चिकित्सा
एका 'प्रख्यात' न्यूजपोर्टलवर पब्लिश झालेली एक बातमी. (बातमीचा स्क्रीनशॉट् वगैरे टाकला तर कॉपीराईटच्या व्हायोलेशनचा प्रॉब्लेम वगैरे होऊ नये म्हणून बातमीची लिंक कमेंट मध्ये देतोय). बातमीचं शीर्षक आहे…
एका 'प्रख्यात' न्यूजपोर्टलवर पब्लिश झालेली एक बातमी. (बातमीचा स्क्रीनशॉट् वगैरे टाकला तर कॉपीराईटच्या व्हायोलेशनचा प्रॉब्लेम वगैरे होऊ नये म्हणून बातमीची लिंक कमेंट मध्ये देतोय). बातमीचं शीर्षक आहे: "छातीत साचलेल्या कफचा रंग सांगू शकतो तुमच्या शरीरातील गंभीर आजार; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला" (स्पॉयलर अलर्ट: अख्ख्या बातमीत कुठेही डॉक्टरांचा 'सल्ला' नाही, विश्लेषण मात्र आहे).
पुढे "हेल्थ टिप्स इन मराठी" असं इंग्रजी अक्षरांत छापून म्हटलंय, "आपल्या कफाचा रंग हिरवा किंवा पिवळा दिसत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. या समस्येची 'जवळून' (बरं का, जवळून!) तपासणी करण्यासाठी डॉक्टर आपल्या (म्हणजे कोणाच्या? पेशंटच्या की आपल्या स्वतःच्या) कफची (जवळून) तपासणी करू शकतात. (करू शकतात, करतीलच असं नाही).
(कंसातले शब्द माझे आहेत. बातमीदाराने त्याचा लोड घेऊ नये).
बातमीमध्ये पुढे सगळीकडेच कफविषयी लिहिताना कफ 'होते', किंवा कफ 'येते' असं लिहिलंय. एके ठिकाणी तर, 'संसर्ग झाल्यास पिवळे कफ दिसतात' असंही लिहिलंय शिवाय गुलाबी कफ विषयी लिहिताना "रक्त आपल्या रक्तवाहिन्यांमधून 'बाहेर येते' तेंव्हा असे होते" असं लिहिलंय. (कोणी सांगावं! जेवण झाल्यावर रात्री येत असावं शतपावलीसाठी- रक्त, रक्तवाहिन्यांच्या बाहेर).
पण काही असो, कोव्हिड टाईम्स पाहता ही अशी बातमी देणं खरंच कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न स्तुत्यच आहे. या बातमीच्या निमित्ताने का होईना, पण तुम्हीही एकदा तपासून घ्या- "तुमच्या नाकाची पृष्ठभाग कोरडी नाही ना?"
बाकी जाळ आणि धूर संगटच करणाऱ्या लोकांच्या छातीत साठलेल्या काळ्या कफ विषयी लिहिताना महाशयांनी "तुम्ही खूप प्रदूषित ठिकाणी श्वास घ्या" असं लिहिलंय. (बातमीच्या हेडिंगमध्ये डॉक्टरांच्या ज्या सल्ल्याविषयी लिहिलं आहे तो सल्ला हाच असावा बहुधा- तुम्ही प्रदूषित ठिकाणी श्वास घ्या!)
पुढे सांगायचं तर या बातमीमुळे आपल्या शरीरात 'एअर पाईप आहे' हे मला आज नव्याने कळलं. जे लोक हवा करतात त्यांना बहुधा इथूनच एअर सप्लाय होत असावा. हरकत नाही. आपल्या शरीरात ट्रॅकिया वगैरे काही नाही, थेट एअर पाईपच आहे हे कळल्यामुळे उद्या माझी कधी जवळून तपासणी झालीच तर मी डॉक्टरांना छातीठोकपणे ही मेडिकल टर्म ऐकवू शकेन आणि माझ्या अगाध ज्ञानभांडाराची चुणूक त्यांना दाखवू शकेन. जवळून तपासणी करत असल्याने ते ही छान विस्मयचकित होतील.
बाकी "श्वसननलिकेतून हवा आत आणि बाहेर श्वास घेतली जाते" या वाक्यात झळकून गेलेल्या लेखनप्रतिभेचं आणि लालित्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एवढं हे एकच वाक्य जे उष्टं करायचं राहून गेलेलं व्यासांकडून. त्याच्यापुढे आता मी काय लिहावं ?
पण एक मात्र खरं, हे असं काही वाचलं की माझ्या मराठीविषयी मला कमालीचा कॉम्प्लेक्स येतो. आपण किती व्यवस्थित बोलतो, लिहितो असं वाटून मी ओशाळून जातो. भाषेच्या माध्यमातून मी माझे ब्राह्मणी संस्कार वगैरे दाखवतो असं वाटून मी अपराधबोधाच्या वजनाखाली दबून जातो. भाषेचा सुयोग्य वापर करून, बुद्धीची छाप शब्दांत उमटवून लोकांना उगाच इंटिमिडेट वगैरे करतो असं वाटून घेऊन मग पश्चात्तापदग्ध होतो. व्याकरणाच्या सेक्शनमध्ये हक्काचे मार्क गेले की मी हळहळत असे, हे आठवून ते सारंच व्यर्थ होतं हे जाणून मी निराश होतो. प्रमाण मराठीचा आग्रह धरणाऱ्या लोकांचा मला राग येतो, ते आम्हाला विभ्रमित करतात म्हणून संतप्त होतो, आणि उरलेला संपूर्ण दिवस मी हे असं लिहू शकणाऱ्या मनुष्याचा हेवा करत बसतो.
माणसानं हे असंच असायला हवं- केअरलेस, बिनधास्त ! (('आणि निर्लज्ज!') असंही लिहायचंय मला, पण भावना दुखावल्या जातील म्हणून लिहीत नाहीए).
एनिवे, हॅपी रिडींग !
-सौरभ राघवेंद्र