळीची स्पेशालिटी सांगताना ‘आमची मिसळ चुलीवरची मिसळ आहे’ असं सांगतं. सोबत पापड असतो, दही असतं. पाव आकाराने एवढा मोठा असतो, एका जोडी मध्येच पोट भरून जातं. जोडीला पेय म्हणून ताक किंवा सोलकढी असते. आम्हा कोल्हापूरकरांना मिसळीसोबत चहाची सवय, पण तिथे चहा नव्हता!
एवढ्या मोठ्या जागेत चहा मिळू नये याचं मला खरं तर नवलंच वाटलं शिवाय मिसळीची चवही यथातथाच वाटली मला. अगदी करायला गेलो एक आणि झालं भलतंच अशा गतीची चव नव्हती त्या मिसळीची, पण ‘अरे ! नाशिकची साधना मिसळ, नाशिकची आराधना मिसळ!!’ असा आमच्या ऐकिवात आलेला होहल्ला आणि ती मिसळ खाण्यासाठी जमलेली गर्दी ह्या निकषांवरून सारासार विचार करता मिसळची चव अगदी यथा-तथाच होती. शिवाय सांगताना त्यांनी सांगितलं होतं कीही मिसळ चुलीवरची आहे म्हणून अन्यथा तिथे अगदी रोज मिसळ खाऊनही माझ्या पचनी न पडलेली मिसळ चुलीवरची आहे हे मी कदाचित कधीच ओळखू शकलो नसतो.
नाही म्हणायला इथे चुलीवरचं आईसक्रिम सुद्धा मिळतं! चुलीवरचा चहा, चुलीवरचं मटण, चुलीवरची भाकरी आणि इतर अनेक पदार्थ जे चुलीवर बनवता येतात पण ज्यांची नावं मला आत्ता पटकन सुचत नाहीएत ते सगळे पदार्थ वगळता ‘आराधना मिसळ’मध्ये पाउल टाकल्यावर मला आयुष्यात पहिल्यांदाच साक्षात्कार झाला होता- “अरे हो की! मिसळ पण चुलीवर बनवता येऊ शकते!” पण आईसक्रिम? आईसक्रिम?
चुलीवर आईसक्रिम कसं बनवलं जाऊ शकतं हा अत्यंत निरागस प्रश्न माझ्या बालबुद्धीला पडला. शंभर प्रकारे विचार करूनही उत्तर मिळत नाही म्हटल्यावर मी तिथे एका मनुष्याला विचारलं, “बाबारे, कसं काय बनवता चुलीवर आईसक्रिम?” तेंव्हा मला उत्तर मिळालं, कि ज्या दूधाचं आईसक्रिम बनवलं जातं ते दुध आणलं की नेहमीच्या गॅसऐवजी ते दुध चुलीवर गरम केलं जातं. “साधना मिसळ” चालकांच्या या ‘इनोव्हेटिव्ह अप्रोच’ मुळं आईस्क्रीमची गोडी एकाएकी दसपटीने वाढली अन्यथा आईसक्रिम चवीला वाटीतून दिलेल्या काहीश्या पातळ- ‘ए कुल्फी ले लो. बोलो भाईसाब, कुल्फी चाहिये क्या? दस को एक’ छाप कुल्फीपेक्षा फार वेगळं नव्हतं.
जाता जाता नमूद करायची आणि मला ह्या ठिकाणी आवडलेली एकमेव गोष्ट म्हणजे इथे एक मनुष्य आपला ठेला मांडून कठपुतळ्यांचा खेळ दाखवतो, तो खेळ. तो खेळ मात्र मला मनापासून आवडला. ऐश्वर्या राय वर चित्रित कुठल्या तरी गाण्यावर तो मनुष्य दोरीनं बांधलेल्या त्या बाहुल्या अत्यंत नजकतीने, सुरेख आणि लयबद्ध रित्या नाचवत होता. जर त्या दोऱ्या अदृश्य असत्या आणि बाहुल्यांच्या डोळ्यांत थोडासा सजीव भाव असता, तर त्या बाहुल्या स्त्री आणि पुरुष्यांच्या खऱ्याखुऱ्या मिनीएचर व्हर्जन्स वाटाव्यात एवढ्या कलात्मकतेने तो मनुष्य त्या बाहुल्यांना खेळवत होता! काही मिनिटांचा खेळ संपला की तो मनुष्य आपल्या जागी जाऊन बसतो आणि त्या वेळेत प्रेक्षक त्याच्या ठेल्यावर जाऊन दहा, वीस, पन्नास वगैरे रुपये ठेऊन जातात.
चवीच्या बाबतीत जी गत ‘आराधना मिसळ’ची तिच गत मुंबई मध्ये अनुभवलेल्या मिसळीची.
मुंबईमध्ये असताना कामानिमित्तानं आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या ‘हॅश टॅग वॉंडरलस्ट’च्या खुमखूमीमुळं मला मुंबईच्या अनेक सबर्बन भागात मिसळ खायची संधी मिळू शकली. मुंबईमध्ये मिसळ खाता खाता एक गोष्ट माझ्या लक्षात आली. मिसळ कशी करावी याविषयी स्वतंत्रपणे संशोधन करून आपलं संधोधन प्रत्यक्षात उतरवणारे कैक खाद्यविशारद इथे आहेत. इथे कुणाच्या मिसळी मध्ये पातळ पोहे, कोणाच्या मिसळीत जाड पोहे, कोणाच्या मिसळीत कांदाच नाही, कोणाच्या मिसळीत फक्त बटाटा, कोणाच्या मिसळीत वांग्याची फोड, कोणाच्या मिसळीत शेवग्याची शेंग अशा ना ना तऱ्हा! (अन्नाला नावं ठेऊ नयेत खरी, पण मुंबई मध्ये एके ठिकाणी कापलेल्या कांद्याचा आकार वगैरे वगैरे...)
मुंबईमध्ये खावा तो वडा-पाव. बाकी मिसळीच्या बाबतीत मुंबई म्हणजे प्रयोगांचा अक्षरश: (कदाचित शब्दशःसुद्धा) मेल्टिंग पॉट आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता मुंबईच्या गर्दीसारखीच इथली मिसळही फक्त मिसळ न राहता पदार्थांची ‘सरमिसळ’ झाली आहे हे मात्र खरं!
मिसळ आणि तिच्या अनुषंगाने येणाऱ्या संशोधनाचा धागा पकडून मला स्वत:ला राहून राहून पडणारा एक प्रश्न सर्व खाद्यविशारदांना विचारायचा आहे. मिसळीसोबत वाटीतून जे लाल-लाल, तिखट-तिखट, कधी कधी तेलाचा तवंग असणारं आणि गरम गरम जे काही दिलं जातं त्याचासाठी नेमका आणि मूळ शब्द आहे तरी काय? आम्हा कोल्हापूरकर ह्या वर्णनविशेषासाठी ‘कट’ असा शब्द वापरायची सवय आहे. ह्या ‘कट’ शब्दावरून एक मजेशीर अनुभवही आला होता मला.
मी पुण्यात आल्या-आल्या पहिल्या काही दिवसांतलीच गोष्ट. कुठं ते नीटसं आठवत नाही पण एका टपरीवजा हॉटेलात मिसळ द्या असं सांगून मी मिसळीची वाट पाहात बसलो होतो. एक दोन मिनिटांनी माझी ऑर्डर घेतलेल्या मनुष्याला मी पुन्हा बोलावलं आणि विचारलं, “कट देता ना?” तो म्हणाला, “नाही.” मी आश्चर्याने प्रतिप्रश्न केला, “नाही?” तो म्हणाला, “आम्ही एकदा दिलेली ऑर्डर कट करू देत नाही.”
मिसळीसोबत वाटीतून येणाऱ्या त्या पदार्थाला ‘सॅंपल’ असंही म्हटलं जातं या संकल्पनेची आणि माझी ती पहिली ओळख. पुढे त्याला रस्सा म्हणतात असाही एक साक्षात्कार मला झाला. का माहिती नाही, पण रस्सा म्हटल्यावर माझ्या मनात उगाचच त्यात बटाट्याचे अगणित तुकडे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत उदार मनानं खिसलेलं आलं वगैरे असल्याची दाट भावना निर्माण झाली आणि तो रस्सा टेबलापर्यंत येण्याआधीच मी मिसळी ऐवजी पोहे मागवले आणि तो तिथेच विषय संपवला.
ज्यांनी ज्यांनी म्हणून चौथीमध्ये मराठी माध्यमातून स्कॉलरशिपची परीक्षा दिली अससेल, किंवा ज्या पालकांनी आपल्या मुलांकर्वे आपल्या बालपणीचं त्या परीक्षेला बसण्याचं अपूरं स्वप्न पूर्ण करण्याच्या हट्टापायी आपल्या मुलांचा चौथी स्कॉलरशिपचा अभ्यास घेतला असेल त्या सगळ्यांना “अनेक शब्दांसाठी एक शब्द” नावाचा एक प्रकार मराठीच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असायचा हे लख्ख आठवत असेल. उदाहरणार्थ- पंधरा दिवसातून एकदा येणारं- पाक्षिक, ज्याच्यासारखा दुसरा नाही असा- अद्वितीयं, एकाचवेळी अनेक गोष्टींचं अवधान असणारा- अष्टावधानी, एकाच आईच्या पोटी जन्म झाले आहेत असे- सहोदर, एकाच काळात जन्मलेले- समकालीन, ज्याने पुष्कळ ऐकले वाचले आहे असा- बहुश्रुत, जो सगळं काही जाणतो असा मनुष्य- सर्वज्ञ वगैरे वगैरे.
तर ह्याच अनेक शब्दांसाठी योजल्या जाणाऱ्या एका शब्दांचा शब्दसंग्रह वाढवा म्हणून या मिसळीसोबत वाटीतून मिळणाऱ्या लाल-लाल, तिखट-तिखट, तेलाचा तवंग असणाऱ्या गरम गरम पदार्थाला कट, सॅंपल, रस्सा इत्यादी पर्यायी शब्दसंपदेत अजून कोणी भर घालतो का याच्या शोधात मी नेहमी असतो. नाही म्हणायला एका प्रवासात बस हायवेवर कुठल्याशा अडनिड्या गावी हॉटेलात जेवणाच्या निमित्ताने म्हणून थांबवली असता चौकशीअंती मिसळी सोबत मिळणाऱ्या “ ‘तिखत पानी’ चे वेगले चारजेस बसतील. आनू का?” अशी पृच्छा झाली होती.
इतरत्र कुठेही काही असो, पण पुण्यात टिळक रोडवर दुर्वांकुरच्या अगदी जवळ असलेल्या एका उपाहारगृहात मात्र मिसळी सोबत सॅंपलच मिळतं.
माझ्या एका मित्राने टिळक रोड वरच्या त्या भाउंच्या मिसळीचं वर्णन फार छान केलं होतं. तो म्हणाला, “इथली मिसळ खाल्ली की दोनदा आग आग होते. एक खाताना आणि दुसरी ...” माझा मित्र शब्दयोजनेच्या बाबतीत माझ्यापेक्षा खूपच मोकळा और सैल होता, त्यामुळं ती टिंब टिंब टिंब तुम्ही तुमच्या व्यासंगाप्रमाणे भरून टाका.
माझ्या मित्राने केलेलं हे वर्णन तपासून पहायचं म्हणून मी आणि माझे काही अजून मित्र इथे एके दिवशी हट्टाने गेलो. तेंव्हा हे वर्णन अजिबात खोटं नव्हतं हे आम्ही यथासांग अनुभवलं.
म्हणजे, खाणाऱ्या व्यक्तीवर राग काढायचा म्हणून, त्या बिचाऱ्या मिसळीवर राग काढायचा म्हणून, ज्यांच्या नावे हॉटेल आहे त्या भाऊंवर राग काढायचा म्हणून, की घरी बायकोशी पटत नाही म्हणून... काही म्हणता काही ठाऊक नाही, पण पहिलं म्हणजे मिसळीत आणि दुसरं म्हणजे खाणाऱ्याच्या तोंडात जाळ करायचा म्हणजे करायचाच असं ठरवून केलेली ती ‘मेडियम तिखट’ मिसळ. ती मिसळ खाणं ही आमच्यासाठी अक्षरश: कसरत होती. आमच्या दिशेने तोंड करून भकाभका वारा फेकणारा टेबल फॅन असूनही माझ्यासकट माझ्या दोघा मित्रांना ती मिसळ खाता खाता घाम फुटला होता. त्यात आम्हाला चहा मागवायची काय दुर्बुद्धी सुचली ते तो भाऊच जाणे. पुढचे दोन दिवस परत तिथे मिसळ खायला जायचं नाही हा घोषा करत आम्ही काढले होते.
जी गती ह्या भाऊंची त्याच्या नेमकी विरुद्ध गती पुण्यातच केसरीवाड्याजवळ आपल्या दोन्ही ‘करांनी’ मिसळ करून वाढणाऱ्या एका पुणेकराची. खाताना आता तिखटाची चव येईल, मग येईल असं म्हणत म्हणत समोरची मिसळ संपूनही गेली. तिथला पोऱ्या आमच्या मिसळीच्या रिकाम्या थाळ्या घेऊनही गेला. नंतर त्यानेच येऊन आम्हाला तिथून उठायला लावलं नाही तर आपण नक्की काय खाल्लं या गहन विचारात गुंतलेल्या आम्हा चौघांच्या एकमेकांकडे पाहणाऱ्या शून्यविमनस्क नजरा आयुष्याच्या कुठल्या अर्थाचा शोध घेत किती वेळ तिथे तशाच बसून राहिल्या असत्या ते तो परमेश्वरच जाणे!
हे अर्थातच दोन टोकाचे अनुभव झाले. या दोन्ही अनुभवांचा मध्य अनुभवता येणारी मिसळ पुण्यात मी दोनच ठिकाणी खाल्ली. एक म्हणजे प्रभात रोडच्या इथलं “काटा किर्र” आणि दुसरी म्हणजे सुरुवातीलाच जिच्याबद्दल सांगितलं ती “श्रीमंत मिसळ.” यात श्रीमंत मिसळ हे नाव मला सुचवण्याचं श्रेय जातं ते माझीच वैयक्तिक माहिती चोरून मलाच जाहिराती दाखवणाऱ्या फेसबुकला आणि “काटा किर्र”चं श्रेय जातं ते माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला.
“काटा किर्र” मिळणाऱ्या मिसळीची चव पुण्यात मिळणारऱ्या इतर मिसळींच्या तुलनेनं पुष्कळ चांगली आहे. (माझ्या मैत्रिणीनं सुचवलं म्हणून नव्हे.) पण इथंली बसायची पद्धत मात्र मला फारशी आवडत नाही. इथे मला एखाद्या थोड्याशा लक्झरिअस खानावळी मध्ये आपण बसलो आहोत की काय असं राहून राहून वाटतं. याचं कारण म्हणजे आम्ही जेंव्हा जेंव्हा इथे गेलो आहे तेंव्हा माझ्या पलीकडे किंवा समोर कोणी न कोणी अनोखळी व्यक्ती बसलेली मला आढळून आली आहे. ‘काटा किर्र’ च्या विपरीत ‘श्रीमंत मिसळ’ मात्र चवीसोबत बैठक व्यवस्थेच्या बाबतीतही सरस आहे.
पाणी प्यायच्या भांड्यापासून ते चमच्यापर्यंत सगळं पितळ्याचं, वेताची खाट, लाकडी टेबल, गिऱ्हाईकाला मान देणारे आदबशीर वेटर- हा सगळा अनुभव ‘श्रीमंत मिसळ’ मधल्या श्रीमंत या विशेषणाशी काही अंशी का होईना पण साधर्म्य साधणारा आहे. इथलं अजून एक वैशिट्य म्हणजे, इथे मिसळी मध्ये जे जे काही मिसळलं जातं, ते सगळं सुटं सुटं आणि (पितळेच्या!) स्वतंत्र वाट्यांमधून दिलं जातं. ज्यानं त्यानं आपल्याला हवं ते आणि हवं ते आणि तेवढं आपआपल्या चवीनुसार घ्यावं. उगाच तिखटही नाही आणि अगदीच सपकही नाही अशी बेतास बेत चव असलेली ‘श्रीमंत मिसळ’ सध्या तरी माझी पुण्यातली आवडती मिसळ आहे.
पण श्रीमंत असो किंवा साधना, सॅंपल असो किंवा रस्सा- मिसळ म्हटलं की माझ्या डोळ्यसमोर तरळणारं एकमेव नाव म्हणजे- कोल्हापूर आणि त्यातही ‘खासबागची मिसळ.’ ही अर्थात जरा जास्तच रेट्रोस्पेक्टीव्ह आठवण आहे, कारण इथली मिसळ खाऊन जवळ जवळ पाच वर्षं उलटून गेली. त्यामुळे आता इथे कशी मिसळ मिळते हे मी नक्कीच खात्रीलायकपणे सांगू नाही शकत, पण इथली चव, एक माझ्या घरची मिसळ सोडली, तर मी आजपर्यंत अनुभवलेल्या चवीत सर्वांत विशेष आहे हे मात्र खरं आणि इथल्या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मिसळीसोबत पाव देत नाहीत. इथे ब्रेड मिळतो. त्यातही कडेचा जो इतर ब्रेडच्या तुलनेने घट्ट असतो, तो मिळावा यासाठी प्रत्येकाचाच आग्रह असतो. ज्या कोणा वाचकाचं कोल्हापूरास जाणं होईल, त्या प्रत्येकानं ही चव नक्कीच अनुभवायला हवी हे ओघानं सांगणं न लगे.
खासबागेशिवाय कोल्हपुरात फडतरेंची मिसळ सुद्धा खासबागच्या मिसळीएवढीच प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच माझं कोल्हापूरास दोन दिवसांसाठी जाणं झालं, तेंव्हा कानावर पडलेल्या माहितीप्रमाणे, “फडतरेची चव आदीसारखी ऱ्हायली न्हायाय.” पण गर्दीशी विपरीतधर्म सांगणारा हा अनाहूत शेरा गांभीर्यानं घेतलाच तरी चांगल्या दर्जाची मिसळ देणारी अनेक नवीन उपाहारगृह कोल्हापुरात अलीकडे सुरु झाली आहेत असंही मी त्याच सल्लागाराकडून ऐकून आहे.
माझ्या महाराष्ट्राबाहेरच्या मित्र-मैत्रिणींसोबत मी एकदा मिसळ खायला गेलो होतो, तेंव्हा मी त्यांना मिसळीची हि विविधता सांगितली होती. मग तेंव्हा त्यांच्यातल्या एकाने मला एक अत्यंत रास्त प्रश्न विचारला होता. तो म्हणाला, “यार इतने सारे व्हेरीएशन्स तुम हमें बता राहे होत, तो फिर बाताही दो के, इस मिसल की असली टेस्ट कैसी है और वो कहां पायी जा सकती है?” ‘कहां पायी जा सकती है ?’ ‘पाया जायला’ ती काय वन्य प्राण्याची प्रजात है का असं मी मनातल्या मनात म्हटलं आणि “वैसे सवाल तो बडा आसान है , लेकीन जवाब उतनाही मुश्कील.” असं म्हणत महाराष्ट्रीयन डिप्लोमसीचे तारे तोडले होते.
पण नंतर मी विचार करत होतो तेन्व्हा मला त्याचा प्रश्न मला खरंच रास्त वाटला- मिसळीची खरी चव कुठली? आणि ती कळणार कशी? मग मला माझाच एक मजेशीर किस्सा आठवला आणि त्या प्रश्नाचं उत्तरही सापडलं.
तो किसा काहीसा असा आहे- दहावीचा निकाल लागल्यावर मी पेढे घेऊन मी ओळखीतल्या एकांच्या घरी गेली होतो. तेंव्हा खरंच पेढे वाटावेत असे मार्क्स मिळवायचो मी. मी पेढे दिल्यावर माझ्यासमोर पोह्यांची थाळी ठेवली गेली आणि दोन घास घशाखाली उतरतात तोच, “काय, छान झाली आहे कि नाही चव पोह्यांची?” असा प्रश्न तो पोहे बनवणाऱ्या सौ. काकूंकडून विचारला गेला होता. तेंव्हा मी अत्यंत शांतपणे त्या काकूंना उत्तर दिलं होतं, “पोह्याची नेमकी चव कशी हे कोणीच सांगू शकत नाही. ती बनवणाऱ्या प्रत्येक स्त्रीगणिक ती बदलते. इतकंच कि खाणाऱ्याच्या आवडीप्रमाणे रसतृप्ती होते किंवा रसभंग होतो आणि त्यावर ती छान है किंवा नाही हे ठरतं.”
माझ्या उत्तरामधला आगाऊपणाचा भाव सोडला तर एक गोष्ट लक्षात येईल की चवीच्या बाबतीत जे पोह्यांसाठी लागू पडतं, तेच मिसळीसाठी पण लागू पडतं आणि अजून थोडा खोलवर जाऊन विचार केला तर जेवणातल्या सगळ्याच पदार्थांच्या बाबतीत लागू पडतं.
कुणी सांगावं- मिसळीची अधिकृत चव अशीच आहे म्हणून? मिसळ मुळची कोल्हापूरची आहे म्हणून? मिसळ तिखट असू नये म्हणून? मिसळ सपक बनवू नये म्हणून? मिसळीवर खोबरं पसरवू नये म्हणून? पण कोणी सांगावं? आणि सांगावं तरी का?
पदार्थांच्या बाबतीत नाही म्हणयला त्यात घालायच्या गोष्टींच प्रमाण आणि बनवण्याची पद्धत एका ढोबळमानानं ठरलेली असते. उदाहरणार्थ- अमुक पदार्थ एवढा-एवढा घ्या, तमुक पदार्थ तेवढा घ्या, मसाल्याचे हे हे पदार्थ ह्या ह्या प्रमाणात. मग शेगडीवरचं सगळं प्रकरण कधी उकळी फुटेपर्यंत ‘मंद आचेवर’ तापवा किंवा रंग बदलेपर्यंत अथवा पदार्थाचा घमघमाट सुटेपर्यंत तो पदार्थ तळा इत्यादी इत्यादी.
पदार्थ बनवण्याचा हा प्रोटोकॉल आपल्या गृहिणींना ठाऊक असतो. स्वयंपाकघर आणि स्वयंपाक म्हणजे शेवटी आपपल्या आई-आजीच्या शिकवणी आणि अनुभवांच्या जोरावर, स्वत: केलेल्या चुकांतून शिकलेल्या धड्यांवर आणि आपल्या हातचं खाणाऱ्या चार लोकांच्या चार आवडीनिवडी आणि चार तऱ्हांवर गृहिणीने एकहाती उभी केलेली प्रयोगशाळा आणि तींत कधी यशस्वीपणे तर कधी अयशस्वीपणे चालवलेले रोजचे प्रयोगच नव्हेत का?
मग हे असं असताना मिसळीबद्दल एक सर्वसमावेशक आणि अचूक विधान कसं करावं ? सगळे लोक म्हणतात मिसळ कोल्हापूरची म्हणून का तिला लगेच कोल्हापूरची ठरवावं? मिसळ या पदार्थाचा शोध कोल्हापुरात लागला होता का? किंवा मिसळीवरचे प्रयोग कोल्हापूरकरांनी तुलनेने लवकर सुरु केले आणि रसतृप्तीचं सूत्र शोधण्यात कोल्हापूरकर अल्पावधीमध्ये यशस्वी झाले होते का? किंवा मग इथल्या लोकांच्या रांगडेपणाचा आणि मिसळीच्या तिखट कटाचा आणि तर्रीचा सहसंबंध चटकन जोडता येण्यासारखा आहे म्हणून कदाचित मिसळ कोल्हापूरची झाली का?
सर्वसामान्यपणे आता आपण चवीप्रमाणे मिसळीला ठरवत असू, कोल्हापुरी किंवा पुणेरी वगैरे. पण मिसळीत मिसळलेल्या पदार्थांच्या कमी अधिक प्रमाणाचा भाग सोडला तर चवीच्या ऑथेंटीसिटीची चर्चा व्हावी असं काय वेगळं आहे मिसळीमध्ये? माणसाच्या अनेक गोष्टी या त्याच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक सभोवतालावरून ठरतात ज्यात त्याच्या जेवणातल्या पदार्थांची आवडही येते.
त्यामुळं, एखाद्या हायवे लगतच्या धाब्यावर “‘तिखत पानी’ चे वेगले चारजेस बसतील.” असं म्हणत वाढलेली मिसळ एखाद्याला न आवडण्याचं जसं काहीच कारण नसतं, अगदी तसंच मिसळीचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या कोल्हापुरात खासबाग किंवा फडतरे मध्ये खाल्लेली मिसळ आवडायलाच हवी असा आग्रहसुद्धा नसतो. कारण शेवटी बनवणाऱ्या व्यक्तीचा अंदाज आणि खाणाऱ्या व्यक्तीची अपेक्षा ह्या दोन गोष्टी एकामेकात सहजपणे मिसळल्या कि झालं, बनली मिसळ, मग ती कोल्हापूरची असो, पुण्याची किंवा गजबजलेल्या मुंबापुरीची!
-सौरभ राघवेंद्र.