•mr•

आप आणि आपण.

मोदी लाटेवर आरूढ भारतीय जनता पार्टीच्या उधळलेल्या वारूला दिल्लीत रोखणारी आम आदमी पार्टी सध्या भलतीच चर्चेत आहे ती अंतर्गत राजकारणामुळे. आता हे अंतर्गत राजकारण कुठल्याही पक्षात असतंच. दस्तुरखुद्द नर…

मोदी लाटेवर आरूढ भारतीय जनता पार्टीच्या उधळलेल्या वारूला दिल्लीत रोखणारी आम आदमी पार्टी सध्या भलतीच चर्चेत आहे ती अंतर्गत राजकारणामुळे. आता हे अंतर्गत राजकारण कुठल्याही पक्षात असतंच. दस्तुरखुद्द नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे अडवाणी, आणि मुरली मनोहर जोशी यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केलं आणि इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांचे पंतप्रधानपदाचे मनसुबे उधळून लावून स्वत: न केवळ पंतप्रधान झाले तर अमिता शहा यांना पक्ष्याध्यक्ष पदी बसवून पक्षावर एकहाती नियंत्रण आणलं, त्यावरून पक्षामधील अंतर्गत राजकारण किती निर्घृण, जबरदस्त, एखाद्या नेत्याच्या शक्तीची परीक्षा पाहणारं आणि आकर्षक असतं हे आपल्या लक्षात येतं. काँग्रेस मध्येही अंतर्गत राजकारणाला कमी नाही. राष्ट्रीय पातळीवर वरिष्ठांच्या माना गांधी घराण्यापुढे झुकलेल्या असल्याला तरी त्या झुकलेल्या मानांमध्येही कोणाची मान उंच यावरून चढाओढ सुरूच असतेच, शिवाय आपल्या राज्यापुरतंच बोलायचं झालं तर सध्या अशोक चव्हाणांच्या निवडीविरोधात नारायण राणे यांची पुन्हा झालेली नाराजी आणि त्यांनी बोलावलेली पदाधिकाऱ्यांची बैठक हे याच अंतर्गत राजकारणाचे द्योतक आहे.

तर आम आदमी पक्ष ज्या कारणावरून नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते म्हणजे पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले असल्याची शक्यता. त्यातल्या एका गटाचं नेतृत्व करत आहे केजरीवाल तर दुसऱ्या गटाचे पुरस्कर्ते आहे भूषण पिता-पुत्र आणि योगेंद्र यादव. आता मला सांगा कुठल्या पक्षात दोन आघाड्या निर्माण होत नाहीत ? कोणत्या पक्षात मतभेद निर्माण होत माहित ? पण 'आप'चं सगळंच वेगळं आहे. 'आप' ची गंमतच निराळी आहे.

आम आदमी पक्ष समजून घेण्यासाठी आपल्याला काहीसं मागं जावं लागेल. अण्णा हजारेंनी छेडलेल्या आंदोलनामधून आम आदमी पक्ष निर्माण झाला हे सर्वज्ञात आहे.. ते आंदोलन एका अर्थानं यशस्वी झालं यात शंका नाही पण अण्णा स्वत: सक्रीय राजकारणात उतरणार नाहीत हे समजल्यावर केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली आप स्थापन झाला आणि तदनंतर दिल्लीच्या पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी चांगली कामगिरीही केली, पण एकोणपन्नास दिवसात सत्तेला लाथ मारून पुन्हा रस्त्यावर येणं त्यांनी पसंत केलं आणि मग नंतर लोकसभा निवडणुकांच्या वेळी लोकांनीच त्यांना आपण होऊन रस्त्यावर ठेवलं. पण अखेर दिल्लीकरांची मने पुनश्च जिंकून केजरीवाल हे सत्तास्थानावर विराजमान झालेच ! खरं सांगायचं तर अशा रोमहर्षक घटना राजकारणात अभावानेच घडतात, कारण त्या घटना ज्यांच्यामुळे घडतात असे घटकच राजकीय पटलावर अभावाने उगवतात. आणि या अशा घटकांकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहते कारण यांची प्रत्येक गोष्ट चौकटीबाहेरची असते.

या सगळ्या उठठेविमध्ये एक गोष्ट मात्र मला अजूनही नीटपणे झेपली नाहीये. ती म्हणजे आप ची विचारसरणी. म्हणजे असे पहा, भा. ज. पा. उघडपणे हिंदुत्ववादी आणि तितकाच लोकशाहीवादी (?) पक्ष आहे. काँग्रेस हा लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष (?) पक्ष आहे. डाव्यांची त्यांची अशी एक विचारसरणी आहे. समाजवाद्यांचे स्वत:चे तत्वज्ञान आहे. दक्षिणेकडचे पक्ष भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर ठाम आहेत. तर काही रिजनल पक्ष तिथल्या स्थानिक मुद्द्यांपुर्तेच मर्यादित आणि स्वत:ची मर्यादा योग्य रीतीने ओळखून आहेत. पण आम आदमी पक्षाचे तत्वज्ञान किंवा त्यांची साधी विचारसरणी एकाला तरी सांगता येईल का ? किमान त्यांच्या कार्यकर्त्यांना तरी ? भ्रष्टाचाराला विरोध, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ही सर्व पक्षांची भूमिका असतेच. सर्वांनाच भले ते कितीही करप्ट असोत, भारताला सुजलाम् सुफलाम् पहायचे असतेच. याचा अर्थ असा नाही की मी करप्ट लोकांची पाठराखण करतोय, ते हरामखोर आहेतच पण माझा मुद्दा हा आहे आम आदमी पक्षाकडे असं कुठला धागा आहे कि ज्याने वाद कितीही टोकाला गेला तरी सर्वांना एकत्र बांधून ठेवता येईल ?

आम आदमी पक्ष हा काही एका समान धाग्याने विणलेले वस्त्र नाही हे इथे लक्षात येते. ती एक गोधडी आहे. वेगवेगळ्या वस्त्रांनी ओढून ताणून शिवलेली. इथे कोणी खूप लिबरल आहे तर कोणी कट्टर डाव्या विचारसरणीचा आहे, कोणाला एक धर्म जवळचा वाटतो, तर कोणी कट्टर भांडवलवादी आहे. त्यामुळे चला जरा गप्पा मारू असं म्हणून आपचे चार नेते एकत्र आले तरी सरतेशेवटी त्यांतल्या दोघात टोकाची वादावादी होणारच हे आपण गृहीत धरावयाचे.

राजकारणामध्ये कोणत्याही पक्षामध्ये जेंव्हा मतभेद होतात तेंव्हा पक्षामधले समंजस लोक या सगळ्यापासून बाजूला होतात. शांतपणे विचार करतात की आपण हे सारे कशासाठी करतोय, आपल्या पक्षाचं, आयुष्याचं ध्येय काय आहे, पक्ष कोणती विचारसरणी प्रमाण मानतो, पक्षाची नियमावली काय सांगते आणि हे वाद, मतभेद त्या योग्यतेचे आहेत का ज्या योग्यतेचे आपले मुख्य कर्तव्य आहे. मग शांतपणे हा असा सारासार विचार करून वादावर तोडगा काढला जातो. भले एखाद्याचा अहंकार अशावेळी दुखावतो पण मनापासून तो पक्षासोबत राहतो कारण निर्णय हा योग्य पद्धत अवलंबून घेतला गेलेला असतो हे त्यास ठाऊक असते.काँग्रेस सारखा पक्ष भलेही अलीकडे तो विसर्जित करण्याचा महात्मा गांधीचा विचार राहुल गांधींनी मनावर घेतला आहे की काय असे वाटावे अश्या मरणप्राय अवस्थेमध्ये असूनही अजून टिकून आहे, प्रचंड सत्ता हातात असूनही भा. ज. पा. चे अन्तर्गत स्थैर्य कधीच डळमळीत होत नाही, ते याच समान विचारधारेमुळे.

पण आप चे काय ? त्यांचे एकच ध्येय होते, सत्ता मिळविणे. ती मिळाली. पण अपवाद सोडले तर यातल्या किती तरी लोकांना राजकारणाचा तर सोडाच, आमदारकीचा सुद्धा अनुभव नाही. परवाच आप च्या काही आमदारांना " पोलीस ठाण्यावर " दगडफेक केल्याने अटक झाली असे वर्तमानपत्रात वाचले. यांचा खुद्द मुख्यमंत्री सत्तेत येऊनही प्रजासत्ताकदिनाच्या काही दिवस आधी रस्त्यावर धरणे ठोकतो आणि सत्ता झुगारून देतो !

मग मला प्रश्न पडतो की कोण आहेत हे आम आदमी पक्षाचे नेते ? त्यांची पार्श्वभूमी काय आहे ? त्यांच्यातले काही चेहरे आधी न्यूज डिबेट मधून दिसायचे तर काही पत्रकार होते, आणि आहेत. काही जण असेच चळवळ चळवळ म्हणत पक्षात येऊन समाविष्ट झाले आहेत. आपण वेगळे आहोत, आपण फार स्वच्छ आहोत आणि बाकीचे भ्रष्टाचारी आहेत हा नैतिक अहंगंड सोडल्यास या पक्षाकडे फार काही आहे असे मला तरी वाटत नाही. यांच्याकडे कुठलीही सस्टेनेबल पॉलिटिकल फिलॉसॉफी तर सोडाच, सस्टेनेबल पॉलिसी तरी आहे का हीच मला शंका आहे. आम आदमी पक्ष पाच वर्ष टिकेल का ? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळ ठरवेलच पण सध्याची परिस्थिती पाहता राजकीय पंडित देखील हा पक्ष टिकणार नाही अशी भाकिते छातीठोक पणे वर्तवू लागतील.

सध्याच्या पार्श्वभूमीवर जर पुढे हा पक्ष दुफळी माजून फुटला आणि सत्ता सोडावी लागली किंवा असे कोणते महानाट्य येत्या काही दिवसात दिल्लीच्या राजकीय पटलावर रंगले तर त्याला कारणीभूत असेल ती ' कुठली गोष्ट किती आणि कुठवर ताणावी हे शिकवणारी राजकीय परिपक्वता त्यांच्यात अजिबात नसणे ' आणि दुर्दैवाने योगेंद्र यादव नावाच्या एकमेव व्यक्तीकडे ही परिपक्वता आहे असे वाटत असतानाच केजरीवाल आणि कंपू त्यांना पक्षांतून आणि सक्रीय राजकारणातून बाजूला ठेवू पाहतो आहे. (नुकत्याच पाहिलेल्या आप च्या स्पोक्सपर्सन च्या प्रेस रिलीजमध्ये तो म्हणतो आमचा पक्ष हास्यास्पद झाला आहे. पक्षाचा स्पोक्सपर्सनच सांगतो आम्ही जोकर आहोत म्हणून!!)

असो. या लेखाचा शेवट कसा करावा या संभ्रमात मी आहे कारण सध्या गाजणाऱ्या नाट्याचा समारोप अजून व्हायचा आहे. योगेंद्र यादव आणि भूषण पितापुत्रांना PAC मधून डच्चू मिळेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होते आहे. या पार्शभूमीवर एखादा निर्णायक शेवट करणे हे एक लेखक म्हणून अत्यंत बेजबाबदार पणाचे ठरेल हे मी जाणतो. तरी पण जाता जाता आणखी थोडं लिहावयाचा मोह आवरत नाही म्हणून काही ओळी लिहून थांबतो.

"इंडिया अगेन्स्ट करप्शन" आणि " मै अण्णा हुं " पासून "आम आदमी पार्टी" आणि "मै आम आदमी हुं" पर्यंतचा प्रवास हा अगदी परवाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपर्यंतही केवळ प्रस्थापितांना (काँग्रेस, भा. ज. पा. आणि इतर पक्ष जे देशभरात इतर ठिकाणी सत्तेवर आहेत त्यांना) विरोध या इंधनावर सुरु होता. यांच्या प्रचार मोहिमा पहिल्या तर या प्रस्थापितांना आणि मोठ्या उद्योजकांना विरोध हेच त्यांचे मुख्य मुद्दे होते हे एखादा लहान मुलगा किंवा अगदी राहुल गांधीही सांगू शकतील.

पण आता एकहाती सत्ता मिळाल्यानंतर परिस्थिती अशी आहे आम आदमी पक्ष स्वत: प्रस्थापितांच्या चौकटीत येऊन बसला आहे त्यामुळे सत्ताधरी लोकांना विरोध हा जो त्यांचा मुलभूत मुद्दा होता तो मुद्दाच हे लोक गमावून बसले आहेत. "आम्ही स्वच्छ" , "आम्ही चांगले" हा नैतिक अहंगंड जो प्रत्येक कार्यकर्त्याच्या रक्तातून सळसळत होता तो कौतुकास्पद वाटे जेंव्हा ते समोरच्या व्यक्तीला जी सत्तेत आहे तिला हे लोक अनैतिक ठरवायचे. फक्त प्रस्थापितांना विरोध हा विचार घेऊन जेंव्हा एखादा पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरतो आणि जिंकतो तेंव्हा त्या पक्षाची काय गत होऊ शकते हे आता "पाच साल केजरीवाल" कसे टिकतात हे पाहताना दिसेलच.

" सिस्टीम को बदलना है " हे केजरीवालांचे प्रसिद्ध वाक्य. पण या वाक्यामागे दडलेला खरा अर्थ तेंव्हा लक्षात आला जेंव्हा पहिल्यांदा सत्ता मिळाल्यावर आप च्या एका मंत्र्याने घातलेला धिंगाणा मिडिया मधून समोर आला. हे लोक स्वत:ला सिस्टीम पेक्षा वरचढ समजतात. अधिक सुज्ञ आणि शहाणे समजतात. एकीकडे आम आदमी आम-आदमी म्हणत मतांची मागणी करतात तर त्याचवेळी विमानातून बिझनेस क्लास मध्ये बसून प्रवास करतात आणि याचे समर्थन करताना यांना लाजही वाटत नाही की आपल्या आम आदमी असण्याची भूमिकाही आठवत नाही. सुरक्षेसाठी नेमलेले पोलीस नाकारताना ते पोलीस सुरक्षा नव्हे तर आमच्यावर हेरगिरी करण्यासाठी दिले आहेत असे सांगून त्यांचा अपमान केला जातो आणि यावर साधा खेदही व्यक्त केला जात नाही. सत्ता लाथाडली तरी शासकीय निवासस्थान सुटत नाही. देशाची आर्थिक परिस्थिती आणि तिचे नियोजन, परराष्ट्रीय धोरण, आरक्षण, दुष्काळ, लोकसंख्या वाढ अशा विषयांवर भाष्य करावसं यांना वाटत नाही, आणि काही विचारवं तर म्हणे सिस्टीम को बदलना है जी !

खरं सांगायचं तर सिस्टीम बदलावी असं आम्हालाही वाटतं. पण १२५ कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशात रातोरात सिस्टम बदलता येण्याची शक्यता तितकीच आहे जितकी आमच्या पलीकडच्या बंद घरामध्ये आमच्या नकळत रोज रात्री परग्रहवासी जेवणासाठी थांबून झोपण्यासाठी परत त्यांच्या ग्रहावर जाण्याची. सिस्टीम को बदलना है हे वाक्य राजकीयदृष्ट्या खूप रोमँटीक वगैरे आहे पण ते व्यवहार्य नाही. कुठलीही

गोष्ट सुधारण्यासाठी त्या गोष्टीकडे खूप साऱ्या संयमाने आणि सहानुभूतीने

पहावे लागते, बदल घडवून आणण्यासाठी प्रथम साऱ्या दोषांसोबत तिला स्वीकारावे लागते आणि मग उगाचच नावे न ठेवता योग्य आणि विचाराधिष्ठीत बदल सुचवावे लागतात आणि अत्यंत संयमाने ते घडवून आणावे लागतात. एका रात्रीत सिस्टीम बदलण्याची क्रांतिकारी घोषणा देणं हे तितकं सोपं काम आहे जितकं ते बदल घडवून आणणं कठीण आहे. क्रांतीची ही असली पिल्लं खूप रोमँटीक वगैरे वाटली तरी फार जगत नाहीत हे इथले दुर्दैव आहे. इथे टिकते ती फक्त उत्क्रांती. कारण सतत बदलत असूनही तीच एकमेव प्रक्रिया अशी असते जी स्थिर असते.

आम आदमी पक्ष एक तर ही सिस्टीम स्वीकारणारच नाही कारण सिस्टीम को बदलना है जी आणि ही सिस्टीम जर त्यांनी आहे अशी त्यांनी स्वीकारलीच तर मग त्यांच्या ते वेगळे असणाच्या अहंकाराला खतपाणी कसे मिळणार ? मला मान्य आहे की माझ्या लिखाणाला फार गांभीर्यानं घ्यावं इतका मी मोठा नाही पण तरी थेट आरोपच आहे की आम आदमी पक्षाकडे संयम, समंजसपणा आणि वैचारिक क्षमता तर नाहीच पण त्याही पुढे जाऊन त्यांचा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव अगदी नगण्य आहे. हो, पण जाता जाता एक गोष्ट मात्र मी मोकळेपणाने मान्य करतो की भ्रष्टाचाराची प्रकारणे उकरून काढण्यात आणि ती लावून धरण्यात मात्र ते अत्यंत निष्णात आहेत. पण यासाठी सत्तेची गरज नसते हे त्यांना कोण समजावणार ? असो. लोकसभा आणि लागलीच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भा.ज.पा. च्या डोक्यात जशी हवा शिरली होती तशीच अवस्था या निवडणुकीनंतर आप ची ही होईल अशी शंका मला आहे आणि असे झाल्यास मात्र आपसाठी भविष्य आत्ता जितके त्यांना सुकर दिसते त्यापेक्षा किती तरी जास्त पटीने धूसर बनेल अशी शक्यता मला जाणवते.

शेवटी इतकेच सांगावेसे वाटते की सत्ता ही सहज मिळणारी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. आम आदमी पक्षाचा संघर्ष टीकेस जितका पत्र होता तितकाच तो कौतुकास्पदही होता. राखेतून फिनिक्स पक्षी उठतो म्हणजे काय हे आम आदमी पक्षाने सगळ्या जगाला दाखवून दिले असे म्हणावयास हरकत नाही पण दुर्दैवाने अजून तरी राजकीय परिपक्वता मात्र यांच्यामध्ये आली नाही हे ही तितकेच सत्य आहे. या सत्याचा स्वीकार करून आपने पुढची वाटचाल सकारात्मक दिशेने करावी यासाठी त्यांना शुभेच्छा.

-सौरभ राघवेंद्र.