•mr•

ड्रम

एका ड्रमर च्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ पहिला.. ज्या पद्धतीने आल्या आल्या हा माणूस पेटला, त्यावरून वाजवायला येण्याआधी त्याच्या घरी झालेल्या संवादाचा मी बांधलेला एक छोटासा अंदाज...

एका ड्रमर च्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ पहिला.. ज्या पद्धतीने आल्या आल्या हा माणूस पेटला, त्यावरून वाजवायला येण्याआधी त्याच्या घरी झालेल्या संवादाचा मी बांधलेला एक छोटासा अंदाज...

बायको (चिडून) : अहो ! निघालात का परत ? इकडे लक्ष द्या जरा..

नवरा (वैतागून) : काय आता ?

बायको (राग,वैताग आणि तत्सम भावनांची परिसीमा गाठून.. एका हातात लाटणं आणि दुसरा हात कमरेवर ठेवून ) : काय म्हणजे काय ? कसलं जळलं मेलं लक्षण ते तुमचं !!? उठसुठ आपलं ड्रम का फम का काय ते बडवत बसता..जा जरा काम शोधा कुठं तरी.. नोकरी शोधा एखादी !

नवरा (रागावून, स्वतःच्या प्रतिष्ठेखातर) : उपाशी तर झोपत नाहीस ना ? आणि काय गं कळतं काय तुला संगीतामधलं ? सांग ना काय कळतं ?लग्नाआधी मारे कौतुक होतं की माझं ! आता काय झालं ?

बायको (रागाने हातातले लाटणे शेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या मुलाकडे रोखून) : हे.. तीन पोरं जन्माला घातली आपण. किती ? तीन. एक तरी धड पोसता येतं का तुम्हाला ? त्यात तो पेपर वाला, दूध वाला.. दोन महिन्यांचे पैसे नाही दिले त्यांचे आपण.

आणि म्हणे कौतुक ! कौतुक कसलं डोम्बलाचं ? आमच्या गावाकडे... मंदिरातला तो ढोलकी वाजवणारा सदाभाऊ.. रोज दोन चमचे तूप ओततो हो वरणावर ! दोन चमचे. रोज.नाही तर आपण !!

(इथे बायको रडवेली होते. तेवढ्यात बाहेर कसली तरी खुडबुड. जोशी काका नोकरी वर जाण्यासाठी बाहेर पडत असतात.हातातलं लाटणं जोशींच्या खिडकीकडे करून)

बायको : जोशी काकांकडे बघा जरा.. कसे दहा ते सहा नोकरी वर जातात रोज.. नाही तर आमचं ध्यान.

नवरा (मनातल्या मनात) : आयला ! या जोश्याला पण आत्ताच बाहेर पडायचं होतं.

बायको : अहो !!!! घुम्या सारखे उभे काय आहात.. बोला ना काही तरी. ड्रम तर वाजवताच.. तोंड वाजवा की थोडं..

जाऊदे.. काय बाई मेलीचं नशीब माझं.. लोक विचारतात.. काय हो कुबेर वहिनी, काय म्हणालात काय करतात तुमचे हे ? आता काय सांगू त्यांना ? आमचे हे किनई उठले की त्या दोन वाळलेल्या काठ्या घेतात आणि बसतात बडवत ती उभी ढोलकी !!

नवरा : मग ? त्यात काय ? लाज काय वाटायची त्यात ? अरे उपासना करतो मी संगीताची..

बायको (पूर्ण वैतागून, लाटण्याच्या कडेला लागलेलं पीठ आता कपाळाला लागलेलं असतं) : उपासना ! कप्पाळ माझं. उपास घडवता आम्हाला उपास. आणि म्हणे सांगायचं !! सांगितलं की पुढे ते विचारतात.. ड्रम वाजवतात ? अरे वा ! पण ' पोटापाण्यासाठी ' काय करतात !!?? अगदी मेल्याहून मेल्यासारखी होते हो मी. आणि आडनाव पण पहा ना कसलं दिलंय देवानं ! म्हणे कुबेर ! तरी आई लग्नाआधी आई सांगत होती, "लक्ष्मी, पोरी, बाई विचार करून लग्न कर. जावई बापू आधीच नोकरी करत नाहीत त्यात संगीताच्या क्षेत्रात. चरितार्थ चालेल का तुमचा ?" पण नाही ! आम्हाला कौतुक होतं ना.. आमचे नावरोबा संगीताच्या क्षेत्रात. नाही ऐकलं. आता भोगते आहे.. जाऊदे ! नशीबच फुटकं, दुसरं काय..

आता निक्षून सांगते.. आता नोकरी नाही ना धरली, तर निघून जाईन बरं माहेरी मी.

(एवढे बोलून तूर्तास ती स्वयंपाकघरात करपलेली तव्यावरची पोळी उलटायला तरातरा निघून जाते. आतून ओरडते: तुमच्या नादात पोळी करपली बघा माझी!(एवढे बोलून तूर्तास ती स्वयंपाकघरात करपलेली तव्यावरची पोळी उलटायला तरातरा निघून जाते. आतून ओरडते: तुमच्या नादात पोळी करपली बघा माझी!)

नवरा बिचारा रागाने धुमसत धाडकन दार आपटून निघून जातो.

समोरच्या खिडकीत उभ्या राहून चोरून संभाषण ऐकणाऱ्या जोशी काकू ताज्या घडामोडीचा इतिवृत्तांत द्यायला वरच्या कुलकर्णी काकूंकडे जाण्यास निघतात.

___

असो. काही म्हणा.. पण हा माणूस ड्रम बाकी मस्त वाजवतो.

शेवटी पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते हेच खरं. मग हातात लाटणं घेऊन करपलेली पोळी आता कशी यांच्याच पानात वाढते असं रागानं म्हणत का असेना.

- सौरभ राघवेंद्र