कोव्हिड आणि लहान मुलं !
काल लिफ्टची वाट पहात उभा होतो तेंव्हा आमच्याच मजल्यावर राहणाऱ्या एका छोट्या मुलीचा तिच्या आईशी चाललेला संवाद माझ्या कानावर पडला. त्या छोट्या मुलीचं नाव- रेवा. वय पाच वर्षं. रेवाला खलच्याच मजल्यावर…
काल लिफ्टची वाट पहात उभा होतो तेंव्हा आमच्याच मजल्यावर राहणाऱ्या एका छोट्या मुलीचा तिच्या आईशी चाललेला संवाद माझ्या कानावर पडला. त्या छोट्या मुलीचं नाव- रेवा. वय पाच वर्षं. रेवाला खलच्याच मजल्यावर राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्या घरी खेळायला जायचं होतं, पण वेळ दुपारची होती आणि रेवाच्या आईला आधी रेवाला झोपवून स्वत:सुद्धा झोपायचं होतं. त्यामुळे आई रेवाला बाहेर जाऊ देत नव्हती. रेवाचा हट्ट अखंड चालूच होता. तिची आई शेवटी कंटाळून म्हणाली, "हे बघ रेवा, खाली डॉक्टर आलेत कोरोनाला घेऊन जायला. तू गेलीस तर तुला पण घेऊन जातील, कळलं ना? जायचंय का तुला डॉक्टर काकांबरोबर ?" त्यावर रेवा केविलवाण्या आवाजात नाही म्हणाली आणि आतल्या खोलीत जाऊन बसली.
कोरोना नावाचा हा प्रकार नवीन होता, त्याच्या परिणामांचं दीर्घकालीन स्वरूप आणि गांभीर्य नुकतंच जाणवू लागलं होतं तेंव्हा कोरोनाच्या सामाजिक परिणामांचं विश्लेषण करताना अनेक वेगवेगळे युक्तिवाद समोर येत होते. कोरोना नंतरचं जग कोरोनापूर्वीच्या जगाप्रमाणं असणार नाही हा या सगळ्या युक्तिवादांमधला समान धागा होता, ज्याची सत्यता आपण सगळ्यांनी पाहिलेली, अनुभवलेलीच आहे, पण यात गमतीचा एक भाग असा आहे की आपण हा फरक पाहू शकलो, अनुभवू शकलो कारण कोरोनाच्या आगमनापूर्वी जे जग होतं ते आपण पाहिलेलं आणि अनुभवलेलं होतं.
कोरोनानंतरच्या जगातला वेगळेपणा समजून घेण्यासाठी, त्याच्याविषयी अनुमान बांधण्यासाठी आणि त्याचा वेगळेपणा अनुभवण्यासाठी त्या जगाची आधीच्या जगात असणाऱ्या स्थितीशी तुलना होणं आवश्यक असतं. अशी तुलना करता येण्यासाठी आधीच्या जगाविषयी माहिती असणं आवश्यक असतं. कोरोनाच्या आगमनापूर्वीच्या जगाविषयी आपल्या मनात अर्थातच थेट अनुभवातून आणि इतर स्त्रोतांच्या माध्यमातून मिळालेली माहिती आपल्यापाशी 'बाय डिफॉल्ट'च होती. या लहान मुलांचं मात्र तसं नाही.
आपण कोणतीही नवी गोष्ट शिकतो, तेंव्हा ती गोष्ट शिकताना आपण जी माहिती आत्मसात करतो ती माहिती आपल्या मनात आधीपासून असणाऱ्या माहितीशी वेगवेगळ्या प्रकारे कनेक्ट होत असते. या कानेक्शन्समधून माहितीचा एक मोठा संच तयार होत असतो आणि त्या संचिताच्या आधारावर आपला आपल्या कळत नकळत स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन घडत असतो. आपल्यापाशी वरकरणी सातत्यपूर्ण भासणाऱ्या माहितीचा साठा असतो ज्याच्या जोरावर आपण नव्याने आत्मसात होणारी माहिती या साच्याशी सुसंगत आहे की विसंगत हे ठरवू शकतो. कोरोनासारख्या रोगाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर साथ येणं, किंवा ती येणं शक्य आहे हे आपल्यापैकी बहुतेक जणांना 'माहित'च नसल्यानं सुरवातीच्या काही काळासाठी जोपर्यंत आपण कोरोनाशी 'जुळवून' घेऊ शकत नव्हतो, तोपर्यंत कोरोना आपल्याला आपल्या आयुष्याशी विसंगतच वाटत होता, पण आता जुळवून घेतल्यानंतर त्याची संगत आपल्याला चांगलीच ओळखीची झालेली आहे.
लहान मुलांच्या बाबतीत, विशेषतः रेवाच्या किंवा तिच्या पेक्षा साधारण तीन-चार वर्षं पुढं असणाऱ्या वयाच्या मुलांच्या बाबतीत मात्र गोष्ट थोडी वेगळी आहे. त्यांच्या संचितामध्ये कोरोनापूर्वीच्या जगाविषयी फारशी माहिती नसल्यानं किंवा त्या माहितीमधलं सातत्य आपण होऊन सिद्ध व्हावं एवढा अनुभव त्यांच्यापाशी नसल्यानं आपल्यासाठी न्यू नॉर्मल असणारं जग त्यांच्या दृष्टीने नॉर्मलच असणार आहे. त्यांच्या जगाविषयीच्या माहितीच्या बेंचमार्किंगची सुरुवात ज्या माहितीपासून होईल त्या माहितीमध्ये अशा अनेक गोष्टी असणार आहेत ज्या कोरोना नसता तर कधीच नसत्या. परिणामी माहितीचा हा संच घेऊन ही पिढी जेंव्हा मोठी होईल आणि काही काळाने आपल्यासाठी न्यू नॉर्मल असणारं जग आपल्या दृष्टीने आपल्यासाठी नॉर्मल असणाऱ्या, आपण कोरोनापूर्वी अनुभवलेल्या नॉर्मल्सीच्या जवळ जाईल तेंव्हा ही मुलं त्या जगाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतील तो दृष्टीकोन समजून घेणं आपल्यासाठी खूप कुतूहलाचं असेल!
या कुतूहलापोटीच मला 'कोरोनाला पकडून नेणारे डॉक्टर काका' असं ऐकल्याबरोबर शांत बसणाऱ्या रेवाची गंमत वाटते. तिच्या मनात कोरिणाविषयी नेमकं काय चित्र असेल, चार गोष्टी काळण्याइतपत तिचं वय होईल तेंव्हा तिच्या बालपणाविषयी ती कशी व्यक्त होईल या गोष्टी जाणून घेण्याविषयी उत्सुकता वाटते. एकीकडे गॅजेट्स आणि डिजिटल विश्वाच्या कचाट्यातून लहान मुलांना लांब ठेवायला हवं असं आपण म्हणत असताना त्यांचं सगळं शिक्षणच फोन आणि कॉम्प्युटरवर होत असेल तर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याविषयी चिंता वाटते. या गोष्टींशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत ज्याविषयी माझ्या मनात संमिश्र भाव आहेत आणि या गोष्टी केवळ या मुला-मुलींविषयीच नाहीत तर त्यांच्या पालकांविषयीसुद्धा आहेत.
कोरोना काय आहे, कसा आहे त्याचं गांभीर्य किती हे तुम्ही आम्ही समजू शकलो, पण या लहान मुलांना ते समजावून सांगताना आणि गेल्या वर्षभराच्या काळात त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया हाताळताना या वयोगटातल्या मुलांच्या पालकांनी काय-काय अनुभव घेतलेले आहेत याविषयी जाणून घ्यायची मला मनापासून इच्छा आहे. कोरोना म्हणजे काय? तुम्ही बाहेर खेळायला का जाऊ शकत नाही? तुझे मित्र-मैत्रिणी आपल्या घरी का येऊ शकत नाहीत? तुझी आई आणि तुझे बाबा हल्ली रोजच घरी का असतात? लॅपटॉपसमोर बसून ते दिवसभर नेमकं काय करतात? तुला पाळणाघरात का जाता येणार नाही? लॉकडाऊन म्हणजे काय, क्वॉरंटाईन म्हणजे काय? तुझ्या आजोबा किंवा आज्जीला कोरोना झाला म्हणजे नेमकं काय झालं? अशा आपल्याला सध्या सरळ वाटणाऱ्या प्रश्नांची एखाद्या चिकित्सक मुलाला किंवा मुलीला उत्तरं देताना या पालकांची काय धांदल उडाली असेल ते हे पालकच जाणोत!
याहीपुढे जाऊन ज्यांच्या कुटुंबाला आर्थिक अस्थिरतेनं ग्रासलं, ज्यांच्या घरातल्या कर्त्या व्यक्तीनं नोकरी गमावली, जे आर्थिक चणचणीला सामोरे गेले, ज्यांच्या घराने मृत्यू पाहिले, ज्यांच्या घरी सक्तीच्या कैदेमुळे नवरा-बायकोच्या, सासू-सुनेच्या नात्यात अनपेक्षित तणाव निर्माण झाले, डोमेस्टिक व्हायोलन्सचे प्रसंग अजून जास्त प्रखरपणे समोर आले अशा घरांत पालकांनी या मुलांना कसं सांभाळलं आणि 'इम्प्रेशनेबल'एजमध्ये असणाऱ्या या लहान मुलांनी या दरम्यान नेमकं काय-काय आत्मसात केलं याविषयीची याक्षणी केवळ कल्पनाच होऊ शकते. स्थलांतरित मजुरांच्या, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातल्या मुलांविषयी तर कल्पनाच होऊ शकत नाही!
कोरोना नवा होता, लॉकडाउनही नुकताच सुरू झालेला होता तेंव्हा काही मित्र-मैत्रिणींशी माझी कोरोना आणि परिणामस्वरूप बदलू शकणारी कलात्मक अभिव्यक्ती याविषयीभोवती खूप छान चर्चा झाली होती. त्या चर्चेत रेवा आणि तिच्या वयाच्या लहान मुलांविषयी आम्ही पुष्कळ वेळ बोललो होतो. याविषयीचं आमचं प्रत्येकाचं आकलन स्वतंत्र होतं, पण एका मुद्दयावर मात्र आमच्या सगळ्यांचं एकमत झालं होतं. 'बाकी काही होवो; पण या लहान मुलांना लहान वयातच मोठं व्हावं लागू नये!' इतकाच तो मुद्दा.
- सौरभ राघवेंद्र.