डोरेमॉन, मी, पैसे आणि जागरूकता !
मी लहान असताना हंगामा नावचं एक चॅनेल खूप प्रसिद्ध होतं. त्या चॅनेलवर डोरेमॉन नावाचं एक कार्टून लागायचं, त्यातला डोरेमॉन नावाचा रोबोट बावीसाव्या शातकातून नोबिता नावाच्या एका वेंधळ्या मुलाला मद…
मी लहान असताना हंगामा नावचं एक चॅनेल खूप प्रसिद्ध होतं. त्या चॅनेलवर डोरेमॉन नावाचं एक कार्टून लागायचं, त्यातला डोरेमॉन नावाचा रोबोट बावीसाव्या शातकातून नोबिता नावाच्या एका वेंधळ्या मुलाला मदत करायला एकविसाव्या शतकात आलेला असतो. नोबिता एखाद्या अडचणीत सापडणार, मग डोरेमॉन त्याला बावीसाव्या शतकात बनलेलं एखादं गॅजेट देणार आणि ते गॅजेट घेऊन नोविता अजून जास्त गोंधळ घालणार असं त्या कार्टूनचं कथानक.
तर डोरेमॉनच्या अशाच एका भागात नोबिता, 'माझा पॉकेटमनी संपत आलाय, माझ्याकडे दहाच रुपये राहिलेत' असं म्हणून रडत असतो. त्याला रडताना पाहून डोरेमॉन त्याला म्हणतो, "पैसे असे उधळायचे नसतात असं मी तुला मागेच सांगितलं होतं. तर ऐकलं नाहीस माझं!" ते ऐकून नोबिता अजून मोठ्या आवाजात रडायला लागतो आणि त्याची दया येऊन डोरेमॉन अखेर त्याला एक गॅजेट देतो.
ते गॅजेट म्हणजे खरं तर एक छोटी बँक असते. त्या बँकेत म्हणे तुम्ही जी रक्कम जमा कराल त्या रकमेवर दर तासाला, बरं का! दर तासाला दहा टक्के चक्रवाढ व्याज मिळत असतं. डोरेमॉन नोबिताला दहा रुपयांची ठेव एका आठवड्यात किती मोठी होईल याचं गणित सोडवून दाखवतो आणि नोबिता अखेर त्याचं दहा रुपयांचं शेवटचं नाणं त्या गॅजेटमध्ये ठेवायला तयार होतो, पण एवढ्यावरच थांबेल तो नोविता कसला!! त्याला कळतं की त्या बँकेतून कर्जही घेता येतं आणि तासाला तीस टक्के व्याजावर तो त्या बँकेतून कर्ज घेतो. पुढे जी मजा होते ती त्या एपिसोडमध्येच पाहायला हवी!
डोरेमॉन हे खरं तर एक कार्टून आहे, लहान मुलांना हसवायला आणि त्यांचं मनोरंजन करायला ते बनवलेलं आहे, त्यामुळे त्याला फार गांभीर्यानं घ्यायची आणि त्या कार्टूनचा संबंध एका मर्यादेपलिकडे वास्तवाशी जोडायची गरज नाही, पण या एका भागात मात्र सुखवस्तू घरात लहानाचं मोठं होणाऱ्या मुलांच्या मनात पैसे साठवण्याविषयीची उदासीनता फार मजेशीर रीतीनं मांडलेली आहे असं मला वाटलं. अर्थात, नोबिताच्या पात्राचं वय लहान आहे आणि त्या वयात तो अर्थसाक्षर असेल अशी अपेक्षा ठेवणं वेडेपणाचं आहे, पण उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिलं तर सुखवस्तू घरातली बरीच मुलं-मुली मोठी झाली तरी आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत नोबितापेक्षा फार मोठी झालेली नसतात असंच मला वाटतं. फार लांब कशाला, माझ्या आर्थिक अनभिज्ञतेला मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे, पण या अनभिज्ञतेचा दोष केवळ माझाच आहे असं मला वाटत नाही.
वरकरणी पाहिलं सुखवस्तू घरात लहानाचं मोठं होणाऱ्या मुलांना पैसे मिळवण्यासाठी विशेष कष्ट करावे लागत नाहीत असं एक चित्र दिसतं. मलाही कधी लागले नाहीत. मागितलेली वस्तू मिळणं, पन्नास, शंभर, पाचशे प्रसंगी हजार दोन हजार या रकमा किरकोळ वाटणं, सेव्हिंग आणि फायनान्शिअल प्लॅनिंग विषयी खोलात जाऊन विचार न करणं, ज्या गोष्टी नसल्या तरी आयुष्यात फार फरक पडत नाही अशा गोष्टींवर खर्च करताना 'सेकंड थॉट्स'ना संधी न देणं या गोष्टी बाकीच्यांच्या जाऊदेत, मी माझ्या स्वतःच्या आयुष्यातही अनुभवलेल्या आहेत, हे अर्थात तोपर्यंतच, जोपर्यंत मी पैशाकडे गांभीर्याने पाहायला शिकलो नाही, स्वतः कमवून खर्च करण्याची वेळ माझ्यावर आली नाही, पण तोपर्यंतच्या काळात माझ्या व्यक्तिमत्त्वाचं फायनान्शियल कॅरॅक्टर मात्र खूप फ्लुईड होतं.
ज्या काळात मी लहानचा मोठा झालो त्या काळात डिजिटल ट्रांझॅक्शन, डेटा ऍग्रीगेशन सारख्या गोष्टी आजच्या इतक्या प्रचलित नव्हत्या, त्यामुळे माझ्या खर्चाविषयी माझ्या आई-बाबांशिवाय ते पैसे ज्यांना मिळायचे असे लोक वगळले तर तिसऱ्या कोणाला माहिती नव्हती आणि ती असायचं काही कारणही नव्हतं, पण आर्थिक व्यवहारांना डिजिटल प्लॅटफॉर्म्सची पार्श्वभूमी मिळायला लागल्यापासून मात्र माझ्या खर्च करण्याच्या सवयींविषयीची माहिती 'जमा' होऊ लागली आणि जमा झालेली ही माहिती निव्वळ माहिती न राहता ती कमोडिटी झाली. माझ्या आर्थिक व्यवहारांचे डिजिटल ट्रेसेस जिथे जिथे म्हणून उमटत आले तिथे प्रत्येक ठिकाणी ते तिसऱ्या व्यक्तीला म्हणजे 'थर्ड पार्टी'ला पाहण्यासाठी उपलब्ध झाले आणि माझं फायनान्शियल कॅरॅक्टर ओळखून त्याला चुचकारण्याचे विविध मार्ग अनेकांना उपलब्ध झाले आणि माझ्यापाशी खऱ्या-खुऱ्या जगात थेट पोहोचण्याऐवजी त्यांना सोशल मिडियावरच्या 'पर्सनलाईझ्ड टार्गेटेड' जाहिराती अधिक 'इकॉनॉमिक' वाटू लागल्या. माझं 'कॅरॅक्टर' इतरांच्या स्वार्थाचं साधन बनलं.
ही फक्त माझीच गोष्ट आहे असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे असंच म्हणावं लागेल. ट्रांझॅक्शनसाठी डिजिटल मिडिया वापरणाऱ्या आपल्या सगळ्यांच्याच फायनान्शियल कॅरॅक्टरची केंव्हाच कमोडिटी झालेली आहे. पुण्यातल्या लोकांच्या वार्षिक उत्पन्नावर क्षेत्रनिहाय वर्गवारी केलेला डेटाबेस मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. त्या डेटाबेस मध्ये त्या व्यक्तीचं नाव, त्याच्या घरी किती लोक राहतात, त्या व्यक्तीचं वय आणि प्रोफेशन, त्याचं मासिक आणि वार्षिक उत्पन्न अशी सगळीच माहिती होती.
ही माहिती केवळ वाईट हेतूनेच वापरली जाते किंवा आपली ऐपत आणि सवय पाहून आपल्याला जाहिराती दाखवण्यासाठीच वापरली जाते असं नाही. खर तर, ज्या वस्तू आपण घेणारच नाही त्या वस्तूंच्या जाहिराती दाखवण्याऐवजी ज्या वस्तू आपण घेऊ त्या वस्तूंची अथवा ज्या वस्तू घेऊन आपल्याला 'छान' वाटेल अश्या वस्तूंच्या जाहिराती 'पर्सनलाईझ' करून आपल्यापर्यंत पोहोचवणं हे अगदीच वाईट आणि गैर आहे असंही नाही. जे डिजिटल प्लॅटफॉर्म आपण वापरतो ते आपल्याला विनामूल्य उपलब्ध व्हावेत आणि ते विनामूल्यच राहावेत यासाठीचा तो छोटासा ऐच्छिक त्याग असतो. त्याला खरं तर त्यागही म्हणता नाही येणार, दानच म्हणावं लागेल, कारण 'टर्म्स आणि कंडिशन्स' आपण 'ऍक्सेप्ट अँड कंन्टीन्यू' करतो तेंव्हाच या दानपत्रावर आपण आपली डिजिटल स्वाक्षरी केलेली असते.
ज्याच्या त्याच्या आर्थिक व्यव्हरांशी निगडित माहितीचं असं एकत्रिकरण झाल्यानं बँकांना सर्वसामान्य लोकांची पत ठरवणं आणि त्यांना कर्ज देताना काळजी घेणं आता अधिक सोपं झालंय. 'क्रेडिट रिस्क मॅनेजमेंट'च्या कामात मोठ्या प्रमाणावर सुलभीकरण आणि सुसूत्रीकरण झालंय. जाहिराती पर्सनलाईझ झाल्यामुळं जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाची मर्यादा ऑप्टिमाईझ करणं शक्य झालंय आणि त्यातून वाचणाऱ्या पैशाची योग्य गुंतवणूक करणं कंपन्यांना शक्य झालंय.
बोलताना आपण एरवी कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात असं बऱ्याचदा म्हणतो. प्रस्तुत चर्चेच्या पार्श्वभूमीवरही ते (शब्दशः) खरं ठरतं आणि ते खरं ठरताना पाहिल्यावर मला असं वाटतं की शाळेमध्ये निबंधासाठी दिला जाणाऱ्या 'विज्ञान: शाप की वरदान' या विषयाचं शीर्षक बदलून ते ''विज्ञान: शाप 'आणि' वरदान' असं ठेवायला हवं. कारण आपलं जग आता बायनरी पद्धतीने चालणाऱ्या वेगवेगळ्या प्लेटफॉर्म्सच्या दिशेने पूर्णतः झुकत चाललेलं असलं तरी आपलं जगणं मात्र अजूनही एक आणि शून्याच्या मध्येच कुठेतरी सुरू असतं. त्यामुळे आपल्या समोर येणाऱ्या गोष्टींची 'आयदर आणि ऑर' अशी विभागणी करण्याच्या शिकवणीऐवजी दोन्ही बाजूंचा तौलनिक अभ्यास करण्याचे 'संस्कार' मुलांवर लहान वयातच करायला हवेत.
वापर आणि अतिवापर किंवा वापर आणि गैरवापर या दोन संज्ञांना परस्परांपासून लांब भिन्न ठेवणारी रेखा खूप धूसर आणि सब्जेक्टिव्ह असते. पूर्वीच्या काळी ही रेषा ठरवण्याचं कार्य परंपरेनेने केलेलं होतं, पण रोज नव्याने येऊ धडकणाऱ्या वैयक्तिक अभिव्यक्तीच्या, तांत्रिक प्रगती आणि त्यातून सुखवस्तू होत चाललेल्या जगाच्या क्रांतीभूत वादळामुळे परंपरांचे हे बुरुज ढासळत चाललेत. मनातला गोंधळ जगात अधिक गडद होऊन उमटू लागलेला आहे. म्हणूनच कदाचित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच आर्टीफिशीअल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जाणत्या लोकांचं, 'येणारं दशक एथिक्सच्या दृष्टीनं महत्वाचं असलेलं दशक असेल' हे निरीक्षण मला आर्टीफिशअल इंटेलिजन्सच्या (कार्य)क्षेत्रापलिकडे असणाऱ्या वास्तवाशी कमालीचं सुसंगत वाटतं. अशावेळी नाण्याची कोणती बाजू योग्य यावर चर्चा करण्यापूर्वी, किंबहुना चर्चा करण्यापेक्षा नाणं- पुन्हा एकदा लिटरली आणि फिगरेटिव्हली खणखणीत कसं असेल याचा अधिक गांभीर्यानं विचार व्हायला हवा आणि तो विचार सुरू व्हावा असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनीच समर्थ म्हणतात तसं "अखंड सावधान", थोडक्यात जागरूक राहायला हवं. रोजच्या आयुष्यात जगताना डोळे 'उघडे ठेऊन' पाहिलं तर सावधानतेचा इशारा देणाऱ्या अनेक घटना घडताना आपल्याला दिसतील. त्या पाहता यायला हव्यात, त्यातले संकेत शोधता यायला हवेत.
मागच्याच आठवड्यात मला अशीच एक जाहिरात माझ्या इन्स्टाग्रामवर दिसली होती. एका मोबाईल ऍप्लिकेशनची ती जाहिरात होती. व्यक्तिगत आर्थिक व्यवहारांच्या नियमनाशी निगडित असलेल्या ऍप्लिकेशनचा 'टार्गेट ऑडिअन्स' आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत नोबिता किंवा त्याच्यासारखाच स्वभाव असणारा अठरा ते चोवीस वयोगटातला असा वर्ग होता जो पाचशे हजार रुपये खर्च करताना फार विचार करणार नाही. हे ऍप्लिकेशन बनवणाऱ्या मंडळींचा 'आम्ही तुम्हाला पैसे वाचवायला मदत करूच, पण त्याहीपुढे जाऊन तुमच्यासाठी ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू' असा दावा होता. तो दावा पुरा करण्यासाठी आपल्याला त्या ऍप्लिकेशनच्या प्लॅटफॉर्मशी आपलं बँक खातं जोडावं लागतं आणि आपल्यावतीने व्यवहार करण्याची परावानगी त्यांना द्यावी लागते.
त्यांचं म्हणणं असं की आपण उद्या एखाद्या ठिकाणी डिजिटली तीनशे साठ रुपये खर्च केले तर तो खर्च राउंड अप करणारी वरची चाळीस रूपयांची रक्कम आपल्या बँकेच्या खात्यातून काढून ते आपल्या वतीने एका विशिष्ट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणार. म्हणजे, त्यांच्या म्हणण्यानुसार तीनशे साठ रुपायांच्या खर्चावर आपण चाळीस रुपये 'सेव्ह' करून इन्व्हेस्ट केले. अशा सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटवर फक्त नोबिताच विश्वास ठेवू शकतो!
पण यात मेख अशी आहे की ते आपल्या अकाऊंट मधून चाळीस रुपये तेंव्हाच काढू शकतील जेंव्हा आपण तीनशे साठ रूपये खर्च केल्याची माहिती त्यांना मिळेल आणि ही माहिती मिळणं वाटतं तेवढं सोपं नाही. त्यामुळे, ही माहिती मिळवण्यासाठी त्यांनी फार मजेशीर शक्कल लढवलेली आहे. त्यासाठी हे ऍप्लिकेशन आपल्याला आलेल्या टेक्स्ट मेसेजेसचा डाटा स्कॅन करत राहतं. म्हणजे, समजा आपण गुगल पे किंवा फोन पे किंवा तत्सम मार्गानं पैसे खर्च केले, तर आपल्या अकाऊंट मधून अमुक रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज आपल्याला येतो. हा मेसेज ते ऍप्लिकेशन वाचणार आणि आपल्याला "एवढे पैसे गुंतवू" असा सल्ला आपल्याला देणार.
थोडक्यात आपण पेमेंट साठी कोणता क्लएन्ट वापरतो, किती पैसे खर्च करतो, कुठे खर्च करतो, किती फ्रिक्वेन्टली खर्च करतो, खर्चाच्या तुलनेत सेव्हिंगसाठी किती रक्कम आपण अप्रुव्ह करू शकतो, खर्च डेबिट कार्ड वरून केला असेल तर अकाऊंट मध्ये बॅलन्स किती, एकापेक्षा अधिक कार्ड्स आपल्याकडे असतील तर ती कोणत्या बँकेची आहेत, त्या बँक अकाऊंट मध्ये आपला बॅलन्स किती, आपण ऑटो-डेबिट वर एखादी सर्व्हिस ठेवली आहे का, आपल्याला इतर कोणकोणत्या जाहिरातदारांचे मेसेजेस येतात ही आणि अशी अनेक प्रकारची माहिती निव्वळ मेसेजेस मध्ये येणार डेटा स्कॅन करू हे ऍप्लिकेशन जमा करू शकतं. त्याचा वापर कसा होऊ शकतो याचा उल्लेख वर येऊन गेलेलाच आहे.
आता या ऍप्लिकेशनच्या दोन्ही बाजू पहायच्याच तर आर्थिक बचतीचं फारसं महत्व न काळणाऱ्या तरुण वर्गाचे काही पैसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवण्यासाठी मदत करणं, ती प्रोसेस ऑटोमेट करणं ही या ऍप्लिकेशनची जमेची बाजू आहे.
क्रेडीबीलिटी टिकवण्यासाठी ही गुंतवणूक चांगल्या ठिकाणी होईल अशी आशाही आपण बाळगू शकतो, पण त्याचवेळी आपण ही गोष्ट विसरता काम नये की बचत ही खर्च कमी करून केली जाते आणि हे ऍप्लिकेशन त्याच्या नेमकं उलट, बचतीसाठी अधिक खर्च करायला उद्युक्त करतं. त्यासाठी बिहॅविअरल चेंजचा उपयोग ते करतं आणि हे सगळं करताना जमा झालेल्या माहितीचा अर्थातच शक्य त्या मार्गाने 'उपयोग' करून घेतं.
आता यात नेमकं चूक कोण आणि बरोबर कोण असा प्रश्न पडू शकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर खूपच सोपं आहे. यात ना कोणी चुकीचं आहे ना बरोबर, कारण यातला प्रत्येकच जण आपल्या स्वभावाप्रमाणं वागतोय. ज्याला असं एखादं ऍप्लिकेशन बनवावं असं सुचलं त्याने हे ऍप्लिकेशन बनवलं, जे फायनान्शियल नोबिता होते, ते फायनान्शियल नोबिताच होते. ते भुलले. ज्यांना डेटा हवा होता त्यांनी डेटा मागितला आणि ज्यांना डेटा देणं शक्य होतं त्यांनी तो दिला.
पायरेट्स ऑफ कॅरेबिअनच्या एका भागात जॅक स्पॅरो म्हणतो, 'इट इज ऑल अबाउट व्हॉट अ मॅन कॅन डू अँड कान्ट डू" जगही असंच चालतं, शक्यतांवर. त्यामुळे आपणही अशाच एखाद्या योजनेचा भाग आहोत का? एखादा प्रॉपोगांडा आंधळेपणाने वाहून नेणारे वाहक आहोत का? हे असे प्रश्न पाडायलाच हवेत. कारण हे असं होत असणं आणि त्याची जाणीव आपल्याला नसणं अगदीच शक्य आहे. समर्थांच्या "अखंड सावधान" या संदेशाची जाणीव पुनःपुन्हा होते ती याचसाठी. हॅरी पॉटरच्या चौथ्या भागात मॅड आय मूडीसुद्धा हॅरीला हेच सांगतो- अखंड सावधान.
सावधानता, जागरूकता किंवा अजून थोडं पुढे जाऊन स्पेसिफिकली बोलायचं झालं तर 'सेल्फ अवेअरनेस' आणि त्याहीपुढे जाऊन सांगायचं झालं तर 'अवेअरनेस ऑफ सेल्फ' ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आजच्या घडीला तर अधिकच, कारण निदान अजून तरी 'अवेअरनेस ऑफ सेल्फ' हा मनुष्य अणि आर्टीफिशिअल इंटेलिजन्समधला डिस्टिंगविशिंग फॅक्टर आहे. आपण तो जपला नाही तर आपलं अस्तित्व वेगवेगळे 'संस्कार' आणि रिझल्टंट 'संस्कृती' नावाच्या अल्गोरिदममध्ये अडकलेल्या एका कंसिस्टंट डेटा पॉईंट पेक्षा मोठं आहे असं आपण म्हणू शकणार नाही आणि या शक्यतेने आजच्या घडीला आपल्याला फार मोठा फरक पडत नाहीए असं वाटलं तरी अजून काही दशकांनी ही शक्यता मनुष्याच्या इतिहासातली सर्वात मोठी शोकांतिका ठरेल हे निश्चित.
सौरभ राघवेंद्र.