मार्गस्थ
कोलाहलापासून लांब घेऊन जाणारे काही रस्ते असतात. या रस्त्यांवरुन चालताना रेचकाचा श्वास होतो. आडोशाला थांबून नाकावरचा मास्क आणि चेहऱ्यावरचा मुखवटा उतरवताना, 'कोणी पाहिलं तर?' या विचारासरशी अवघड…
कोलाहलापासून लांब घेऊन जाणारे काही रस्ते असतात. या रस्त्यांवरुन चालताना रेचकाचा श्वास होतो. आडोशाला थांबून नाकावरचा मास्क आणि चेहऱ्यावरचा मुखवटा उतरवताना, 'कोणी पाहिलं तर?' या विचारासरशी अवघडून जावं लागत नाही. दैनंदिन जगण्यात वेळोवेळी कात्रीत पकडणारी आयुष्याची सगळीच गणितं इथे सुटल्यासारखी वाटतात. आयुष्य सहज वाटतं, सोपं वाटतं. असा रस्ता शोधावा लागत नाहीत. शोधून तो सापडतही नाही. नकाशा पाहून फार तर ठिकाण सापडेल एखादं, मार्गस्थ थोडीच होता येईल?
आपण घाईत असतो नेहमीच. ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्याची घाई, पोहोचलो की तिथून निघण्याची, अजून वेगळ्या ठिकाणी पोहोचण्याची घाई! प्रवास कमी आणि धावपळच जास्त! कसं व्हावं मग मार्गस्थ? मार्गस्थ व्हायचं तर प्रथम ठिकाणाचा मोह सुटायला हवा, मायेचा पाश तुटायला हवा. जे घडतं हे घडू द्यायला हवं, जे दिसतं ते पाहता यायला हवं. ज्ञाताची ओझी वाहणारी ओझ्याची गाढवं आपण! ज्ञातापासून मुक्त झाल्याशिवाय अज्ञाताचा मार्ग कसा गवसावा?
परंपरा आणि गप्पांच्या ओघाने आलेले उल्लेख वगळले, तर मुक्ती आणि स्वातंत्र्य आपल्याला मुळी झेपतही नाही. चाकोरी नसेल तर आपण अस्वस्थ होतो, ठिकाण ठाऊक नसेल तर सैरभैर होतो. लेखणीतली शाई संपेस्तो वर आणि कागद फाटेस्तोवर आपण "जर्नी इज ब्युटीफुल. जर्नी इज ब्युटीफुल. जर्नी इज ब्युटीफुल." असं लिहीत गेलो तरी त्या प्रवासाचा शेवट कुठे करायचा हे ज्ञात असतंच की आपल्याला. परतीचे दोर कापून उद्या ठिकाणच न ठरवता बाहेर पडावं एखाद्याने आणि मग सांगावं, "जर्नी इज ब्युटीफुल!"
परतीचा दोर म्हणजेच ज्ञाताची बंधनं. ती सैलावली की कंप सुटतो आपल्या पायांना! घसे कोरडे पडतात, छाती दडपते. ही बंधनं सैलावू नयेत म्हणून आयुष्यभर झगडतो आपण. ज्ञाताच्या चौकटीचं सुख आयुष्य हिरावून घेत असेल तर त्याच्याशी भांडता तरी येतं! पण मृत्यूचं काय? तो येतो आणि क्षणात तोडून जातो सगळं! भांडता येतं त्याच्याशी? येईल? नाही? मग जगण्याशी तरी का भांडतो आपण? हे भांडण थांबवता आलं तर कोलाहलही थांबेल आपोआपच, आपणही आपल्या प्रवासात स्थिर होऊ, मार्गस्थ होऊ. शांतपणे जगू शकू!
कोलाहलापासून लांब घेऊन जाणारे काही रस्ते असतात. ते शोधून सापडत नाही. शोधावे लागतही नाहीत. ज्ञाताचं ओझं उतरलं की आपोआप मार्गस्थ होतो आपण, जिवंतपणी- आपल्याही नकळत!
- सौरभ राघवेंद्र.