•mr•

मन रे ! (पूर्वार्ध)

मी आणि माझे दोन मित्र मुंबईमध्ये लोकलने दादरकडे का तिकडेच कुठेसे निघालो होतो, तेंव्हाची ही गोष्ट. 

मी आणि माझे दोन मित्र मुंबईमध्ये लोकलने दादरकडे का तिकडेच कुठेसे निघालो होतो, तेंव्हाची ही गोष्ट. 

साडे-अकरा बारा ची वेळ होती. रविवारच्या दिवशी त्या वेळी लोकल मध्ये जशी

स्थिती असावी त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती त्यादिवशी.आम्हा तिघांच्या

गप्पा सुरु होत्या. बाकीचे लोक आपापल्या विश्वात रममाण होते. कोणी

फोनमध्ये गुंतलं होतं, कोणी खिडकीतून बाहेर बघत होतं. कोणी आपलं स्टेशन आता

येईल म्हणून लगबगीने उठत होतं तर नुकतंच चढलेलं कोणी बसायला जागा शोधात

होतं. या गर्दीत एका मनुष्याने माझं लक्ष वेधून घेतलं.

पस्तीशीचा

असावा साधारण. दाढी न केल्यामुळं खुंटं वाढेललं. चुरगळलेला पांढरा टी-शर्ट

आणि काळी अंगाबरोबर जाणारी जीन्स आणि पायात जीर्ण झालेले सॅंडल्स. त्याच्या

हातात बॅग होती. त्याचा एकूण अवतार पाहून असं वाटत होतं की कदाचित नुकताच

कुठला तरी लांबचा प्रवास करून आला होता. 

एखाद्या व्यक्तीने आपलं

लक्ष का वेधून घेते याला काही विशिष्ठ असे नियम नाहीत. कोणाचं रूप आपलं

लक्ष वेधून घेतं, तर तोंडओळख असलेल्या एखाद्या व्यक्तीचं स्वरूप आपलं लक्ष

वेधून घेतं. एखाद्या व्यक्तीचा कपडे घालण्याचा अंदाज आपलं लक्ष आकर्षित

करतो तर कुणाच्या शरिराची आकर्षक ठेवण आपलं लक्ष वेधून घेते. एखाद्याची

चाल, एखादा विशिष्ठ हावभाव, केसाची वेगळीच काही रचना- एक ना अनेक. 

या इसमाने माझं लक्ष वेधून घेतलं ते अनोळखी गर्दीत एखादा ओळखीचा किंवा ओळख

करता येण्याजोगा चेहरा शोधात असल्याच्या भाव घेऊन भिरभिरणाऱ्या त्याच्या

चष्म्याआडच्या डोळ्यांनी आणि त्या शोधाला सोबत करणाऱ्या तो गुणगुणत

असलेल्या सुरेल गाण्यानी. 

आम्हा तिघांच्या गप्पा, लोकलचा खडखडाट,

आजूबाजूंच्या लोकांच्या गप्पा-गोंधळ या सगळ्यामध्ये त्याचा आवाज अत्यंत

शांतपणे आपला मार्ग शोधून या सगळ्या गोंगाटापासून आपलं अलिप्त अस्तित्व

टिकवून होता. तो आवाज बेसूर नव्हता, फार मोठा किंवा कर्कश्शही नव्हता.

त्यात अकारण क्रंदन नव्हतं, गर्दीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनण्याची

अभिलाषाही त्यात नव्हती; पण त्याच्या भिरभिरणाऱ्या डोळ्यांकडे बघून की काय

कोणास ठाऊक मला त्या आवाजात कुठेतरी एकाकीपणाची झाक आहे की काय अशी पुसटशी

शंका येऊन गेली.

मी आमच्या संभाषणातून थोडासा बाजूला झालो आणि

कुतुहलापोटी तो काय गातो आहे हे ऐकायचा प्रयत्न करू लागलो. कान देऊन थोडंसं

ऐकल्यावर लक्षात आलं की सार्वकालिक प्रख्यात उर्दू गझलकार मिर्झा गालिब

याची एख रचना तो गुणगुणत होता, आणि ती रचन होती- ‘हर एक बात पे...!’

हर एक बात पे कहते हो तुम कि 'तू क्या है'

तुम्हीं कहो कि ये अंदाज़-ए-गुफ़्तगू क्या है

एखाद्या वेगळ्याच पुरुषाशी आपली प्रेयसी बोलते आहे आणि त्या दोघांचं

संभाषण खूप छान सुरु आहे, ती त्याच्याकडे लक्ष देण्याच्या नादात सातत्याने

आपल्याकडे दुर्लक्ष करते आहे आणि या सगळ्याची बोचरी जाणीव होऊन प्रेयसीकडे

बोलायला गेलेल्या मिर्झा गालिबला, तो काही बोलला की प्रत्येक वेळी काहीशा

तुसडेपणानेच “कोण रे तू मला हे सांगणारा?” असं म्हणणाऱ्या प्रेयसीला- गालिब

विचारतो आहे- “तूच संग ना ! बोलायची कसली ही पद्धत ?” 

हर एक बात पे कहते हो तुम कि 'तू क्या है'

तुम्हीं कहो कि ये अंदाज़-ए-गुफ़्तगू क्या है

गालिब म्हणजे प्रेम आणि विरह या दोन सुलभ भावनांचं मूर्तिमंत रूप. एखाद्या

प्रेयसीचं वर्णन कोणी करावं तर ते गालिबनेच. आपल्या प्रेयसीचं वर्णन

करताना तो लिहितो, की त्याच्यासाठी अत्तरगंधित गुलाबी मदिरेपेक्षा

(बादा-ए-गुलफ़ाम-ए-मुश्क-बू) किंचितही कमी नाही ! पण न ती या कौतुकाने

त्याच्यावर भाळली ना त्याच्या नशिबी असलेला विरहभोग त्याला चुकला. 

पण तिची आणि ती आपल्याशी प्रेमाने वागेल त्या घटिकेची जीवे भावे वाट पाहता

पाहता गालिब आताशा इतका व्याकुळ झाला आहे की तो तिला म्हणतो- 

“चिपक रहा है बदन पर लहू से पैराहन,

हमारी जेब को अब हाजत-ऐ-रफू कया है?”

या विरहव्याकुळतेनं शरीराला इतक्या जखमा दिल्या आहेत की अंगावरचे कपडे आता

त्या जखमेतून ओघळणाऱ्या रक्तानेच शरीराला चिकटले आहेत. मग फाटलेल्या

ठिकाणी कपडा शिवायची गरजच काय !? या अवस्थेकडे बघून किंवा आणि कशासाठी तरी

ती कधी कधी ती त्याच्याकडे एखादा कटाक्ष टाकत असावी बहुधा, म्हणूनच कदाचित

तो तिला विचारतो आहे- 

“जला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा,

कुरेदते हो जो अब राख जुस्तजू क्या है?”

जुस्तजू म्हणजे –इच्छा, गरज. रक्त वाहून गेलं. प्रेमाच्या ज्वालेत शरीराची

सुद्धा राख झाली. माझं हृदय पण जाळून गेलं असावं एव्हाना. कुरेदते हो जो

अब राख जुस्तजू क्या है? आता या राखेत तुला काय शोधायचं आहे !?

तुम्हीं कहो कि ये अंदाज़-ए-गुफ़्तगू क्या है

या विवंचनेनं त्याला इतकं थकवलं आहे तो म्हणतो- 

“रही न ताक़त-ऐ-गुफ्तार और अगर हो भी” आता माझ्यामध्ये दोन शब्द बोलण्याचीही ताकद उरली नाहीये.

आणि जरी उरली असेल तरी-

“तो किस उम्मीद पे कहिये के आरजू क्या है?” कुठल्या आशेवर सांगू की माझी इच्छा काय आहे ! 

रही न ताक़त-ऐ-गुफ्तार और अगर हो भी

तो किस उम्मीद पे कहिये के आरजू क्या है?

तिच्या प्रेमात त्याने स्वत:ला इतकं झोकून दिलंय की त्याच्या दृष्टीने

तिचा प्रियकर इतकंच त्याच्या आयुष्याचा अर्थ उरलाय, तेवढीच त्याची त्याला

ओळख उरलीये आणि याची जाणीव त्याला झाली आहे. हे जाणीव व्यक्त करताना तो

लिहितो-

“बना है शाह का मुसाहिब फिरे है इतराता,

वगरना सहर में ‘ग़ालिब’ की आबरू क्या है?”

तो त्या राजाचा- मुघल राजसत्तेचा शेवटचा राजा- बहादूर शाह जाफर, या शाहचा

“मुसाहीब” साथीदार (गालिब राजकवी होता) आहे म्हणून ते काय तो चार लोकात

अभिमानाने वावरू शकतो- “बना है शाह का मुसाहिब फिरे है इतराता” नाही तर

तिच्या प्रेमात स्वत:च्या प्रतिमेशी त्याने असे खेळ केले आहेत की “वगरना

सहर में ‘ग़ालिब’ की आबरू क्या है?” तो म्हणतो- नाही तर या गालिबची शहरात

अब्रूच काय राहिली आहे !!

त्याच्या त्या ओळी ऐकून माझ्या डोळ्यासमोर

हे सगळं चित्र एका क्षणात उभं राहीलं. माझ्या तोंडून आपसूकच वाह ! असं

निघून गेलं. त्याने चमकून कोणी दाद दिली हे पाहण्याचा प्रयत्न केला; पण तो

मी होतो हे त्याच्या लक्षात आलं नाही. 

काही क्षण असेच शांततेत

गेले. त्याने खिशातून आपला मोबाईल काढला. काही तरी पाहिलं त्यात. वेळ आणि

कोणाचा संदेश वगैरे काही आला आहे का हे पाहिलं असावं बहुधा. मग तो फोन

त्याने पुन्हा खिशात ठेवून दिला. काही सेकंद डोळे मिटले आणि पुढची रचना

गुणगुणायला सुरुवात केली !

दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है

आख़िर इस दर्द की दवा क्या है

दिल-ए-नादाँ ! पुन्हा गालिब ! मनातल्या मनात म्हटलं “बहोत खूब जनाब ! चालू द्या !” 

दिल-ए-नादाँ ही माझ्या आवडत्या रचनांपैकी एक. त्यात मिर्झा गालिब

स्वत:च्या मनाची व्यथा व्यक्त करतोय आणि म्हणतो- अरे वेड्या मना, असा

तळमळतोयस का? काय झालंय तुला आणि जे काही झालंय (हे परमेश्वरा!)

त्याच्यावरचा उपाय काय ?" खरं तरी ही रचना अत्यंत नाजूक भाव व्यक्त करते.

आपल्याला आवडणारी व्यक्ती जेंव्हा आपल्या आजूबाजूल असते, आणि तिच्या केवळ

असण्याने आपली घालमेल सुरु होते- तेंव्हाचे हे सगळे भाव ! आणीत ए व्यक्त

करताना तो म्हणतो- 

हम हैं मुश्ताक और वो बेजार

या इलाही यह माजरा क्या है?

मुश्ताक म्हणजे उत्सुक,इच्छुक. मला बोलायचंय तिच्याशी. पण हे देवा ! काय

हे ! तिला काही फरकच कसा पडत नाही ? माझी दाखल ती का घेत नाही ? शाळेत

असताना आपल्याला एखादी वर्गमैत्रीण नुकतीच आवडू लागलेली असते. आपल्याला

तिच्याशी बोलायचं तर असतं, पण कसं ते काळत नाही आपल्याला. मग वाटतं की,

तिच आपल्याशी येऊन बोलली तर ! आणि लक्षात येतं कित्ती सोप्प !! तिनेच

आपल्याशी येऊन बोलायला हवं. आणि मग आपण वाट पाहतो आणि मनोमन म्हणतो “हम हैं

मुश्ताक” लेकीन भाई वो तो है – वो तो है बेजार !! चिडचिड होते न आपली-

काळात नाही तिला मला बोलायचंय तिच्याशी ? येत का नाही माझ्याशी बोलायला?

“या इलाही यह माजरा क्या है?” अरे देवा काय चालू काय आहे हे ?

जसं

काही काय चालू आहे या गोष्टीच्या विचारांतून होणारा त्रास कमी असतो म्हणून

आपल्या लक्षात येतं- की तिला बोलायचं नाहीये असं नाहीये. तिला बोलायचं आहे,

किंबहुना ती बोलतेसुद्धाआहे. पण, मी सोडून सगळ्यांशी. गालिबने पण हाच

अनुभव घेतला असावा. नाही तर तो (कदाचित काहीश्या उद्वेगाने) म्हणाला नसता-

मैं भी मूंह में ज़बान रखता हूँ

काश पूछो कि मुद्दा क्या है?

बोलायला मला सुद्धा येतं बरं का- “मैं भी मूंह में ज़बान रखता हूँ”, यार

मला विचार तरी की काय झालंय म्हणून !! “काश पूछो कि मुद्दा क्या है?” 

पण नशीब कधी कधी साथ सुद्धा देतं. आपण एके दिवशी शाळेत लवकर पोहोचलेलो

असतो. (किंबहुना ती भेटवी म्हणून लवकर गेलेलो असतो) आणि योगायोगाने ती

सुद्धा आलेली असते आणि गम्मत म्हणजे- वर्गात कोणीच नसतं ! आता बोलायला जावं

तर मनाचा इतका गोंधळ उडतो की बोलता येत नाही !

जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद

फिर यह हंगामा ए खुदा क्या है?

मग पुन्हा विचारावसं वाटतंच-

दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है

आख़िर इस दर्द की दवा क्या है

आधीच आग लागलेली असते- तिचं स्वर्ग-लावण्य त्यात तिचे चोरून कटाक्ष टाकणं,

मन मोहवणाऱ्या गंधानं गंधित झालेले तिचे केस, आणि काजळाची गरजाही नसलेले

तिचे डोळे ! या सगळ्याचं वर्णन केलं नाही तर तो गालिब कसला !

ये परी चेहरा लोग कैसे हैं?

गम जा -ओ-इश्व-ओ-अदा क्या है?

शिकन-ए-जुल्फ-ए-अम्बरी क्यों है?

निगाह-ए-चस्म-ए-सुरमा सा क्या है?

एकूणच सगळी परिस्थिती कधी कधी इतकी हाताबाहेर जाते की आपलं बालसुलभ वय,

निरागस आकर्षण वगैरे गोष्टी ओलांडून आपण नाही म्हटलं तरी तत्त्वज्ञानाची

कास धरू पाहतोच. जिथे आपण विचार करतो की हे सगळं काय आहे ? तिथे महाप्रगल्भ

प्रतिभेचा गालिब थोडीच थांबणार आहे !? तो म्हणतो-

सबज़ा-ओ-गुल कहाँ से आये हैं?

अब्र क्या चीज़ है, हवा क्या है?

सबज़ा-ओ-गुल म्हणजे हा सगळा निसर्ग- वृक्ष, वेली, फुलं वगैरे वगैरे कुठून

येतं? ही ढग म्हणजे काय आहे ? ही हवा- ती काय आहे ? वरकरणी प्रवाहबाह्य

वाटणाऱ्या या ओळी कमालीच्या अर्थगर्भ आहेत. कुठून येतं हे सगळं ? आपली

श्रद्धा तरी अशीच आहे न की तो परमेश्वर निर्माण करतो ! ही फुलं, ही झाडं,

हे डोंगर, नद्या, हे आकाश, आकाशातले मेघ- हे, हे सगळं परमेशाने निर्माण

केलेल्या पंचमहाभूतांचा मुक्तछंदच नव्हे का? मग हे- हे स्वर्गसुंदर लावण्य-

त्याचीच निर्मिती नव्हे का ? मग हे प्रेम सुद्धा त्याचीच निर्मिती नसेल

कशावरून ? आणि हे सगळं असं असताना का हा गोंधळ, का हा त्रास ?

दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है ?

आख़िर इस दर्द की दवा क्या है?

यात रचनेत येणाऱ्या पुढच्या दोन ओळी गालिबच्या प्रेमाची तीव्रता सांगून जातात. तो म्हणतो-

हमको उनसे वफ़ा कि है उम्मीद

जो नहीं जानते वफ़ा क्या है।

वफा हा प्रेमालापांमधला परवलीचा शब्द. ऐन तारुण्यात प्रेम हे प्रेमासाठी

केलं जात. ते वय असं असतं की प्रेम हे व्यक्तीपेक्षा आपण एखाद्या

व्यक्तीच्या प्रेमात आहोत या संकल्पनेवरचं प्रेम असतं. त्या नकळत्या वयात

ती व्यक्ती खरंच तितकीशी महत्वाची असते हे येणारा काळच ठरवत असतो. पण गालिब

या बालिश प्रेमाच्या पुढे आला आहे. त्याच्या मनात जे पोक्त प्रेम आहे जिथे

प्रेमात पडण्याच्या भावानेपेक्षा ज्या व्यक्तीच्या प्रेमात आपण असतो ती

व्यक्ती महत्वाची आहे- त्या व्यक्तीलाच जर या पोक्तपणाची जाणीव नसेल तर काय

! म्हणून तो तिला उद्देशून म्हणतो- तिला अजून प्रेमाचं गांभीर्य कळलंच

नाहीये- जो नहीं जानते वफ़ा क्या है। पण हे सगळं असलं तरी, ती आवडते न

त्याला- मग तो तिला एका दारावेशाचा- साधूचा दाखला देतो आणि म्हणतो-

हाँ भला कर तेरा भला होगा

और दरवेश कि सदा क्या है?

तू माझं भलं कर, म्हणजे तुझं पण भलंच होईल. तो साधू याहून वेगळं काय सांगतो !

माझ्यवर दया- माझं भलं करण्यासाठी का होईन, पण माझ्यावर प्रेम कर असं

सांगणारा अगतिक गालिब शेवटच्या दोन कडव्यांत व्याकुळतेची परिसीमा गाठतो,

आणि हे फक्त गालिबच करू जाणे !

तो म्हणतो-

जान तुमपर निसार करता हूँ

मैं नहीं जानता दुआ क्या है।

मैंने माना कि कुछ नहीं ग़ालिब

मुफ्त हाथ आये तो बुरा क्या है?

आपल्या रोजच्या आयुष्यातून परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी वेगळा वेळ

काढतो. प्रार्थनेत आपण चांगल्या गोष्टींचं चिंतन करतो. आपल्यासाठी- आपल्या

प्रियजनांसाठी. पण गालिब आपल्यासारखा थोडीच आहे !

जान तुमपर निसार

करता हूँ – माझं आयुष्य मी तुझ्यावर ओवाळून टाकलंय. माझं आयुष्य

तुझ्याचभोवती फिरतंय. मी जे काही चांगलं चिंतन करतो- ते तुझ्यासाठीच.

माझ्यासाठी काही मागायला मी माझा कुठे राहिलो आहे ! मला नाही माहिती हे दुआ

मागणं वगैरे काय आहे ! 

जान तुमपर निसार करता हूँ

मैं नहीं जानता दुआ क्या है।

प्रेम हे धोकादाय असतं ते या एका कारणासाठी- समोरच्या व्याक्तीपायी माणूस स्वत:ला हरवून जातो. आणि म्हणतो-

मैंने माना कि कुछ नहीं ग़ालिब

मुफ्त हाथ आये तो बुरा क्या है?

मी मान्य करतो- तुझ्या प्रेमात मी कोणी नाहीये. माझ्यासाठी माझ्यादृष्टीने

तर नाहीच, पण तुझ्यासाठी सुद्धा तसं निरुपद्रवीच आहे. तुला कुठलाच त्रास

देणार नाही. माझी तुझ्याकडून कुठली अपेक्षा पण नाही. असा नितांत, अपरंपार

प्रेम करणारा गालिब जर तुला फुकट, काहीच प्रयत्न न करता मिळत असेल तर का

नको आहे तुला ?

मैंने माना कि कुछ नहीं ग़ालिब

मुफ्त हाथ आये तो बुरा क्या है?

दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है ?

आख़िर इस दर्द की दवा क्या है?

दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है ?

आख़िर इस दर्द की दवा क्या है?

ह्या ओळी तो पुन:पुन्हा गुणगुणत होता. मग काही वेळा साठी तो थांबला.

त्याचं गायन कमालीचं भावव्याकूळ होतं. इंग्रजीमध्ये ज्याला स्पेलबाउंड

म्हणता येईल, तशी माझी अवस्था झाली होती. मी लोकलमध्ये आहे क्षणभर विसरूनच

गेलो होतो. तो गायचा थांबला तेंव्हा माझी तंद्रा भंग पावली. मी आजूबाजूला

पाहिलं. लोकल तीच होती. दोघा मित्रांचा गप्पांचा विषय थोडासाच पुढं सरकला

होता. लोकांची लगबग सुद्धा थोड्या फार फरकाने तशीच होती. मी आणि तो अनोळखी

व्यक्तीच काय ते “मिर्झा गालिब” नावाच्या एका पराविश्वाची सफर करून आलो

होतो. 

पुढचे काही क्षण शांततेत गेले. मला त्या माणसाबद्दल कुतूहल

निर्माण झालं. त्याचे उच्चार, त्याचा अंदाज- कुठे तरी खानदानीपणा होता

अंगात त्याचा असं वाटून गेलं मला. त्याच्याशी बोलायला मी शब्द जुळवू लागलो

तेवढ्यात त्यानं पुढचं गाणं गुणगुणायला सुरुवात केली. 

त्या कोलाहलातही त्याचा सुस्वर आवाज आणि स्पष्ट उच्चार माझ्या कानावर आदळत होते. 

या गाण्याचे गाण्याचे शब्द होते- मन रे ! तू काहे न धीर धरे ? 

मी आमच्या इप्सित स्थळी उतरलो तेंव्हा हे गाणं माझ्या मोबाईलमध्ये टिपून

ठेवलं आणि घरी गेल्या नंतर त्या गाण्याचा शोध घेतला. ते गाणं होतं- साहीर

लुधियानवी या महान गीतकारच्या लेखणीमधून उतरलेलं, रोषन यांनी संगीतबद्ध

केलेलं महोम्मद रफींच्या आवाजातून मूर्तरूप लाभलेलं चित्रलेखा (१९६४) या

चित्रपटातलं एक अत्यंत सुरेल आणि अर्थवाही गाणं- “मन रे ! तू काहे न धीर

धरे !”

हे गाणं माझ्या ओळखीचं नव्हतं. पण मला ते आवडलं. त्याची चाल

शब्द लक्षात राहिले. त्याचं ते गाणं गाऊन झाल्यावर आपण ह्या गाण्याविषयी,

त्याच्याविषयी त्याच्याशी किमान दोन शब्द तरी बोलू, दोन प्रश्न विचारू असं

मी मनाशी ठरवलं खरं, पण ते सत्यात उतरायच्या आत माटुंगा स्टेशन आलं आणि तो

मनुष्य खाली उतरला आणि निघून गेला. लोकलच्या दरवाज्याशी येऊन मी त्याच्या

मार्गस्थ आकृतीकडे पाहात राहिलो. माझ्या मित्राने मला मागे खेचलं. आमचं

संभाषण पुन्हा सुरु झालं खरं पण माझं त्यात फारसं लक्ष नव्हतं. तो माणूस,

या सगळ्या गर्दीतून उचलून एका वेगळ्याच दुईयेत घेऊन जाणारा त्याचं सहज पण

आर्त गायन, मिर्झा गालिब अशा सगळ्या विषयांनी माझं मन भरून आई भारावून गेलं

होतं. तो मनुष्य कोण होता, मला परत भेटेल किंवा भेटणार नाही, गालिबच्या

त्या रचना ऐकण्याचा तो तसा अनुभव मला परत अनुभवायला मिळेल किंवा नाही-

माहिती नाही ! पण गालिबच्या या दोन रचना आणि त्याचं ते मला तेंव्हा अनोळखी

असणारं गाणं आता केंव्हाही कानावर पडलं की माझ्या डोळ्यासमोर तो प्रवास उभा

राहतो आणी अंगावर त्या सुंदर अनुभवाच्या आठवणीनं अंगावर रोमांच उभे

राहतात.

अगदी साक्षात परमेश्वराकडेही न मागता आयुष्यभरासाठी या

रोमांचकारी अनुभवाची सुंदर ठेव देऊन गेलेल्या त्या अनोळखी मनुष्याचे शतश:

धन्यवाद ! या लेखनप्रपंच्याच्या निमित्ताने कदाचित मी त्याच्या ऋणातून

किंचित उतराई होईन. 

-सौरभ राघवेंद्र.

(क्रमशः)

नम्र

सूचना- या लेखात केलेलं मिर्झा गालिबच्या रचनांचं अवलोकन हे माझ्या

वैयक्तिक आणि अल्प अभ्यासातून केलेलं आहे. ते चुकूही शकतं. आपण योग्य अर्थ

जाणत असाल तर कृपया तो मला जरूर अवगत करा; पण हे असं नाही, असंच आहे असा

वाद घालण्याचा वृथा प्रयत्न दुर्लक्षित केला जाईल.