तिच्या डायरीतलं (२)
त्याच्या प्रश्नात माझे प्रश्न, त्याच्या उत्तरात माझी उत्तरं, त्याच्या असण्यात माझं असणं आणि त्याच्या नासण्यात माझे शब्द! सारं काही सापडत गेलं मला. नको होतं खरं तर मला यातलं काहीच, मी मागितलंही नव्ह…
त्याच्या प्रश्नात माझे प्रश्न, त्याच्या उत्तरात माझी उत्तरं, त्याच्या असण्यात माझं असणं आणि त्याच्या नासण्यात माझे शब्द! सारं काही सापडत गेलं मला. नको होतं खरं तर मला यातलं काहीच, मी मागितलंही नव्हतं; पण तरीही दिलं त्याने. तो नाहीये आता, पण त्याने दिलेलं हे सगळं आहे तसंच आहे. शब्दांना कवितेचा साज चढतो, माझं असणं आठवत राहतं, त्या आठवणींमुळं अनिच्छेनंच व्याकुळ होऊन जगताना उत्तरं आधार देऊन जातात आणि शिल्लक राहिलेले प्रश्न मात्र डासांसारखे घोंगावत राहतात अवतीभोवती.
कोण होता तो? त्याचाच प्रश्न हा खरं तर, पण काही कळेपर्यंत माझा केंव्हा झाला मला कळलंही नाही. सुखापाठोपाठ दुःख यायचंच. दुःखाला विलग करून सुखाचा स्विकार कसा करावा? त्याचंही तसंच. त्याच्यातून प्रश्न वजा केले तर त्याच्या प्रश्नांबरोबर तोही वजा होतो. येताना तो प्रश्न घेऊनच आला होता. पहिल्या भेटीतच विचारलं त्याने, 'बसू का इथे? चालेल का तुम्हाला?'
'तुम्हाला?' त्याचं ते तुम्हाला म्हणणं थेट डोक्यात गेलं होतं माझ्या आणि आजुबाजूला पाहिलं तर अख्खी बाग रिकामी. माझ्याच बाकावर काय बसायचं याला? समहाऊ कळली त्याला माझी चलबिचल. तो म्हणाला, 'नाही, रोज मी इथेच बसतो. आजही इथेच बसायचं आहे मला. तुला इथे बसायचं असेल अजून तर हरकत नाही काहीच. मी नंतर येतो.'
'तुला' त्याने ते अंमळ जोर देऊन म्हटलं होतं का? की मलाच तसं वाटलं? पण तेंव्हापासून त्याला माझ्या मनातलं बरंचस कळत याची मला जाणीव झाली. मी बैस असं म्हणायच्या आधीच तो बसलेला होता. 'मला समोरचं झाड आवडतं.' एवढंच म्हणाला तो आणि त्याच्या विचारात गढून गेला.
एवढा कसला विचार करायचा ते तोच कोण जाणे! त्याच्या भिरभिरत्या डोळ्यात हरवून जायचे मी. पाहायचा माझ्याकडे तेंव्हा वाटायचं शोधायचंय याला काही तरी माझ्यात. पोटात गोळा यायचा. याला हवंय ते माझ्याकडे नसलं तर? काय करावं ते कळायचंच नाही मला. मिठी मारून मोकळी व्हायचे मग, प्रेम वगैरे म्हणत. कधी कधी एखादी सरही कोसळून जायची आमच्यामधून. ओहोळातुन ओघळणारं मळभ दिसलं की मिठी पुन्हा घट्ट व्हायची आपसूक; पण तो मात्र एव्हाना कोरडा झालेला. माझ्याकडे देण्यासारखं होतं ते सगळंच दिलं मी त्याला. तोच असमाधानी होता का मग? वरवर तरी नव्हता, नक्कीच नव्हता. पण खोलवर? हे खोलातले क्षण भिववून टाकतात मला.
शनिवारी संध्याकाळी आम्ही आईस्क्रीम खायला जायचो. एक झालं, दोन झाली, तीन झाली! 'अरे किती खाशील!' मग तो कोन उंचावून त्याची पेटंट नौटंकी दाखवून म्हणायचा, 'कन्ये,असमाधान हीच पुरुषाची आदिम प्रेरणा.' डिड ही मिन इट? वरवर तो वाटायचा विनोद, पण खोलवर? धस्स होतं छातीत. श्वास उथळ होतो. त्याने पहिल्यांदा हात हात घेतला तेंव्हाही असंच झालं होतं. आपल्याच धुंदीत वळवळणाऱ्या सापाला गरुडाची चाहूल लागावी आणि काय होतंय ते कळायच्या आतच.. झडप आणि तो साप त्या गरुडाचा मग त्यानं आता त्याच काही करावं. पण तो गरुड होता? आणि मी साप? शी! कसल्या विचित्र उपमा सुचतायत मला! पण खरंच, मी होते त्याची? मला व्हायचं तरी होतं.
मी म्हटलं होतं एकदा त्याला, 'तू माझा आहेस बरं का, कुणा-कुणाचा नाहीस तू, कुणाचाच.' मला वाटलं तो ही म्हणेल, 'हो! आणि तूही फक्त माझीच.' पण तो काय बरं म्हणाला होता! हां! तो म्हणाला होता, 'हो मी फक्त तुझाच.' यातलं वरवरचं काय होतं आणि खोलवर.. खोलवर काय होतं? कोण होता तो? त्याचाच प्रश्न हा खरं तर, पण कळेपर्यंत माझा केंव्हा झाला मला कळलंही नाही.
-सौरभ राघवेंद्र