•mr•

गंध

माहितीये मला, तू येतेस. टेबलावर ठेवलेल्या माझ्या वहीत चोरट्याने डोकावून मी लिहिलेलं वाचतेस.

माहितीये मला,

तू येतेस.

टेबलावर ठेवलेल्या माझ्या वहीत चोरट्याने डोकावून मी लिहिलेलं वाचतेस.

आणि मला न सांगताच निघूनही जातेस.

म्हणून मी लिहितच नाही आताशा.

एरवी एकट्यानं फडफडणारं पान तुझ्या स्पर्शानं गंधाळलं की खोलीभर दरवळ पसरतो तुझ्या अस्तित्वाचा,

आणि त्या मधाळ गंधानं मी पुरता घुसमटून जातो.

मग टेबलासमोरच्या खिडकीची काच सरकवतो मी.

ह्या टोकाची काच त्या टोकाला जावयचा अवकाश,

सोसाट्याची एक संध्याकाळ येऊन आदळते माझ्या तोंडावर.

तोलच जातो माझा आणि टेबलाअल्याडच्या खुर्चीत पडतो मी धा्डदिशी.

स्वयंपाकघरात काहीबाही खुडबुड करता करता आई आतूनच विचारते मला,

‘काय रे! काही पडलं का?’

मी म्हणतो, ‘काही नाही गं, खुर्ची सरकली.’

सावरतो मग मी स्वत:ला.

इकडे तिकडे पाहतो उगाचच.

उघड्या खिडकीतून सांडलेली संध्याकाळ

टेबलावरच्या सुट्या कागदांच्या, रिफिली संपलेल्या पेनांच्या पसाऱ्याला

पुरती भिजवून गेलेली असते.

वर्षानुवर्ष बंद घरातल्या कुबट भिंतीवर चढावी

तशी कसली तरी विचित्र ओल चिकटलेला तो पसारा-

सकाळच्या उन्हाचा शिडकाव झाल्यावरच आवरू असं म्हणून मी

दुसऱ्या खोलीकडे रवाना होतो.

खोलीत शिरल्या शिरल्या मग आधी दोन्ही खिडक्या उघडतो,

खोलीचं दार लावून घेतो आणि आतूनच ओरडतो,

“आई, थोडावेळ प्राणायाम करतोय गं मी.”

पण कसचं काय!

रेचक आणि पुरकांच्या अगणित आवर्तनांनंतर सुद्धा

तो गंध छळतच राहतो मला.

चिडचिड होते मग माझी.

मी लिव्हिंग रूममध्ये येऊन बसतो.

देवघराच्या खोलीत संध्याकाळ किणकिणत असते.

“घरची पिडा बाहेर जाउदे” असं म्हणत मी

घराचा दरवाजा उघडून व्हरांड्यात येऊन उभा राहतो.

इथे उभं राहिलं की आमच्या बिल्डींगमधल्या सगळ्याच घरांच्या खिडक्या दिसतात मला.

त्यात खालच्या मजल्यावरच्या गोखल्यांच्या खिडकीत डोकावायला आवडतं मला.

विशेष असं काही नाही पण; त्या खिडकीच्या पलिकडे गोखल्यांची अनु दिसते कधी कधी.

तशी आपल्याच नादात असते ती,

पण कधी नजरानजर झालीच तर एकमेकांकडे पाहून हसतो आम्ही.

का कोणास ठाऊक, पण इथे आमची ही अशी नेत्रपल्लवी झाली

की अचानकच घराच्या त्या टोकाला बाल्कनीमध्ये ठेवलेल्या

आमच्या एका कुंडीत लहानाच्या मोठ्या झालेल्या

गुलाबाचा वास शिरतो माझ्या नाकात.

आणि तुझी आणि तुझ्या अस्तित्वाची दरवळ वगैरे वगैरे

साफ विसरूनच जातो मी.

टेबलापाशी येतो मग.

टेबल झाकणाऱ्या कापडभर सांडलेली संध्याकाळ आपसूकच वाळून गेलेली असते एव्हाना.

आणि टेबलाच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या फुटक्या आरशाच्या एका तुकड्यामध्ये चमकत असते चंद्राची लख्ख कोर.

एक दीर्घ आणि मोकळा श्वास घेतो मग मी,

आणि टेबलाअल्याडच्या खुर्चीत बसतो निवांत.

फुटक्या आरशाचा तुकडा हातात घेतो आणि पाहतो त्याच्याकडे निरखून.

माझा चेहरा दिसतो मला त्यात.

सस्मित.

तेवढ्यात आई येते पाठीमागून,

हातात एक पणती असते तिच्या, बाल्कनीमधल्या तुळशी समोर ठेवण्यासाठी आणि

तोंडातल्या तोंडात सुरु असतं कुठल्या तरी स्तोत्राचं पठण.

ते पठण संपलं की लागलीच आई ओरडते मला,

"कसली रे विचित्र सवय तुला दारं-खिडक्या सताड उघडून ठेवून बसायची ! डास येतात घरात. कळत नाही का?"

मी निमूट बंद करतो मग सगळ्याच खिडक्या आणि दारं.

-सौरभ राघवेंद्र.