•mr•

करमरकर आजोबा.

आज दुपारी मी निवांत बसून कुठल्याशा गोष्टीचा विचार करत होतो. मग विषयाला विषय आणि संदर्भाला संदर्भ जुळत गेले आणि माझ्या विचारांची गाडी करमरकरांच्या दुकानाच्या समोर येऊन थांबली.

आज दुपारी मी निवांत बसून कुठल्याशा गोष्टीचा विचार करत होतो. मग विषयाला विषय आणि संदर्भाला संदर्भ जुळत गेले आणि माझ्या विचारांची गाडी करमरकरांच्या दुकानाच्या समोर येऊन थांबली.

करमरकरांचं दुकान. कोल्हापुरात शाळांना वैज्ञानिक प्रयोगांशी निगडीत साहित्य पुरवणारं कोण ? असा प्रश्न कोणाला पडला तर त्याला उत्तर असे करमरकर. रेल्वेस्टेशन पासून जवळ असणारं करमरकरांचं दुकान माझ्या अगदी आवडीचं ठिकाण होतं. कारण त्यावेळची माझी दहा अकरा वर्षाची बालसुलभ बुद्धी ज्या ज्या म्हणून कल्पना करू शकेल त्या सर्व वैज्ञानिक वस्तू तेथे उपलब्ध असत आणि दुकानाचे मालक करमरकर आजोबा... त्यांना तर माझे भारी कौतुक वाटे.

त्यांच्या दुकानात शेवटचं गेलो होतो त्याला आता दहा वर्ष तरी उलटून गेली असतील, पण दुकान मात्र अजून जसाच्या तसं आठवतं मला. गेल्या गेल्या उजव्या हाताला असे तो दुकानाच्या मोठा काउंटर. मोठ्याच्या मोठ्या चौरसाकृती दुकानात काचेच्या शेल्फांवरून अनेक वैज्ञानिक उपकरणे, साहित्य, तक्ते, पृथ्वीचे गोल मांडून ठेवलेले असत.

मोठा चष्मा घालणारे हसतमुख करमरकर आजोबा त्या काउंटरच्या मागे बसलेले असत. त्यांच्या मागच्या शेल्फ वरती एक कॉम्पुटर ऑपरेटेड मायक्रोस्कोप ठेवलेला होता. तो मला हवा असा माझा ठरलेला हट्ट. अर्थात त्या मायक्रोस्कोपचा मला काहीच उपयोग झाला नसता हे आता कळतंय मला, पण तेंव्हा मला तो हवा होता आणि अजूनही संधी मिळाली तर तो नक्की विकत घेईन मी.

पाचव्या इयत्तेच्या दिवाळीपर्यंत आम्ही आमच्या स्टेशन रोड वरच्या घरी राहत असू. त्या घराच्या हॉलमध्येच एका छोट्या कपाटात मी माझी एक मोठी (!) प्रयोगशाळा बनवली होती. आणि काय नसे त्यात ? छोट्याशा लोह्चुम्बकापासून, टारटारिक अॅसिड पर्यंत साऱ्या गोष्टी होत्या तिथे. केमिकल्स, टेस्टट्यूब्स, फ्लास्क, वायर्स, बॅटऱ्या, वेगवेगळी स्वीचेस, एक मोठं भिंग, होकायंत्र... खूप खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि विज्ञानावरची पुस्तके तर एवढी होती ! बापरे !

टी.व्ही वर पाहून मला थोडं फार ठाऊक होतं की हे सारे सायंटिस्ट लोक एप्रन आणि हँडग्लोव्हज घालून प्रयोग करतात, पण माझ्याकडे तर ते नव्हते. मग मी यावरही उपाय शोधून काढला होता. माझा निळ्या रंगाचा पायघोळ रेनकोट आणि लोकरीचे हातमोजे घालून मी माझे ' एक्सपेरीमेंट ' करत असे. आई, आजी आणि बाबा खूप हसत माझ्या त्या अवताराकडे पाहून...

विज्ञानाच्या या आवडीपोटी मी दोन विज्ञान प्रदर्शनांमध्ये भाग घेतला होता. दोन्ही मध्ये मला बक्षिसे मिळाली होती. पहिल्या मध्ये चार प्रशस्तीपत्रके तर दुसऱ्यामध्ये मला यंग सायंटिस्टचं शालेय स्तरावरचं बक्षीसही मिळालं होतं. अशी खूप सारी बक्षिसं माझ्याकडे जमा आहेत. पण खरं सांगू, या बक्षिसं आणि प्रशस्तिपत्रकांचं कौतुक आणि अप्रूप मला कधीच नव्हतं. काही क्षणांचे ते प्रदान सोहळे मला कधीच आवडले नाहीत. त्यापेक्षा मला पुस्तकांमध्ये, छोट्याश्या का होईना पण विज्ञानातल्या प्रयोगांमध्ये, किंवा एखाद्या क्लिष्ट गणितामध्ये तासनतास रमून जाणे जास्त आवडे.

मग रात्रीच्या वेळी आकाशात पसरलेल्या तारकांचे निरीक्षण असो किंवा नेहमीपेक्षा वेगळा किडा दिसला की त्याला पकडण्यासाठी वेड्यासारखे त्याच्या पाठी धावणे असो, सायन्स एन्जॉय करणं ही संकल्पना मी माझ्या बालपणात पुन:पुन्हा अनुभवली आहे आणि याचं श्रेय जितकं माझ्या आई-बाबांना जातं तितकंच ते करमरकर आजोबांच्या दुकानाला आणि त्यांना स्वत:ला सुद्धा जातं.

पण मग जसजसा मी मोठा होत गेलो तशा या सर्व गोष्टी मला छोट्या वाटू लागल्या. मला काहीतरी मोठं करण्याची स्वप्न पडू लागली. आनंदाची जागा कुठे तरी निरर्थक अभिमानाने घेतली. आणि पु. लं.च्याच शब्दात सांगायचं तर कौतुकाचा ' वा ' चुकीच्या ठिकाणी पडला आणि या नराचा 'वा'नर झाला. या सगळ्या गोष्टी आठवतांना मनामध्ये संमिश्र भाव दाटून येतात. समाधान आहे, हुरहूर आहे.

जमवलेलं सगळं साहित्य इतस्तत: विखुरलं. काचेची छोटी छोटी उपकरणं फुटून गेली. अनेक टाकून दिली. घरं बदलताना पुस्तकं हरवली. करमरकर आजोबा गेल्याचाही मध्ये माझ्या कानावर आलं. एकूणच माझ्या बालपणाशी सांधला गेलेला एक दुवा मी कायमचा गमावून बसलो. कधी कधी वाटतं की किमान ते होकायंत्र तरी असायला हवं होतं जवळ. निदान आयुष्य कुठल्या दिशेने जातंय ते तरी समजलं असतं.

खरं सांगू, आजही मी कधी कधी आरशासमोर स्वत:लाच निरखत उभा राहतो तेंव्हा मला तो रेनकोट घालून प्रयोग म्हणून रसायनं मांडून काहीतरी उपद्व्याप करून ठेवणारा छोटा मी मला दिसतो माझ्या डोळ्यात. घट्ट मिठी मारावीशी वाटते त्याला. पण भानावर येताच मात्र फक्त निराशाच उरते. कोणत्या गोष्टींच्या मोहापायी आपण किती आणि काय गमावून बसलो आहोत याची जाणीव सर्रकन अंगावर काटा आणते आणि उरते ती केविलवाणी हाताशा आणि स्वत:वरचा वांझोटा संताप. मग मला करमरकरांचे शब्द आठवतात. ते मला नेहमी म्हणत, ' काय हो भावी सायंटिस्ट, या परत आमच्या दुकानात. ' आणि हे शब्द आठवले की मन थोडं शांत होतं.

ते दुकान आता सुरु आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. आणि जरी असलं तरी तिथे जाण्याचे धाडस माझ्यात नाही कारण त्यांच्याशिवाय त्या दुकानाची कल्पनाही मी करू शकत नाही. इतरांसोबत जे आजोबा करत असत तो त्यांचा व्यवहार होता पण माझ्यासोबत मात्र त्यांनी एक छान नातं निर्माण केलं होतं. माझ्यामध्ये असणारं सायंटिस्ट होण्याचं स्वप्न अलगद विस्तारलं होतं. विज्ञानाचं वेड प्रत्येक भेटीत दुप्पट केलं होतं. सुट्टी संपवून पुन्हा आपल्या घरी निघालेल्या नातवाला जसं ' बाळा, पुन्हा ये रे लवकर ' म्हणून बोलवावं तसं ते मला दुकानातून जाताना सांगत.

स्टेशन रोड वरचं घर सोडल्यावर मात्र माझं पुन्हा तिथे जाणं झालं नाही. आणि आता आमची भेटही कधी होणार नाही. पण त्यांची आठवण, त्यांचे शब्द आणि मी मोठेपणी एक यशस्वी वैज्ञानिक होईनच हा माझ्यावरचा विश्वास अनेक प्रसंगी मनाला उभारी देऊन जातो.

-सौरभ राघवेंद्र