कॅलिडोस्कोप
Saurabh Raghavendra
October 18, 2021 • 5 min read
राहून गेलेल्या गोष्टी त्रास देतात खूप. शरीराचं दुखणं बरं झालं की ते विसरून जातो आपण. लहानपणी हात फ्रॅक्चर झाला म्हणून कोणी वयाच्या विशीत नाही रडत. मनाचं मात्र नसतं तसं. मनाची दुखणी नाही विसरता येत- ती ठणकतच राहतात. मनाचं बहुधा कामच असावं ते- जे जे म्हणून घडतं ते सगळं साठवून ठेवण्याचं. आपण बसतो मग, पसारे आवरत, गुंते सोडवत- मी हे असं केलं असतं तर, ते तसंच का झालं..?
उगाचच वाटतं मला कधी कधी की या आठवणींच्या प्रतिबिंबांशी खेळणारे कॅलिडोस्कोप्स आहोत आपण! आपल्याला काय फार तर चार-सहा आवडते आकार पहायचे असतात, पण ते पाहण्यासाठी म्हणून आरसे फिरवायचेच तर जे जे म्हणून साठलंय ते सगळं साकार होणारच! जे घडलं ते नाही बदलता येत आणि जे नाही घडलं ते ही नाही बदलता येत. सांगणारे सांगतात- वर्तमानात जगा- बी हिअर, बी नाऊ वगैरे वगैरे; पण या आठवणींचं ओझं झालं; कितीही झालं तरी असं एकाएकी नाही उतरवता येत. कसंही असलं तरी शेवटी आपलं असतं ते! ह्या आपलेपणाशीच येऊन थांबतं सगळं.
पूर्वी मी पर्वतीवर जात असे रोज. तिथे एक आजोबा येत. ते सांगायचे, "सौरभा, बाळा जे जडतं ते जड. काय समजलास? जे जडतं- ते जड!" हे जडवून घेणं, हा आपलेपणा म्हणजे काय शेवटी? नाही म्हटलं तरी जीव जडतोच की आपला. माणसा-माणसांवर, मुला-बाळांवर, झाडा-फुलांवर, पैश्या-अडक्यावर, घरा-दारावर! म्हणूनच बहुतेक कोणी सुखी माणसाचा सदरा नाही शोधू शकलं आजतागायत. सदरा काढून घेतला की झाली स्वारी दुःखी! साध्या सदऱ्यातही जीव अडकतो आपला! संतांनी मात्र हे जाणलं असावं, म्हणूनच कदाचित तुकोबा म्हणाले, 'न करीं रे संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ।' 'घडी एकी पळ स्थिर' नसणाऱ्या आपल्या मनाला ते म्हणतात, 'बा मना, जडाशी संग करू नको, ममतेचा-ममत्वाच मळ लागू देऊ नको. निश्चल रहा!' पण नेमकं हेच जमत नाही आपल्याला. आपलं मन स्तब्ध नसतंच मुळी. ते अस्थिर असतं, गतिमान असतं. ही गतिमानता आपल्याला या ओझ्याचं ओझं जाणवू देत नाही, पण मग अखेर एखादी निवांत दुपार किंवा शांतावलेली संध्याकाळ येते, ही गती आपोआपच मंदावते आणि दाटून येतं भरगच्च!
म्हणूनच वाटतं मला की कॅलिडोस्कोप्स आहोत आपण सगळे. प्रत्येकाच्या पटलावरच्या प्रतिमा वेगळ्या पण आरसे सारखेच, तेच कदाचित. गती, सातत्य आणि सौख्याची आसही तीच, तशीच! प्रतिबिंबं खरी मानण्याचा स्वभावही तोच! फरक इतकाच की खराखुरा कॅलिडोस्कोप स्वतःला प्रतिमेशी जडवून घेत नाही, आपण मात्र घेतो!