•mr•

दुपार !

बराच वेळ झाला, घड्याळाचा छोटा काटा दोनवरच

बराच वेळ झाला, घड्याळाचा छोटा काटा दोनवरच आहे. मोठा काटा सुद्धा काहीसा रेंगाळतच पुढे सरकतोय. मध्येच एखादी वाऱ्याची झुळूक येते आहे आणि त्या झुळूकेसरशी झाडाची पानं सळसळताहेत. पक्षी सुद्धा तसे शांतच आहेत. आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी जणू आपापल्या आयुष्यामध्ये ईप्सित स्थळी पोहोचल्याची सुखद अनुभूती मनाशी घेऊन आपापल्या जागी स्थिर झाल्या आहेत. आजची दुपार खूपच निवांत आणि काहीशी सुस्तावलेली आहे- रोजच्यासारखीच.

बराच वेळ झाला, लिखाणाची वही आणि माझं आवडतं शाईचं पेन घेऊन मी खिडकीपाशी बसून आहे. खरं तर आज लिहायला फार काही सुचत नाहीये आणि मीही स्वत:ला उगाच सायास घ्यावयास लावत नाहीये. मनात रुंजी घालणाऱ्या असंख्य विचारांमध्ये गुंतून न जाता आजूबाजूच्या शांतातेत तल्लीन होण्याचा प्रयत्न चालू आहे माझा.

शेजारच्या फडके आजींनी टी. व्ही. लावलेला दिसतोय. वयापरत्वे आजींना कमी ऐकू येतं त्यामुळे त्यांच्या टी. व्ही. चा आवाज अंमळ मोठाच असतो; पण त्याचा त्रास मात्र आम्ही कधीच करून घेत नाही. फडके आजींबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही या नव्या सोसायटीमध्ये राहायला आल्यानंतर आमच्या ओळखीच्या झालेल्या त्या पहिल्या व्यक्ति. अर्थात, शेजारी असल्या करणानं पुढं मागं कधी तरी संबंध आलाच असता पण फडके आजी-आजोबांच्या लाघवी आणि मनमिळाऊ स्वभावामुळं आमच्या मधल्या नात्याची वीण एव्हाना पुष्कळ घट्ट झाली आहे.

स्वभावानं खूप चांगलं आहे फडके दांपत्य. आजी-आजोबांचा संसार इथे असतो आणि त्यांच्या मुलं-नातवंडांचा अमेरिकेत. त्यांची नातवंडं माझ्याच वयाची आहेत, म्हणूनच कदाचित माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर विशेष जीव आहे त्यांचा. माझ्या आईसोबतही त्यांच्या- विशेषकरून आजींच्या पुष्कळ गप्पा चालतात. माझ्या आईने काढलेल्या रांगोळ्या खूप आवडतात त्यांना. पूर्वी त्यासुद्धा खूप रेखीव रांगोळ्या घालत असत पण वय झाल्यामुळं त्यांचे हात आता थरथरतात. फडके आजींनी, त्यांनी जमवलेल्या रांगोळीच्या वेगवेगळ्या डिझाइन्सची वही आईकडे केंव्हाच सुपूर्द केली आहे. वय आणि माणसाचं हळवेपण एकत्रच वाढतं असं म्हणतात- फडके आजींकडे पाहिलं की पटतं ते.

घड्याळाचा छोटा काटा अजुनही दोनवरच आहे, मोठा काटा सहावर येऊन थांबला आहे. वरच्या मजल्यावरून अथर्वच्या पळापळीचा आवाज ऐकू येतोय. आणि पाठोपाठ मृण्मयी काकूचं त्याला रागे भरणं ! मृण्मयी काकूने त्याला काही सांगायला जावं आणि याने नेमकं उलटं काही तरी करावं किंवा काही मजेशीर उत्तर तरी द्यावं हा त्यांचा नेहमीचा क्रम. सध्याच्या एकूण बोलण्यावरून तरी मला वाटतंय अथर्वच्या जेवणाचा कार्यक्रम सुरु असावा. काकू ओरडते आहे, “अरे एका जागी बसून नीट जेव रे अथर्व ! घर भर पळू नको उगाच !”

अथर्वचं वय आहे वर्षं चार. आमच्या बिल्डींगमधल्या सगळ्यांनाच लळा लावलाय त्याने. प्वार लई ग्वाड हाय, पण आहे खूप दंगेखोर. त्यामुळं मग त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचेही साहजिकच मोठे मोठे कार्यक्रम होतात आणि ते पार पाडता पाडता काकूची मात्र दमछाक होते. आता हा जेवणाचा कार्यक्रम झाला की मग साहेबांच्या झोपण्याचा कार्यक्रम असतो; पण आजवरच्या अनुभवाप्रमाणे, या कार्यक्रमाची सांगता काकू निजेपर्यंत अथर्वच्या झोपेच्या नाटकाने होते. आईचा डोळा लागल्याचं पाहिलं की स्वारी पळते आजोबांच्या खोलीत. बाल्कनीमध्ये आरामखुर्चीत वाचन करत बसलेल्या आजोबांच्या मांडीवर जाऊन हा बसतो आणि “मला एक गोत्त सांगा” असा हट्ट धरतो. मग आजोबा आपलं पुस्तक बाजूला ठेवतात आणि ‘लामायानातली गोत्त’ चालू होते पण आधीच दमलेला अथर्व गोष्ट संपायच्या आधीच आजोबांच्या मांडीवर झोपून जातो. मग आजोबा त्याला त्याच्या खोलीत नेऊन व्यवस्थित निजवतात आणि त्यांचं वाचन पूर्ववत सुरु होतं.

अथर्वच्या कार्यक्रमाचा हा दुपारचा अंक संपेपर्यंत एरवी सहसा तीन वाजलेले असतात. माझ्या लेखणीची गती संथ झालेली असते. मधूनच येणारी वार्‍याची झुळूक घरासमोरच्या मोकळ्या जागेत लावलेल्या मागच्या वर्षीच्या दिवाळीमधल्या छोट्या छोट्या आकाशकंदिलांशी आणि दारावरच्या तोरणाशी खेळत असते. आईने नुकत्याच वळून परातीमध्ये झाकून ठेवलेल्या बेसनाच्या लाडवांचा वास घरभर दरवळत असतो. दुपारच्या यथेच्छ भोजनाने मला काहीशी सुस्ती आलेली असते. माझे डोळे आपोआपच मिटायला लागतात. प्रसंग, गोष्टी, स्थळ, काळ अशा सगळ्या गोष्टींचे संदर्भ यथावकाश सैलावत जातात आणि कधी डोळा लागतो ते समजतही नाही.

झोप लागल्याला काही वेळ उलटतोच आहे तेवढ्यात, ‘प्लीज क्लोज डोअर ! कृपया दरवाजा बंद करा’ -लिफ्टचा भोंगा वाजतो. खरं तर लिफ्टचं दर उघडलं गेलेलं असतं चौथ्या मजल्यावर, पण त्या भोंग्याचा आवाज इतका मोठा आहे, की तो ऐकू जातो साऱ्या बिल्डींगला ! लिफ्टच्या त्या अनाहूत भोंग्यानं माझी झोप कुठच्या कुठे निघून जाते पण लिखाण पुन्हा सुरु करावं म्हटलं तर आळस आलेला असतो. मग मी खिडकीच्या बाहेर पहात बसतो. आकाराने चिमणीएवढाच पण रंगाने पिवळसर असा एक छोटासा पक्षी माझं लक्ष वेधून घेतो. या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत मारत अखेर तो दुसर्‍या झाडावर जाऊन बसतो. पक्ष्यांच्या बाबतीत माझं ज्ञान अगदीच तोकडं. त्यामुळे त्या पक्षाचं नाव वगैरे माहिती असण्याचा प्रश्न उद्भवतच नाही, पण त्या पक्ष्याकडे पाहून माझ्या डोक्यात विचारांचं चक्र चालू होतं-

‘बरंय राव, या पक्ष्याचं. कसलं टेन्शनच नाही ! शिवाय हवं तिथे आणि हवं तेंव्हा उडण्याचं स्वातंत्र्य ! तसा मी सुद्धा स्वतंत्र आहेच की. मीच का, सगळेच स्वतंत्र आहेत- मागच्याच गुरुवारी नाही का सोसायटीमध्ये आम्ही सगळ्यांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन ! मजा आली होती. दहावी नंतरचा साजरा केलेला हा पहिला स्वातंत्र्य दिन. नाही म्हणायला कॉलेज मध्ये असायचा छोटेखानी कार्यक्रम, पण शाळेतल्या स्वातंत्र्य दिनाची सवय असल्यामुळं की काय कोण जाणे- कॉलेज मध्ये तो साजरा करणं फारसं आवडलं नाही कधी. आणि शाळेसारखी समूहगीतं कॉलेजात कुठे ! कुठली होती बरं समूहगीतं ? एक आठवतंय- माणूस माझे नाव, आणि हो, ‘इतनी शक्ती’ सुद्धा. साक्षी गायची सगळी गीतं पुढं उभं राहून. खरं तर चार मुलं आणि चार मुलांचा ग्रुप असे तो, पण साक्षीचा आवाज चांगला, म्हणून बाईसाहेब लीड सिंगर ! नीलला आवडायची म्हणे ती शाळेत असताना. साक्षीचा मेसेज आला होता परवा. या रविवारी स्वरमंदिरामध्ये कार्यक्रम आहे तिचा- शास्त्रीय गायनाचा. सोलो परफॉरमन्स. ग्वाल्हेर घराण्याची तालीम चालू आहे तिची. रिमाइंडर लावून ठेवायला हवा फोन मध्ये, विसरून जायचो नाही तर. तसा मी स्वत: संगीत क्षेत्रात वावरत असल्यानं (वावरण्यापेक्षा माकड उद्या मारत असल्यानं असा शब्द योजला तरी चालू शकेल म्हणा !) तिनं आग्रहानं बोलावलं आहे. सो, जाईन म्हणतो.’

विचाराच्या नावेचा हा प्रवास असाच सुरु राहतो. संदर्भाला संदर्भ जोडले जातात आणि जुन्याच गोष्टी पुन्हा एकदा नव्यानं आठवायला लागतात. परवाच्याच दुपारी नाही का, निखीलबरोबर झालेलं भांडण आठवलं होतं ! तो तीन एक वर्षांनी मोठा होता माझ्या पेक्षा. मला म्हणाला, ‘खेळायला घेणारच नाही तुला जा !’ लहान असताना पुरतं एवढंसं कारण भांडणासाठी- आला मला राग. झालं भांडण, अर्थात मिटलंही लगेच. त्यानंतर एका वर्षाने त्याच्या बाबांची मुंबई मध्ये बदली झाली आणि ते सगळे तिकडेच शिफ्ट झाले. आता तो नोकरीच्या निमित्ताने लंडन मध्ये असतो.

खरं सांगू, या छोट्या छोट्या आठवणींचा खूप मोह पडतो मला. आपल्या मनामध्येच दडून बसलेल्या त्या असतात आपला असा एक छोटा कोपरा शोधून. मध्येच एकदम टुणकन् उडी मारून वर येतात आणि आपल्या गालावर हसू उमटवून जातात. खूप वाटतं मला की हाकारावी आपल्या मनाची नाव या आठवणींच्या घननीळ सागरात आणि सोडून द्यावा सुकाणू. जाऊ द्यावं नावेला हवं तिथे वाहवत नेणाऱ्या लाटेवर स्वार होऊन; पण तेवढ्यातच शेजारी ठेवलेला फोन व्हायब्रेट होतो !

फोनच्या त्या एका आवाजासरशी माझी आठवणींच्या प्रदेशात भरकटलेली नाव वर्तमानाच्या किनाऱ्यावर जाऊन थडकते. आलेला मेसज न उघडता नोटिफिकेशन ट्रे मध्येच मी तो वाचतो- वीणाचा मेसेज: “आज कुठे भेटायचं ?” उत्तर न देता मी फोन तसाच बाजूला ठेवतो. मी असं करणार याची तिला खात्रीच असते. त्यामुळे दोन मिनिटं पण होत नाहीत तोच तिचा कॉल येतो, “माहितीये मला, वाचला आहेस तू मेसेज. सांग कुठे भेटायचं !” ”मी मेसेज वाचल्याच तुला कळलं तसंच मला कुठं भेटायचं हे ही तुला कळलंच असेल.” मी उत्तरतो. “हो !” पलिकडून उत्तर. “काय हो ?” माझा प्रतिप्रश्न. “कळलं मला” तिचं उत्तर. “कुठे ?” मी पुन्हा प्रश्न विचारतो. मग कुठल्या तरी एका जागेचं नाव ती सांगते आणि मलाही खरंच तिथेच जावंसं वाटत असतं पण तरीही मी उगाच म्हणतो, “वेल, तिकडे ? ठीक आहे. भेटू.” “बरोबर ओळखलं की नाही ते सांग आधी. भाव नको खाऊ उगाच.” ती म्हणते. “सहा वाजता भेटू आपण. भेटल्यावर सांगतो.” असं म्हणून मी फोन ठेवतो आणि घड्याळात पाहतो तो मगाशी सुस्तावलेलं घड्याळ आता वेगात पळताना मला दिसतं. सव्वा चार झालेले असतात.

दुपारचं हे नेहमी असंच असतं. एकदा संध्याकाळच्या प्लॅन ची चाहूल लागली, की दुपारचं दुपारपण क्षणात संपून जातं आणि जे काही उरतं ते असतं केवळ घड्याळाच्या काट्यांनी दर्शवलेली वेळ आणि ठरलेल्या प्लॅनची वेळ यांमधला अवकाश. मग या अवकाशात काय करायचं आणि काय नाही हे संध्याकाळच्या ठरलेल्या कार्यक्रमावर अवलंबून असतं. सध्या तरी मला फक्त शेव्हिंग करायचं आहे आणि ग्रे कलर सोडून कुठल्याही रंगाचा टी-शर्ट घालायचा आहे. माझ्या कपाटात साधारण तीस एक शर्ट असतील; त्यातले किमान दहा शर्ट ग्रे कलरचे आहेत. खूप आवडतो मला तो रंग. खरं सांगायचं तर फक्त मलाच आवडतो तो रंग. नाही तर एरवी सगळ्यांची तक्रारच असते, “जगात एवढे रंग आहेत. त्या ग्रे मध्ये काय जीव अडकला आहे तुझा ते तो देव जाणे !” अशावेळी मी फक्त हसतो आणि या कानाने ऐकलेली टिप्पणी त्या कानाने सोडून देतो.

खिडकीपासून मी उठतो तोच मला आठवतं की लायब्ररीचं पुस्तक परत करायची आज शेवटची तारीख आहे, मग विचार येतो जाता जाता ते परत करावं आणि नावं घेऊन यावं; पण दरवेळेप्रमाणं काही न काही कारणानं ते पुस्तक अर्धंच वाचून झालेलं असतं, मग मी मनाशी ठरवतो की यावेळी आणेन ते पुस्तक पूर्ण वाचायचं. (खरं तर असं दर वेळीच ठरवतो !) मग परत करायचं पुस्तक शोधता शोधता आता कुठलं पुस्तक आणावं याचा विचार चालू होतो. अखेर पुस्तक सापडतं, बदलून आणायच्या पुस्तकाचं नावही मनाशी निश्चित होतं आणि तेवढ्यात आई चहासाठी बोलावते. टेबलवर ठेवलेल्या त्या वाफाळत्या गरम चहाच्या पहिल्या घोटासरशी जाणवतं, निवांत दुपार सरली सौरभा ! आता थोडी घाई करायलाच हवी !

सौरभ राघवेंद्र.