कविता
दोन-अडीच महिन्यांपूर्वी माझा एक मित्र त्याने लिहिलेल्या कविता घेऊन माझ्याकडे आला होता.
दोन-अडीच महिन्यांपूर्वी माझा एक मित्र त्याने लिहिलेल्या कविता घेऊन माझ्याकडे आला होता.
तो: सौरभ, अरे बघ ना, कविता लिहिल्या आहेत मी. वाचून सांग ना कशा आहेत.
मी: अरे, मी कसं सांगू ! मला स्वतःला तरी कुठे कळतं एवढं ? चांगल्या-वाईटाचा विचार न करता लिहीत राहायचं असतं आपण.
तो: बास काय राव ! तुला नाही तर कोणाला कळणार ! सांग की कशा झाल्यात !
मी (ह्या भोगातून मुक्ती नाही हे ओळखून): बरं बरं! कौतुक नको उगाचच. बघू कविता.
तो (कवितांची वही देत): घे.
(थोड्याच वेळात कविता वाचून झाल्यावर-)
मी: अरे वा !!! प्रेम, विरह वगैरे विषयांवर अशा हास्य-कविता लिहिणं खरंच अवघड आहे रे. छान जमलंय. खूप हसू येतं वाचताना. कीप इट अप.
तो (ओशाळून आणि वही अलगदपणे हिसकावून घेत): अरे, त्या हास्यकविता नाहीयेत रे.
मी: ओह!
(अवघडलेल्या शांततेत सरलेल्या काही मिनिटांनंतर तो गेला त्यानंतर ना तो पुन्हा माझ्याकडे आला, ना त्याच्या कविता....)