•mr•

अनाहूत (भाग १)

“श्रेया? ए श्रेया?” अनन्याने हाक मारली.

“श्रेया? ए श्रेया?” अनन्याने हाक मारली.

“काय गं? काय झालं” श्रेयाने स्वयंपाकघरातून विचारलं.

“जरा बाहेर येतेस का?” अनन्याने तिला हॉलमध्ये बोलावलं.

“सांग ना गं काय ते. भाजी बनवतेय मी.” श्रेयाने आतून उत्तर दिलं.

अनन्या काहीच बोलली नाही. ती होती तिथेच उभी होती- स्तब्ध, थिजलेली.

“अनु?” भाजीला फोडणी देता देता श्रेयाने आतून हाक मारली. “ए अनु?”

अनन्याच्या कानावर ती हाक आदळली खरी, पण त्या हाकेला ‘ओ’ देण्याच्या स्थितीमध्ये ती अजिबातच नव्हती.

“ए अनु, काय गं ?” श्रेयाने पुन्हा आतून हाक मारली.

टी.व्ही. शेजारी ठेवलेल्या फ्रेम वर अनन्याची नजर खिळलेली होती. सकाळी

ऑफिससाठी निघण्याच्या वेळी ही फ्रेम टी.व्ही. शेजारीच काय, आपल्या घरात तरी

होती का हे आठवायचा ती पुन:पुन्हा प्रयत्न करत होती.

“अनु?” कुकिंग एप्रन उतरवून त्याची हाताशीच घडी करत श्रेया स्वयंपाकघरातून हॉल मध्ये आली.

आज सकाळीच अनन्याच्या प्रोजेक्टची क्लोजर मीटिंग झाली होती. गेले तीन

महिने अतोनात कष्ट उपसून अनन्या आणि तिच्या टीमने प्रोजेक्ट डेडलाईनच्या

आधी पूर्ण करून दाखवला होता. तिच्या कंपनीची मॅनेजमेंट आणि त्यांचा

क्लायेंट अशा दोघांनी सगळ्याचं मनमोकळं कौतुक केलं होतं, आणि ते रास्तही

होतं. कारण हा प्रोजेक्ट मुळातच खूप चॅलेन्जिंग होता. चौदा आठवड्यांच्या

मुदतीमध्ये एवढी मोठी सिस्टीम डिप्लॉय करणं खायचं काम थोडीच होतं!

प्रोजेक्ट बिडिंगच्या आधी झालेल्या मीटिंग मध्ये जेंव्हा प्रोजेक्टचा हा

कंगोरा चर्चेसाठी समोर आणला तेंव्हा अनन्या, सारंग जोशींना, (व्ही. पी.

प्रोजेक्ट्स) म्हणाली होती, “सारंग सर, मान्य आहे हा प्रोजेक्ट चॅलेन्जिंग

आहे, पण चॅलेन्ज जेवढा मोठा, अकॉम्प्लीशमेंट पण तेवढीच मोठी ना? आणि आपल्या

कंपनीच्या प्रोफाईल व्हर्सटॅलिटीसाठी सुद्धा हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा

आहे सर.”

“मिस गोखले, चॅलेन्ज आणि अकॉम्प्लीशमेंटच्या बाबतीत, आय

टोटली अग्री विथ यू.” सारंग जोशी आपल्या हाताची घडी सोडवत म्हणाले, “पण

चॅलेन्ज जेवढा मोठा, रिस्कही तेवढीच मोठी असते याचा विचार तुम्ही केला आहात

का ?” जोशींनी खांदे उउडवून पुन्हा आपल्या हाताची घडी घातली.

“नेव्हर वॉज एनिथिंग अचिव्हड विदाउट डेंजर सर.” अनन्याने हजरजबाबीपणे उत्तर

दिलं. “अ शिप इज ऑल्वेज सेफ इन द हार्बर सर. बट इज इट व्हॉट इट इज फॉर ?”

“जॉन शेड ना?” जोशींनी मिश्कीलपणे विचारलं.

“सॉरी सर?” अनन्य क्षणभर गोंधळली.

“अ शिप इज.. ते वाक्य जॉन शेडचं आहे ना?”अनन्याने मान डोलावली.

“हं.” जोशी एका हाताने आपला फ्रेंच कट कुरवाळत मिटिंग रूम मधल्या ओव्हल

आकाराच्या काचेच्या टेबलवर पडलेल्या आपल्या सहकाऱ्यांची प्रतिबिंबं

न्याह्याळत होते. उजव्या बाजूला बसलेला कार्तिक, त्याच्या पलीकडे बसलेली

रुधिरा, रुधिराच्या पलीकडे गौरांग तर डाव्या बाजूला सोहम, आशुतोष आणि

अनन्या. कार्तिक, रुधिरा, गौरांग, सोहम, आशुतोष आणि अनन्या ग्लोबल

इन्फोसिस्टीम्सचे लीडिंग प्रोजेक्ट मॅनेजर्स होते. सगळ्यांच्या हाताखाली

प्रत्येकी तीस ते पन्नास जणांची टीम, आणि किमान तीन प्रोजेक्ट्स तरी होते.

पस्तिशीच्या आतल्या ह्या तरुण मंडळींनी आपल्या कर्तृत्वाच्या आणि कष्टाच्या

जोरावर पदोन्नतीची शिडी चढलेली होती. कार्तिक यांच्यात वयाने सर्वात मोठा,

म्हणजे चौतीस वर्षांचा तर अनन्या सर्वात लहान. म्हणजे सत्तावीस वर्षांची.

ग्लोबल इन्फोमध्ये जॉइन होऊन तिला केवळ आठच महिने झाले होते, पण तिची

बुद्धिमता आणि तिच्या कामाचा आवाका पाहता तिच्या नवखेपणावर अजाणत्या

व्यक्तीला नेहमीच शंका येई.

“मिस गोखले” जोशींनी अनन्याकडे पाहिलं,

“ ‘ऑल्वेज’ हा शब्द मूळ वाक्यात नाहीये. अ शिप इज सेफ इन द हार्बर सर. असं

वाक्य आहे ते. न की अ शिप इज ऑल्वेज सेफ इन द हार्बर.”

“ओके सर.”

अनन्याने काहीश्या अस्वस्थपणे त्या क्रिटीसीझमचा स्वीकार केला. जोशींना

कंपनीमध्ये मान होता. त्यांचा अनुभव दांडगा होता. एखाद्या कुटुंबवत्सल

व्यक्तीप्रमाणे आपल्या ज्युनिअर्स सोबत ते वागत. हा सगळा विचार करून अनन्या

शांत बसून राहिली.

“नॉट दॅट इट मॅटर्स.” अनन्याची अस्वस्थता

जोशींच्या लक्षात आल्यासारशी ते म्हणाले आणि पुन्हा प्रतिबिंबं पाहण्यात

मग्न झाले. काही झालं तरी अर्ध्या तासात निर्णय घेऊन ही मिटिंग संपवणं

त्यांना भाग होतं.

“तुम्ही हॅंडल करू शकाल हा प्रोजेक्ट, मिस

गोखले?” त्या अपारदर्शी काचेवरच्या अनन्याच्या प्रतिबिंबाकडे रोखून पाहात

जोशींनी अत्यंत अनपेक्षित प्रश्न विचारला.

 

“एक्सक्यूज मी सर !”

कार्तिकने एकाएकी सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. “प्रोजेक्ट लीडचं डेलिगेशन

सिनिओरिटी प्रमाणं व्हायला हवं आणि इंटर्नल प्रीबिड मीटिंग मध्ये प्रोजेक्ट

मॅनेजर ठरवणं ही आपली पॉलिसी नाहीये सर. आय फर्मली अॅंड फॉर्मली रजिस्टर

माय प्रोटेस्ट.”

जोशींचे केस केवळ कामच्या ताणतणावामुळेच पिकले होते

असं आजिबात नव्हतं. त्यांचा आजवरचा अनुभव त्यांना खूप काही शिकवून गेला

होता. माणसाचा स्वभाव ओळखण्याचं आणि त्याच्या प्रतिक्रियेबद्दल आधीच अंदाज

बांधण्याचं कसब हा त्याच शिक्षणातला एक धडा. त्यामुळे कार्तिकचा हा असा

विरोध त्यांच्यासाठी अनपेक्षित नक्कीच नव्हता, किंबहुना त्याच्या

प्रतिक्रियेवर त्यांच्याकडे प्रत्युत्तरही तयार होतं.

“मिस्टर

कार्तिक गोस्वामी, युअर फर्म अॅंड फॉर्मल प्रोटेस्ट इस नोटेड अॅंड

रजिस्टर्ड.” असं म्हणत मिनिट्स ऑफ मिटिंगच्या च्या पेपर वर जोशींनी चार

शब्द खरडले.

“धिस, धिस इज नॉट फेअर सर. धिस इज अबसोल्यूटली नॉट

फेअर.” कार्तिक आपल्या सहकाऱ्यांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहात म्हणाला. भले

ते जोशी असोत, पण आपल्या सारख्या सिनिअर व्यक्तीला अशी कॅज्युअल वागणूक

देणं आणि ते ही एवढ्या महत्वाच्या मीटिंग मध्ये- हे त्याला अजिबात पटलेलं

नव्हतं.

“व्हू सेज लाईफ इज फेअर ? व्हेअर इज इट रिटन ?” जोशींनी कार्तिकला मिश्कीलपणे विचारलं. “अॅंड, धिस, बाय द वे, इज- ?”

जोशींनी अनन्याकडे पाहिलं. “गोल्डमन सर. विलियम गोल्डमन. फ्रॉम द

प्रिन्सेस ब्राईड.” अनन्याने काहीसं अडखळतच ‘व्हू सेज लाईफ...’चं उगमस्थान

स्पष्ट केलं.

अनन्याच्या चेहऱ्यावर तणाव आता स्पष्ट दिसत होता.

प्रोजेक्ट हॅंडल करू शकता का असं विचारल्याक्षणी तिच्या मनात दोन गोष्टी

चमकून गेल्या होत्या. पहिली गोष्ट होती होकार आणि दुसरी गोष्ट होती

उत्सुकतामिश्रित भिती. कामाच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी तिच्यासाठी पूरकच

होत्या. पण ह्या सगळ्यात कार्तिक ही अशी आडमुठी भूमिका घेईल हे तिच्या

ध्यानीमनी सुद्धा आलं नव्हतं. तिच्या मनात कार्तिकबद्दल आदर होता. ती

ग्लोबल इन्फो मध्ये जॉईन झाल्या झाल्या सुरवातीच्या महिन्यात तिची घडी

बसेपर्यंत कार्तिकनेच तिला सांभाळून घेतलं होतं.

त्यानंतरही दिवसभरात

त्यांची जेंव्हा जेंव्हा भेट होत, त्या प्रत्येक वेळी त्यांच्यामधला संवाद

हा सुसंवादच असे; पण आज हे त्याचं असं अचानक वागणं तिला कमालीचं खटकलं.

अनन्याच्या उत्साहमिश्रित भिती मधला उत्साह निघून गेला आणि ह्या प्रोजेक्ट

च्या निमित्ताने आपल्या जॉईनिंगच्या पहिल्या आठ महिन्यातच आपण ऑफिस

पॉलिटीक्सच्या एका नव्या अध्यायाचे निर्माते ठरतोय की काय अशी भिती तिच्या

मनात चमकून गेली.

मिटिंग रूम मध्ये पसरलेला तणाव हा कोणासाठीच

हितकारक नाही याची जाणीव व्हायला जोशींना फारसा वेळ लागला नाही. त्यांनी

सूत्रं पुन्हा आपल्या हातात घेतली. “कार्तिक, माय डिअर बॉय, पॉलिसीज आर

देअर, बट व्हॉट फॉर? टेल मी. कम ऑन.”

“व्हाय डोंट यु एक्स्प्लेन सर

?” त्या वाक्यातल्या ‘यु’वर अंमळ जास्तच दिलेला जोर सगळ्यांनाच खटकला, पण

अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याइतके जोशी समंजस होते.

“ओके. लेट मी

एक्स्प्लेन. पॉलिसीज ह्या नॉर्मल सिच्युएशन्स आणि सर्कमस्टान्सेस हॅंडल

करण्यासाठी असतात जेणे करून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत मॅनेजमेंटला

लक्ष घालावं लागू नये. पण हा प्रोजेक्ट इज अॅन एक्स्ट्रा ऑर्डीनरी

सर्कमस्टान्स. कान्ट यु सी दॅट मिस्टर गोस्वामी ?”

“येस, आय व्हेरी

वेल कॅन सर आणि म्हणूनच प्रिमाईस ऑफ युअर अर्ग्युमेंट इज माय काऊंटर

अर्ग्यूमेंट.” कार्तिकने आपले दोन्ही हात टेबलावर रेलून उत्तर दिलं. “एवढा

क्रिटीकल प्रोजेक्ट तुम्ही एखाद्या नवख्या व्यक्तीला देऊ कसा शकता सर ?”

“एक्सक्यूज मी !!” जोशी आणि अनन्या एकदम उद्गरले. जोशींचा आवाज सौम्य आणि समंजस होता, पण अनन्याच्या आवाजात मात्र धग होती.

“यु वोन्ट माइंड इफ आय स्पीक फर्स्ट, मिस गोखले, विल यु ?” जोशींनी अनन्याकडे पाहिलं. अनन्याने मान डोलावली.

“कार्तिक, तुझा माझ्या निर्णयक्षमतेवरचा विश्वास कमी होतोय का ? तसं असेल

तर प्लीज सांग. आपण सर्वानुमते निर्णय घेऊ. लेट अस ऑल व्होट.” जोशींनी

चेंडू कार्तिककडे टोलावला.

 

“असं नाहीये सर. असं नाहीये.” कार्तिक पुटपुटला.

“अॅंड युअर एक्स्क्यूज वॉज?” जोशींनी अनन्याकडे पाहून विचारलं.

“माझं नवखेपण हा माझ्या क्षमतेचं परिमाण म्हणून वापरणं. दॅट इज माय

एक्स्क्यूज. आणि मी कंपनीमध्ये नवी असेन, कामाच्या बाबतीत नाही. आय टेक

मिस्टर गोस्वमीज् कॉमेंट्स अॅज अ पर्सनल इन्सल्ट.”

मिस्टर गोस्वामी.

पहिल्यांदाच तिने आपली समकक्ष व्यक्तीचा असा थंड आणि औपचारिक उल्लेख केला

होता. कार्तिकने आपला अपमान केला या गोष्टीपेक्षाही कार्तिकच्या

अवसानघातकीपणाचा तिला राग आला होता. कार्तिकनं अनन्याला नेहमीच प्रोत्साहित

केलं होतं, पण अशा मोक्याच्या क्षणी सर्वांसमक्ष हतोत्साहित करणं

अनन्याच्या मनाला चांगलंच लागलं होतं. खायचे दात वेगळे, दाखवायचे दात

वेगळे; पुराच्या पाण्यात आपल्या पिलाला पायाशी ठेऊन त्याच्या डोक्यावर चढून

स्वत:चा जीव वाचवणारी माकडीण वगैरे वगैरे विचार तिच्या मनात पिंगा घालायला

लागले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, हा प्रोजेक्ट मिळवायचा असा तिचा हेतू

कधीच नव्हता. स्वप्नातही नाही. मग असं असतानासुद्धा दैवयोगानं चालून आलेली

संधी एका तिसऱ्याच व्यक्तीच्या कुकर्मानं लांब न्यावी हे तिला कदापि मान्य

होणार नव्हतं. अनन्याला तिच्या आयुष्यानं काही मोजक्या गोष्टी वारंवार

शिकवल्या होत्या. स्वावलांबन आणि स्वाभिमान ह्या त्यातल्या प्रमुख गोष्टी

आणि हे असं बोलून कार्तिकने तिचा नेमका स्वाभिमानच दुखावला होता. हे दु:ख

ती सहज विसरणार नव्हती आणि पुढचाच क्षण त्याची प्रचिती देऊन गेला.

“आय डीड नॉट मीन इट अॅज अॅन इन्सल्ट, अनन्या.” कार्तिक म्हणाला. अनन्याने त्याच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं.

कार्पोरेट सेक्टर मध्ये जेंव्हा तुम्ही यशाच्या पायऱ्या चढत असता तेंव्हा तुमच्या पाठोपाठ तुमचा अहंकार सुद्धा ती शिडी चढत असतो.

कार्तिकच्या बाबतीत त्याचा अहंकार नेहमीच त्याच्या पुढे एक पाउल

राहिलेलेला होता. लहानपणापासून शिक्षण संपेपर्यंत पहिला क्रमांक न सोडलेला

कार्तिक. कंपनीच्या उत्तम काम करणाऱ्या मोजक्या व्यक्तींपैकी एक.

त्याच्यासाठी ‘आय डीड नॉट मीन इट अॅज अॅन इन्सल्ट, अनन्या’ हे वाक्य

उच्चारणं हे जवळ जवळ माफी मागण्याजोगं होतं आणि तरी त्यावर अनन्याने,

आपल्यापेक्षा सगळ्याच बाबतीत कनिष्ठ असणाऱ्या एका मुलीने, आपल्याकडे

बघूसुद्धा नये! ही गोष्ट कार्तिकच्या जिव्हारी चांगलीच लागली.

मिटिंग

रूम मध्ये अस्वस्थ शांतता पसरली होती. कोणी तरी काही तरी बोलेल म्हणून सगळे

एकमेकांकडे चोरते कटाक्ष टाकत होते. कार्तिकने आपला विरोध नोंदवून जेमतेम

पाच मिनिटंच झाली असावीत, पण त्या पाच मिनिटात निर्माण झालेल्या मतभेदातून

जन्म घेऊ पाहणाऱ्या वादाची जी ठिणगी ठिणगी पडली तिचा वणवा नक्कीच पेटणार

याची जोशींना जाणीव झालेली होती.

शरीराचं दुखणं आपण चटकन विसरून

जातो, पण दुखावलेल्या मनावरचीची जखम कधी कधी शेवटच्या श्वासापर्यंत ठसठसत

राहते. प्रोजेक्ट मॅनेजरची निवड करण्याबाबतीत कार्तिकचा विरोध जोशी समजू

शकत होते. कार्तिक ठरलेल्या चाकोरीमधून, आखीव रेखीव तत्त्वांना अनुसरून

चालणारा मनुष्य होता आणि त्याला ह्या तत्त्वनिष्ठेचा स्वत:च्या असामान्य

बुद्धीमत्तेच्या अभिमानाएवढाच अभिमान होता. त्यामुळं जोपर्यंत चाकोरीबाहेर

जाऊन केलेल्या गोष्टीला त्याचा विरोध होता, तोपर्यंत जोशींच्या मते त्याचं

वागण जस्टीफाय करण्याजोगं होतं पण कार्तिकने अनन्याला सर्वांसमक्ष नवखं

म्हणून हिणवणं मात्र जोशींना खटकलं होतं. अर्थात कार्तिक हे बोलण्याच्या

ओघात नकळत बोलून गेला किंवा काय हे जाणून घेतल्याशिवाय त्याला सरसकट चूक

ठरवणं जोशींना योग्य वाटत नव्हतं, पण त्याच्या बोलण्यातून प्रोजेक्ट

चुकीच्या व्यक्तीकडे दिला जातो आहे असा संदेश गेला होता आणि त्याचं

गांभीर्य मात्र दुर्लक्षित करता येण्या जोगं नक्कीच नव्हतं.

“यु

डीड नॉट अन्सर माय क्वेश्चन मिस गोखले. विल यु बी एबल टू हॅंडल द प्रोजेक्ट

ऑर नॉट?” जोशींनी मिटिंगची सूत्रं पुन्हा एकदा आपल्या हातात घेतली. मिटिंग

रूम मध्ये कितीही तणाव निर्माण झाला असला तरी हा प्रश्न विचारणं जोशींना

अखेर भागच होतं. कारण हा प्रश्न आणि ह्या प्रश्नाच्या औपचारिक उत्तराशिवाय

मिटिंग कन्क्ल्युड होणं शक्यच नव्हतं.

“येस सर. आय विल.” अनन्याने क्षणार्धात उत्तर दिलं.

“हं” जोशींनी तिच्याकडे पाहून स्मितहास्य केलं. अनन्या ही संधी स्वीकारेल

याची जोशींना पूर्ण खात्री होती, कार्तिक या गोष्टीला ऑब्जेक्शन घेईल याची

सुद्धा त्यांना पूर्ण जाणीव होती, पण एका जाणीवेने मात्र त्यांना हुलकावणी

दिली होती. ती म्हणजे एका तासाच्या त्या मिटिंग मध्ये एक व्यक्तीचा

स्वाभिमान आणि दुसऱ्या व्यक्तीचा अहंकार दुखावला जाईल.

वय आणि

अनुभव या दोन गोष्टी माणसाला समंजसपणा शिकवतात ह्या गोष्टीवर त्यांचा पूर्ण

विश्वास होता, शिवाय परिस्थितीच्या गांभिर्यासमोर मनुष्य आपला स्वकेंद्रित

स्वभाव बाजूला ठेऊ शकतो या गोष्टीबद्दलही श्रीयुत सारंग जोशी नेहमीच

सकारात्मक होते. किंबहुना त्यांनी स्वत:सुद्धा कित्येक वेळेला

परिस्थितीसमोर स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेवलेला होता. ग्लोबल इन्फोच्या पाच

फाऊंडिंग मेम्बर्स पैकी एक असलेल्या पंचावन्न वर्षांच्या जोशींनी अशाच एका

परिस्थितीमध्ये स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेऊन व्हाईस प्रेसिडेंट प्रोजेक्ट्स

या पदावर समाधान मानत आपल्या हाताखालच्या व्यक्तीला वरच्या पदावर जाऊ दिलं

होतं. ह्या सगळ्याचा विचार करता त्यांना मनुष्याच्या समंजसपणाबद्दल असलेलं

त्यांचं गृहीतक हे जणू युनिव्हार्सल ट्रुथच वाटत असे. पण आज तो क्षण आलाच

होता, जेंव्हा त्यांच्या सत्याला अपवाद असणाऱ्या उदाहरणांमध्ये आणखी एका

उदाहरणाची भर पडली होती. अनन्याच्या ‘येस सर. आय विल.’ मध्ये उत्साहपेक्षा

जिव्हारी लागलेल्या अपमानातून आणि दुखावल्या गेलेल्या स्वाभिमानातून

पेटलेली विजीगिषु वृत्ती दिसत होती आणि हे जोशी आपलं अनुभवसिद्ध ज्ञान

बाजूला ठेवूनही सांगू शकत होते. समकक्ष सहकाऱ्यांमधली हेल्दी कॉम्पिटीशन

कंपनीच्या प्रगतीसाठी पूरक असते या सर्वमान्य मताचे जोशी खंदे समर्थक होते;

पण हा इगो टसल?

जोशींच्या कपाळावर अठ्या चढल्या. मुळात प्रोजेक्ट

घ्यावा की नाही याबद्दलच साशंक जोशींनी आपल्या गट फिलिंगवर विश्वास ठेऊन

आणि आपल्या कंपनीच्या प्रोफाईल व्हर्सटॅलिटीकडे पाहून हा प्रोजेक्ट

स्वीकारण्याची रिस्क घेतली होता शिवाय हा प्रोजेक्ट लीड करण्यासाठी

लागणाऱ्या क्षमता मिटिंग मध्ये उपस्थित लोकांपैकी केवळ अनन्याकडेच आहेत

याची त्यांना जाणीव होती म्हणून तो तिला द्यायचा निर्णय सुद्धा मनोमन घेऊन

टाकला होता, पण या सगळ्यात अनन्या कितपत समंजस आहे याबद्दल मात्र त्यांना

अंदाज बांधता आला नव्हता. तिच्या ‘येस सर. आय विल.’ पाठीमागे दडलेल्या

भावदर्शनासरशी तो अंदाज जोशींनाआला, आणि आपण चूक तर केली नाही ना अशी

पुसटशी शंका त्यांच्या मनाला चाटून गेली. मिटिंगनं हे वावगं वळण

घेण्यापूर्वी जेंव्हा अनन्याला ‘तुम्ही हॅंडल करू शकाल हा प्रोजेक्ट, मिस

गोखले?’ असा प्रश्न विचारला गेला होता तेंव्हा तिच्या डोळ्यात चमकलेली

उत्सुकता, काहीसा भितीयुक्त आत्मविश्वास, करू दाखवण्याची जिद्द वगैरे तत्सम

भाववलयं जोशींना हवी होती. कार्तिककडे क्रोधयुक्त कटाक्ष फेकून ‘येस सर.

आय विल.’ म्हणताना पेटलेली आग नव्हे.

आणि या सगळ्याच्या पुढे जाऊन

ह्या घटनाक्रमात सहभागी व्यक्ती चूक की बरोबर या जजमेंट पेक्षा सुद्धा

जोशींच्या दृष्टीने काही गोष्ट महत्वाच्या होत्या. कलेक्टीव्ह गुड,

म्युच्युअल गुडविल, कॉमन गोल वगैरे वगैरे त्या गोष्टींपैकी काही. प्रोजेक्ट

येतात आणि जातात, पण माणसं आणि आठवणी मात्र शेवटपर्यंत राहतात या मताचे

जोशी. त्यामुळं चार लोकांनी कंपनीमध्ये एकत्र काम करताना कसं करायला हवं

याबद्दल त्यांचे काही स्पष्ट आडाखे होते आणि ते आडाखे जेवढे स्पष्ट होते,

आजच्या मिटिंग मध्ये तेवढ्याच स्पष्टपणे त्या आडाखे मातीमोल झाले होतं; पण

आता माघार घ्यायची वेळ निघून गेली होती.

“वेल, मिस अनन्या गोखले, कॉंग्रॅच्युलेशन्स अॅंड ऑल द बेस्ट !” जोशींनि मिटिंग संपल्याचं जाहीर केलं.

(क्रमश:)

-सौरभ राघवेंद्र.