गाईड
‘अथांग’ हे विशेषण फक्त तीन गोष्टींनाच योग्य तऱ्हेनं विभुषित करू शकतं. पाहिलि गोष्ट आहे समुद्र, दुसरी गोष्ट आहे अवकाश आणि तिसरी गोष्ट आहे आपलं मन. या तीन गोष्टींपैकी समुद्र आणि अवकाशाचा थांग लागेलही कदाचित पण आपल्या मनाचा ? तो लागणं मात्र जवळ जवळ अशक्यच आहे. ‘मालगुडी डेज’ साठी प्रसिद्ध असणारे आर. के. नारायण यांनी लिहिलेली ‘गाईड’ ही कादंबरी वाचताना ही शक्याशक्यता पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याशिवाय रहात नाही
‘अथांग’ हे विशेषण फक्त तीन गोष्टींनाच योग्य तऱ्हेनं विभुषित करू शकतं. पाहिलि गोष्ट आहे समुद्र, दुसरी गोष्ट आहे अवकाश आणि तिसरी गोष्ट आहे आपलं मन. या तीन गोष्टींपैकी समुद्र आणि अवकाशाचा थांग लागेलही कदाचित, पण आपल्या मनाचा ? तो लागणं मात्र जवळ जवळ अशक्यच आहे. ‘मालगुडी डेज’ साठी प्रसिद्ध असणारे आर. के. नारायण यांनी लिहिलेली ‘गाईड’ ही कादंबरी वाचताना ही शक्याशक्यता पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याशिवाय रहात नाही.
‘गाईड.’ एक खूप साधं, सरळ आणि सोपं कथानक. एका विवाहितेच्या प्रेमात पडलेल्या प्रेक्षणीय स्थळं दाखवणाऱ्या ‘राजू’ नावाच्या गाईडची ही गोष्ट. मालगुडी नावाच्या खेड्यात लहानाच्या मोठ्या झालेल्या राजूच्या वडिलांचं किराणामालाचं छोटेखानी दुकान असतं. झोपडीवजा घरामध्ये राहणाऱ्या राजूची आई एक सर्वसामान्य गृहिणी असते. आई-वडील आणि मुलगा या त्रिकुटाचं आयुष्य सुरळीत सुरु असतं. वडील दुकानामध्ये बसत, आई घराचा सांभाळ करे आणि राजू काहीश्या नाखुशीनेच शाळेत जात.
एके दिवशी अचानक गावात बातमी येते, की मालगुडी गावामध्ये रूळ येणार आहेत. मालगुडी गावात रूळ ! मालगुडी गावात रेल्वे ! मालगुडी गावाला आता स्वत:चं हक्काचं स्टेशन मिळणार होतं आणि यथावकाश ते मिळालं सुद्धा. स्टेशन झाल्यावर स्टेशनमास्तर सोबत संधान बांधून राजूच्या वडिलांनी रेल्वे स्टेशन मधली मोक्याची जागा मिळवून तिथे आपलं दुकान नव्याने सुरु केलं. दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मालामध्ये विविधता आली. लोकांची वर्दळ वाढू लागली, धंदा तेजीत सुरु झाला.
वडिलांच्या पश्चात राजू दुकानाची देखभाल करू लागला. त्याच्या येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाश्यांशी गप्पा होऊ लागल्या आणि या गप्पामधून त्याला त्याच्या आयुष्याचं नवं ध्येय सापडलं. पाहता पाहता ‘दुकानदार राजू’ ‘गाईड राजू’ मध्ये बदलून गेला. त्याने आपलं दुकान ओळखीच्या एका पोरावर सोपवलं आणि तो येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी गाईड म्हणून काम करू लागला.
लोकांची नस ओळखण्यात राजू वाकबगार होता. कोणता प्रवासी किती खर्च करू शकेल, कोणत्या प्रवाश्याला काय पाहायला आवडेल, कोणता प्रवासी कुठे जास्त रमेल या आणि अशा सगळ्या गोष्टी तो एका नजरेत ताडून घेत. त्यात तो मुळचा मालगुडीचा. त्यामुळे आसपासचा इतिहास आणि भूगोल त्याला तळहातावरच्या रेषांसारखा ठाऊक. लोकांचं मन ओळखणं, सभोवतालच्या परिसराची जाणीव आणि आपला बोलका स्वभाव या तीन गोष्टींच्या बळावर एक गाईड म्हणून तो कमालीचा यशस्वी झाला. इतका की या यशाने राजूची ओळखच बदलून गेली आणी तो राजूचा ‘रेल्वे राजू’ बनला. मालगुडीमधल्या प्रेक्षणीय स्थळांइतकाच ‘रेल्वे राजू’ प्रसिद्ध झाला. त्याची ख्याती दूरदूरपर्यंत पोहोचली. मालगुडी स्टेशनवर उतरणाऱ्या परगावच्या कित्येक प्रवाशांचा पहिला प्रश्न असे- ‘रेल्वे राजू’ कुठे भेटतील ?
सगळी घडी एव्हाना नीट बसली होती. राजूचं दुकान छान सुरु होतं. त्याचा गाईडचा व्यावसाय उत्तम सुरु होता. राजूच्या आईच्या मनात राजूच्या लग्नाचे विचार येऊ लागले होते, आणि त्याप्रमाणे आडून आडून का होईना पण राजूकडे एका मुलीचा विषय काढत होती; पण ही बसलेली घडी नियतीला पाहवली नाही की काय कोण जाणे आणि एके दिवशी मालगुडीच्या स्टेशन वर तिचं आगमन झालं. ती- रोझी. ज्या क्षणी तिचं स्टेशन वर आगमन झालं, त्याच क्षणी तिने राजूच्याही आयुष्यात प्रवेश केला आणि हा प्रवेश राजूच्या आयुष्यात जी काही नाट्यमयता घेऊन आला, ती जाणून घेण्यासाठी ‘गाईड’ वाचायलाच हवं.
‘गाईड’ या कादंबरीची व्याप्ती केवळ पुस्तकापुरतीच मर्यादित नाही. एकोणीसशे पासष्ट साली या कादंबरीवर आधारित ‘गाईड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. देवानंद आणि वहिदा रेहमान यांच्या अभिनयातून जिवंत झालेल्या राजू आणि रोझीच्या व्यक्तिरेखांनी नटलेल्या आणि श्रोत्यांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारऱ्या ‘दिन ढाल जाए’, ‘तेरे मेरे सपने’, ‘गाता राहे मेरा दिल’ या एस. डी. बर्मन यांनी चाल दिलेल्या अत्यंत सुंदर गाण्यांनी सजलेल्या या चित्रपटाकडे एक यशस्वी निर्मिती म्हणून पाहिलं जातं.
इतरांचा प्रवसा गाईड करणाऱ्या राजूच्या स्वत:च्या आयुष्याचा प्रवास हे या कथानकाचं मुख्य सूत्र. रोझीचं आगमन या प्रवासाची दिशा आणि दशा दोन्ही बदलून टाकतं. राजूचं काय होतं, रोझीचं काय होतं, रोझीचा नवरा- मार्को, त्याचं काय होतं आणि जे काही होतं, ते कसं होत जातं हा सगळा प्रवास रेखाटताना आर. के. नारायण यांची लेखणी एका क्षणासाठी कमी पडलेली नाही. राजूचं हे शब्दचरित्र रेखाटण्याचं श्रेय जेवढं आर. के नारायण यांचं आहे, तेवढचं श्रेय ‘रोहन प्रकाशन’ या संस्थेसाठी या कादंबरीचा अनुवाद केलेल्या अनुवादिका ‘उल्का राउत’ यांचंही आहे. या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी इतका सहज जमवून आणला आहे, की हे अनुवादित पुस्तक आहे याची किंचितही जाणीव आपल्याला होत नाही. तेंव्हा ‘रेल्वे राजू’ची कथा मांडणारी हे कादंबरी आपणही जरूर वाचावी अशी नम्र विनंती.
-सौरभ राघवेंद्र.