एक गोष्ट
तीन वाजलेत.
तीन वाजलेत.
दुपारच्या शांततेच्या आवाजाखेरीज कुठलाच आवाज नाही. समोरच्या झाडावर एक भारद्वाज बसलाय. साद घालतोय बहुधा कोणाला तरी. बाकी कावळे ओरडत आहेत अधून-मधून. रहदारीच्या रस्त्यापासून तसं लांब आमचं आहे आमचं घर. त्यामुळे एखाद्याच गाडीचा आवाज येतो, तो सुद्धा ती गाडी आमच्या घराच्या दिशेने येत असेल तरच.
माझा छोटासा प्रपंच टेबलावर मांडून बाल्कनीमध्ये येऊन उभा आहे मी.
माझा प्रपंच तो केवढा ! भल्या मोठ्या घरातला एक छोटासा कोपरा ! त्या कोपऱ्यात उभं एक टेबल आणि त्याच्यासमोरच एक खुर्ची. टेबलावर विस्कळीत झालेली सुटी पानं. त्यावर खरडलेले शब्द आजही वायाच जातील बहुधा. बाजूला उघडं पडलेलं आपोआप गळणाऱ्या शाईने बोटं बरबटवून टाकणारं एक शाईचं पेन- साधंच आहे. पारकर वगैरे अडकवलं खिशाला, की ओझ्यानं झुकल्यासारखं वाटतं उगाच.
त्या टेबल वर पडलेलं एक घड्याळ. बाबांनी दिलेलं बारावीच्या परीक्षेच्या वेळी. सुरु आहे ते अजून. समोरच एक आरसा आहे. कोपर्यातून फुटला आहे तो. माझ्याकडूनच फुटला. फुटका आरसा ठेवू नये म्हणतात घरी.
आरशाच्या बाजूला काही पुस्तकं आहेत, वाचावयच्या मनिषेनं आणलेली. सेकंड हॅंड आहेत. मूळ प्रत महाग. मूळ प्रती विकत घ्यायच्या म्हटलं तर तीन रात्री उपाशी पोटी झोपावं लागेल. ‘एवढ्या महागाईच्या पुस्तकांचा सोस असावाच कशासाठी ? लायकीप्रमाणे वाच की !” एका मित्राने अनाहूतपणे दिलेला सल्ला. खरं तर टोमणाच होता तो. पण मित्र चांगला, म्हणून सल्ला म्हणायचा आणि रिचवून टाकायचा.
एक कंगवा पण आहे शेजारी. माझा जुना कंगवा मी हरवून आलो कुठे तरी. मग आईला सांगितलं की बाहेर जाशील तेंव्हा कुठला तरी एक कंगवा घेऊन ये माझ्यासाठी. आईने तो आणला, पण जुना कंगवा गेल्यानंतर त्याचे दिवस पूर्ण होईपर्यंत केसाला कंगवा लावलाच नव्हता मी. कंगवा असला म्हणून काय झालं? इमान तो इमान. राखलाच पाहिजे. आणि तसाही हल्ली या कंगव्याच्या नशिबी माझ्या केसांचा कोरडा स्पर्श नसतोच फारसा.
माझ्याबद्दल एक तक्रार आहे काही जणांची. तसं बघितलं तर माझ्याबद्दल एक का एक हजार जणांच्या एक हजार तक्रारी आहेत. लोकांना तक्रार करण्याची सवयच असावी बहुधा ! असो.
तर माझा प्रपंच तो इतकाच. राहता राहिला तो एक लॅपटॉप. तो सुद्धा चार वेळा सर्व्हिस सेंटरची वारी करूनच आलेला. बॅटरीचा त्रास आहे त्याला. खाल्लेली वीज अंगाला लागत नाही त्याच्या असं त्या तंत्रज्ञाचं सांगणं. “बरं” म्हटलं मी. टॉनिक असेल एखादं लॅपटॉपसाठी तर त्याचं नाव सांगायला सांगितलंय मी. “बघतो” या उत्तरापलीकडे कार्यवाही शून्य. असो.
मावळता दिनकर आहे तो बिचारा. माझ्याशिवाय करेल कोण त्याचं ! मलाच शोधायला हवं ते टॉनिक.
तोच लॅपटॉप मी काहीशा अस्वस्थपणे झाकला आणि आता बाल्कनी मध्ये येऊन उभा राहिलोय. उन्हाळा सुरु झालाय. राई तशी गर्द आहे आमच्या घराच्या आजूबाजूला पण तरी दाह जाणवतो आहेच. कॅमेरा नावाचं खेळणं चालवलं तर इथले चार फोटो निघातीलही चांगले पण ते संध्याकाळीच काढावे लागतील असं दिसतंय.
धुळीने माखलेल्या हिरवट पानांवर ऊन चांगलंच विसावलंय. वारं आजीबात नाहीये. पण मध्येच एखादी झुळूक आली त्या झुळकीच्या सोबतीनं सगळी पानं सळसळून रंध्रं रंध्रं तापवणारं ते ऊन झिडकारु पाहतात. पण कुठचं काय ! उन्हाळ्यातलं ऊन- भारीच चिवट. पसरतंच पुन्हा !
मध्यंतरी इथलं एक झाड तोडलं काही लोकांनी. फांद्या घेऊन गेले. पानांना आग लावली. कधी कधी वाटतं जाता जाता त्या झाडावर घरटं असणाऱ्या, संध्याकाळी माघारी आलेल्या पक्ष्यांचं आक्रंदन ऐकायला सुद्धा थांबायला हवं होतं त्यांनी. फार स्वरविदीर्ण होतं क्रंदन. त्या स्वरांनी माझ्या डोळ्यांना इजा झाली आणि डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं. दृश्य धूसर झालं आणि मी कानही बंद केले तरी तो आवाज... जाउदे !
त्या झाडाचं खोड वाळेल आता आणि कोसळेल पुढच्या उन्हाळ्यात.
जोश्यांचा मुलग- विनीत. आत्ता आलेला दिसतोय कुठूनसा. कुठे जातो, काय करतो... देव जाणे. वाया गेलंय पोर असं म्हणतात. सान्यांच्या काकू आईला सांगत होत्या, टपरीसमोर उभा राहून सिगारेटी पेटवतो म्हणे. माझ्याशी चांगला वागतो तसा. इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतो, काही बाही विचारतो. मी हि त्याच्याशी चांगलंच वागतो पण काहीसं अंतर राखूनच वागतो जरा. शेवटी अंतर राखून वागणं म्हणजेच चांगलं वागणं, नव्हे का ? असो. शेजारधर्म. पाळावा लागतोच.
हा माझा फोन काही मला सुखानं दुपार अनुभवू देईल असं वाटत नाही. मगापासून चौथा फोन आलाय. आधीचे तीन वीणाचेच होते. हा सुद्धा तिचाच असावा बहुधा.
हो तिचाच आहे.
का फोन करत असेल, कोण जाणे !
काल रात्री म्हणे तिला माझी आठवण येत होती. आज सकाळी उठल्या उठल्या तसा मेसेजच पाठवला होता तिने. सहा महिन्यानंतर काल रात्री असं काय झालं आणि या पामराची गणती त्या अप्सरेच्या स्मरणमालिकेत झाली- हे त्या इंद्रालाच ठाऊक !
तो मेसेज वाचल्यानंतर पुढचा अर्धा तास मी अंथरुणात लोळता लोळता डोळ्यांवर आलेली झोप परतवून लावण्याच्या प्रयत्नात त्या मेसेजमागचा कार्यकारण भाव शोधण्याच्या प्रयत्न करू लागलो.
माझ्या आजवरच्या अनुभवातून मी एक गोष्ट शिकलो आहे आणि ती म्हणजे अर्धवट झोपेत एखादा विचार करणं हे वेडेपणाचं असतं. मद्यधुंद मनुष्याच्या वेड्यावाकड्या चालीप्रमाणे अर्धनिद्रित अवस्थेत चालणारे आपले विचार कुठल्या क्षणी कुणीकडे वळतील याचा नेम नसतो.
माझे विचार वळले ते आमच्या आठवणींच्या प्रदेशाकडे घेऊन जाणाऱ्या छोट्याश्या पायवाटेच्या दिशेने.
क्षणार्धात चार वर्षं मागं गेलो मी ! पावसाळ्याचे दिवस होते ते. तेंव्हा मी रोज संध्याकाळी फिरायला जात असे. त्या संध्याकाळीही गेलो होतो.
दुपारभर भान हरपून कोसळलेले मेघ एव्हाना अज्ञाताकडे मार्गस्थ झाले होते. पक्ष्यांची पिलावळ आपल्या चोचीचा इवलासा चंबू करून घरट्यातून बाहेर डोकावत होती. धो धो कोसळणाऱ्या पाण्याने लख्ख न्हाऊन निघालेला सभोवताल नभपटलावर नुकतंच आगमन झालेल्या सूर्याच्या सुवर्णप्रभेनं उजळून गेला होता.
सुखद गारवा पांघरलेल्या त्या वातावरणामुळं प्रफुल्लीत झालेल्या माझ्या मनामध्ये आपण एखादं चित्र काढावं असा मोह उत्पन्न झाला. मग मी माझ्या पेन्सिली, स्केचबुक वगैरे सगळं साहित्य घेतलं आणि घराजवळच्या बागेतला पावसाच्या तांडवाला चुकवून कोरडा राहिलेला एक बाक गाठला, माझं स्केचबुक उघडलं आणि पेन्सिल चालवू लागलो.
खरं सांगायचं तर चित्रकलेचा आणि माझा फार निकटचा संबंध आहे अशातला भाग नाही. मनावरचा ताण हलका करायचं एक माध्यम म्हणून मी या रंगरेखासाधनेकडे वळलो होतो, पण कालांतरानं मला जाणवू लागलं की माझ्या हाताला वळण आहे, रेषांना लय आहे. स्वारस्य पहिल्यापासून होतंच. मग मनावरचा ताण हलका करण्याचा विरंगुळ्याचा उपाय म्हणून योजलेला पांढऱ्यावर उगाच काही तरी काळं करण्याचा माझा उद्योग, साधनेमध्ये कधी वर्ग झाला ते मलाही उमजलं नाही. हातात पेन्सिल घ्यावी, कोऱ्या कागदावरून हात फिरवावा, डोळे काही क्षण बंद करून एखादी प्रतिमा मनामध्ये साठवून घ्यावी आणि बाकी सगळं त्या कलादेवतेवर सोपवून द्यावं ! मग रेषा आपसूकच उमटू लागतात माझ्या हातून.
त्या संध्याकाळीही काहीसं असंच झालं. माझा हातून रेषा उमटू लागल्या. त्या रेषांमध्ये निसर्गाचं सौंदर्य गुंफण्याचा माझा प्रयत्न सुरु होता. रेखाटनास सुरुवात करून आता कुठे अर्धाच तास झाला होता, तोच पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा व्हाव्ही अश्या एका गोड आवाजातली काही ध्वनीकंपनं माझ्या कर्णपटलावर थरारली.
“छान काढतोस रे !” तो आवाज म्हाणाला.
“थॅंक यु !” मी त्या ध्वनीस्वामिनीकडे न पाहताच म्हटलं.
“पाहत बसले शेजारी तर चालेल ?” पुन्हा तोच आवाज.
तो प्रश्न ऐकून कागदावर चालणारा माझा हात आपोआप थांबला. पेन्सिल आडवी झाली. कलेची महानतम तपस्या भंग झाल्याचे लटके भाव चेहऱ्यावर उतरले. प्रतिक्षिप्तपणे मान वर उचलली गेली. “युअर चॉइस” असे शब्द जिभेवर येऊन थांबले. कागदावरच्या चित्राचं पूर्ण रूप रेंगाळणाऱ्या माझ्या डोळ्यांनी त्या मधुरस्वरस्वमिनीच्या चेहर्याचा ठाव घेतला. माझ्या चेहऱ्यावरच्या त्रासिक भावाचं प्रतिबिंब तिच्या डोळ्यात तरळू लागलं तसं तिच्या चेहऱ्यावरच्या कुतूहलाची जागा अवघडलेपणानं घेतली. तिला असं अवघडलेलं पाहून मात्र मग मला थोडं अपराधी वाटलं.
“बैस ना !” मी म्हटलं.
तर अशी होती आमची पहिली भेट. त्या अर्धवट झोपेत मन:चक्षुंनी पुन्हा एकदा माझ्यासमोर जशीच्या तशी उभी केली. पुढचा सगळा प्रसंगही राहिला असता उभा, पण तेवढ्यात पुन्हा एकदा फोन थरारला.
वीणाचाच मेसेज.
“झोपेत आहेस का ?” तिनं लिहिलं होतं.
ममानातल्या मनात मी म्हटलं, 'कसं कळतं राव हिला सगळं ? '
प्रश्नांकित चेहऱ्याने मी तो फोन बाजूस ठेवतो तोच आणखी एक मेसेज;
“मेसेज वाचण्याची घेतलीस तशी उत्तर पाठवण्याचीही तसदी घे”
तो मेसेज वाचून मात्र माझी क्रोधघंटा घणाणू लागली.
एक तर सहा महिन्यांपासून अबोला धरून आहे हे मुलगी. एका शब्दाने बोलली नाही, फोन नाही, मेसेज नाही इतकंच काय, एखादा औपचारिक इमेल सुद्धा नाही पाठवला हिने आणि आज मात्र अचानक मेसेज पाठवते आणि सांगते- आदल्या रात्री तुझी खूप आठवण आली रे मला !!अजून एक मेसेज पाठवते आणि वर म्हणते, उत्तर दे काही तरी.
अविर्भाव तर असा जणू मधले सहा महिने उडूनच गेले कापरासारखे, कुठलाच मागमूस न ठेवता.
काहीश्या त्राग्यानेच मी तो फोन बाजूला ठेवतो तोच आणखी एक मेसेज:
“उत्तर पाठवू नकोस तू हवं तर, पण माझा मेसेज तू वाचलेलं कळतं मला.”
मग न राहवून उत्तरादखल मी पण लिहिलं, “एवढं सगळं कळतं तर,...”
पुढे लिहायची इच्छा नाही झाली. लिहिलेलं खोडलं, फोन ठेवला आणि अंथरुणातून उठलो. खरं तर तो रविवारचा दिवस. उशिरापर्यंत लोळत पडायची तीव्र इच्छा होत होती माझी, पण या बाईसाहेबांचे मेसेजेस आले आणि वाजले झोपेचे बारा.
मोठ्या अनिच्छेनेच उठलो मी बेडवरून आणि वाफाळती कॉफी घेऊन माझ्या खोलीच्या खिडकीपाशी येऊन बसलो. गरम कॉफीमधून निघणाऱ्या उष्ण वाफेपलीकडे खिडकीमधून दिसणारा समुद्र आजसुद्धा नेहमी इतकाच गूढ आणि अथांग भासत होता.
उष्ण वाफेमुळे माझ्या चष्म्याच्या काचेवर बाष्प जमू लागलं तसं खिडकीतून दिसणारा समुद्र धूसर होत गेला.
(क्रमश:)
- सौरभ राघवेंद्र.