कैफियत
अंड्यापासून ब्रह्मांडांपर्यंत सगळं काही कवितेत सामावून घेण्याइतकी मोठी मनं असणारे कवी वैयक्तिक हेवेदावे चव्हाट्यावर आणतात तेंव्हा जे न देखे रवी ते सर्व काही पाहणारा यांच्यातला कवी वाक्यागणिक प्रकट…
अंड्यापासून ब्रह्मांडांपर्यंत सगळं काही कवितेत सामावून घेण्याइतकी मोठी मनं असणारे कवी वैयक्तिक हेवेदावे चव्हाट्यावर आणतात तेंव्हा जे न देखे रवी ते सर्व काही पाहणारा यांच्यातला कवी वाक्यागणिक प्रकट होणारा आपल्याच मनाचा संकुचितपणा पाहू शकत नाहीत का असा प्रश्न पडतो मला. साहित्यक्षेत्र, साहित्यिक आणि सहसंबंधाने येणारे हेवेदावे आपल्याला नवे नक्कीच नाहीत; पण 'नाभिषेको ना संस्कारा: सिंहस्य क्रियते वने' या उक्तीप्रमाणं निरीक्षण आणि अभिव्यक्तीच्या सिद्धहस्त कौशल्यानं समाजभान जपण्याची जबाबदारी आपसूकच ज्यांच्या हातात (शब्दश:) येऊन पडते, त्यांचंच बेभान वागणं पाहिलं की एक सामान्य रसिक म्हणून माझा हिरमोड होतो आणि मग मला ना यांच्या कविता वाचाव्या वाटतात ना काव्यरसिक वगैरे म्हणून यांच्याशी कोणता संवाद साधण्याची इच्छा उरते.
कवितांचा आणि माझा संबंध मी शाळेत होतो तेंव्हापासूनचा असला तरी कवितेच्या 'प्रांताचा' आणि माझा संबंध मात्र अगदीच अलिकडचा, तोही योगायोगानं आलेला. या थोड्याफार काळात मला समजलेल्या 'आतल्या' गोष्टींच्या, त्यांचे सार्वजनिक विस्फोट मग त्यातून उद्भवलेल्या (आणि बहुधा त्या उद्भवांच्या मूळाशी असलेल्या) गटा-तटांच्या डायनामिक्सच्या संज्ञानानंतर (दर्जेदार) कविता लिहिणारे कवी- सर्वसामान्य लोकांपेक्षा एक व्यक्ती, एक माणूस म्हणूनही वेगळे असतात ह्या माझ्या गोड गैरसमजाच व्यवस्थित निराकरण झालंच शिवाय या मंडळींमधून जर उद्याचे कुसुमाग्रज, उद्याचे सुरेश भट, उद्याचे विंदा, उद्याच्या शांता शेळके निपजणार असतील तर त्या आणि त्यांच्या सारख्या ज्या इतर आदरणीय कवींच्या कविता वाचत आम्ही लहानाचे मोठे झाले ते कवीही त्यांना यथोचित प्रसिद्धी मिळाली त्या पूर्वीच्या काळात असेच अतिसामान्य होते का अशी शंका आता माझ्या मनात निर्माण झाली आहे.
ही शंका केवळ कविता आणि साहित्य-क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे असं नाही. गट-तट, कंपूशाही, हेवेदावे, आग्रही मत-मांडणी या गोष्टी सगळीकडेच असतात, त्यात नवीन किंवा गैर काहीच नाही, पण एक कलाकार जेंव्हा 'मी माझ्या कलेशी प्रामाणिक आहे' आशा वल्गना करतो, पण आतून मात्र सृजनाच्या आनंदापेक्षा आपल्या भोवती जमवलेल्या चार लोकांच्या प्रतिसादातुन मिळणारी नशा महत्वाची मानतो तेंव्हा सर्वसामान्य रसिकांना त्या कलाकाराचा दुटप्पीपणा कमालीचा खटकतो, त्यांच्या अहंकाराचा उग्र दर्प आणि त्यांचा अभिव्यक्तीत येणारा साचलेपणाही जाणवू लागतो, मग तेच ते काय वाचायचं, पहायचं असं म्हणून हे रसिक त्यांच्याकडे फारसे फिरकेनासे होतात. आपली प्रशंसा करणारा गट टिकून रहावा या इच्छेतून होणारी घालमेल आणि मग त्यातून सुरू होणाऱ्या चाळ्यांची पहिली शक्यता इथेच निर्माण होत असावी असं मला वाटतं.
इतरांवर टीका करून मिळणार आनंद, इतरांनी कौतुक केल्यावर चढणार कैफ, इतरांनी टीका केल्यावर दुखावलेलं मन अशा अनेक गोष्टींमधून प्रतिबिंबित होणाऱ्या परावलंबी आत्मभानामुळं आपलं भलं होणार नाही, झालंच काही तर वाईटच होणार आहे याची उपरती कलावंतांना का होत नसावी असाही एक प्रश्न मला पडतो आणि त्याचं उत्तर शोधावं म्हटलं तर, 'आपण कलावंत आहोत म्हणून वेगळे कोणी आहोत, कला आणि अभिव्यक्तीच्या पलीकडे या जगात काहीच नाही, असेलच जर तर ते आपल्यालाच सापडू शकतं आणि आपणच ते मांडू शकतो हा वृथा समज या झापडाआड दडला असावा कदाचित' असं वाटतं. समाजाकडे तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या, त्यांची दुःखं वगैरे टिपणाऱ्या या कलावंतांना स्वतःचं स्वतःभोवती जमवलेल्या वर्तुळात वावरणं, स्वतःमध्ये हरवणं आणि हे संपलं तर काय? अशी भिती वाटून वेगळेवेगळे चाळे सुरू होईपर्यंत या गर्तेत खोलवर गुंतून जाणं दिसतच नसावं बहुधा.
मग स्वतःला असं अवाजवी महत्व देणारा स्वभाव निर्दोष कलानिर्मितीचा अधिष्ठाता होऊ शकतो का? होऊ शकत असेल तर स्वाभाविकत: ती कलाकृती सदोष नसेल का आणि तसं असेल तर वास्तव आणि "मला" दिसलेलं वास्तव यांच्या अर्धवट मिश्रणापेक्षा तसूभरही अधिक महत्व त्या निर्मितीला कलावंतांनं स्वतः तरी द्यावं का? का द्यावं? ती निर्मिती मी किंवा अमुक एका नावाच्या कलावंताची कलाकृती आहे म्हणून!? किती कलावंत स्वतःच्या पलीकडे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात? स्वत:च्या पलीकडे जाण्यासाठी मुळात 'स्व म्हणजे काय?' असा प्रश्न किती जणांना पडलेला असतो? ज्यांना तो पडतो त्यांच्यापैकी किती जणं हाताशी येईल त्या पुस्तकात मिळणाऱ्या उत्तरांना शरण न जाता 'मुक्त'पणे हा शोध घ्यायला धजतात? एखाद्याने असा शोध घेतलाच तर स्वतःला नग्नावस्थेत पाहताना जे दिसलं ते साहित्यात मांडायचं धाडस किती जणांकडे आहे? माहिती असलेलं, दोन भाषा आणि चार पुस्तकं वाचून गोळा केलेलं ज्ञान, जमवलेली माहिती चौकटीत बसवून किंवा चौकट मोडून मांडायला केवळ सराव लागतो; पण नाविन्य आणि चैतन्य शोधलं तरच सापडतं हे सत्य नाही का?
या घडीला अभूतपूर्व संकटाचा सामना करणारी सकल मानवजात एका अत्यंत विचित्र अवस्थेतून जात आहे जिचा दूरगामी परिणाम इत:पर निर्माण होणाऱ्या सगळ्याच साहित्यिक आणि गैरसाहित्यिक अभिव्यक्तींमध्ये उमटू शकतो. म्हणूनच या स्थित्यंतराचं यथाशक्ती आणि यथास्थिती चित्रण करणाऱ्या प्रमाणिक साहित्यिकांची, कलावंताची समाजाला मोठी गरज आहे आणि या परिस्थितीमध्ये आणि या परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या साहित्याचं नितळ असणं हा भविष्यातल्या समाजाचा अधिकार आहे; पण तरीही डाव्या-उजव्या गढूळ विचारसणांच्या आहारी गेलेल्या, एक नाही तर दुसरी बाजू घेऊन भांडणाऱ्या, चुटकीसरशी प्रसिद्ध होणाऱ्या अभिव्यक्तीची चटक लागलेल्या आजच्या बहुतांश लेखक-कवी आणि एकूणच कलावंतांकडे पाहिलं की सामान्य रसिक म्हणून माझं मन विषण्ण होतं आणि आजपासून चाळीस पन्नास वर्षांनी मागं वळून पाहताना पाहणाऱ्याला दिसणाऱ्या कलाकृतींमध्ये आपापले अभिनिवेश जपण्याच्या अट्टाहासापलिकडे क्वचितच काही दिसेल अशी भिती वाटते.
कलावंत समजापेक्षा वेगळा असतो या मताचा मी नाही मात्र स्वतःला समाजापेक्षा वेगळं ठेऊन समाजाकडे तटस्थपणे पाहण्याची कला (काही) कलावंताकडे असते असं मला वाटत; पण हे स्वत: बाजूला जाऊन ज्या समाजाकडे तटस्थपणे पाहायचं त्याच समाजात गट पाडून दुही माजवणाऱ्या एखाद्या विचारसारणीला, मतप्रवाहाल आपलंसं करून तटस्थता फाट्यावर मारून आपली बाजू सावरून धरणारी कलाकृती जन्माला घालणं हीच कलेची साधना समजणारे कलावंत निर्मितीच्या संदर्भाने कितीही उत्तम असले तरी शेवटी रसिकद्रोहीच म्हणायला हवेत आणि त्याहीपेक्षा ते अज्ञ म्हणायला हवेत कारण वास्तव नावाच्या स्थलकालमर्यादेत जगणाऱ्या लोकांना त्यांच्याच आयुष्याचं विपर्यस्त चित्रण ओळखता येत नाही या भ्रमात हे कलावंत जगतात आणि त्यांच्या अस्वस्थ (स्वतः मध्ये स्थिर नसलेल्या आणि म्हणून इतरांमध्ये स्थैर्य शोधू पाहणाऱ्या) 'स्व'भावाने जमवलेल्या चांडाळचौकडीने त्यांचा आणि त्यांच्या अभिव्यक्तीचा केलेला उदो उदोच या भ्रमाला कारणीभूत ठरतो.
माझ्या लेखनाला विशेष गांभीर्याने घेणारे फार कमी लोक असल्यामुळे मी कोणाच्या अस्थापनेला धक्का वगैरे लावू शकेन अशी शक्यता नक्कीच नाही उलट यातून काही झालंच तर हे काय बाष्कळ अशा अर्थाच्या विनोद-निर्मितीचाच संभव या लेखनात अधिक आहे, पण त्यातूनही जे लोक हे लिखाण गांभीर्याने घेतात त्यांच्यातही स्वतःची कलावंत म्हणून ओळख करून देणारी काही मंडळी असतील आणि त्यांच्या मनात लेखाबद्दल किंवा लेखामुळे माझ्याबद्दल तिरस्कार उत्पन्न झाला, किंवा हे लेखन हसण्यावारी न्यावं असं त्यांना वाटलं तर कोणाशीच आणि कुठलेच लागेबांधे नसणाऱ्या एका सर्वसामान्य रसिकाची कैफियत हलक्यात घेणं किती दुर्दैवी असतं हे समजून घेण्यासाठी त्या मंडळींना पुढच्या पिढ्यांनी लिहिलेल्या समीक्षाग्रंथांची वाट पहावी लागेल आणि त्या ग्रंथातून झालेल्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी ना ही मंडळी असतील ना त्यांनी गोळा केलेली मंडळी.
-सौरभ राघवेंद्र.