•mr•

एक गोष्ट (भाग ३)

व्ही !

व्ही !

मी तिला व्ही म्हणायचो. वीणा या नावाच्या स्पेलिंग मधलं पाहिलं-वाहिलं अक्षर.

व्ही !

या ‘व्ही’ मागची गोष्ट काहीशी मजेशीरच आणि अगदीच बालिश !!

तेंव्हा आमची ओळख अजून तशी नवीच होती. वळिवाचा पाउस पडून गेल्यानंतर दरवळणारं चैतन्य जसं असतं तसं चैतन्य होतं आमच्या मैत्रीमध्ये. आम्ही अजून एकमेकांना तथाकथित निक-नेम्स वगैरे काही योजली नव्हती. ती मला दिनेश म्हणे, आणि मी तिला वीणा.

तर, तेंव्हाची ही गोष्ट.

झालं असं होतं की वीणा एकदा आमच्या घरी आली होती. माझ्या खोलीमध्ये आम्ही गप्पा मारत बसलो होतो. गप्पा नव्हत्या अक्च्युअली त्या, मी बासरी वाजवत होतो, आणि ती ऐकत होती. खास तेवढ्याचसाठी आली होती ती, बासरी ऐकायला.

मी मालकंस वाजवत होतो.आम्हा दोघांचीच मेहफिल छान रंगली होती, तेवढ्यात आईने मला बोलावले, “अरे दिनू ! इकडे ये जरा. वरचा डबा तेवढा काढून दे. हात दुखतोय रे माझा, मीच काढला असता नाही तर.”

ती विनंतीवजा सुचना ऐकून बासरी वाजवण्यात गुंग झालेला आज्ञाधारक दिनू उठला. आईकडे गेला आणि तिला वरती ठेवलेला डबा काढून देऊन आला.

सोपवलेली कामगिरी निर्णायकपणे बजावून मी खोलीत आल्यावर पाहिलं तर वीणाच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य ! बघून मला म्हणते, “दि नू ! ए दि नू !”

तिचं ते खोडकर हास्य आणि हे अशी हाक ऐकून आधी मी गोंधळलोच जरा. वैतागल्याचे भाव चेहऱ्यावर आणले आणि रुक्ष आवाजात विचारलं, “काय ? काय होतंय तुला ?”

ती म्हणे, “ काही नाही. मी पण आजपासून तुला दिनू म्हणणार. आवडलं मला. दि नू”

“पण तू मला दिनू म्हणायला माझी परवानगी नाहीये” मी म्हटलं.

“परवानगी मागतेय कुठे मी ?” तिने हसत हसत उत्तर दिलं.

मी म्हटलं, “पण का ? दिनेशमध्ये काय वाईट आहे ?”

“छे छे !" ती म्हणाली, "दिनेश मध्ये काही वाईट आहे असं कुठे म्हणतेय मी ? पण, दिनू आवडलं बरं मला. काय ? कळलं का रे दिनू ? ए दिनू ?”

“हो. कळलं.” मी उडवून लावलं.

आणि मग पुन्हा म्हटलं, ”थांब, तुझं पण काही तरी नाव शोधून काढतो मी.”

“काढ की !” मी कुठे नाही म्हणतेय ?” चेहऱ्यावरचं खोडकर हास्य आणखीन रुंदावत केसाची बट मागे घेत ती म्हणाली.

“सुचलं की सांग हं आणि !” अशा अविर्भावात ती म्हणाली जणू मला काही सुचणारच नव्हतं.

आणि खरंचं, मला सुचतच नव्हतं.

मी आधी माऊ आणि चिऊ आणि काऊ आणि मनू अशा नावांचा विचार केला होता.

“बट दॅट इज लिट्ल टू चिझी !” माझ्या अंतर्मनाने कौल दिला.

माझा शोध सुरूच होता. ती घरी येऊन आता दोन दिवस होऊन गेले होते, आता तिसरा दिवस उजाडला होता, पण नव्या नावाचा काही पत्ताच नव्हता. तिच्यासाठी नवं नाव ठरवणं हा एव्हाना माझ्यासाठी इगो-इश्यू वगैरे होऊन बसला होता. कारण मागचे दोन दिवस तिने कधी मेसेज पाठवला, किंवा फोन केला की तिचं पाहिलं वाक्य असे, “दि नू ! काही सुचलं का ?”

मी लटक्या त्राग्याने म्हणे, “थांब गं जरा ! सुचेल मला. सुचेल.”

“सुचलं की सांग हं.” तिची प्रतिक्रिया आणि मग तिचं ते खोडकर हसणं !

मला ना कधी कधी खरंच कळत नाही, या मुलींना आपल्या मित्राला त्यांची आई ज्या नावाने बोलावते त्या नावाने हाक मारायची काय ती हौस असते ते. तरी नशीब माझ्या आईने मला “अरे पिल्लू” किंवा “अरे राजा” अशी काही हाक मारली नाही ! नाही तर या दिनूचं केंव्हाच पिल्लू झालं असतं !

ती येऊन एव्हाना चौथा दिवसही उलटून गेला होता. पाचव्या दिवशीची दुपारही एव्हाना टळून चालली होती. नुकताच फोन वर तिचा “सुचलं का रे काही ?” असा टोमणाही ऐकून झाला होता. मी खिडकीपाशी बसलो होतो. नारळाच्या झावळ्यांचा वाऱ्याशी खेळ सुरु होता. आणि प्रोग्रेस ? नन ऍट ऑल !

मी खूप थकलो होतो. सकाळी जिम मध्ये जरा जास्तच वर्क आउट केला होता मी. त्यानंतर घरी आल्यावर दिवसभर मी माझ्या थर्मोडायनॅमिक्स मधल्या संशोधन प्रकल्पावर काम केलं होतं. त्यामुळे थकलेल्या शरीराने आणि दिवसभर क्लिष्ट कॅल्क्युलेशन्स करून दमलेल्या माझ्या मेंदूने मला न विचारताच झोपी जायचा निर्णय घेतला आणि माझ्या खुर्चीत बसल्या बसल्या मला झोप येऊ लागली.

मला झोप लागते एवढ्यात एक आवाज कानावर आदळला. “व्हूईई ! व्हूईई! व्हूईई!”

त्या अर्धनिद्रित अवस्थेमध्येसुद्धा मी चटकन ओळखून गेलो, पुष्कर राजे त्यांचं खेळण्यातलं विमान घेऊन आमच्या घरी अवतरले आहेत ! हे पुष्कर राजे म्हणजे आमच्या पुण्यातल्या घरासमोर राहणाऱ्या चैत्राली काकूचे सुपुत्र !

पाच वर्षांचं हे एकच ध्यान असं आहे जे कोणाच्याही घरी कधीही अवतरू शकतं. सर्वसामान्यांना मानवणारी स्थळ-वेळ-काळ आणि कपडे यांची बंधनं आमच्या पुशला वर्ज्य. (पुष्करची ताई, म्हणजेच त्याची सख्खी मोठी बहिण सायली त्याला पुश म्हणते. या आमच्या सायली मॅडम आहेत दहा वर्षांच्या, पण वागतात जणू वय आहे वीस !) तर आमचा हा पुश फक्त शड्डी (आपल्या भाषेत चड्डी) घालून उघडाबंब कोणाच्याही घरात कधीही प्रकट होतो ! त्यात आमचं घर तर साहेबांचं फेव्हरेट.

कारण इतरांच्या घरी दार वाजवून ते उघडेपर्यंत याला बाहेर वाट पाहत उभं राहावं लागतं, “तेवढे पेशन्स नाहीत आमच्याकडे” चैत्राली काकू कधी गमतीने तर कधी ओशाळून म्हणते ! पण आमच्या घराचं दार मात्र त्याला वाजवावंच लागत नाही कारण ते सकाळी सात पासून रात्री अकरा वाजेपर्यंत उघडंच असतं. किमान मी घरी असताना तरी ते असतंच असतं.

आणि खरं सांगायचं तर आमच्या घराचं उघडं दार हा सोसायटीमधल्या अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहे. “डास येत नाहीत का घरी?” अनेकांचा पहिला प्रश्न. “अहो कोणी तरी आलं म्हणजे !!??” कित्येकांची भीती. “हल्ली काय काय होतं ते वाचता न पेपर मधून ?” एखाद्याचा जाता जाता उगाच आमचं जनरल नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न. “कामवाल्या बायका फिरत असतात. आत येऊन मोबाईल वगैरे काही तरी घेऊन गेल्या म्हणजे ?” सकल महिलामंडळाची कॉमन शंका.

आमच्या मातोश्रींना या चौकशा आणि सल्ल्यांना सतत तोंड द्यावं लागतं मग येऊन हे सगळं माझ्यापाशी रितं होतं कारण दार उघडं ठेवा हा आदेश लाडक्या चिरंजीवांचा.

“लक्ष देऊ नको गं” मी सांगतो.

“अरे लक्ष देऊ नको म्हणजे काय ? चुकीचं का सांगतात ते काही ? तू पण वाचतोसच ना आजकाल काय काय होतं ते !” आईची काळजी.

मग मी म्हणतो, “अगं मी कुठे म्हणतो की मी नसताना दार उघडं ठेव म्हणून ! मी असताना उघडं ठेवत जाऊ न फक्त. मग झालं तर. आणि तसही आई, आपली सोसायटी पुण्यातल्या प्रतिष्ठित सोसायट्यांपैकी एक आहे. आपली सिक्युरीटी माहितीये ना तुला ! इथे कधी कधी मला आपल्याच वॉचमनला पटवून द्यावं लागतं की बाबरे, मी राहतो इथे. आमचं घर आहे इथे. ते बघ ते- दिसतीये का ती खिडकी. हां तीच. ते आमचं घर. तेंव्हा कुठे तो आत सोडतो मला. आपल्या कोकणातल्या बंगल्यासारखी थोडी परिस्थिती आहे इथे ? राहू दे ना यार दार उघडं. आणि म्हणू देत लोक त्यांना जे म्हणायचं आहे ते. उलट तूच त्यांना सांग- तुमच्या घराची पण दारं उघडी ठेवा. घराचं दार उघडं असलं, की घर कसं मोठं वाटतं.”

आई वैतागून जाते या ठरलेल्या साचेबद्ध उत्तराने आणि म्हणते, “तू आणि तुझं स्पष्टीकरण. धन्य आहात आपण. आणि मला ते यार वगैरे म्हणायचं बंद कर, समजलं का. मी काय मैत्रीण आहे का तुझी ?”यावर चिरंजीवांची मान डाव्या खांद्यापासून उजव्या खांद्यापर्यंत आणि उजवीकडून पुन्हा डावीकडे अशी छान दोन वेळा डोलते.

मला नेहमीच असं वाटतं आलंय की घराचं दार उघडं ठेवलं की चार माणसं जास्त येतात घरी आणि मला माणसं खूप आवडतात. त्यामुळं घराचं दार नेहमी उघडं असावं हा माझा नेहमीचा आग्रह असतो. शिवाय दार उघडं असणं हा आपलेपणाचा एक छान संदेश वाटतो मला.

ओके. फक्त मलाच वाटतो.

पण बाकी असो, या उघड्या दारापाठीमागच्या आपलेपणाचा हक्काने यथेच्छ पाहुणचार घेतलेली व्यक्ति कोणी असेल तर ती म्हणजे हाप शड्डीमधला व्हूईई व्हूईई करणारा चैत्राली काकूचा पुष्कर !

पुष्कर च्या त्या व्हूईईने माझी झोप केंव्हाची व्हूईई झाली होती. माझ्या टेबलाचा त्याने रनवे केला होता. त्याच्या लीलेमध्ये त्याने मला सुद्धा एव्हाना समावून घेतलं होतं. आमचे खेळ सुरुच होते, तेवढ्यात वीणाचा फोन आला.

कावळा बसायला आणि फांदी तुटायला म्हणतात तसा मी विणाचा फोन रिसीव्ह करायला आणि पुष्कर पाठोपाठ मी सुद्धा “व्हूई” म्हणायला एकच गाठ पडली.

त्या व्हूईचा आवाज फोनपलीकडे तिला “व्ही” असा ऐकू गेला आणि तो आवाज ऐकताच वीणा म्हणाली, “अरे वा ! सुचलं की नाव तुला. व्ही ! व्ही फॉर वीणा. गुड गुड. छान आहे रे नाव ! मला नव्हतं वाटलं रे इतका हुशार असशील तू.”

ते ऐकून मी पण चमकलोच ! “अरे हो ! राईट !! व्ही ! व्ही फॉर वीणा आपल्याला हे सुचलं कसं नाही हे ? व्ही !! येस ! हिला आपण आता व्ही म्हणायचं.” आणि अशाप्रकारे वीणा तेंव्हापासून माझ्याही नकळत माझ्यासाठी “व्ही” झाली.

खूप पोरकट आहे ना हे सगळं ! खूपच पोरकट ! असं असतं अरे का कुठे ? व्हूईई आणि व्ही !! काही !! ज्या पद्धतीने तिचं नाव मला सुचलं, खरंच, त्यापेक्षा बालिश काही असू शकेल या जगात असं आजीबात वाटत नाही मला. पण मग तेंव्हा किती मस्त वाटलं होतं मला जेंव्हा हे सगळं घडून गेलं होतं. खूपच छान वाटलं होतं. विमान घेऊन व्हूईई करणाऱ्या त्या छोट्या पुष्कर कडे हसत हसत पाहताना मी पण अभिमानाचा आव आणत म्हटलं होतं, “मग !! आहेच हा ‘दि नू’ हुशार. आणि तो सुद्धा अगदी लहान असल्यापासून ! वाटलं काय तुला !!”

आता हे सगळं आठवतं तेंव्हा गम्मत वाटते मला. वाटतं बालिशपणाला वयाचं बंधन नसतंच कधी. आपण कायम बालिशच असतो. कायम. आपण मोठे झालो आहोत हे आपल्याला तेंव्हाच कळून येतं जेंव्हा आपण आपल्या आयुष्य पाठीमागे वळून पाहतो, समयरेखेवर एक एक घटना मांडत जातो.

ही मांडणी पहिली की हुरहूर लागते मग मनाला दिवस खूप वेगाने निघून गेल्याची. एकतीस डिसेंबर होऊन चार महिने लोटून गेलेले असतात, पण वाटत असतं जणू कालंच महागडं ड्रिंक रिचवत होतो मी. दहावीची परीक्षा, बारावीची परीक्षा होऊन पाच- सात वर्ष उलटलेली असतात. पण परीक्षेआधीचा अभ्यास, मग परीक्षा, मग परीक्षेनंतरची सुट्टी ! कालच्याच गोष्टी वाटतात या सगळ्या. शाळेत वर्ग सुरु असताना सगळ्यांच्या नजरा चुकवून अशाच एखाद्या अवचित क्षणी मनामध्ये प्रवेश केलेल्या तिच्याकडे पाहिलेलं असतं आपण. ती सुद्धा काल-परवाचीच गोष्ट वाटून जाते.

आपले सवंगडी, बाबांनी आणलेलं पाहिलं घड्याळ, पावसाळा सुरु व्हायच्या वेळी शाळेत जाण्यासाठी नवी नवी घेतलेली सायकल, मग सायकल आपली वरची पहिली फेरी, नवीन वहीचा, पुस्तकाचा वास, लहानपणीचे खेळ, बागेतली घसरगुंडी, तो झोपाळा ! निर्जीव वस्तू सुद्धा सजीव होऊन गेलेल्या असतात आपल्या वाढत्या वयाच्या स्पर्शाने !

या जाणीव जस जशा गहिऱ्या होता जातात तसं तसं निरभ्र नभपटलावर पावसाचे ढग एकाएकीच दाटून यावेत तसेच काहीसे आठवणींचे एक एक ढग मन:पटलावर जमा होत जातात. मन उगाच हळवं वगैरे होतं. पाणावलेल्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू त्या समयरेखेचा ओलसर स्पर्श गालावर उमटवत जातात.वाटतं मग अशावेळी, जवळ असायला हवं आत्ता आपल्या शेजारी कोणी तरी. वीणा असायची आधी.

वीणाची माझी आणि समयरेखा जवळ जवळ चार वर्ष समांतर धावली होती. अजूनही समांतरच धावते आहे बहुतेक. नसेलही कदाचित, माहिती नाही, पण माझा “दिनू” आणि तिची “व्ही” होण्याचा प्रसंग आमच्या समांतर प्रवासरेखांना छेदुन गेला तेंव्हा एकमेकांसाठी आम्ही अजूनही नवेच होतो. आमची पहिली भेट होऊन अजून दोन महिने सुद्धा उलटले नव्हते, पण वाटत मात्र होतं, जणू आम्ही खूप काळापासून समांतरच धावतो आहोत !

व्ही !

(क्रमश:)

-सौरभ राघवेंद्र.