•mr•

फास्टर फेणे

<!--[if gte mso 9]>

फुरसुंगीचा तो लुकडा मुलगा....

मी वाचला तेंव्हा लहान होता. माझ्या एवढाच कदाचित. त्याच्या करामतींनी भरलेल्या व भारलेल्या वीस पुस्तकांसामावेत मी मोठा झालो. माझ्या मधल्या करामती, उत्साही, दंगेखोर पण तेवढ्याच प्रेमळ मुलाला मी बन्या मध्ये पाहत आलो. आज ती पुस्तके ठेवून जवळ जवळ चार-पाच वर्षं उलटली, पण जेंव्हा केंव्हा मझं मन मला बन्या, त्याचा गाव, सुभाष, माली, सुर्वे सर अशा सर्वांच्या आठवणींमध्ये घेऊन जातं, त्या साऱ्या कथा माझ्या डोळ्यांसमोर जश्याच्या तश्या उभ्या राहतात...

माझं आणि बन्या अँड कंपनीच सख्य जमलं ते बाबांनी आणून दिलेल्या 'फुरसुंगीचा फास्टर फेणे' या पहिल्या पुस्तकापासून. त्यानंतर उत्साहानं आणलेले उर्वरीत भाग आणि त्याच्या पेक्षा कितीतरी जास्त उत्साहानं केलेलं त्यांचं वाचन- बालपणाचं सार्थक झाल्याचा आनंद देऊन जातं. फास्टर फेणेचे कित्येक भाग तर मी अक्षरश: १० ते १५ वेळा वाचले आहेत ! आजही जेंव्हा जेंव्हा मी बन्याचे कारनामे, त्याच्या यशोगाथा, वाचायला घेतो, तेंव्हा नवीन पुस्तकाच्या आनंद देणाऱ्या गंधासारखा, एक वेगळाच असा बालपणाचा नॉस्टॅल्जिक गंध घेऊन साऱ्या आठवणी पुन्हा जाग्या होतात....

गुलमर्ग मधल्या बंगल्यातल्या अंधाऱ्या तळघरात अडकलेला तो अन्वर आणि तरुण तडफदार डिटेक्टिव मन्सूर चाचा, माझेही खूप चांगले मित्र बनले. मी बन्यासोबत प्रतापगडावर जाऊन आलो. बन्या आणि माली जेंव्हा विमानचोरांच्या तावडीमध्ये होते, तेंव्हा सदैव त्यांच्या बरोबर होतो. चिंकूचा मला कधी कधी राग यायचा, गम्मत वाटायची.इंद्रु इनामदार जर समोर भेटला तर त्याला थोबाडीत मारण्याचा मनसुबा होत माझा !

आता काही वर्षांनी, या गोष्टीकडे वळून पाहताना, मला माझीच गम्मत वाटते. बालपणी मला एक असा सवंगडी भेटला की जो मला त्याच्या बरोबर सगळीकडे घेऊन जात असे, त्याच्या छान छान गोष्टी सांगत असे कधी राष्ट्रभक्ती सारख्या मोठ्या गोष्टींची, त्यासाठी केलेल्या त्यागाची सोप्या शब्दात ओळख करून देत असे तर कधी अतूट मैत्री, नाती आणि प्रेमाची हळूच जाणीवही करून देत असे.

जायफळ घालून चिनी हेरला झोपवणाऱ्या बन्याचे पाय मला आज पकडावेसे वाटतात, त्याला कडकडून मिठी मारून मनापासून धन्यवाद द्यावे वाट ते यासठी की जर तो माझ्या आयुष्यात आला नसता तर गोष्टींचा आणि आठवणींचा एक मोठा खजिनाच मी गमावला असता...

बन्याचा मला नेहमी हेवा वाटे. वाटे की, ' अरे, सगळ्या गमती याच्याच वाट्याला कशी येतात ? पळपुटे चीनी साले यालाच कसे सापडतात ? हा एवढ्या फास्ट सायकल चालवू शकतोच कशी ? एवढी संकटं येऊनही हा बापडा, तेवढाच हुशार, तेवढाच आनंदी आणि तेवढाच चुणचुणीत राहतो कसा??? ' आणि, ' अरे वीस भाग झाले पण हा अजून लहानच कसा ? ' या प्रश्नासरशी मग भीतीने त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी येई आणि वाटे की, मी तर आता मोठा होतोय पण हा असा लहानच राहिला तर आमची मैत्री टिकणार कशी ?

अम्ही दुरावू ही माझी भीती अखेर खरी ठरली. जसजसा मी मोठा होत गेलो, तसं तशी नवं-नवी पात्रं माझ्या आयुष्यात आली आणि कधी नव्हे तो फास्टर फेणे थोडा मंदावला.

फास्टर फेणे आणि माझा एकत्र प्रवास नाही म्हटलं पाच ते सहा वर्षांचा होता. या प्रवासामध्ये काही काळासाठी का होईना, पण बन्याची सगळी अॅडव्हेंचर्स माझी होत, मी- विद्याभावानाचा, सुर्वे मास्तरांचा विद्यार्थी बनत असे .पुण्यातल्या रस्त्यांवरून हर्क्युलीस हाणीत असे, साने गुरुजींचे पत्र डोळ्यात पाणी येईपर्यंत पुन्हा पुन्हा वाचीत असे, नेफा आघाडीवर चिन्यांचा धुव्वा उडवीत असे, कमालीच्या ईर्ष्येने क्रिकेट खेळत असे आणि, आणि तो एक एक क्षण माझा म्हणून माझ्या आठवणींमध्ये साठवून ठेवत असे

बन्याचं पुस्तक शेवटचं खाली ठेवून काही वर्षं उलटून गेली असतील आता. आम्ही आता एकत्र चालत नाही. एका ताटामध्ये जेवत नाही. एकमेकांच्या घरी जात-येत नाही. माझी भीती शेवटी खरी ठरली. मी मोठा झालो. आमची मैत्री तुटली आणि तीही दुर्दैवानी माझ्या बाजूने; पण आजही जेंव्हा जेंव्हा मी त्याला साद देतो, तेंव्हा तो त्याच्या फुल फास्टर स्पीड ने माझ्याकडे येतोच आणि यावेळी तो मोठा होत नाही, तर मीच लहान होऊन जातो. त्याच्याच वयाचा.

सौरभ राघवेंद्र.