•mr•

कोव्हिड-१९ | भाग २ | 'व्हायरस व्हायरस'

व्हायरस किंवा विषाणू म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करणारा एक संक्रामक घटक. हे विषाणू नेमके कसे असतात किंवा त्यांचं नेमकं स्वरूप काय आहे या प्रश्नावर शास्त्रज्ञांनी कित्येक वर्षं चर्चा, संशोधनं केलेल…

व्हायरस किंवा विषाणू म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करणारा एक संक्रामक घटक. हे विषाणू नेमके कसे असतात किंवा त्यांचं नेमकं स्वरूप काय आहे या प्रश्नावर शास्त्रज्ञांनी कित्येक वर्षं चर्चा, संशोधनं केलेली आहेत. त्या घटकाकडे आत्तापर्यंत विषस्वरूप अणू, जैविक घटक, जैविक रसायनांचा समुच्चय अशा विविध दृष्टीनं पाहिलं गेलेलं आहे. सजीव आणि निर्जीव ह्या दोन्ही संकल्पनांविषयीच्या आपल्या कल्पनांना चॅलेंज करणारा व्हायरस आकाराने अत्यंत लहान असतो. त्याचा आकार मोजण्यासाठी नॅनोमीटर हे परिमाण वापरावं लागतं. नॅनोमीटरमध्ये आपल्या एका केसाची जाडी आपण मोजली तर ती साधारण ऐंशी हजार ते एक लाख नॅनोमीटर इतकी भरते तर एखाद्या व्हायरसचा पारिघ साधारण वीस ते अडीचशे नॅनोमिटर्स एवढा असतो. यावरून एका केसावर किती व्हायरस बसू शकतील याची कल्पना नक्कीच येऊ शकते!

पुनर्निर्मिती करता येणं हे सजीवांचं एक मूलभूत लक्षण पण शक्यतो कोणताही व्हायरस स्वत:च्या बळावर स्वत:ची पुनर्निर्मिती करू शकत नाही, त्याच्यासाठी त्याला जिवंत पेशीचा आधार घ्यावा लागतो आणि ह्या प्रक्रियेमध्ये त्या पेशीच्या नियत कार्यात हा विषाणू अडथळे निर्माण करतो.

व्हायरस हा शब्द ज्या मूळ लॅटिन शब्दापासून निर्माण होतो, त्या शब्दाचा अर्थ विष असा आहे. जेंव्हा ह्या विषाणुंचं अस्तित्व संशोधकांच्या प्रथम लक्षात आलं होतं तेंव्हा त्यांना ते बॅक्टेरिया प्रमाणे कार्य करणारे पण आकाराने लहान असणारे घटक आहेत असं जाणवलं. पण पुढे एकोणीसशे पस्तीस साली वेंडेल आणि इतर काही संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये व्हायरस नावाच्या घटकात काही जैविक रसायनं आहेत, पण मेटाबोलीझम किंवा चयापचयक्रियेसाठी आवश्यक घटक त्यात नाहीत असं त्यांच्या लक्षात आलं.

पुढे यथावकाश होत गेलेल्या संशोधनात असं लक्षात आलं की व्हायरस न्यूक्लिक असिड्स म्हणजेच- आरएनए किंवा डीएनए यांचा बनलेला असतो आणि त्याच्याभोवती प्रोटिन्सचं आवरण असतं. असा व्हायरस जेंव्हा एखाद्या पेशीमध्ये प्रवेश करतो, तेंव्हा त्याच्या भोवती असलेलं प्रोटिनचं आवरण निघून जातं, त्या पेशीच्या पुनर्निर्मिती करणाऱ्या संरचेनच्या मदतीनं व्हायरस पुन्हा तशाच व्हायरल प्रोटिन्सची निर्मिती सुरु करतो आणि अशा पद्धतीनं संसर्ग वाढत जातो. कोरोनाव्हायरसही याच पद्धतीनं काम करणार एक व्हायरस.

कोरोनाव्हायरस हे मुळात एक विशिष्ट व्हायरसचं नाव नाही. ते व्हायरसच्या एका समूहाचं नाव आहे. या समूहातले व्हायरस अत्यंत क्षुल्लक विकरांपासून थेट जिवावर बेतणाऱ्य अनेक आजारांना कारणीभूत ठरतात. एसएआरएस आणि एमएआरएस हे दोन आजार कोरोनाव्हायरसशी निगडीत आहेत आणि याच समूहातल्या एसएआरएस-सीओव्ही-2 ह्या व्हायरसमुळे पसरलेल्या कोरोना या साथीच्या रोगाशी सध्या संबंध मानवजात दोन हात करते आहे.

एसएआरएस म्हणजे सिव्हीअर अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम. थोडक्यात श्वासना-संबंधीचा गंभीर विकार.

कोरोनाव्हायरस मुळे पसरलेली एसएआरएसची पहिली साथ चीनने सतरा वर्षांपूर्वी अनुभवलेली होती. त्यानंतर थेट मागच्या वर्षी, म्हणजे डिसेंबर ३१ २०१९ रोजी चीनने गंभीर आजार पसरवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या कोरोनाव्हायरसच्या नव्या प्रजातीबद्दल बद्दल वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला माहिती दिली आणि एसएआरएस-सीओव्ही-२ असं त्याचं नामकरण करण्यात आलं. सुरुवातीला चीनच्या वुहान प्रांतापुरता मर्यादित असणाऱ्या कोरोंनानं आजच्या तारखेपर्यंत म्हणजे मार्च २०, २०२० पर्यंत दहा हजार चारशेसहा बळी घेतलेले आहेत.

एखाद्या साथीच्या रोगामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण दगवण्याची जगाच्या इतिहासामधली ही पहिलीच वेळ नाही. अगदी अलिकडचीच उदाहरणं जरी पहिली, तरी एक लाखापेक्षा आधिक लोकांचे बळी घेणार इबोला, दहा लाख लोकांचे बळी घेणारा हाँगकाँग फ्ल्यू, पाच कोटी लोकांचे बळी घेणार स्पॅनिश फ्ल्यू, दोनशे दशलक्ष म्हणजे जवळपास वीस कोटी लोकांचा बळी घेणार ब्युबोनिक प्लेग मानवजातीनं पाहिला आहे, पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरोंनाचं गांभीर्य समजून घेण्यासाठी काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात.

कोव्हिड-१९ची लागण झाली तरी सुरुवातीच्या काळामध्ये आढळून येणारी लक्षणं ही सर्वसाधारण सर्दी प्रमाणेच असतात. त्यामुळं ह्या रोगाची लागण झाल्यानंतर त्याचं निदान होण्यासाठी लागणार अवधी जास्त आहे. शिवाय या रोगाच्या बऱ्याच केसेस सबक्लिनिकल आहेत, म्हणजे दवाखान्यात तपासणीसाठी जाण्यापूर्वीच आपली रोगप्रतिकारशक्ति एसएआरएस-सीओव्ही-2 ह्या विषाणूचा सामना करते, मात्र त्याच वेळी अशी निरोगी व्यक्ति ह्या व्हायरसची वाहक म्हणून कार्य करू शकते आणि ज्यांची प्रतिकारशक्ति तेवढी सुदृढ नाही, त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता वाढते.

रोगप्रतिकारशक्ति आणि एसएआरएस-सीओव्ही-2 बद्दल फ्लोरियन क्रामर आणि इतर संशोधकांनी केलेलं एक पृथक्करण वेगळा पैलू समोर घेऊन येतं. ह्या व्हायरसचा सामाना माणसांनी याआधी केलेलाच नसल्यामुळं आपण ह्या व्हायरसच्या बाबतीत इम्युनोलॉजिकली नाईव्ह आहोत असं ते म्हणतात.

कोरोओनाच्या च्या फटक्यातून भारत देशही सुटलेला नाही. भारतात मार्च २० पर्यन्तच्या माहिती नुसार कोव्हिड-१९ म्हणजेच कोरोंनाच्या २२३ केसेस रजिस्टर झालेल्या आहेत पैकी पाच जणांना दुर्दैवानं त्यांचा जीव गमवावा लागला. कोरोंनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भारत अनेक उपाययोजना राबवत आहे; पण तरीशी कोरोंनाचा धोका दिवसागणिक वाढतोच आहे.

(क्रमश:)

-सौरभ राघवेंद्र.