•mr•

मायाजाल हे समर्थ !

<!--[if gte mso 9]>

या, या मंडळी! बसा! बसा! घर सापडायला त्रास नाही ना पडला? अहो, नाहीच पडणार! गुगल मॅप्स वरती पिन करून ठेवलंय आमचं घर शिवाय लोकेशन पण केली होती की हो शेअर व्हॉट्स-अॅप वर. काय म्हणता? येऊन गेला होता दोन वर्षांपूर्वी? पत्ता लक्षात होता घराचा. बरं बरं! पण अहो, हल्ली लक्षात कशाला ठेवायला लागतो पत्ता? मला विचार तुमच्या घराचा पत्ता ठाऊक आहे का? विचारा विचारा! अहो असे अवघडून काय जाता? आम्ही कोणी परके का? एकमेकांचे स्टेट्स पाहतो की आपण व्हॉट्स-अॅप वर. आम्ही पोस्ट पण लाईक करतो की तुमच्या फेसबुक वरच्या, आता तुम्ही आमच्या करत नाही तो भाग वेगळा.

परवा! अहो, परवा इन्स्टा वर लाईव्ह व्हिडिओ केला होता आमची ही पिझ्झा बनवत होती घरी तेंव्हा- तुम्ही पाहिला होता की पहिली दोन मिनिटं. तर सांगायचं मुद्दा असा की हे असे अवघडून जाऊ नका हो..

असो. तुम्ही नाहीच विचारणार बहुधा आपण होऊन, तेंव्हा मीच सांगतो. तुमच्या घर शेजारची ती ‘जय हनुमान पानपट्टी’ हां तीच- ती दिसते मॅप्स मध्ये. मग काय, कॅब बोलवायची, ‘जय हनुमान पानपट्टी’ लावायची. मग येतं तुमचं घर. काय म्हणाला! माहिती नव्हतं, पानपट्टी गुगल वर दिसते? काय पाहुणे! आहात कुठे! अहो आमची ही- काय गं बकुळे, बाहेर ये पाहू जरा. बकू ए बकू! आलोच हं पाहुणे, काय करतेय पाहून येतो.

इअरफोन घालून युट्यूब वर पास्ता कसा बनवायचा ते पाहतेय. परवा-परवाच आले. कोण आले म्हणून काय विचारता! अहो इअरफोन्स. त्याचं काय आहे, सुट्टी होती ना ऑगस्ट मध्ये ती चौदा का पंधरा तारखेला- सगळे कसे भारताच्या झेंड्याची फ्रेम लावत होते बघा फेसबुकच्या प्रोफाईल वर.. काय म्हणाला? स्वातंत्र्यदिन? हां हां तसंच काहीसं होतं बघा.. तर त्या दिवशी सेल होता ऑनलाईन खरेदीवर. मागवले मग. तेच घालून बसलीये आमची ही कानात. अहो, त्याचं नॉईज कॅन्सेलिंग काय भारी आहे म्हणून सांगू- इतक्या हाका मारतो, एक हाक ऐकू जात नाही.

काय म्हणाला? माझा आवाज त्या इअरफोनला नॉईज वाटतो? भारीच गमत्या स्वभावाचे हो तुम्ही पाहुणे! लॉलंच हां! लॉलं हो, लॉलं- लॉलं! लॉलं?? एल. ओ. एल. अहो, म्हणजे लाफ आउट लाउड हो. मी लॉलं म्हटलं की तुम्ही अशी कल्पना करायची असते की मोठ्या मोठ्याने हसतोय. काय म्हणाला? त्यापेक्षा हसायचंच? हा हा! रॉफलच बरका पाहुणे! नाही नाही- राफेल वेगळं. राफेल म्हणजे ते विमान. अच्छा राफेल म्हणजे काय ते माहितीये होय तुम्हाला! अर्थातच माहिती असेल. ट्विटर वर चांगलंच उडतंय हल्ली. तुम्हाला पण आवडला न हा पन? थांबा लक्षात आहे तोवर टाकतो फेसबुक वर.

“राफेल हल्ली चांगलंच उडतंय ट्विटर वर” लाफिंग विथ आमचे पाहुणे अॅट आमचं घर. झालं बघा पोस्ट.

अरे! लाईक पण आला बघा एक. कोणी बरं केलंय? रश्मीने केलं होय. ती एक नेहमी लाईक करत असते बघा माझ्या आणि बकूच्या पोस्ट. काय म्हणाला? हो, हो. बहिण माझी. बऱ्याच दिवसांत भेट झाली नाही म्हणता? अहो टाका की फ्रेंड रिक्वेस्ट. भेटायचे वगैरे दिवस गेले पाहुणे आता. आता हॅंग आउटचा जमाना. परवा तुम्हाला सांगतो, वरच्यांच्या बाथरूम मधून पाणी गळत होतं थेंबा-थेंबाने. मग काय काढला फोटो आणि दिला पाठवून व्हॉट्स-अॅप वर आणि लिहिलं, लवकर दुरुस्त करा, नाही तर तुम्हाला टॅग करून फेसबुक वर टाकेन म्हणून. पुढे काय झालं म्हणून काय विचारता! दोन दिवस होऊन गेले तरी गळती चालूच! टाकलान् मग फोटो टॅग करून. पन्नास लाईक मिळाले. भारी ना! पण आमच्या वरच्यांचा टेम्पर व्होलाटाइल आहे थोडा. कधी पण क्रॅश होतो. क्रॅश. क्रॅश. काही काय पाहुणे- क्रॅशचा फुलफॉर्म काय विचारता! भलतंच काही! तुमचा फूलीशनेस पण फुल फॉर्मात आहे बरं आज. नो ऑफेन्स बरं का. नन टेकन का? अच्छा अच्छा. बरं बरं. तसे तुम्ही समंजस आहातच हो. मलाच आपलं जस्ट किडिंगची हुक्की येते अध्ये मध्ये, तेवढंच.

काय म्हणलात? हां, हां. क्रॅश. अहो- आपल्या फोन मध्ये खूप डाटा जमा झाला की अॅप कसं क्रॅश होतं, तसं ह्यां वरच्यांचं. जरा काही बोललं की ह्यांचां मेंटल बॅलन्स क्रॅश! छोट्या छोट्या गोष्टीवर राग राग! परवाच एक फॉरवर्ड पोस्ट होती. त्यात लिहिलेलं की मानसशास्त्र सांगतं म्हणे- छोट्या छोट्या गोष्टींवर जे चिडतात त्यांना प्रेमाची गरज असते म्हणे. तुम्हाला म्हणून सांगू का पाहुणे- मला जरा शंकाच आहे त्या नवरा-बायकोचं पटत नसावं. कशावरून काय विचारता! आत्ताच नाही का दाखला दिला मानसशास्त्राचा. शिवाय मी त्याचं फेसबुकचं प्रोफाईल पाहिलं. तुम्ही पण पहा. एकच मिनिट हां. हे बघा, हे बघा. गेली तीन वर्ष एकाच प्रोफाईल फोटो. करतं का असं कोणी!

तर मी काय म्हणत होतो- हां. ते नवरा बायको. ह्याच्या एका तरी पोस्टला लाईक केलंय का बघा त्याच्या बायकोनं. नाही तर माझी बकू- अहो पहिला लाईक असतो हो तिचा माझ्या पोस्ट वरती.

हां. हे बघा, तर ही ती पोस्ट. हा आमचा कमोड. ऑटोमॅटिक आहे बरं का, अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी. पण कसली अॅडव्हान्सड् आणि कसली टेक्नॉलॉजी. वरच्याच्या बाथरूमने पाणी फिरवलं हो सगळ्यावर. दाखवतो, थांबा.

हां, हे बघा- हे त्याचं बाजूचं डिजिटल पॅनेल. त्यावरच ह्यांच्या बाथरूम मधूनगळणाऱ्या पाण्याचे थेंब पडतात. तसे नाही दिसणार. झूम करून दाखवतो थांबा. हां, हे बघा. दिसले का? मग! अहो खराब झालं ते पाणी पडून पडून. कंपनी म्हणाली, वॉटर डॅमेज आहे. वॉरंटी नाही. कमोड वरच्या डिजिटल पॅनेलला वॉटर डॅमेज वॉरंटी नाही देणार तर कशाला देणार? हो ना? परफेक्ट आहे न मुद्दा? नाही तर काय! आणि तुम्हाला सांगतो- ते खराब झालं की फ्लश होत नाही हो, आणि बाकीचे फंक्शन पण नाही होत हो नीट. अहो! काही काय..! ते होतं हो- ते मन्युअलच असतं की. तुम्ही भारी चावट बरंका पाहुणे. बाकीचे फंक्शन्स म्हणजे- जाउद्या. तुम्ही आत गेला की स्वत:च सगळी बटणं दाबून बघा. कळेल तुम्हाला.

असो. तर मी काय सांगत होतो- हां- ही पोस्ट बघितली त्याने, आणि लावलान् मला व्हिडीओ कॉल. चांगलं अर्धा तास भांडलो आम्ही- ते हि मोठमोठ्या आवाजात. एवढ्या मोठ्या की शेजाऱ्यांचं पण कुतूहल जागं झालं. मग काय विचारता- त्यांना पण घेतलं आमच्या कॉल मध्ये अॅड करून. हे बघा- हा स्क्रीनशॉट. बघितलं का कसा माकडतोंड्या दिसतो आमच्या वरचा. साला आमच्या सोसायटीमधला बग आहे बघा अगदी. कधी डीबग होतोय देव जाणे.

अरे हो! विसरलोच बघा. ती हनुमान पानपट्टी, तुमचं घर, आमची बकू- तर पाहुणे, अहो सगळं डिजिटल झालंय हल्ली. ऑनलाईन. स ग ळं. कॅपिटल एस, कॅपिटल जी, कॅपिटल एल. स ग ळं. आमची बकू, घरातलं सगळं सामान ऑनलाईन मागवते. भाजी घ्यायला गेली की खरेदी पे. टी. एम. वर. आमची मुलं तिकडे अमेरिकेत, त्यांच्याशी गप्पा सुद्ध्या ह्या अशाच, ऑनलाईन. परवा तुम्हाला सांगतो, मी आमच्या नातीला आय-ट्युन्स वर अंगाई गीतांचा अल्बम गिफ्ट केला तिच्या वाढदिवशी. कालच रात्र, म्हणजे आपल्या सकाळी स्टेटस ठेवला होता तिने अंगाई गीत लावल्याच्या प्लेस्लीस्टच्या स्क्रीनशॉटचा. इतकं समाधान वाटलं म्हणून सांगू- पन्नास वेळा लाईक करायची इच्छा होत होती, पण तसं करता नाही न येत, पण पहिल्यांदा लाईक केलं आणि आणि मुंह अनलाईक केलं, असं पन्नास वेळेला झाल्यावर एकवानाव्व्या लाईक ला थांबलो बघा.

अरे, बकुळेचा झाला की नाही हिचा व्हीडीओ बघून? तो बघून झाल्याशिवाय आपल्याला खायला मिळणार नाहीये. बकुळे, अगं ए बकुळे! हाहा! ऐकू जात नाहीये वाटतं तिला. थांबा, व्हॉट्स-अॅप वर मेसेज करतो. काय म्हणाला? व्हिडीओ कॉल करू? आयडीया अगदीच लॉल नाहीये. अगदी बरोबर. लाफ आउट लाउड. मी मोठ्यांदा हसलो अशी कल्पना केली तुम्ही. पाहुणे!

अहो, होताय की हो तुम्हीपण हळू हळू डिजिटल!

पण तुम्हाला सांगतो, आपला मेसेजच बरा. मागच्या वेळी एकदा बकू- कुठली तरी वेब सिरीज पाहत होती नेटफ्लिक्स वर. अहो असं प्रश्नचिन्ह का चेहऱ्यावर. नेटफ्लिक्स म्हणजे.. अच्छा, नेटफ्लिक्स म्हणजे काय ते माहितीये होय तुम्हाला, कुठली सिरीज असं विचारयचं होतं! अच्छा अच्छा. माय मिस्टेक, माय मिस्टेक. सॅक्रेड गेम्स पाहात होती. तुम्ही पहिली आहे? नाही का? ओके, ओके. बघा नक्की. बकूला खूप आवडली, मला मात्र कथा उथळ वाटली थोडी. असो, तर मी बकुला हाकेवर हाक मारतोय, पण हिचं ढिम्म लक्ष नाही. मग केला व्हिडीओ कॉल. रागावली हो ती माझ्यावर, तिची लिंक तुटली म्हणून. मला ब्लॉक केलं होतं तिने पुढचा एक आठवडा. बाबा आदमच्या जमान्यात बोलायचो तसं साधे टेक्स्ट मेसेज करून बोलत होतो आम्ही. सो, मॉरल ऑफ द स्टोरी- आपला व्हॉट्स-अॅप मेसेजच बरा. हा पहा, केला टाईप-

बकू, अगं पाहुणे आलेत केंव्हाचे. ये बाहेर. सें ड. केला सेंड!

अरे! वाचला पण तिने. टाईप करतेय, थांबा. येते म्हणतेय. येईल येईल. ग्रुप सेल्फी काढायचा आहे ना आपल्याला- तयार होतेय म्हणे. अरे! हे बघा.. झाला वाटतं पास्ता बनवून. तिने बनवलेल्या पास्ताचा फोटो पाठवलाय तिने. काय म्हणाला? अहो काय हे पाहुणे- अशी कशी फोटोवर बोळवण करेन तुमची? आधी इन्स्टावर एकदा अपलोड झाला की मग खायचाच आहे की तो आपल्याला- बाकी तुम्ही भलते विनोदवीर बरं पाहुणे! थोडं विनोदी लेखन करा आणि पोस्ट करा फेसबुक वर. दहा बारा लाईक्स पहा कशा बघता बघता मिळतील तुम्हाला. मी शेअर पण करेन बरं का. काय म्हणाला? आपल्या आजच्या भेटीचा इतिवृत्तांत लिहिताय गेल्यावर! अरे वा वा! छान छान. आपला ग्रुप सेल्फी पण जोड बरं त्या पोस्टसोबत आणि लिहा, इटिंग होम-मेड पास्ता आणि आम्हा सगळ्यांना टॅग करा. घराची लोकेशन आहेच मॅप वर!

अरेरे! हे काय विपरीत. छान फोटो उपलोड करता करता मध्येच नेटच जावं तसं हे.

अहो काय म्हणून काय विचारता! बकुचा मेसेज आलाय. फोनची बॅटरी संपत आलीये म्हणे. तीस टक्के चार्ज करूनच बाहेर येते म्हणतेय. काय म्हणाला? फोन चार्जिंगला लावून बाहेर यायला सांगू म्हणता? तशी नाही हो यायची ती. फोन हातात नसला की जीव कसा कासावीस होतो हो बिचारीचा. खूप लळा आहे तिच्या फोनचा तिला. अगदी हळवी आहे हो आमची बकू फोनच्या बाबतीत. आपण गप्पा मारू की ती येईपर्यंत.

घ्या! मी पण बघा कसा वेंधळा- त्या क्ल्म्सी निन्जा गेम मधल्या निन्जा सारखा. तुम्ही येऊन अर्धा तास होऊन गेला, पण तुम्हाला न मी पाणी विचारलं, न फोनचा चार्जर विचारला. वाय-फायचा पासवर्ड पण सांगितला नाही पहा मी. चालायचंच काय म्हणता पाहुणे! असं कसं चालेल. आम्हाला टॅग करून उद्या तुम्ही लेखात लिहिलंत की यांनी आम्हाला ना पाणी विचारलं, न चार्जर न वाय-फायचा पासवर्ड तर काय म्हणतील आमचे मित्रमंडळी! इमेजच खराब होईल हो आमची! इतकं छान मेंटेन केलंय मी माझं प्रोफाईल इंटरनेट वर, तुम्हाला सांगतो! त्याचा बाज ठेवायला नको का? ठेवायला हवाच ना. शिवाय तुम्ही आम्ही सामान्य माणसं. अलीकडे ही डिजिटल इमेज ठेवायची सोय झालीये म्हणून- नाही तर उद्या आपण गेल्यावर आपल्या पश्चात आपलं असं काय राहणार आहे इथे! काहीच नाही ना!

अरे! हे बघा, आली आमची बकू. ये गं बकुळे. ओ. एम. जी. बकू! किती छान दिसते आहेस हो! बेसिक तरी पण एकदमच लिट गं! आणि हे काय!? आणलास का तो पास्ता बाहेर! छान छान! थांब जरा फोटो काढू दे. वा वा! वा वा! काय मस्त आलाय फोटो! बाकी पास्ता लगेच आणलास ते बरं केलंस बरं का! नाही तर पाहुणे म्हणाले की फोटो वरच आमची बोळवण करता की काय! काय म्हणालीस? हो, हो- हे अगदी खरं बघ. खायच्या पदार्थांचे फोटो डाउनलोड करता येतात, पण खायचे पदार्थ डाऊनलोड करता येत नाहीत. फेसबुकवर पोस्ट कर नंतर तुझी ही क्वोट. पहिला लाईक माझा! पाहुणे पण लाईक करतील बघ. काय हो कराल ना?

तर मग पाहुणे, हा झाला फोटो. आता एक याला छानशी कॅप्शन टाकतो थांबा, मग सुरूच करू खायला. हिने खालच्या हॉटेल मध्ये अजून काही अडर्थांची ऑर्डर दिलीये. कॅप्शन सुचेपर्यंत त्याची डिलिव्हरी येईलच. काय म्हणाला? लॉल बरंका पाहुणे. अहो फ्राईड राईस मागवला आहे. कोणी फोटो काढतं का त्याचा? पण ते फोटोचं जाउदे- मी काय म्हणतो- तुम्ही आज पाहुणे म्हणून, अतिथी म्हणून आमच्या घरी आला! अतिथी देवो भव! तेंव्हा कॅप्शन सुचवण्याचा मान तुमचा. काय सांगता! सुचली पण कॅप्शन तुम्हाला? हा सांगा तुम्ही, मी टाईप करतो. मराठीत आहे? अहो, चालेल का म्हणून काय विचारता!! धावेल धावेल. थांबा, मराठी मोड ऑन करतो.

एकाच मिनिट हां. ओक्के. डन. सांगा आता-

“वदनि कवळ घेता, लॉक उघडा ते फोनचे |

सहज हवन होते स्क्रोल करिता ह्या फीडचे |

जिवन करी जिवित्वा मायाजाल जरी अपूर्ण |

उदरभरण कुठचे हे केवळ- मनोरंजन ||

जनीं भोजनी फोन सर्व उघडावे |

अती तत्परे अन् चित्र ते साठवावे |

हरीचिंतने मग मायाजाळी पाठवावे |

तेंव्हाच की पावेल श्रीहरी हे समजावे ||

जय जय मायाजाल हे समर्थ ||

-सौरभ राघवेंद्र.