•mr•

कळलंच नाही !

अजूनही आठवते त्याची इवलीशी मुठ

अजूनही आठवते त्याची इवलीशी मुठ

माझं बोट घट्ट पकडून ठेवायची.

 

मी कडेवर घ्यायचो तेंव्हा

माझ्या खांद्यावर कलणारी त्याची मान

आणि त्याचा पहिला बोबडा बोल !

 

तो मिशी ठेवतो आता.

 

सैलसर निसटत होता वाळू सारखा,

काळ पकडून ठेवायला हवा होता मी घट्ट.

 

एक सहल कदाचित जास्त करता आली असती

त्याला बिलगून एक रात्र जागवता आली असती.

 

बागेत क्रिकेट खेळताना चार चेंडू जास्त टाकले असते.

त्याच्या विश्वासावर

आज एका लक्ष्मीनं आमच्या घराचं माप ओलांडलं

अन् पहिल्या आवर्तनाची सम दाटून आली डोळ्यांत.

 

यथावकाश

त्याचही बोट पकडेल एक इवलीशी मुठ

त्याच्याही खांद्यावर विश्वासानं विसावेल

एक निरागस विश्व.

 

त्याला सांगायला हवं,

"बाबारे, तो काळ मोठा कलंदर,

पकडून ठेव त्याला.

 

पाहता पाहता निसटून जाईल

आणि दाटून येईल अचानक

अशाच एखाद्या समेवर."

खरंच सांगू का त्याला?

की नको?

 

मोठा झालाय तो,

कळेल त्याचं त्यालाच.

 

पण,

पण हा मोठा कधी झाला?

कळलंच नाही !

 

-सौरभ राघवेंद्र