•mr•

कथा अाॅर्कुटची

काही दिवसांपूर्वीच वेब जायंट गुगलनं जाहीर केलं कीअाॅर्कुट ही वेबसाईट ३० सप्टेंबर रोजी बंद केली जाणार आहे. २४ जानेवारी २००४ ते ३० सप्टेंबर २०१४ असा दहा वर्ष आणि काही महिन्यांचा प्रदीर्घ प्रवास…

काही दिवसांपूर्वीच वेब जायंट गुगलनं जाहीर केलं कीअाॅर्कुट ही वेबसाईट ३० सप्टेंबर रोजी बंद केली जाणार आहे. २४ जानेवारी २००४ ते ३० सप्टेंबर २०१४ असा दहा वर्ष आणि काही महिन्यांचा प्रदीर्घ प्रवास केलेलीअाॅर्कुटबंदहोणार म्हटल्यावर मला आश्चर्य जरी फारसं वाटलं नसले तरी वाईट मात्र नक्कीच वाटलं.

अाॅर्कुट बद्दल एक गमतीशीर गोष्ट प्रसिद्ध आहे.अाॅर्कुटचासंस्थापक Orkut Buyukkokten याची आणि त्याच्या प्रेयसीची ताटातूट झाली आणि नंतर काही केल्या त्याला ती सापडेना. म्हणून मग, ती इथे नाही तर इंटरनेट वर नक्की सापडेल असा विचार करून या पठ्ठ्याने म्हणे ही वेबसाईट सुरु केली ! आणि तीन वर्षाच्या काळाने ते एकत्र आले. ही कथा अर्थातच अजिबातच खरी नाही.

२००० साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये Orkut Buyukkokten याने सुरु केलेल्या क्लब ने्क्सस नावाच्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफाॅर्मशी त्यावेळी दोन हजार विद्यार्थी जोडले गेले होते. त्या पाठोपाठ त्याने अलुम्नाई सोशल नेटवर्क आणि इन-सर्कल असे आणखी दोनप्लॅटफाॅर्मसुद्धा सुरु केले. कॉम्पुटर सायन्स मध्ये डॉक्टरेट मिळवलेल्याOrkut Buyukkokten ला कालांतराने गुगल मध्ये नोकरी मिळाली. गुगल मध्ये काम करता करता तो आपल्या कामाचा एक पंचमांश वेळ त्याने त्याच्या या सोशल नेटवर्किंगच्या वेडासाठी देत असे. तो म्हणे, ''माझे स्वप्न होते की इंटरनेट वापरणाऱ्या सर्वांना एकमेकांशी जोडणे ज्यायोगे ते एकमेकांशी नवे संबंध जोडू शकतील (आणि त्यामुळे) त्यांच्या आयुष्यातएक वेगळा बदल घडू शकेल.'' तत्याच्या या वेदाची परिणीती अखेर ओर्कुट डॉट कोम मध्ये झाली जेंव्हा गुगल मध्ये त्याच्या प्रोजेक्ट मॅनेजर आणि मेरीसा मेयर(गुगल मधली सर्वात पहिली फिमेल इंजिनिअर जी नंतर एक्झीक्यूटीव्ह पदापर्यंत जाऊन पोहोचली) या दोघांनी ठरवले की त्याच्या यासोशल नेटवर्किंग प्लॅटफाॅर्मला त्याचेच नाव द्यायचे.

अनेक वर्षं नेटीझन्सना या ना त्या मार्गाने हितगुज करण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देणाऱ्या अाॅर्कुटने आपल्या वेबसाईटवर अनेक फीचर्स उपलब्ध करून दिली होती. आपलं अकाउंट सुरु केल्या केल्या दिसे ते आपले प्रोफाईल कोणी कोणी पाहिले आहे याची लिस्ट. आणि मग आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीने ते पाहिले असले की वाटणारी गम्मत वेगळीच असे. आज जशी फेसबुक ची वाॅल आहे तशीच काहीशीअाॅर्कुट ची असे. इथे पाठवल्या जाणाऱ्या मेसेजेस ना स्क्रॅप म्हणत. फोटो आणि आवडणारे व्हिडीओ शेअर करण्याची सुविधा सुद्धाअाॅर्कुट देत असे.

इथे आणखी एक गम्मत होती ती म्हणजे टेस्टीमोनीअल्स. आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये असणाऱ्या अनेक लोकांविषयी आपल्याला काय वाटते हे सर्वांसमक्ष लिहिण्याची सुविधा. कधी मजेशीर तर कधी मनापासून लिहिलेलेटेस्टीमोनीअल्स वाचून खूप छान वाटे. आणि हो, ऐकून कदाचित नवल वाटेल पण आज शेकड्याने उपलब्ध असणाऱ्या स्मायालींची संख्या त्यावेळी जेमतेम आठ वरच मर्यादित होती !! गुगलशी संलग्न असल्याने इथे पर्सनल आणि व्हिडीओ चॅटिंग ची सुविधा होते हे सांगणेतर अर्थातच न लगे.

ऑर्कुटमुळे माझे नातेवाईक असणारे पण संपर्कात फारसे नसणारे लोक खूप जवळ आले. आणि खऱ्या अर्थाने एक नवा संवाद सुरु झाला. माझ्या काकांना जेंव्हा जवळ जवळ पन्नास वर्षांपूर्वी कामानिमित्त शहर सोडून निघून गेलेला मित्रऑर्कुटवर भेटला तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. असे कित्येक लोक असतील ज्यांच्या नशिबी हा आनंद त्यावेळी आला असेल.

अनेकदा समविचारी लोक इथे एकत्र येऊन साहित्यापासून ते सायन्स पर्यंत विषय हाताळणाऱ्या आपापल्या छोट्या छोट्या कम्युनिटीज ओपन करत आणि मग इथे चर्चा वाद रंगत असत. कधी कधी गैरसमजातून खरंच एखादा वाद होई आणि या सोशल कट्ट्यावर तो सोडवलासुद्धा जात असे. किती तरी कपल्स अशी आहेत की ज्यांची ओळख इथे झाली आणि मनेही इथेच जुळली नी कालांतराने त्यांचे लग्नही झाले.

या लेखाच्या वाचकांपैकी पुष्कळ जणांनी ऑर्कुट वापरले असेल. आणि जे ऑर्कुट भरात होती तेंव्हा टीनएज मध्ये होते त्यांच्या मनामध्ये तर ऑर्कुट चे विशेष स्थान असेल हे वेगळे सांगावयास हवे का ? आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचे प्रोफाईल शोधणे, सापडल्यावlर आणि मग तिने किंवा त्याने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यावर होणारा आनंद तासनतास रंगणाऱ्या गप्पा हे सारे जगच नवे आणि वेगळे होते.

पण ऑर्कुट साठी सारेच आलबेल आणि सुंदर होते असेही नाही. ऑर्कुटला अनेक काॅंट्रोव्हर्सीजना सामोरे जावे लागले. एखाद्या व्यक्तीच्या नावाने खोटे प्रोफाईल तयार करणे, एखाद्या व्यक्तीला जाणून-बुजून बदनाम करणे, सामाजिक तेढ निर्माण करणारे ग्रुप इथे तयार होणे, जातीय आणि धार्मिक विद्वेष पसरवणारे मेसेजेस पसरणे अशा गोष्टी तर घडल्या होत्याच पण त्याहीपुढे जाऊन कळस गाठणारी घटना समोर आली ती होती वेश्या व्यवसाय करणारे काही ग्रुप समोर आले ज्यांची सदस्य संख्या पाच हजारांपर्यंत होती. हिंदुस्तान टाईम्सच्या नवी दिल्ली आवृत्तीमध्ये याविषयी २००६ साली बातमी आली होती.

आजघडीस मागे वळून पाहताना प्रकर्षाने जाणवते तो ऑर्कुटचा कमी होत गेलेला जनाधार आणि घटत गेलेली लोकप्रियता. हे असे का झाले याची कारणे आपापल्या जागी आहेत आणि त्याची मीमांसाही अनेक लोकांनी केली आहे. पण सोशलनेट्वर्किंग ची एकप्रकारे पाया रचणारी वेबसाईट आता बंद होणार आहे ही बातमी अनपेक्षित नसली तरीदु:खदनक्कीच आहे.

आज जे ऑर्कुटचे झाले ते काही वर्षांत फेसबुकचे सुद्धा होईल असे म्हणणारे अनेक विचारवंत जगात आहेत. पण आजपर्यंत उत्क्रांती हेच बदलाचे सूत्र पाळत आलेल्या या जगात क्रांती घडवणारी ही माध्यमं सुद्धा कालबाह्य होत आहेत, होणार आहेत यावरून आपल्याला आपल्या बदलत्या जीवनशैलीची कल्पना यावी.

हाताने लिहिलेल्या पत्रांसून सुरु झालेला अप्रत्यक्ष संवादाचा प्रवास आज पृथ्वीवर दोन टोकांना असणाऱ्या दोन लोकांना अक्षरश: काही फुटांवर आणून त्यांची जशीच्या तशी थ्री-डी प्रतिकृती निर्माण करून जणू ती व्यक्ती आपल्या समोरच बसली आहे असं भासवणारं होलोग्राफीचं तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे. अर्थात, हे तंत्रज्ञान सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास बराच वेळ जावा लागेल पण आपला प्रवास कुठल्या दिशेने होतो आहे हे समजण्यास पुरेसे आहे.

काळानुरूप संवादाची माध्यमे बदलत गेली. एकाच्या तुलनेत दुसरे मागे पडत गेले. पण संवादाची गरज मात्र कधीच कमी झाली झाली नाही. उलट ती वाढतच गेली. आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी सर्वांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले.Orkut Buyukkoktenहा त्यांपैकीच एक अवलिया.

अॉर्कुटच्या बंद होण्याने सोशल नेटवर्किंगचं एक पर्व आता खऱ्या अर्थाने संपून जाईल. निर्माण झालेली पोकळी भरायला आणखीन नवनव्या सोयी, नवनव्या सुविधा येतीलच पण ऑर्कुट चे स्थान मात्र वेगळेच असेल हे सांगायला माझी वेगळी गरज आहे असे मला तरी वाटत नाही.

-सौरभ राघवेंद्र.