मत
काल दुपारी बसल्या बसल्या व्यंकटेश माडगूळकरांची भाषेविषयी मत मांडणारी चार वाक्यं आठवली. माडगूळकर म्हणतात, "आपली भाषा निर्जीव व चिवट होता कामा नये. बोलीपासून ती वेगळी पडता कामा नये. ललित-लेखनात…
काल दुपारी बसल्या बसल्या व्यंकटेश माडगूळकरांची भाषेविषयी मत मांडणारी चार वाक्यं आठवली. माडगूळकर म्हणतात, "आपली भाषा निर्जीव व चिवट होता कामा नये. बोलीपासून ती वेगळी पडता कामा नये. ललित-लेखनात हे अंतर वाढू देता काम नये. 'ण'चा 'न' म्हणण्यात काही पाप नाही. शुद्धाशुध्दतेच्या नादी लागून आपण आपली जोरदार, नेमकी आणि रसरशीत भाषा टाकून देतो ही भयंकर गोष्ट आहे." या वाक्यांमधलं तथ्य मला पटलं. कोणतीही बोली अशुद्ध नसतेच शिवाय प्रत्येक व्यक्तीची बोली ही त्याच्या वैयक्तिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीची अभिव्यक्ती असते असं माझंही मत आहे. माडगूळकरांनी मांडलेलं मत आणि माझं मत बऱ्यापैकी सारखं आहे या जाणिवेनं मी सुखावलो. चेहेऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. तेवढ्यातच फेसबुक स्क्रोल करता करता एका परिचितानं "कौटिल्याचं अर्थशास्त्र" हा शब्दसमुह "कवटील्लाच अर्थशास्तर" असा लिहिलेला दिसला आणि इंद्रायणी तांदळाचा भात खाता खाता दाढेखाली खडा यावा, तो चावला जाऊन दाढेतुन कळ यावी तसं काहीसं झालं. माडगूळकर, "भाषा प्रवाही असावी" असं म्हणतात. त्यांच्या वेळी प्रवाह नितळ असावा कदाचित, नाही तर त्यांनी, "भाषा प्रवाही असावी पण प्रवाह नितळ असावा" असं काहीसं म्हटलं असतं. असो. चालायचंच.