•mr•

कदाचित

मी कविता विसरलोय असं वाटत असेल तुला कदाचित.

मी कविता विसरलोय असं वाटत असेल तुला कदाचित.

खिडक्या बंद केलेल्या, पडदे ओढून घेतलेले.

वाड्याचं जुनाट दारही बंद आतून.

पण पैंजणांचा नाद मात्र ऐकू येतो तरीही,

माझ्या दाराशी येऊन तू माघारी फिरतेस तेंव्हा.

पण पडदा हळूच बाजूला सरकवून मी पहायच्या आधीच

तू निघून गेलेली असतेस तिथून.

किनाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या अरुंद रस्त्याच्या

निमुळत्या वळणावर एक सावली दिसते मला.

चंचल असते ती सुद्धा तुझ्यासारखीच.

स्थिरावले तर शपथ !

दार उघडून एक पाऊल पुढे यावं,

तर गायब!

तरी आईकडे तक्रार करतच असतो मी नेहमी,

दरवाज्याची कडी हल्ली जरा जास्तच कुरकुरते म्हणून.

मी कविता विसरलोय असं वाटत असेल तुला कदाचित.

खिडक्या बंद केलेल्या, पडदे ओढून घेतलेले.

वाड्याचं जुनाट दारही बंद आतून.

पण पैंजणांचा नाद मात्र ऐकू येतो तरीही

मी.

कविता.

तू.

कदाचित.

-सौरभ राघवेंद्र.