•mr•

<!--[if gte mso 9]>

निवडणुका येताहेत, त्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपचं रणकुंड चांगलंच धगधगतंय. त्यात त्या गुगलला काय वाटलं कोण जाणे- माझ्या युट्युबच्या रेकमंडेड लिस्ट मध्ये सुद्धा राजकीय संदेशानं भरूभरून वाहणारे व्हिडीओ! ट्विटर आणि इंटरनेटवर बातम्यांचा पाउस तर अव्याहत पणे सुरूच असतो. त्यात हे फेसबुक. इथे पण चित्र काही वेगळं नाही. त्यात झुकरबर्ग साहेबांना इथेही पॉप्युलर अक्रॉस फेसबुक नावाचा कचरा लोकांच्या भिंतीवर आणून ओतायची सवय. असं वाटत होतं की एवढ्या सगळ्या कंटेंटचं विष भिनत चाललंय अंगात, रक्तात, मेंदूत आणि मनात. मग ह्या टॉक्झीफिकेशन वर अॅंटीडोट म्हणून डिजिटल डिटॉक्स नावाची एक भन्नाट कल्पना मला माझ्या मैत्रिणीने मागे एकदा सुचवलेली होती, ती पुन्हा अमलात आणली, आणि मारली एक्झिट सगळ्या सोशल अकाऊंट्स वरून.

पहिला फटका दिला तो फेसबुकला. दुसरा ट्विटरला. तिसरा युट्युब आणि चौथा इंटरनेट वरच्या बातम्यांना. इतकंच काय मेल सुद्धा मी आठवड्यातून सोमवार आणि बुधवार ह्या दोनच दिवशी पाहिले मागचा पूर्ण महिना. राहता राहिलं व्हॉट्सअॅप. नरेंद्र मोदींच्या येऊ घातलेल्या सिनेमामध्ये त्यांनी सन्यास वगैरे कसा घेतला हे सांगणारा एक सिक्वेन्स आहे. त्या सिक्वेन्स वरून सिनेमा रिलीज होण्याआधीच पोरानं प्रेरणा घेऊन काशी-बिशी गाठली की काय अशी शंका येऊ नये म्हणून व्हॉट्सअॅप तेवढं सुरु होतं; पण मी तत्त्वाचा पक्का, सिद्धांतवादी. म्हणून मग डी.पी. काढून ठेवला होता आणि ब्लू टिक ऑफ.

ह्या दरम्यान माझ्या सडन एक्झिटमुळे मला जवळच्या काही मित्र-मैत्रिणींनी ब्रेक-अप वगैरे झालंय का? काही सिरिअस मॅटर आहे का? कुठल्या परीक्षेचा अभ्यास वगैरे करतोयस का? असे अनेक प्रश्न आडून आडून तर कधी समोरून विचारले. त्यावर “असं काही नाहीये- डिजिटल डिटॉक्स करतोय” असं खरं-खुरं सांगितल्यावर “चल काही तरीच तुझं!” असं म्हणून खरं काय ते सांग अशी गळ घातली. अखेर त्यांच्या प्रश्नाचं त्यांना अपेक्षित खोटं खोटं उत्तर देऊन त्यांना खरं वाटल्यावर त्यांनी फोन ठेवल्यावर मग कुठे समाधान मिळालं- मलाही आणि त्यांनाही.

बाय द वे, मला विचारण्यात आलेल्या प्रश्नाची उत्तरं देता देता माझ्या ब्रेक अप्सचा आकडा एव्हाना सहा वर जाऊन पोहोचला आहे. मी चार पाच वेगवेगळ्या परीक्षांची ‘एकाच वेळी’ तयारी करतो आहे आणि अशाच काही तरी चार सहा मजेशीर गोष्टी- आपल्या म्यूच्युअल्सकडून तुमच्यापैकी कोणाच्या ऐकिवात आल्या तर “हो का? मला माहिती नव्हतं!” असं उत्तर देऊन वेळ सणसणीतपणे मारून न्यावी अशी विनंती. (मला ह्या गोष्टी विचारणारे लोक माझे मोठे लेख सहसा वाचत नाहीत, त्यामुळं त्यांना मी हे असं लिहिलेलं कळेल असं मला वाटत नाही.)

असो.

गमतीचा भाग जाऊ दे. तर सांगायची गोष्ट ही की डिजिटल डिटॉक्सचं पिल्लू माझ्या डोक्यात सोडणाऱ्या मैत्रिणीला मी काल भेटलो होतो. तेंव्हा आमची ह्या विषयी चर्चा झाली. (ती माझे लेख वाचते, पण तिच्या परवानागीने मी आमच्या चर्चेचा सारांश इथे लिहितोय. सो ऑल ओके.)

ती म्हणाली, “डिजिटल डिटॉक्स वगैरे सगळं ठीक आहे रे; पण ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण किती पळणार आणि कुठवर? धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी त्याची गत. त्यात फोमो असतोच की रे आपल्याला. हां, आता तू एक अजब प्राणी. त्यामुळे तुला नसेल फोमो वगैरे- पण असतोच ना रे तो. शिवाय एखाद्याचं अकाऊंट स्टॉक करायचं तर पुन्हा उघडावं लागेलच की फेसबुक. आता सौरभ, तू एक नाहीस करत असलं काही स्टॉक-बिक, माहितीये मला- पण मी करते आणि सॉरी नो सॉरी. आय अॅम अनअपोलोजेटिक अबाउट ईट.”

आता मी तिला सॉरी म्हण असं सांगेन असं तिला असं का वाटलं कोण जाणे. ती सॉरी नो सॉरी म्हणून आय अॅम अनअपोलोजेटिक असं सांगून मोकळी झाली सुद्धा. मी म्हटलं, “बरं बाई. नो सॉरी तर नो सॉरी. निघू आता आपण मी. उशीर झालाय मला. घरी जाऊन फेसबुक अॅक्टीव्हेट करायचंय.”

माझ्या ह्या वक्तव्यावर ती गालावरची खाली नाचवत ती खळखळून हसली. आता ह्यात हसण्या सारखं काही नव्हतं खरं तर; पण मला विनोदबुद्धी नाही, आणि मला विनोदबुद्धी आहे अशा दोन स्कूल ऑफ थॉट्स पैकी दुसऱ्या शाळेची ती विद्यार्थिनी, त्यामुळे हा विनोद होता अशी कल्पना करून ती हसली असावी, पण ते बाकी काही असो- आपल्या विनोदावर कोणी असं मोकळं हसलं की बरं वाटतं थोडं. त्यात ती कोणी गालवर खळी आणि डोळ्यात धुंदी टाईप समवयस्क सुंदरवदना असली तर घरी येता येता एक दोन विनोद बाकी जरा जास्तच सुचतात म्हणा.

असो.

तर सांगायचा मुद्दा असा की निवडणुका आल्यात, मतदान करत असाल तर जरूर करा. करत नसाल तर का करत नाही ह्याचं एखादं संयुक्तिक कारण शोधून ठेवा. मागच्या वेळी एकाने बोटावरची शाई बरेच दिवस तशीच राहते म्हणून मतदान करत नाही असं सांगितलं होतं. आम्ही सगळे त्याच्यावर खूप हसलो होतो. एवढं की त्यानं ठरवलं, २०१९ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत तो दहाच्या दहा बोटांना शाई लावून घेणार आणि आम्हाला दाखवणार. तो आणि तो बूथ वरचा शाई लावणारा मनुष्य- बघून घेतील त्यांचं ते; पण मतदान करणं जसा आपलं अधिकार आहे, तसंच ते न करण्याचं स्वातंत्र्यसुद्धा किमान अजून तरी घटनेनं अबाधित ठेवलंय बरं. शेवटी व्यक्त न होणं हे वेगळ्या प्रकारे व्यक्त होणंच आहे.

आणि सांगायचा दुसरा मुद्दा असा, की डिजिटल डिटॉक्स वगैरे सगळं झूट असतं हो शिवाय कसंय- डोळे मिटून बसलं की शेवटी आपल्या पुरताच अंधार होतो आणि लख्ख उजेडी घडणाऱ्या घटना पटलावर स्थिरावतील म्हणेपर्यंत निसटतात.डोळे उघडे ठेवणं आणि विषारी साप दिसला की त्याला--- ठेचायचं नाही. गाय असूदे किंवा साप. प्राणीहत्या हे पाप असतं. (रात्रीच्या जेवणात गावरान चिकन हाणून आल्यावर लिहिता लिहिता खांद्यावरून घसरणारं जानवं सांभाळताना हे लिहितो आहे त्यामुळं, थोडं विचित्र वाटतंय, पण असो.) त्यामुळं, असा साप दिसला की त्याला जंगलात सोडून यायचं.

वस्तुस्थिती कितीही विदारक असली (आहे असं मी म्हणत नाही- उगाच वादाला तोंड कशाला!), परिस्थिती कितीही भयानक असली (मागच्या कंसातलं पुन्हा वाचणे), वर्तमान कितीही निष्ठुर असला (तुम्हाला माहितीये काय करायचं), काळ कितीही कठोर असला (पुन्हा नको न सांगायला?) तरी त्याच्यापासून पळून जाण्यात शहाणपण नसतं. तुमच्या कोण्या सुंदर मैत्रिणीनं डिजिटल डिटॉक्स नावाची एक गोड झुळूक तुमच्या कानाशी हळुवार खेळवली तरीसुद्धा- जे आहे त्याच्यापासून पळून जाण्यात फारसा अर्थ नसतो. पाण्यात पडलं की पोहावंच लागतं आणि पोहायचं असेल तर पाण्यात उडी मारावीच लागते. पाणीच ओलं असतं, अंगंच ओलं झालं, चड्डी लवकर वाळतच नाही असं काही-बाही म्हणून डोळ्यातून पाणी काढत बसलं तर चालत नाही.

असो.

तेंव्हा सोशल मिडियावरती चालताना आजूबाजूला सरपटणाऱ्या अविचारांना, प्रचारकी थाटातल्या शेकडो पोस्ट्सना, जाता जाता थोडा फार विचार करून चार पुस्तकं लिहून वर गेलेल्या माणसांचे शांतताप्रिय विचार पटवून देण्यासाठी कचकावून भांडणाऱ्या लोकांच्या अभिव्यक्तीला, राजकीय जाहिरातींना- आपल्या संयमाच्या आणि सामंजस्याच्या काठीचा धाक दाखवला की त्यांच्यातलं विषच निघून जातं हे लक्षात, मग भिनतंय कसचं बोडक्याचं!

-सौरभ राघवेंद्र.

ता. क. ह्या लेखामधली पात्ररचना खरी असेलच असं नाही. ह्या लेखामधली पात्ररचना खरी नसेल असही नाही. तुमचा उल्लेख येऊन गेला असेल तर कॉमेंट मध्ये मला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सब्स्क्राइब करा, बेल आयकॉनची घंटा दाबा, उदबत्ती पेटवा, धूप लावा, देवाला नमस्कार करा, एकशेएकवीस प्रदक्षिणा घाला, रात्री पाय दुखायला लागले तर माझं ऐकून एकशे एकवीस प्रदक्षिणा घातल्या म्हणून मला शिव्या घाला, मला शिव्या घालता घालता पायाला आयोडेक्स चोळा (माझा मित्र आयोडेक्स ला आयोडेस्क म्हणतो हे माझ्याकडून तुम्हाला कळलं हे विसरून जा) ही अशी सगळी बडबड युट्युब वर असते. त्यामुळे इथे मी असलं काही करणार नाही, आणि तुमचा वेळाही घेणार नाही. त्यामुळे जाता जाता माझ्या ह्या सूज्ञपणाबद्दल मनापासूनआभार मानून, माझ्या लेखनकौशाल्याचं तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या (विशेषत: मैत्रिणींच्या) गराड्यात मनमोकळं कौतुक करा.

आणि हो, मिस ‘गालवर खळी’- आपण पुन्हा भेटूच लवकर.